Saturday, September 21, 2019

मिटिंग पॉइण्ट


जेव्हा जेव्हा मी भूतकाळात जातो तेव्हा तेव्हा काही प्रसंग पुन्हा पुन्हा नजरेसमोर येतात. विद्यार्थी असताना जेवढी भटकंती झाली त्यात अनेक प्रसंग आलेत. चांगले-वाईट दोन्ही. काही विस्मृतीत गेले काही अजूनही अस्तित्व टिकवून आहेत मनाच्या कोपर्यात कुठंतरी. आपलं आयुष्य म्हणजे घटनांचं भांडार आहे. जळगाव ला पदवी करत असताना एम. जे. कॉलेजच्या वसतिगृहात राहत होतो. संध्याकाळी सारी मंडळी बाहेर पडायची फेरफटका मारायला, कुणाला तरी भेटायला, कुणी चहा घ्यायला वगैरे म्हणजे विविध कारणांनी. आम्ही पण तसेच. त्यावेळेस ची गोष्ट.
मिटिंग पॉइण्ट नावाचं हॉटेल होतं जळगाव ला. नावाप्रमाणेच मिटिंग पॉइण्ट.  ओमकारेश्वर मंदिराजवळ.  आमचं फेरफटका मारण्याचं ठिकाण. एम. जे. पासून थोड्या अंतरावर ओमकारेश्वर मंदिर. पुढे काव्य रत्नावली चौक. तो परिसर तसा विद्यार्थ्यांनी गजबजलेला. त्यातले आम्ही. मंदिर असल्याने मार्केट चं स्वरूप. पाणीपुरी वाले, पाव-भाजी सेंटर असे अनेक व्यावसायिक आजूबाजूला. गर्दी तिथं बिजनेस. हे समीकरण. त्यामुळे लोकांची रेलचेल आलीच.
मंदिरात बर्याच वेळा जाणे व्हायचं.  दर्शन घ्यायला म्हणा की आसपास चं सौंदर्य अनुभवयाला. मंदिराच्या वार्या व्हायच्या. वापस येताना मोठ-मोठ्या इमारती पाहून त्यावर चर्चा करत एम.जे. गाठायचो. 
हॉटेल चा झगमगाट होता. संध्याकाळी नेहमी गर्दी दिसायची. मुलं-मुली घोळक्याने. कपल्स वगैरे. आम्हाला ही त्या हॉटेल चं कुतूहल होतंच. कित्येकदा वाटायचं आपण श्रीमंत असतो तर गेलो असतो. आपल्या ही सोबत कुणीतरी असतं. आमच्या साठी ते खर्या अर्थाने मिटिंग पॉइण्ट  असत. त्या घोळक्याचा भाग असतो. मजा, मस्ती, आनंद मिळाला असता. मोबाईल, बाईक सारं काही. हेवा वाटायचा प्रत्येक गोष्टीचा. कल्पना, स्वप्न प्रत्येकालाच. आम्ही ही त्यातले. मानवी स्वभाव. जे नाही त्याच्या मागे धावण्याचा, ते मिळवण्याचा अट्टाहास. गैर काही नाही त्यात. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही. काहीना नशिबाने मिळते, काहीना ते मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
पैसे कधी नसायचेच. त्यामुळे आमच्यासाठी ते नव्हतंच. मंदिरात जाऊन दर्शन घेणे आणि पुन्हा फिरत फिरत एम.जे. च्या होस्टेल ला येणे. यापलीकडे दुसरं काही करण्यासारखे नव्हतेच. तो रस्ता ही अंगवळणी पडला होता. रस्त्याच्या आसपास असलेली प्रत्येक गोष्ट ओळखीची झाली होती.  
एकदा आमच्याकडे थोडे पैसे होते. कुणीतरी विचारलं, जायचं का मिटिंग पोइंट ला. होकारार्थी मान डोलावली सार्यांनी. त्यामुळे आम्ही तिघे जण त्या हॉटेल मध्ये गेलो. नेहमी बाहेरून पाहणारे आम्ही आत प्रवेश करत होतो. थोडं अडखळतच. मंद प्रकाश. हिरवळ. आजूबाजूला कित्येक टेबल्स. गार्डन सारखं वातावरण. प्रसन्न. खाली असलेल्या एका टेबल ला जाऊन बसलो. इकडे-तिकडे नजर भिरकावून आढावा. कपल्स. कुणी ग्रुप नं. तरुणाई तशी जास्तच. हा हा-ही ही , हसणं-खिदळणं सुरु. आम्ही मात्र शांत. आमचं राहणीमान आणि त्या हॉटेल चं स्टेटस याचा ताळमेळ बसत नव्हता. पायात स्लीपर चप्पल, जुनाट ड्रेस. शरीरयष्टी सडपातळ. ते कुपोषित म्हणतात तसंच. बराच वेळ झाला तरी कुठलाही वेटर आमच्याकडे लक्ष देत नव्हता. शेवटी मी एका वेटर ला हात दाखवून मेनू कार्ड आणायला सांगितलं. तर तो म्हटला खंबा नाही भेटत इथं. त्याच्या दृष्टीने आम्ही त्याचे ग्राहक नाहीच. अशीच त्याची प्रतिक्रिया, त्याचे हाव-भाव. मी म्हटलं, मेनू कार्ड पाहिजे. कसंतरी त्याने मेनू कार्ड आणून दिलं. तिथे मिळणारे अनेक पदार्थ आमच्या ऐपती बाहेर. त्यावर नजर टाकली. काहीतरी चहा-कॉफी वगैरे मागवलं. त्याचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लक्षात यायला वेळ लागला नाही.
आमचं संभाषण सुरु होतं. मोडकी-तोडकी इंग्रजी भाषेचा वापर संभाषणात होता. वेटर चं आमच्यावर लक्ष होतंच. त्याने त्याचं निरीक्षण केलं. काय कुणास ठाऊक बाहेर पडताना  त्याचा दृष्टीकोन बदलला होता. होस्टेल ला परत येताना कित्येक शिव्या हासडल्या त्याला. तोंडसुख. त्याच्या सारखा आनंद ही नाही. त्यात आम्ही ग्रामीण भागातील असल्याने आमची मराठी भाषा समृद्ध होती. खरं सांगायचं तर कुठलीच शिवी सोडली नाही. उद्धार. त्या नंतर पुन्हा कधी मिटिंग पोइंट ला गेलो नाही.
मध्यंतरी जळगाव ला गेलो होतो. ओमकारेश्वर च्या मंदिरात गेलो. बाहेर आल्यावर लक्षात आलं की मिटिंग पॉइण्ट राहिलंच नाही. नवीन इमारत उभी राहिली आहे. दुसरं काहीतरी आहे त्या जागेवर. नेमकं आठवत नाही.
छोटासा प्रसंग. कित्येकांच्या आयुष्यात येतो. लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपलं राहणीमान कसं यावर अवलंबून. चांगले कपडे दिसले की मत बदलते. माणसाला किंमत नाही. पैसा मोठा झालाय. अश्या गोष्टी आम्ही फार काही गंभीरतेने घेत नाही. त्या तिथेच सोडण्याची कला अवगत झाली आहे. कशा-कशाचं ओझं वागवावं?

