Friday, May 9, 2014

असंच काहीतरी......२


एक छोटं आयुष्य अन त्यातले अनेक चढ-उतार. नको वाटतं हे सगळं आता. वाढतं वय आणि वाढत्या जबाबदार्या...कंटाळा आलाय या समीकरणाचा. जगण्याचा आनंद घेण्य ऐवजी त्यातच गुरफटलोय. पावलागणिक नवीन अडचणी उभ्या ठाकतात. एक गुंता सोडवावा तर दुसरा तयार. याच्या बाहेर पडण्याची इच्छा असून सुद्धा काही करू शकत नाही. शिकत असताना वाटायचं कि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही तरी कमवायला लागल्यानंतर व्यवस्थित होईल सगळं. पण तसं काहीच होत नाही. या उलट असंख्य नवीन प्रश्न निर्माण होतात. आणि ते सोडवता सोडवता नाकी नऊ येतात. किती दिवसांपासून घर बांधायचं अस ठरवलं. पैसे येतात आणि जातात. पण नियोजन काही जमेना. प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं आपलं एक घर असावं. पण कदाचित ते स्वप्नं च राहील कित्येक दिवस. सध्या तरी ते दृष्टीक्षेपात नाही. आर्थिकदृष्ट्या सध्यातरी ते शक्य नाही. कर्ज घ्यावं म्हटलं तर बँक वाले उभे पण करत नाहीत. 

सगळ्या बँका फिरून झाल्यात. शेवटी तो प्रयत्न हि असफल. ग्रामीण भागात लोक सावकाराकडून कर्ज का घेतात त्या प्रश्नाचं उत्तर या निमित्ताने मिळालं. आपले प्रश्न आपलेच असतात. त्याचं उत्तर आपल्याकडेच असते पण तरी आपण ते दुसरीकडे शोधात असतो. कुठली आशा असते कुणास ठाऊक. जर आयुष्य असंच असेल तर ते नको आहे मला. माझ्या आयुष्याच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. पण त्यांचा आणि वास्तव स्थितीचा कुठलाही संबंध नाही. दोन्ही गोष्टी दोन टोकाला. आणि मी कुठेतरी भटकतोय या दोन टोकांमध्ये. टोलवा टोलव आहे सगळं. आयुष्याने अनुभवापलीकडे काही दिलं नाही. प्रत्येकजण स्वतःच्या जीवनात मग्न झालाय. बाहेर काय सुरु आहे कुणालाच माहित नाही.

एका वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढण म्हणजे तारेवरची कसरत. पैसा कमावणे फार सोपे आहे पण त्याचं नियोजन आणि बचत प्रचंड कठीण आहे. वेगळ काहीतरी करायचं होतं मला. पण त्या विचारात मीच वेगळा होऊन गेलो. आता भूतकाळात ला मी अन आताचा मी.....कुठलाही संबंध नाही. स्वतःची च दोन प्रतिमा समोर येतात. आणि मी नेमका कुठला याचं उत्तर मला सापडत नाही.


अस्तित्ववाद म्हणजे काय ते पुस्तकं वाचून फक्त व्याख्याच कळल्या. पण आता तो कळायला लागलाय. निझे, सार्त्र ने आणि इतर अनेक विचारवंतानी ती संकल्पना का मांडली असेल ते कळायला लागलय. आपल्याय वाटतं आपण स्वतंत्र आहोत पण नाहीच. आपण गुलाम आहोत आपण  या समाजाचे. आपण तेच करतो जे समाजाला हवं आहे. त्या विरोधात आपण जायचे धाडस करत नाही. अन्यथा कित्येक प्रश्न सुटू शकतात. 

No comments:

Post a Comment