Wednesday, February 17, 2016

इंजिनीरिंग एक्स्पिरिअनस


मी कला शाखेचा विद्यार्थी. इंजिनीरिंग चा ई पण माहित नव्हता. विद्यार्थी असताना कला शाखेत प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहत होतो. कधी कल्पना हि केली नाही कि ते सोडून दुसरंच काहीतरी करावं लागेल.
नशिबाने आणि समोर येणाऱ्या परिस्थितीने मला इंजिनीरिंग मध्ये ढकललं. इंजिनीरिंग ला कम्युनिकेशन स्कील हा विषय असतो. तो शिकविण्यासाठी एम. ए. ईंग्रजी असणे अनिवार्य.
त्या आधी मला कम्युनिकेशन चा “क” पण माहित नव्हता. मी शिकलो ते कथा, कादंबर्या, आणि कविता. त्यामुळे कम्युनिकेशन चा काही संबंध आलाच नाही.
मग सुरु झाला एक प्रवास जे शिकलो त्यापासून दूर जाण्याचा आणि ज्याचा गंध हि नव्हता ते शिकण्याचा. कल्पनेतल्या आयुष्यातून व्यावहारिक आयुष्याकडे मार्गक्रमण. ते काही सहज होत नाही. एवढं आयुष्य एक गोष्ट मिळवण्यामागे धावायचं आणि जवळ आल्यावर नशिबानं आपल्याला कुठंतरी लांब फेकून द्यायचं ते परत न येण्यासाठीच.
मुळात इंजिनीरिंग मध्ये येण्याचा मानस नव्हता. पण नेट पास होईना. नेट पास  झाल्याशिवाय सिनिअर कॉलेज  ला प्राध्यापक होता येत नाही. आणि सिनिअर कॉलेज ला सी एच बी वर जॉब करण्याची इच्छा नव्हती कारण त्यातून मिळत होती तुटपुंजी रक्कम कि ज्यावर उदरनिवार्ह हि शक्य नव्हता.  इंजिनीरिंग मध्ये त्या मानाने चांगलं पैसा मिळत होता.
२०१० मध्ये ठरवलं कि आता इंजिनीरिंग कॉलेज ला जॉब करायचा. मग सुरु झाली शोधा शोध.  पुण्यामध्ये भरपूर कॉलेजेस आहेस.  त्यामुळे जॉब लवकर मिळाला. पुण्यापासून ३०-३५ किमी अंतरावर च्या एका महाविद्यालात रुजू झालो. पगार होता २०-२२ हजार. पण मी समाधानी नव्हतो. शोधा शोध सुरूच होती. महिनाभरात ते कॉलेज सोडलं आणि  दुसरं जॉईन केलं. तिथे हि काही रमलो नाही. धर-सोड सुरु राहिली आणि २०११ ला पुणे सोडून पंढरपूर च्या एका कॉलेज ला रुजू झालो. तोच एक टर्निंग पोइंट होता.  तिथं इंजिनीरिंग खर्या अर्थाने कळलं. सिनिअर कॉलेज ची आशा सोडली होती.  त्यातच २११२ ला मी नेट पास झालो. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. फार दूर निघून गेलो होतो. परिस्थिती हि बदलली होती. एका जागेसाठी २०-२५ लाख रुपये असा रेट सुरु झाला होता.  त्यामुळे इंजिनीरिंग मध्येच करिअर असं ठरवून टाकलं. म्हणून कुठल्याही सिनिअर कॉलेज ला अप्रोच केलं नाही.

इंजिनीरिंग ने काय दिलं तर मी तंत्रज्ञानाशी अवगत झालो. जगाबरोबर चालता झालो. व्यावहारिक अप्रोच अवगत झाला. इंग्रजी विषयात पदवी घेऊनही मला इंग्रजी बोलता येत नव्हतं. आणि इंजिनीरिंग मध्ये टिकायचं तर इंग्रजी बोलल्याशिवाय पर्याय नव्हता.  इंग्रजी बोलायला शिकलो ते या कारणाने. व्यावसायिक शिक्षण आणि पारंपारिक शिक्षण यातील फरक स्पष्टपणे दिसून आला.
इंजिनीरिंग ला शिकवायला लागल्यानंतर कळलं कि कम्युनिकेशन ची पण व्याख्या आहे. ती म्हणजे एकमेकांमध्ये माहितीची देवाणघेवाण वा आदानप्रदान.  शिकवायचे ते संभाषण कौशल्य. पण इथे इंग्रजी भाषेचे तर वांदे आहेत. मग कौशल्य कुठून येणार. तरी पण आपण ते शिकवायचं. आपल्याही उपजीविकेचा प्रश्न आहे ना. मग हे रहाटगाडग चालवण्याशिवाय पर्याय नाही. फक्त इंग्रजीत फाड-फाड बोलायचं. कुणाला समजो अगर ना समजो. प्रत्येकाला वाटतं किती हुशार आपण. पण ज्ञानाचा आणि भाषेचा कुठलाही संबंध नाही. भाषा फक्त ज्ञान व्यक्त करण्याचं साधन. पण काय ना आपण खरं सांगू शकत नाही आणि लोकांना खरं ऐकण्याची सवय राहिली नाही. तंत्रज्ञानाच्या अतिवापराने खरं काय आणि खोटं यात काही फरक च उरला नाही. कित्येक गोष्ठी इतरांच्या नावावर खपवल्या जातात.
कित्येक विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि विचारतात “सर, इंग्रजी बोलायचं कसं?”  काय उत्तरं देणार मी. मलाच माहित नाही मी ते कसं शिकलो. दोन-चार पुस्तके वाचायची आणि ठराविक उत्तरं तयार करून ठेवायची. म्हणजे आपला धंदा छान पैकी चालतो. सगळीकडे हेच सुरु आहे. कुणालाही कुणाचं घेणं-देणं नाही. भाषा शिकवली जाऊ शकत नाही, ती शिकावी लागते. तरी पण जाहिराती दिसतात : इतक्या दिवसात तुम्हाला इंग्रजी शिकवू.  एवढे पैसे लागतील. झटपट बोला इंग्रजी म्हणणारे झटपट प्रसिद्ध आणि श्रीमंत झालेत. किती लोक इंग्रजी शिकलेत हा भाग अलाहिदा.
मुळात आपली भाषा शिकण्याची पद्धतच चुकीची आहे. आपल्याला शिकवलं जाते ए फोर एपल...ते झेड फोर झेब्रा. अन मग ग्रामर शिकवलं जाते. लोकांनी दुकाने मांडली आहेत आणि चांगली चालत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सुळसुळाट झालाय. पण तिथं एकही शिक्षक इंग्रजी बोलू शकत नाही. बिच्चारे लोक ....काही कळत नाही त्यांना. आपलं पोरगं इंग्रजी माध्यमात शिकावं हि इच्छा प्रबळ झाली आहे. आणि संस्थाचालक आपला गल्ला  भरताहेत. सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शिक्षणाचं इंग्रजीकरण सुरु आहे. पण याची गरज आहे  का याचा विचार कुणाकडे हि नाही. भाषा शिकण्यासाठी ऐकणं आणि बोलणं गरजेचं आहे. पण इथे ते होतंच नाही. वर्षानुवर्षांपासून हेच सुरु आहे. मग काय घंटा इंग्रजी येईल.
खाजगी क्षेत्रात संभाषण कौशल्याशिवाय पर्याय नाही. ती अवगत करावीच लागतात. कला शाखेत ज्याची कमतरता होती ती इथं भरून निघाली. आता रुळलो आहे इथं.  अडचणी खूप आल्यात. पण त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला.
एका अनोळखी क्षेत्रात करिअर सुरु केलं होतं. पुढे काय होईल याची चिंता नव्हती. एक एक आवश्यक असलेली गोष्ट शिकत गेलो. सुधारण्यास भरपूर वाव आहे.  आणि शिकण्याची प्रक्रिया हि निरंतर आहे.
स्वप्न...काय स्वप्न होतं माझं?. विसरलो आता सगळं. थोर लोकं सांगून गेलेत कि मोठी मोठी स्वप्ने पहा. पण इथं खायला नाही म्हणे स्वप्ने पहा. मी स्वप्ने पाहिलीत....ती उद्धवस्त होतानाही पाहिलीत. पण त्या अनुभवाने मला सक्षम केलं. अनपेक्षित गोष्टी हि घडल्यात.
इथे मुलभूत गरजा अपूर्ण आणि म्हणे रिसर्च करा.
कसा करायचा रिसर्च आणि कशी पहावी स्वप्ने? इथे प्रत्येकाला आयुष्याची पडली आहे. मोठ्या लोकांना बोलायला काय जातं हो. समाजात जाऊन बघा म्हणजे कळेल काय परिस्थिती आहे ती. आता कुठे कित्येकांची पहिली पिढी शिकतेय. आपलं भविष्य सुधारू पाहतेय. प्राथमिक गरजा अजून त्यांच्या पूर्ण नाहीत. कर्ज काढून शिकतात. आणि नोकरीसाठी जावं तर म्हणे इतके लाख घेऊन या.  पण कसं?
इंजिनीरिंग मध्ये शिकवणं हा माझ्या आयुष्यातला एक अपघात होता...ना मनी ना ध्यानी....पण तेच आता जीवन होऊन बसलंय आणि मलाही तेच हवंय. गरजेच्या वेळी या क्षेत्राने मला आधार दिला. योग्य वेळी सावरलं. अन्यथा मी माझाच राहिला नसतो. (इंजिनीरिंग ला एनजिनीरिंग उच्चारतात)
सचिन भगत