एम. जे. च्या कॉर्नर ला एक हॉटेल. पूर्वीच आस्वाद. आता त्याचं नाव बदललंय. LAA-VA. विद्यार्थी असताना फार कधी जाता आलं नाही. तुलनेने महाग. श्रीमंत घरातली मुलं-मुली कायम तिथे पडलेली असायची. मागच्या भेटीत मी आणि माझा मित्र त्या हॉटेल ला  गेलो. चहा ऑर्डर केली. तर वेटर येऊन म्हणाला २५ रुपयाला एक चहा आहे. आम्ही एकमेकांकडे पाहून हसायला लागलो. त्याला म्हटलं घेऊन ये. पुन्हा तेच. आमचं राहणीमान आधी जसं होतं तसंच. थोडा-बहुत काय तो फरक. आमच्याकडे पाहून त्यालाही वाटलं असेल २५ रुपयाचा चहा घेण्याची यांची ऐपत आहे की नाही. दिसण्यावरून इतरांची पारख होऊ शकत नाही. दुर्दैवाने आजकाल तसंच झालंय. एकदा अस्खलित इंग्रजी बोलला की हुशार वगैरे. अशी अनेक उदाहरणं आसपास आढळतात.
राहणीमान चांगलं असलं म्हणजे तो श्रीमंत, पैसेवाला वगैरे. अशी समज रूढ झाली आहे. जाहिरातबाजी. यातच कित्येक लोकं फसतात.
लोकं म्हणतात “Simplicity is the ultimate sophistication.”या बोलायच्या गोष्टी झाल्या. व्यवहारात तत्त्वज्ञान चालत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर याची जाणिव होत राहते. जशी दृष्टी तशी सृष्टी. विचार बदला सगळं बदलेल.
बर्याच वेळेस असे अनुभव येतात. ते कायम लक्षात राहतात. पूर्वी आवाक्यात नसलेल्या गोष्टी आवाक्यात आल्यात.  पण पूर्वीची ती इच्छाशक्ती नाही, आसक्ती ही नाही. काळ झपाट्याने बदलतोय, जीवन बदतेय पण भूतकाळ पाठ सोडत नाही.
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव