दोन-चार दिवसांपूर्वी एक मित्र भेटला. नागपूर च्या एका प्रतिष्ठित
महाविद्यालयात सहायक प्राध्यापक. मुळचा तो औरंगाबाद चा. शिक्षण जळगाव आणि पुण्यात
तर नौकरी नागपूरला. रेल्वे स्टेशन वर त्याला भेटायला गेलो होतो. त्याच्या काही
मित्रांसोबत तो शेगाव ला महाराजांच्या दर्शनासाठी आला होता. छोट्याश्या भेटीत त्याने
त्याचे काही अनुभव सांगितले. त्याचा एक अनुभव फक्त शब्दबद्ध केलाय त्याच्या
परवानगीने. वास्तवाला थोडी कल्पनेची जोड दिलीय. अनुभव त्याचा असल्याने प्रत्येक
गोष्टीवर प्रकाश टाकू शकलो नाही.
त्याच्याच शब्दात.....
तब्बल दहा वर्षानंतर फेसबुक ला सापडली. किती बदलली
होती ती. आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता.
किती शोधलं तिला. वेड्यासारख.....2006 मध्ये शेवटची भेटली होती. अनेक गोष्टी तिला सांगायच्या
होत्या. पण हिम्मत झाली नाही. काही तरी मिळवल्यानंतर बोलू असं वाटलं. पण काय तिचं
लग्न झालं. आणि सगळं संपलं. ती मनाच्या कोपर्यात कुठतरी दडलेली होती. त्यामुळे
आठवण तर यायची.
माझं तुझ्यावर प्रेम आहे हि सांगायची
संधी पण तिने दिली नाही. पुण्यात गेल्यानंतर जळगाव ला येणं शक्य नव्हतं. खरं तर
मला तिच्यासाठीच पुण्याला जायचं नव्हतं. पण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हळू हळू
संपर्क कमी होत गेला. नंतर तोही कुठतरी
लुप्त झाला.
मी पण माझ्या कामात मग्न झालो
होतो. कित्येक वेळा फेसबुक ला शोधलं. पण
सापडलीच नाही. फेसबुक ला ती नव्हतीच.
आज तिची खूप आठवण येत होती.
म्हणून सहज फेसबुक वर सर्चिंग केलं. तर अचानक सापडली. गेल्या ४-५ वर्षांपासून शोधतोय पण सापडेना.
आज तिचा फोटो पाहायला मिळाला. तिला पाहण्याची उत्सुकता तर होतीच. पूर्वीपेक्षा खूप
जाड झालीय. हसतमुख चेहरा मात्र तसाच. त्या चेहऱ्याने मला वेड लावलं होतं. आज तिचा फोटो
पहिला. आणि सगळ्या भूतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्या. साडीमध्ये छान दिसते. कसं
सांगू मनातल्या भावना. कुठं नाही शोधलं.
जीव कासावीस झाला होता.
२००३-४ ची वेळ. तिची आणि माझी
पहिल्यांदा भेट झाली. ती पण एका लेक्चर
ला. ती कुना सोबत पण बोलत नव्हती. मुलांपासून दूर रहायची. कदाचित मुलं कशी असतात
याची जाणीव असावी तिला.
मला निमित्त हव होतं. मी
जाणूनबुजून लेक्चर ला गेलो नाही. ५-७ विद्यार्थी असायचे फक्त.
मला नोट्स पाहिजेत. तर नाही
म्हटली.
माझा इगो दुखावला गेला. नकळत मी
तिच्याकडे ओढला गेलो. संधीची वाट पाहत होतो. कित्येक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला
पण काही केल्या दाद देईना.
मी कधी कुणाला नोट्स मागितल्या
नाहीत. सगळे माझ्याच नोट्स वापरायचे. मी फार वक्तशीर होतो. कुठलाही लेक्चर मिस करत नव्हतो.
एकदा ती एक आठवडा आलीच नाही.
एके दिवशी तिने मला नोट्स
मागितल्या.
मी देऊन टाकल्या.
दोन तीन दिवसानंतर तिने नोटबुक परत केली.
छान अक्षर आहे म्हणे तुझं.
खरं तर फक्त तिच्यासाठी नोट्स
व्यवस्थित ठेवत होतो. तिला प्रभावित करायचं होत. आणि माझा उद्देश सफल झालाही.
