एका whats app ग्रुप मध्ये होतो. मी सहसा कुठली पोस्ट टाकत नाही. फोरवर्ड तर कधीच नाही. फक्त आलेल्या पोस्ट वाचायच्या. यापलीकडे काही नाही. त्या ग्रुप मध्ये बरेच सभासद होते. सर्व सुशिक्षित. त्यातले बहुतांशी सभासद एकाच विचारधारेचे. त्यामुळे पोस्ट ही तश्याच. तशी आमची कुठली विचारधारा नाही. कारण विचारधारेने पोट भरत नाही हे कधीच समजलेलं. जे चांगलं ते चांगलं. मानवते पलीकडे कुठली विचारधारा असू शकत नाही. दुर्दैवाने तसं होत नाही. त्या विशिष्ट विचारधारेच्या पोस्ट एक-दोन लोकांना काही पटत नव्हत्या. त्यांचे नेहमी वादविवाद चालायचे. सगळा ग्रुप तुटून पडत होता. म्हणजे वाद-विवाद ही virtual. मी फक्त वाचत होतो. न राहवून मी आधी त्या विचारधारेच्या समर्थन करणाऱ्या पोस्ट टाकू लागलो आणि नंतर त्याच्या विरोधात. हे सगळं ठरवून केलं होतं. समर्थन करत होतो तो पर्यंत ठीक पण नंतर जेव्हा विरोध करू लागलो तर काही दिवसानंतर admin ने मला remove केलं. तसंही मला काही घेणं-देणं नव्हतं. मला चांगलं वाटलं. आणि admin ची कीव आली. ज्या विचारधारेचा तुम्ही स्विकार करता, प्रचार करता तिचा तुम्ही बचाव करू शकत नाही, चांगलं काय ते पटवून देऊ शकत नाही या पेक्षा फोलपणा काय असू शकतो. तसंही जगाच्या कुठल्याही कोपर्यात जा खरं ते खरं. त्याला पटवून द्यायची गरज नसते. ते सर्वाना माहित असते.
लढा विचारांचा विचारांशी असला पाहिजे. तो वैयक्तिक असता कामा नये. कुणी आपल्या विचारधारेशी सहमत असेल असं नाही. पण आजकाल लोकांना ते जमत नाही.
आज-काल कुठेही जा. चहाची टपरी असो...सलून, नाश्ता सेंटर, बस स्टोप, मार्केट ला किंवा अजून कुठेही लोकं विभागलेले आढळतात. नेमका हाच कसा चांगला हे सांगण्याची चढा-ओढ. इकडे तुम्हाला खायला नाही...हाल आहेत. कुणी येतंय का मदतीला. ज्याचं समर्थन करतात ते ओळखतात तरी का आपल्याला?
गेल्या ५-६ वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढलंय. ज्याला कवडीची अक्कल नाही तो ही तज्ञ झालाय. Whats app University मधून आलेले लेख वाचून ज्ञान समृद्ध झाल्याचा भास कित्येकांना. खरं-काय, खोटं-काय कुणाला माहित नाही. कित्येकदा आलेली माहिती ही जाणीवपूर्वक पसरवली गेलेली असते. काही लोकांना काम-धंदा नाही. ते फक्त forwarding करत असतात. आपण काय forward करतोय याचा कुणी विचार करत नाही.
विचारधारेच्या या गफलतीमुळे कित्येक लोकं एकमेकांपासून दूर जात आहेत. कटुता निर्माण होत आहे नाते-संबंधात. व्यक्ती मोठा की विचारधारा याचा ही विचार व्हायला पाहिजे. आपल्या जवळ असलेला व्यक्तीच वेळ प्रसंगी मदत करू शकतो. दुसरं कुणी येत नाही मदतीला.
व्यक्ती-व्यक्तींमध्ये दरी निर्माण करणारी कुठलीही विचारधारा कधी ही वैश्विक होऊ शकत नाही. लोकांना विभागणारी विचारधारा हवी की जोडणारी. ते आपण ठरवायचं. बाकी काही नाही. आपण सारे सुज्ञ.
सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव