परिवर्तन...आनंद...क्षण. परिवर्तन हे निरंतर तर आनंद अथवा क्षण अल्पजिवी. परिवर्तन होताना यांची गाठभेट होतच राहते. या मार्गक्रमणात आनंदाच्या व्याख्या हि बदलत जातात. त्या परिवर्तनाने कित्येक आनंदाचे क्षण ही लुप्त होऊन जातात. वर्तमानात आनंद या शब्दात ते क्षण बसत नाही. कारण काही असो. जीवनाचा फोलपणा असो...स्वतःची ओळख असो...उमगलेला जीवनाचा अर्थ असो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण बदलत जातो...आपल्या संकल्पना बदलत जातात...जीवनाचा अर्थ बदलत जातो. मुळात आपण जगतो ते आनंदाच्या क्षणांसाठी. सारी धडपड हि त्याच्यासाठी. ते क्षण येतात आणि काही कळण्याच्या आत निघून जातात. पुन्हा आपला प्रवास ते मिळवण्यासाठी.
परिवर्तन जळगाव यांच्या जीवनातील 'आठवणीतील आनंदाचे क्षण' या उपक्रमात मनोज ने लिहायला भाग
पाडलं. हे लिखाण मला कित्येक वर्षे मागे घेऊन गेलं. ज्या वर्षांचा मागमूस ही
नव्हता त्यात पुन्हा गेलो. विस्मृतीत गेलं होतं सगळं. जशास तसं आठवत नाही. ज्या
काही पुसटश्या आठवणी आहेत त्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न.
आनंदाचे क्षण:
एक-
२०००-२००१ चा काळ. उदारीकरण सुरु होऊन
दशक उलटत होतं. त्याचा परिणाम सगळीकडे जाणवत होता. शिक्षण क्षेत्र ही त्याला अपवाद
नव्हतं. सिंदखेड च्या बस स्टॉप वर बसलो होतो. वाट पाहणं सुरु होतं. तास दोन तास
बसलो असेल. त्याला कारण ही तसंच होतं. तो निकालाचा दिवस होता. उत्सुकता होती.
शिक्षण जीवन बदलू शकते हे समजण्याचा तो काळ. ती आशा कुणाला नसणार. मी त्याला अपवाद
कसा ठरेल. त्या साली मी दहावीला होतो. इंटरनेट ग्रामीण भागात पोचायचं होतं. डिजिटल क्रांती व्हायची होती. दहावी म्हणजे त्यावेळी
तो महत्त्वाचा टप्पा. त्यावर पुढे काय करणार हे ठरवायचं. किती गुण मिळवले यावर
गुणवत्ता ठरवली जायची. मुळात परीक्षेत मिळणारे गुण आणि गुणवत्ता याचा तिळमात्र
सबंध नाही हे समजायला पुढे अनेक वर्षे गेली. असो. ज्या शाळेत मी शिकत होतो ती नवीन
स्थापन झालेली. नॉन-ग्रांट. बिन-पगारी शिक्षक. शाळेच्या इमारती व्हायच्या होत्या.
पत्र टाकून सप वापरून वर्ग तयार केलेले. त्या
शाळेसारखं आमचं होतं. वर्तमानात काहीच नव्हतं. फक्त सुवर्ण भविष्याचं स्वप्न. असं
असताना सुद्धा शैक्षणिक वातावरण चांगलं होतं. स्पर्धा होती...शिक्षकांची
शिकविण्याची तळमळ होती. त्या तालमीत आम्ही तयार होत होतो. एका बस मधून सर उतरले
आणि मी त्यांच्या मागे धावत गेलो. सर निकाल काय आहे?
सर खुश होते. पहिला आहेस तू. ८२ टक्के.
इंग्रजीत ८९ मार्क्स. ते ऐकलं. तेव्हा झालेला आनंद पराकोटीचा. तो पहिला क्षण
जेव्हा स्वतःबद्दल काहीतरी करू शकतो याचा आत्मविश्वास दिला. स्व ची जाणिव म्हणता
येईल. त्यावेळेस हे खूप मार्क्स झालेत. आता असणारी मार्कांची खैरात त्या वेळी
नव्हती. पुढे त्या इंग्रजी विषयाने मला तारलं. पदवी आणि पदव्युत्तर त्यातच.
त्या शाळेत अजूनही बोर्डवर नाव आहे
माझं. पहिला असल्याने एक चांदीचा शिक्का बक्षीस म्हणून मिळालेला. तो टिकवता आला
नाही तो भाग वेगळा. ते यश तसं एकट्याच नव्हतंच. त्यामागे शिक्षकांची मेहनत होती.
दांडगे सर याचं इंग्रजी शिकवण, वाघ सर याचं गणित अजूनही स्मरणात आहे. त्या लोकांनी
आम्हाला घडवल. न घडण्याचे हजार गुण होते आमच्यात. त्यामुळे त्यांच्या समोरील
आव्हानांची कल्पना येईल . दगडांना पैलू पाडण्यात ते यशस्वी झाले असं म्हणता येईल.
स्वप्न पेरली त्यांनी आमच्या आयुष्यात.
सगळीकडे उजाड रान असताना हिरवळीची स्वप्ने दाखवली. आयुष्यात जे काही करता आलं
त्याची सुरुवात त्या शाळेत.
प्रचंड आनंद देणारा तो क्षण. तेवढे गुण
पुन्हा कधी मिळाले नाहीत आयुष्यात.
आता शाळा बदलली आहे. सिमेंट च्या भिंती
झाल्यात. पुष्कळ झाडे लावण्यात आली त्यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली.
दोन-
आयुष्यात प्रत्येक गोष्टी ठरवून होत
नाही. तसंच ठरवून मित्र हि होत नाही. तसच काहीतरी आमच्यात. मुकेश मला पहिल्यांदा भेटला तो १९९८ साली. आठव्या
वर्गात. फक्त एक वर्ष कारण नंतर शाळा बदलली मी. मित्र वगैरे म्हणता येणार नाही
त्यावेळेस. पण वर्ग मित्र. अनोळखी...वर्गमित्र...मित्र आणि सर्वकाही असा तो
प्रवास. मनोज भेटला त्या एम.जे. च्या होस्टेल ला २००४ साली. आणि मग सान्निध्यात
घालवलेला प्रत्येक क्षण हा आनंददायी. नाना तर्हेचे उद्योग केलेत...भटकंती असो...खेचाखेची
असो...चित्रपट असो... हॉटेलिंग असो की एका डब्यात दोन ची कसरत. व्यक्त करता येणाऱ्या आणि व्यक्त न करता
येणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. यांच्या सान्निध्यात आनंदाची परिभाषा बदलली. आपलं
आयुष्य हे आपलं नसतेच. आसपास अनेक लोकं आपल्यावर प्रभाव टाकत असतात. माझं लिखाण,
वाचन ही त्यांची देण, त्यांचा प्रभाव. सहवासाने माणूस घडतो तसा तो प्रकार. माझ्या
चाकोरीबद्ध आयुष्याला यांनी यु टर्न दिला. वेळ-प्रसंगी आधार दिला. मला बदलायला भाग
पाडलं बहुतांशी. ते माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित प्रवास कठीण झाला असता. अनेक
वाद-विवाद, विचारांची भिन्नता असूनही सोबत
कायम राहिली. असं कुठलंही क्षेत्र नसेल ज्यावर चर्चा होत नसेल. पुढे मी आणि मुकेश
पुण्यात कित्येक वर्ष सोबत होतो. गमती-जमती, चांगले-वाईट प्रसंग आम्ही पाहिलेत,
अनुभवलेत. रोज कमीत कमी एक फोन ठरलेला असतो त्याचा. आम्ही जेव्हा ही भेटतो तेव्हा
आम्हाला एकांत हवा असतो गप्पा मारण्यासाठी.
तीन-
पदवी संपली होती. नेट-सेट हे उद्दिष्ट
होतं. पुढे पुण्यात विद्यापीठात जायचं तर प्रवेश परीक्षा होती. इतर विद्यापिठातील
विद्यार्थ्यांसाठी फक्त सहा जागा त्या तीन ओपन तर तीन राखीव. ऐकीव माहितीवरून
प्रवेश मिळणे दुरापास्तच. जळगाव सोडणं कठीण होतं. अर्ज भरून ही परीक्षेला जायची
इच्छा नव्हती. त्यावेळी मनोज म्हटला तू नाही गेलास तर लोकं म्हणतील लायकी नव्हती,
त्यापेक्षा पास हो आणि जाऊ नको. जगाला ताठ मानेने सांगता येईल. मी २३ एप्रिल ला
प्रवेश परीक्षा दिली. तो पुण्यात जाण्याचा पहिला प्रसंग. जनरल मध्ये प्रवास करणं म्हणजे
हाल च. ते अनुभवलं. २००-२५० विद्यार्थी
आणि जागा फक्त सहा. आठ-दहा दिवसा-नंतर विद्यापीठात फोन केला. शेख madam
होत्या तेव्हा. तुझा नंबर लागला. लवकर
येऊन प्रवेश घे. पण माझा काही विश्वास बसेना. अजून दोन वेळा फोन केला. ती बाई
कंटाळली आणि म्हटली आता जर तुझा फोन आला तर प्रवेश रद्द करून टाकते. हा टर्निंग पोइंट. बिफोर आणि आफ्टर...आयुष्याचे दोन भाग...पुण्यात
जायच्या पूर्वी आणि पुण्यात गेलानंतर ...प्रचंड दरी आहे. मी ...फक्त मी न राहता
वेगळा काहीतरी झालो. आयुष्य बदललं...जीवनाकडे
पाहण्याचा दृष्टीकोन बदलला...यश-अपयश हे फक्त शब्द न राहता यशाला अनेक हाथ आहेत, अपयशाला कुणीच वाली नाही
हे कळून चुकलं. व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात याला अर्थ नाही. समाज फक्त यशस्वी
लोकांचे गुणगान करतो...ऐकतो...अपयशी लोकांना या समाज व्यवस्थेत स्थान नाही. हि
जाणिव त्या विद्यापीठात झाली. म्हणून तिथला प्रवेश गेम-चेंजर. आनंद देणारा क्षण. (एम.
ए. झाल्यावर एम.फिल , वृत्त पदविका वगैरे.
विद्यापीठात वसतिगृह तीन आणि पाच चा मुक्काम, रात्री-बेरात्री भटकंती...पुण्याचा
आसपास गड-किल्ले यांच्या वार्या. काही
ठराविक व्यक्तींसोबत पालथा घातलेला फर्गुसन रोड, टोकीज, हॉटेल्स, ओपन कॅन्टीन,
ओल्ड कॅन्टीन, आदर्श कॅन्टीन चे ते क्षण, पैसे नसताना खिचडी बनवून खाण्याचा आनंद
इत्यादी.)
*श्रीमंत भाई, चोथवे सर,मिश्रा सर,
बालाजी सूर्यवंशी, नामदेव पवार, सुनील कणकटे, तानाजी, राहुल राजपूत यांच्या सोबत
घालवलेले क्षण...
चार- :
नेट परीक्षे बाबतीत जे कित्येकांचं
झालं तोच संघर्ष...त्रास माझ्याही वाटेला आला. कितीही प्रयत्न करून असफल. जवळ जाऊन
हुलकावणी अनेकदा. ओपन मधून पास व्हायचा किती संघर्ष असतो हे काही वेगळं सांगायला
नकोच. समोरचे प्रश्न वाढत होते...शेक्सपिअर
ने म्हटलंय...
