Friday, September 20, 2019

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१८


पुणे विद्यापिठात शिकायचं स्वप्न कित्येक जण पाहतात.काहींच प्रत्यक्षात येते कित्येकांचे नाही. मी तेच केलं. प्रवेश मिळणं सोपं ही नव्हत. त्यावेळी फक्त सहा जागा इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी असायच्या.त्यातल्या तीन राखीव तर तीन खुल्या प्रवर्गासाठी.  त्यात प्रवेश परीक्षा. विविध राज्यांमधून येणारे विद्यार्थी. त्यामुळे प्रवेश कठीणच. नशिबाने म्हणा, मेहनतीने म्हणा की अजून काही २००६ साली मी प्रवेश परीक्षा पास झालो आणि विद्यापिठात जाण्याचा मार्ग सुकर झाला. २४ एप्रिल ला प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा विद्यापिठात पाउल ठेवलं.  -१० दिवसांनी निकाल जाहीर झाला.
अधून-मधून विद्यापिठात फोन करून विचारात होतो निकाल लागला का म्हणून. एकदा फोन केला. एका महिलेने फोन उचलला.  निकाल लागला का प्रवेश परीक्षेचा?  त्या बाई हो म्हटल्या. नाव सांगितलं. या आणि प्रवेश घ्या एवढंच काय त्या उत्तरल्या. मला विश्वास नव्हता. तासाभरानं मी पुन्हा फोन केला. तेच उत्तर. तरीही विश्वास बसेना. अजून एकदा फोन केला. ती बाई जाम वैतागली. आता जर तुझा फोन आला तर तुझा प्रवेश रद्द करते म्हटली.
इथून आमची सुरुवात. तालुक्याच्या गावी होतो. घरी येऊन धावपळ करत जळगाव गाठलं. खिश्यात काहीच नाही. कित्येकांना फोन  केले.  पैश्याची जुळवाजुळव केली. अपेक्षित-अनपेक्षित लोकांनी मदत केली.  आणि रात्री आझाद हिंद ने प्रवास करून पुणे गाठलं. सामान्य बोगीत. जिथे पाय ठेवायला ही जागा नाही.  त्या संडास जवळ रात्रभर उभं राहून प्रवास करावा लागला. तेव्हापासून  ट्रेन ने प्रवास म्हटला की आधीच मनात भीती निर्माण व्हायची. आरक्षण करण्याची ऐपत नव्हती. बस चं भाडं आवाक्याबाहेर. खाजगी बसेस बद्दल तर विचार पण नाही. विद्यार्थी असताना   सामान्य बोगीतून  प्रवास  केला.  तो प्रवास  म्हणजे  कसरतच.
ऑगस्ट २००६ ला गाठोडं घेऊन मी पुण्यात रेल्वे स्टेशन ला उतरलो.एक ड्रेस, सतरंजी, चादर. दोन-चार पुस्तक. एवढंच काय ते समान.   पि.एम.टी., ऑटो वगैरे ने जायचं असते असं काही माहित नाही नव्हतं. जळगाव ला असताना सर्वत्र पायी फिरत होतो. ऑटो करून जाण्याची सवय नाही. मग काय रेल्वे स्टेशन ते पुणे विद्यापिठ पायी. असं एकदा नाही. दोन-तीन वेळेस. कुणाला सांगितलं नाही. पीएमटी कित्येक दिवस समजली नाही. समजत नाही अशी म्हणायची सोय नव्हती. त्यामुळे पायी वार्या घडल्या.  
होस्टेल नंबर सहा ला रूम मिळाली होती. पण तिथे जाता एका मित्राकडे तीन नंबर च्या होस्टेल राहिलो. वर्षभर. दुसर्या वर्षी तिच रूम घेतली. दोन वर्षे एक रूम. सहा नंबर चं होस्टेल पाहायला वर्ष लागलं.
आयुष्यात नवीन काहीतरी होत असल्याचा आनंद होता. त्याचं वेळी जळगाव सोडल्याचं दु: ही होतं. त्या शहराशी भावना जुळल्या होत्या या ना त्या कारणाने.
पुणे विद्यापीठाचा इंग्रजी विभाग.  खेर वाडमय भवन मध्ये असलेल्या अनेक विभागांपैकी एक. सुरुवातीला कुणी ओळखीचं नव्हतंच.
वेळापत्रक पाहिलं. वर्गात जाऊन बसलो.नेहमीसारखा वर्ग नव्हता. एका बाजूला मुलं दुसर्या बाजूला मुली. ही संकल्पना नव्हती. कुणी कुठेपण बसावं.  डेस्क-बेंच ची जागा खुर्च्यांनी घेतलेली.  मुलं-मुली एकत्र. भन्नाट. काय आनंद होता तो. कसं आहे आपल्याला अशी सवय नव्हती. पारंपारिक शिक्षण पद्धतीमधील बदलाची ही पहिली सुरुवात.   वेगळ काहीतरी असल्याचा, नाविन्याचा आभास. विभागात असलेली प्रत्येक गोष्ट वेगळी. स्वायतत्ता असल्याने अभ्यासक्रम ही वेगळा. त्यावर बाजारात कुठल्याही नोट्स उपलब्ध नसायच्या. त्यामुळे पुस्तके वाचल्याशिवाय पर्याय नव्हता. आयुष्यात पहिल्यांदा टेक्स्ट वाचलं ते तिथे. जावरे सरांच्या काळात विभागाचं ग्रंथालय पुस्तकांनी समृद्ध झालं. भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत.
एम.फिल च्या मुलाखतीला जावरे सरांनी विचारलं होतं-तुम्ही इथे दोन वर्षात काय शिकला? माझं उत्तर-सर, टेक्स्ट वाचायला शिकलो, त्या वाचनाचा आनंद घायला शिकलो. त्यावर त्यांनी स्मित हास्य दिलं. ते खरंच. पदवी पर्यंत कुणीही टेक्स्ट वाचा म्हटलं नाही. आम्हीही केलं नाही. आमची मदार फक्त नोट्स वर. शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, कोलेरीज, टेनिसन, बेकेट, काफ्का, निजे ही नावे तिथेच वाचली. पण त्याचं पुस्तक कधी हातात पडलं नाही पदवी होईपर्यंत.
देशाच्या कानाकोपर्यातून आलेले विद्यार्थी, काही परकीय विद्यार्थी. मिक्स्ड क्लास.  क्लासेस सुरु झाले.  माझ्यासाठी फक्त सुरु झाले. कारण काय चाललं होतं ते कधी समजलंच नाही. फक्त जाऊन बसने. इकडे-तिकडे पाहणे. अधून-मधून मान डोलावून समजतेय चा आव आणणे. समोरचे  काहीजण संवाद साधायचे.  कायम तेच. आमची ओळख ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबत. जे इंग्रजीत बोलतात त्यांच्याशी संवाद  नाहीच. नेहमी मी मागे बसत होतो. खिडकीजवळ. बाहेर काय चाललं ते पण महत्त्वाचे. खिडकीतून बाहेर पाहिलं की रोड पलीकडील ओपन कॅन्टीन चं दृश्य. सुंदर, नयनरम्य  चेहऱ्यांची रेलचेल. येणारी-जाणारी वाहने. पहिलं  सेमिस्टर खरं-तर यातच गेलं. तसंही  हजेरी नव्हतीच. इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा वर्गात जाऊन बसने.
विभागात असलेली नावाजलेली प्राध्यापक मंडळी. नवीन-नवीन त्यांच्याच  चर्चा. काय इंग्रजी बोलतात ते. कारण समजत काहीच नाही.  सगळं डोक्यावरून.  प्रत्येकाबद्दल  वेगवेगळी माहिती प्रचलित. प्रत्येकजण स्वयंभू.
त्या गोलय हॉल मध्ये चालणारा फिल्म क्लब, लेक्चर्स. अद्भुत. हॉलीवूड मुव्ही पहिल्यांदा तिथे बघितला. आमच्यापैकी कित्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने मुव्ही पाहायचे. हॉलीवूड मुव्ही समजण्याची, पाहण्याची प्रगल्भता आपल्यात नाही हे अनेकदा समजलं. ज्या गोष्टींचा आपण परंपरा, संस्कृती म्हणून उदो-उदो करतो त्या सार्या गोष्टी ते वेशीला टांगतात. म्हणजे आपण जे चार भिंतीच्या आत करायला हवं असं म्हणतो ते सर्रास ओपनली करतात. म्हणून ते प्रगत झालेत. आपण अजूनही तिथेच.  “शेक्सपिअर इन लव” हा चित्रपट पाहताना आम्ही कित्येकजण एकमेकांकडे पाहून हसत होतो.  भाषा समजत नव्हती. पण त्या चित्रपटातल्या दृश्यांनी आम्ही कित्येकजण फिल्म क्लब मध्ये रेग्युलर जाणे सुरु झालं. आमच्यासाठी ते सर्व नवीन होतं. कित्येकदा त्या चित्रपटांवर चर्चा, ठराविक दृश्यांवर आणि हास्यकल्लोळ. जेन आयर, ऑथेलो, प्राईड अंड प्रेज्युडाईस, द नेमसेक सारखे अनेक चित्रपट पाहण्याची संधी मिळाली.
विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाला अनेक मोठ्या प्राध्यापकांची परंपरा लाभली आहे. आम्ही पाहिलेले अनिकेत जावरे आणि राज राव. त्यांची शिकवण्याची पद्धत ही निराळीच. कादंबरी कशी शिकवावी ते राज कडून तर समीक्षा अनिकेत कडून.
त्यांच्या बोलण्यात येणारी नावे कित्येक दिवस लिहिता आली नाही. फुको ला नाही का फोकाल्त. असे अनेक प्रसंग. स्पेलिंग काय, उच्चार काय आणि आम्ही उच्चारतो काय. आलबेल म्हणा, गोलमाल म्हणा. घरातल्या पहिल्या पिढीने शिक्षण घेताना हे आलेले अनुभव कित्येकांचे.  
या लोकांनी एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली.
अलीकडच्या काळात काही विक्षिप्त, सत्ता पिपासू लोकांमुळे विभागाच्या प्रतिमेस तडा गेलाय. पेपरमध्ये, सोशल नेटवर्कींग  वर वाचनात आलंय. खरं काय नी खोटं काय या फंद्यात आपण पाडण्यात अर्थ नाही. त्या विभागाची प्रतिमा जपल्या गेली पाहिजे.

आजही मी पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचा विद्यार्थी होतो असं सांगायला चांगलं वाटते. हाच तो विभाग ज्यानं आम्हाला जगण्याची उमेद दिली. मार्केट मध्ये  उभं राहण्याची ऐपत दिली, बळ दिलं.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव