Wednesday, April 27, 2016

Marriage@1Year

लग्न होऊन एक वर्ष पूर्ण झालं आज. त्यानिमित्ताने काही गोष्टी शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केलाय.
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा. २८ एप्रिल २०१५ ला मी विवाहबद्ध झालो. अरेंज्ड मरेज. आज एक वर्ष पूर्ण झालंय. दोघांनी संसार सुरु केला आणि वर्षभरात दोघांचे तीन झालेत. मागे वळून पाहताना अनेक चढ-उतार दिसतात. दोन व्यक्ती...पूर्वी कधीही न भेटलेले... एका बंधनात बांधले गेलेत. एकमेकांचा स्वभाव ओळखण्यात कित्येक दिवस निघून गेलेत.
पूर्वीसारखं आयुष्य राहिलं नाही. बंधने आलीत. जबाबदार्या वाढल्यात. पण तडजोड जास्त नाही केली.  दोन लोकं म्हटल्यावर भांड्याला भांड वाजणारच...ते आमच्यातही झालं. पण ते तेवढ्यापुरतं. ताणल नाही.
साखरपुडा...घर ...लग्न...आणि अपत्य....१०-१२ महिन्यात सर्वकाही. सगळं कसं झटपट होतं गेलं. त्यामुळे मला स्वतःला बदलायला वेळ मिळालाच नाही. खरा प्रवास अजून सुरु व्हायचाय. हि तर सुरुवात होती.
आयुष्य मात्र बदललं आहे. ठराविक वेळेला घरी पोचलोच पाहिजे. नाहीतर फोन सुरु होतात. थोडा उशीर झाला म्हणजे, कुठं होतात. काय काम होतं. अश्या असंख्य प्रश्नांचा भडीमार आणि उत्तरे उत्तरं देताना माझी उडालेली तारांबळ. हे चित्र नेहमीचं. त्यानंतर कुठे चहाचा कप हातात येतो. त्यातही आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे. कधी जायचं मार्केट ला. माझं उत्तरं मात्र एकच..जाऊ नंतर. नंतर कधी ते निश्चित नसतेच. टोलवा -टोलवी दुसरं काय?
पूर्वी बाहेर पडलो कि परतीची ठराविक वेळ नव्हती. कधीही आणि कुठेही. मनसोक्त स्वातंत्र्य.  
जीवनाची हीच तर खरी मजा आहे. आपण प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणायचं आणि जे करायचं आहे तेच करायचं. त्या फक्त ‘हो’ या एका शब्दाने येणारे प्रश्न नाहीसे होऊन जातात.
वेळेवर सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळे जीवनात बरीच शिस्त आलीये. नाहीतर शिस्तीचा आणि आपला काही संबंध नव्हताच.
एखाद्या वेळेस भाजी चांगली नाही लागली तरी खूप छान होती असं सांगावं लागतं. कारण खरं सांगितलं तर तिकडून उत्तरं तयार...तुम्हाला बाहेर खायची चटक लागली आहे. त्यामुळे घरच कसकाय चांगलं लागणार? एवढी छान भाजी तर होती. पैसे जास्त झालेत तुमच्याकडे. म्हणून हे असं होतंय.....आता हे सर्व पुराण टाळण्यासाठी खोटं बोलणे हा सर्वोत्तम पर्याय.  कुठे खरं बोलावं आणि कुठे खोटं याचा आता बराच अनुभव आलाय. त्यामुळे सहसा वाद होत नाहीत.  खरं समजून घेतलं जात नाही आणि खोट्याला डोक्यावर नाचवलं जातं. सुरुवातीला मी प्रत्येक गोष्ट खरी सांगत होतो पण त्याचा उलट परिणाम व्हायचा. म्हणून ते आता कमी केलंय. मी एकटा नाही सगळेच तेच करतात.
कमी जेवण केलं तर तिकडून हि समस्या. आता भूक काय नेहमी सारखी असते का? नेहमी पेक्षा कमी खाल्लं म्हणजे “काय खाऊन आलात बाहेर? म्हणून तर जेवण जात नाहीये. आता हे उरलेलं तुम्हीच खायचं सकाळी.” आपण फक्त नेहमीप्रमाणे ‘हो’ म्हणायचं. पण ते खाण्याची वेळ काही आली नाही.  कधी कधी जबरदस्तीने जास्त जेवण करायची सवय झाली आहे भूक नसली तरी.
भिन्नतेचा आदर केला तर कुठलंही नातं टिकून राहते. आपल्या गोष्टी लादायच्या नाहीत आणि लादलेल्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत. हे तत्त्व मी पाळत आलोय. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व सारखं असू शकत नाही. त्यामुळे समोरच्याने माझ्यानुसार वागायला पाहिजे असं वाटणं म्हणजे मूर्खपणा. पर्सनल स्पेस ज्याची त्याला द्यायलाच हवी. त्यामध्ये आपले अतिक्रमण नको. अन्यथा प्रश्न निर्माण होतात. त्त्यापेक्षा प्रश्नच निर्माण होऊ द्यायचे नाहीत म्हणजे उत्तरं शोधण्याची गरज पडणार नाही. सगळे वादविवाद तासाभरात संपून जातात. पण ते माझ्यामुळेच होतात असं नेहमीचं उत्तर.
मला सहसा औपरीचाकता आवडत नाही. तिला मात्र त्यात भरपूर इंटरेस्ट. कधी कधी इच्छा नसतानाही त्या पार पाडाव्या लागतात. नातं टिकून ठेवायचं म्हणजे या गोष्टी आल्याच. वाढदिवस, सण, नवीन वर्ष किंवा कुठलाही प्रसंग असो मी सहसा कुणाला शुभेच्छा देत नाही. जवळच्या नात्यांमध्ये औपचारिकतेची गरज नाही असं माझं मत आहे. माझे दोन मित्र आहेत. ते आणि मी कधीही एकमेकांना शुभेच्छा द्यायला फोन करत नाहीत.  चुकून एखाद्याच्या वाढदिवशी फोन केला तरी त्याबद्दल ब्र शब्द हि काढत नाही.  बरं आम्हाला कधी गिफ्ट द्यायची सवय नाही. त्यामुळे अडचणीत अजून भर पडते. वेळेनुसार ते हि आत्मसात होईल अशी अपेक्षा आहे. आणि तिच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा हि पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
(गिफ्ट चा विषय निघाला म्हणून: - माझा एक जवळचा मित्र. तो गिफ्ट देतो फक्त मुलींना. कुणाला पुस्तक, कुणाला मोबाईल आणि अजून काय असेल ते माहित नाही. एक नंबरचा ढोंगी आहे. खरं कधीच सांगत नाही. अंगावर आलं कि मग सांगतो. पण त्याचं दुर्दैव असं कि त्याने काही अश्या भेटवस्तू कुणाला दिल्या कि आम्हाला माहित होतेच. मग सुरु होते खेचाखेची.)
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनुष्य बदलत जातो. आसपासच्या कित्येक लोकांमध्ये हा बदल पाहिलाय. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर या दोन टप्प्यात प्रत्येकजण वेगळा आढळून येतो. स्वतःची जबाबदारी ओळखून पार पाडण्याचा प्रयत्न करतोय.


तिचंही आयुष्य बदललं आहे. माझ्यासारख्या व्यक्तीसोबत जुळवून घेतलंय तिने. काही झालं तरी अंतर देत नाही. मला काय आवडते आणि काय नाही याचाही अभ्यास झालाय तिचा. सर्व गोष्टी वेळेवर मिळतात.
मुलगा हा बायको आणि आईवडील यांच्यातील दुवा. स्वतःला त्याला यात संतुलन ठेवावं लागते. नाहीतर त्रास त्यालाच.  हे मी जाणून आहे. त्यामुळे कुणाला काय सांगावं आणि किती सांगावं याचं सतत भान ठेवावं लागते.काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागते एका मर्यादेपर्यंत. कधी-कधी एक पाऊल मागे घेणच चांगलं.  जीवन जगण्याची माझी संकल्पना फार सोपी आहे. प्रत्येक क्षण सुखासमाधाने घालवायचा एवढंच ध्येय. आणि हेच मी तिला नेहमी सांगत असतो. त्यात मी यशस्वी व्हावं एवढीच मनिषा.
(हे लिखाण म्हणजे एकच बाजू आहे. जाणूनबुजून तसं केलंय.)

-सचिन भगत