Friday, May 9, 2014

नवीन वर्ष, नवीन अनुभव...


गेल्या एक दोन दिवसात बरेच एस एम एस आलेत. दूर-दूर च्या लोकांचे. हो दूरचेच कारण जवळचं खरं तर कुणी नसतंच आपल्या आयुष्यात. असतो तो फक्त भास. कारण जवळच्या लोकांना औपचारिकता पाळायची गरज नसतेच. तेव्हा जाणीव झाली कि वर्ष संपतंय. तोपर्यंत काही डोक्यात आलं नाही. नाही तरी आजकाल कुणी एस एम एस करत नाहितच. वेळ कुठं आहे आपल्याकडे असल्या फालतू गोष्टींसाठी. 

एक काळ होता खूप एस एम एस यायचे...फोन करणारे पण खूप. आजकाल आई वडील सोडले तर कुणाच फोन नसतो कधी. अन आपण केला तरी लोक उचलत नाहीत हा अनुभव. का झालं असं. परिस्थिती बदलली. सगळे आपल्या पुढे निघून गेलेत अन आपण मात्र तिथच भटकतोय. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपली रीत. अशा कितीकारी गोष्टी मनात घोळत राहतात. 

कळायला लागलं तेव्हापासून कित्येक स्वप्नं पाहिलीत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पण ती काही प्रत्यक्षात आली नाहीच. म्हणून स्वप्नं नकोतच आपल्या आयुष्यात या विचारावर येऊन ठेपलो. तेव्हा कुठं आयुष्य जगायचं समाधान वाटलं. नाही तर तो स्वप्नांचा उद्योग अन त्यामागून येणारा मानसिक त्रास. जो कुणाला कळत नाही. हानी होते ती आपलीच. फक्त प्रत्येक क्षण जगायचं कुठल्याही स्वप्नांशिवाय असं ध्येय ठरवलं काही वर्षांपासून. तेव्हा कुठं आयुष्याला स्थिरतेचा भास झाला. नाहीतर पाठलाग सुरूच होता स्वप्नांचा कुठल्याही पुर्ततेशिवाय.

२०१३ संपल खरं पण काही प्रश्न अन्नुत्तरीत ठेवूनच. अजूनही त्या उत्तरांच्या शोधात आहे. नवीन वर्ष सुरु झालं म्हणून नवीन काही आयुष्यात घडते असं नाहीच. आयुष्य तेच असते अन तसच राहते अन आपण हि तेच. फार फरक पडत नाही. फक्त आपण मनाची समजूत करून घेत असतो नवीन काहीतरी होत असल्याचा. नवीन संकल्प करायचे ते फक्त पूर्ण न होण्यासाठीच. आज केलेल्या संकल्पांचा दुसर्या दिवशी विसर पडतो. तरी आपण ते काही सोडत नाही. मानवी मन नाहीतरी भरकटलेल असतच नेहमी.

अशी कित्येक नवीन वर्ष येऊन गेलीत म्हणून काही घडलं असेल वेगळ असं नाहीच आयुष्यात. मग नवीन वर्ष लागल म्हणून आनंद मानण्यासारख काही उरलंय वाटत नाही. फार फार तर ओळखी-अनोळखी व्यक्तींचे संदेश एक दोन दिवस आधीच येतात कारण जास्त पैसे पडतात ना त्या दिवशी म्हणून. या औपचारीकतेशिवाय वेगळ काही नसते. कुणी HAPPY NEW YEAR म्हटलं म्हणून वर्ष आनंदात जात नाही. तरी आपण ते पाळतो. कशासाठी आणि का याची उत्तरे आपल्याकडे कधी नसतातच. 

अस्थिरतेतून स्थिरतेकडे जाण्याचा प्रयत्न सुरु असतो नेहमी. त्याला किती वर्ष लागतील ते सांगता येत नाही. पण आशा असतेच मनात. ती कधी आपला पाठलाग सोडत नाही. एक संदेश पाठवला म्हणजे झालं असं वाटतं आपल्याला. हल्ली आपण एवढे मग्न झालोय कि तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला संपर्क करायला हि वेळ नाही. तंत्रज्ञानानं जेवढं जग जवळ आणलं तेवढं किंवा त्यापेक्षा कित्येक पटीन मना-मनांमध्ये अंतर निर्माण झालंय. हि आपली शोकांतिका म्हणावी कि काय? हे जेव्हा बदलेल तेव्हा नवीन काहीतरी घडेल. अन्यथा वर्ष येतील हि अन तसेच निघून जातीलही. त्यात आनंद मानण्यासारख काही नाही. 

-सचिन भगत

No comments:

Post a Comment