“When sorrows come,
they come not single spies. But in battalions!”(Hamlet)
तसाच काही प्रकार झाला होता. अडचणी
वाढत होत्या. पूर्ण वेळ अभ्यास कठीण होता. त्यामुळे शेवटी पर्याय म्हणून अभियांत्रिकी कडे
वळलो. २०१२ च्या नेट परीक्षेची फोर्म भरण्याची जाहिरात आली होती. मला फोर्म भरायचा
नव्हता. सोडून दिलं होतं. तेव्हा पंढरपूर ला होतो. फोर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी
सिद्धार्थ काळे या माझ्या ज्युनिअर चा फोन आला. फोर्म भरला का तू? त्यानं विचारलं.
मी नाही म्हटलं. त्यानं आग्रह केला. तो म्हटला स्कॅन करून मार्क लिस्ट पाठव, बाकी
मी करून घेतो. इच्छा नसताना सुद्धा मी त्याला मार्क लिस्ट पाठवून दिली. डी.डी.
वगैरे त्यानेच केलं सगळं. सेट भवन ला जावून फोर्म भरून दिला.
जून च्या शेवटच्या आठवड्यात रविवारी
परीक्षा होती. जावं कि जावू नये या द्विधा मनस्थितीत होतो. रात्री बस स्तोप ला
गेलो. पंढरपूर वरून चार-पाच तासाचा प्रवास. पंढरपूर बस-स्थानकावरून सुटणारी साडे-दहा ला
असणारी बस निघून गेली होती. त्यानंतर फक्त कर्नाटक वरून येणाऱ्या बसेस असायच्या.
पण त्या वेळेस बेळगाव प्रश्नाचं आंदोलन चिघळल होतं त्यामुळे त्या बसेस येणार
नव्हत्या. मी रूम वर जायला निघालो. बस स्टॉप च्या बाहेर येत नाही तर रोहिदास ढाकणे
या मित्राचा फोन आला. कुठपर्यंत आलात त्यानं विचारलं. मी त्याला परिस्थिती
सांगितली. आपण भेटू...तुम्ही या तर खरं. मी पुन्हा बस- स्टॉप ला आलो. रात्री
दोन-अडीच वाजता ज्यादा बस सोडण्यात आली पुण्याला जाण्यासाठी. हडपसर ला परीक्षा
केंद्र होतं. पहिला...दुसरा पेपर सोडवला. तिसरा पेपर मधील शेवटचे पंचवीस प्रश्न
सोडवणे जिवापार झालं. सोडून दिले तसेच आणि बाहेर पडलो. भेटी-गाठी झाल्या आणि
पंढरपूर ला परतलो.
निकाल वगैरे ची चिंता नव्हतीच. फेल
शिवाय काय होणार...याचा आत्मविश्वास.
जून २०१२ च्या नेट परीक्षेचे दोन निकाल
जाहीर झाले होते त्या वेळेस. मी कधीही निकाल पाहिला नव्हता. परीक्षा क्रमांक हि
माहित नव्हता. दुसरा निकाल जेव्हा जाहीर झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी श्रीमंत जाधव
या मित्राचा फोन आला. तुझा परीक्षा क्रमांक सांग म्हणे. मला आठवत नव्हता. मी पास
होऊ शकत नाही. जाऊ द्या ना. मी म्हटलं. त्यांचा आग्रह एवढा कि मी आठवून आठवून ५०३०००४७
असा क्रमांक सांगितला. तो चुकीचा होता. पुणे सेंटर वरून जेवढे इंग्रजी विषयात पास
झाले होते ते सर्व माहित झाले होते. फक्त एक परीक्षा क्रमांक कुणाचा हे समजत
नव्हतं. दोन-तीन दिवस गेलेत त्यात. बर्याच जणांचे फोन यायचे. विद्यापीठ
विद्यार्थ्यांचा अभ्यास एवढा कि त्यांनी शोध सुरूच ठेवला आणि बी ची सिरीज पर्यंत
येऊन ठेपले. श्रीमंत चा अजून एकदा फोन आला. तू नंबर चेक कर पुन्हा ...बी ची सिरीज
म्हणजे तूच असशील. शेवटी नाईलाजाने नेट च्या वेबसाईट ला जाऊन लॉग इन केलं (पासवर्ड
मिळवता येतो इमेल असला कि....माझा परीक्षा क्रमांक होता...५०३०१७४७). समोर मेसेज
दिसला....Congratulations………….अजून बरंच काही लिहिलेलं होतं.
