Thursday, November 27, 2014

अन्नुत्तरीत प्रश्न-रिकामटेकड्या गप्पा

Laptop घेतल्यापासून कित्येक चित्रपट मी गोळा करून ठेवलेत. कधीही चित्रपट पूर्ण न पाहणे हा माझा छंद. दोन तीन तासांचा चित्रपट एका तासामध्ये पाहायचा. काल रात्री झोप लागत नव्हती म्हणून फोल्डर मध्ये कोणता चित्रपट पाहायचा हे शोधत होतो. त्यात Stanley ka Dibba हा एक चित्रपट होता पण मी कधी पहिला नाही. साधारण दोन-तीन वर्षानंतर पूर्ण चित्रपट पहिला. पुणे सोडल्यापासून कुठल्या थीएटर मध्ये जाऊन चित्रपट पहायची इच्छा झाली नाही. चित्रपट पाहून झाल्यावर मन अस्वथ झालं. नकळत कसा भूतकाळात गेलो आणि बालपण आठवायला लागलं. हा लेख म्हणजे Stanley ka Dibba पाहिल्यानंतर ची प्रेरणा. एका चांगल्या कलाकृतीला एवढे दिवस नजरेआड केल्या गेल्याचं वाईट वाटल.

१९९०-ते २००० काळ. म्हणजे बालपण. शाळेत जाताना कधी कधी डब्बा घेऊन जात होतो. सगळे एकत्र येऊन डब्बा खाणे हे ओघाने आलेच. माझ्या डब्यात नेहमी भाकरी असायची. श्रीमंती घरातली पोरं पोळ्या सोडून काही खायची नाहीत. तो फरक स्पष्टपणे जाणवायचा. म्हणून दुपारच्या सुट्टीत घरी येऊन जेवत होतो. त्या वयात काय कळणार. पोळ्या मिळायच्या त्या फक्त सणासुदीला. मी आईला किती वेळ सांगायचो कि मला पोळ्या पाहिजेत पण कधी मिळाल्या नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या गोष्टी लहान असताना आवडायच्या पण मिळाल्या नाहीत, आज त्या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार आहे. आज सगळ्या गोष्टी आवाक्यात असताना मला कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही.
लोक सरकारला कितीही अकार्यक्षम म्हणत असले तरी गरिबांना स्वस्त धन्य दुकानातून धान्य स्वस्तात देण्याचं श्रेय हि त्यांचं. गुणवत्ता कमी जास्त असेल. नाहीतर गरिबांना ह्या गोष्टी कधी मिळाल्या नसत्या.

मध्यंतरी दिल्ली ला जाण्याचा योग आला. मोठ्या हॉटेल ला कार्यक्रम होता. सलग तीन दिवस होतो तिथे. साधारण दोन-अडीच हजार लोक. फाइव स्टार हॉटेल म्हणजे सगळ्या गोष्टी मुबलक उपलब्ध. मी फक्त निरीक्षण करत होतो. दिसायला श्रीमंत असलेली लोकं खरंच किती गरीब असतात हे जेवणाच्या वेळी दिसून यायचं. जस त्यांना कधी मिळालाच नाही अशी त्यांची वर्तणूक.

आजही गरिबांना पुरेसं अन्न मिळत नाही. कित्येकांना उपाशी पोटी झोपावं लागत असेल याची तर कल्पनाच नाही. पुणे विद्यापीठात आज हि कित्येक मुले मेस बंद असली कि काहीतरी खाऊन वेळ निभावून नेतात. कारण बाहेर जाऊन खाण्याची ऐपत नाही. तेवढा पैसा नाही. भविष्याची स्वप्नं घेऊन येणारा प्रत्येक जण फक्त आशेवर सगळ्या गोष्टी निभाऊन नेतो. लोकं magi शौक म्हणून खातात पण आमच्यासाठी ते जेवणापेक्षा कमी नव्हतं. खिचडी बनवून खाणे हा पण त्यातलाच एक प्रकार. जर स्वस्त धान्य दुकाने बंद केली तर आजही कित्येक लोक उपाशी झोपतील. सरकारने सगळ द्यावं या मताचा हि मी नाही. फक्त मेक इन इंडिया ची घोषणा देऊन विकास होणार नाही किंवा स्वच्छ भारत अभियान चालवून देश स्वच्छ होणार नाही किंवा त्याही पुढे जाऊन जन धन योजना सुरु करून लोकांकडे पैसा येईल असंही नाही. सगळं डिजिटल झालं म्हणजे विकास झाला हा समज हि त्याच पातळीवरचा. ६०-७० टक्के मतदान झालं म्हणजे चमत्कार झाला हा आपला भाबळा समज. पण ३०-४० टक्के लोक मतदान करत नाही त्याचं काय? मग कशी काय आपली लोकशाही रुजली? आजही वास्तव काय आहे.

मुठभर श्रीमंत लोकांना गरिबी काय असते हे कळणार नाही. चांगल्या एसी रुममध्ये बसून गरिबांबद्दल पुस्तके, लेख लिहिणारे भारतात कमी नाहीत. पेट्रोल, नैसर्गिक वायू कोण वापरत? त्यावर सवलती चालतात सगळ्यांना. गरिबांकडे ना गॅस आहे ना गाड्या. आज नोकरी करणारे हि त्याचा फायदा घेतात. खर तर त्यांना सवलती द्यायलाच नको. बऱ आम्हाला ते नको असे स्वाभिमानी लोक आहेत तरी कुठे भारतात. शेतकरी लयास जात असताना सरकार मात्र शांत आहे. इंडिया शायनिंग चं बागुलबुवा करून तात्पुरत चांगलं वाटेलही. पण भविष्याचं काय?  सगळेच प्रश्न अन्नुत्तरीत आहेत. सरकार कुठलंही असो सामान्य लोकांच्या जीवनात काही बदल होत नाहीत.


शिक्षण क्षेत्राचे तर कधीच बारा वाजलेत. राजकारण्यांनी प्रचंड कमाई केली शिक्षणसंस्था उभारून. डीएड म्हणजे नौकरी हे समीकरण काळाच्या ओघात नष्ट झालं. पैसा आहे तर नौकरी. एका जागेचा भाव वीस-पंचवीस लाखांवर जाऊन ठेपला आहे. गुणवत्ता असूनही दारोदार भटकणारे विद्यार्थी काही कमी नाहीत. आवश्यक सगळ्या पात्रता असूनही आर्थिक व्यवहारांमुळे विद्यार्थी नोकरी पासून वंचित राहतात. कोण बदलणार हे सगळं. आपण बदलायचं तर सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची हिम्मत आहे कुठं आपल्यात. पोटासाठी चाललेली हि धडपड व्यक्तीला काय करायला लावेल कुणास ठाऊक. परवा एका मॉल मध्ये गेलो होतो. बाहेर एक मुलगा पाम्फलेट वाटत होता. मी ते घेतलही. त्याला सहज विचारलं कि काय शिक्षण झालंय तुझं. तो म्हटला एमबीए. काय वाईट अवस्था आहे. यात दोष कुणाचा? शिक्षण पद्धतीचा कि विद्यार्थ्यांचा. अन्नुत्तरीत आहे सगळं.

                                                                   Sachin Bhagat