ज्या गोष्टीचा एवढा पाठलाग केला पण ती दूर पळत
होती. जेव्हा पाठलाग सोडून दिला...तेव्हा ती माझ्यापर्यंत.
नेमकं आयुष्यात असंच होतं. अपेक्षित नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा
आनंद शब्दात सांगता येत नाही.
नेट पास झाल्यावर मी पंढरपूर सोडलं.
अनेक आठवणी आहेत तिथल्या. न विसरता येण्यासारख्या. तिथली स्वप्ने प्रत्यक्षात आली
नाही याची खंत...........................
*पंढरपूर मध्ये माधव सरांशी झालेली ओळख,
त्यांच्या सोबत केलेली भटकंती, सोबत घालवलेले क्षण अविस्मरणीय.
पाच-
वर्षानुवर्षे पत्र्याच्या घरात राहून
उबग आला होता...पावसाळा असला की गळती,
हिवाळ्यात कडाक्याची थंडी...घरी असेपर्यंत ते अनुभवलं होतं.. ....त्यामुळे घर कायम
मनात घर करून होतं...२०१५ ला स्वतःच घर तयार झालं....स्वतःच झालेलं
घर...लग्न....आणि मुलगा....सर्व आनंद देणाऱ्या गोष्टीच. अनेक वर्ष जे स्वप्नात
होतं ते प्रत्यक्षात उतरलं हा पेक्षा आनंद नसतोच कुठला. तसंही ते सोपं नव्हतंच...लोन
साठी बँकांच्या वार्या...नन्तर हप्ते...ओघाने येणाऱ्या adjustments. मानलं तर
त्यात ही आनंदच. जीवन ही एक सर्कस आहे...कसरती कराव्या लागतात. शेक्सपिअर च्या “As
You Like It” मधील मोनोलॉग ची सुरुवात सर्व काही
सांगून जाते...
All the world’s a stage,
And all the men and women merely players;
They have their exits and their entrances;
And one man in his time plays many parts,
His acts being seven ages.
आनंदाचे क्षण यावर लिखाण करताना जे
जगासमोर मांडता येते तेच लिहिण्याची कुवत... सांगता येणारे अनेक प्रसंग आहेत....परंतु
ते सांगता येत नाहीत...समाजात जगताना चौकट ओलांडता येत नाही...त्या आपल्या मर्यादा.
म्हणूनच आपण सामान्य. कारण असामान्य लोकांना चौकट हा प्रकार नसतोच. उधळून लावतात
ते या सार्या चौकटी आणि मुक्तपणे संचार करतात. जीवनाचा खर्या अर्थाने आनंद घेतात.
आनंदाचे क्षण तसे दुर्मिळ ...पण
त्यांचा पाठलाग सुटत नाही...धडपड सतत...ती काही केल्या थांबत नाही. आवक वाढली की
गरजा वाढतात तसेच आनंदाच्या संकल्पना ही बदलतात...मग कितीही असलं तरी आपला संघर्ष
सुरूच...तो थांबत नाही. ज्या क्षणांनी आनंद दिलाय ते विस्मृतीत गेले. आणि मी नवीन
क्षणांच्या शोधात आहे. नेमकं काय मला कळत
नाही. प्रतिकूलतेत अनुकुलता शोधनं ज्याला
जमलं तो कायम आनंदी.
परिवर्तन जळगावचे आभार त्यांनी मला
माझ्याच आयुष्याची आनंदाची सफर घडवलीत म्हणून.
।।
धन्यवाद ।।।
परिवर्तनच्या विविध उपक्रमासाठी
सबस्क्राईब करा परिवर्तनचं युट्युब चॅनेल
https://www.youtube.comll/channel/UCvmsOWIXxS-lIuzpwRw1JNQ
https://www.facebook.com/parivartan.jalgaon/
सचिन भगत
९९२२१२७३८५