तिथून सुरुवात झाली आमच्या
मैत्रीची. रोज भेटणं असायचं.
वर्गात कमी आणि बाहेर जास्त हे
समीकरण झालं होतं. तासंतास गप्पा चालायच्या. हळू हळू बाहेर हॉटेल ला जायला
लागलो. ती नसली कि खूप असायचं डोक्यात. पण
ती समोर आली कि मी मात्र शांत. मला शब्द सापडत नव्हते. काय बोलावं हे सुचत नव्हतं.
आमचं एकमेकांवर प्रेम होतं. पण ते
कधीच व्यक्त झालं नाही. काळाच्या ओघात ते हृदयाच्या कोपर्यात साठवलं गेलं.
slam बुक मधला तिचा तो पासपोर्ट फोटो नेहमी निहाळत होतो.
फक्त तिच्यासाठी slam बुक तयार केलं. औपरीचाकता म्हणून
इतरांचे पण मत घेतेलेत त्यात.
आता ती आपल्या ला भेटणार नाही.
तिचं लग्न झालंय. खूप दूर राहते. भेट तर शक्यच नाही.
जळगाव सोडताना अजूनही आठवते ती
शेवटची भेट. २-३ तीन तास गप्पा मारत होतो आम्ही. कुणालाही जायची इच्छा होत नव्हती.
मला विसरणार तर नाही ना हे तिचं
भावनिक वाक्य काळजाला छेद करून गेलं. तिच्या चेहऱ्यावरच्या भावना सगळं काही सांगत होत्या.
आता कसं सांगू तिला कि तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करवत नाही.
जाताना तिचा तो हातातला हात
सोडवेना. पहिला आणि शेवटचा शेकहंड.
तो हाताचा स्पर्श अजूनही स्मरणात
आहे. ती गाडीवर बसून निघून गेली. मी मात्र तिला पाहत राहिलो एकदा तरी मागे वळून
पाहिलं या आशेने. कॉलेज च्या गेटजवळ ती दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिलो.
माझं आयुष्य सुरु झालं होतं
तिच्याविना. आता ती नाही भेटणार रोज या ची वेदना होत होती.
नकोच जायला पुण्यात. पण
भविष्याचा विचार डोक्यात येत होता. म्हणून पुण्यात गेल्यानंतर हि मी रमलो नाही.
थोडक्यात पुणेकर झालो नाही.
मला परत यायचं होतं फक्त
तिच्यासाठी. नशिबात मात्र काही वेगळंच होतं.
माझं यश लांबत गेलं. तिनं वाट नाही पहिली आणि संसाराला लागली.
माझी स्वप्ने उद्धवस्त झालीत.
मला पुढे जायचं होतं तिच्याविना. मनाची समजूत काढली. लग्न केलं तर नाही कळवलं
तिने. कदाचित ती धाडस नाही करू शकली. ५-६ महिन्यानंतर कळलं कि ती विवाहबद्ध झालीय.
तेव्हा मोबाईल नव्हता. फेसबुक चा
परिचय नव्हता.
एक मध्यमवर्गीय मुलगी. एवढ्या
कॉलेजात फक्त मीच तिचा मित्र. माझं
तिच्यावर प्रेम होतं. भेटी गाठी खूप व्हायच्या. बोलणे नेहमीच. तिला मनातलं सांगू शकलो नाही. फक्त एवढीच खंत होती.
फेसबुक नसतं तर कदाचित तिला
पाहायला पण मिळालं नसतं. सहवासात राहून आमचं प्रेम बहरलं. एम जे ची मानव विद्या
इमारत कशी विसरता येईल. तिथं कट्ट्यावर बसून एकमेकांशी ओळख अधिक चांगल्या पद्धतीने
झाली.
मी एकदा असंच कामानिमित्त भुसावळ
ला गेलो होतो. दोन दिवसानंतर परत आलो तर ती बोलायला तयार नव्हती. न सांगता
गेल्याचा तिला राग आला होता. कसंतरी मी तिचं मन वळवलं होतं. कुणीतरी अधिकाराने
बोलते याचा फार आनंद झाला.
मैत्री नंतर आमचं प्रेम बहरत
गेलं. प्रेमाचा वसंत ऋतू सुरु झाला होता. तिच्या सानिध्यात दिवसामागून दिवस जात
होते. आयुष्य रंगीन झालं होतं. स्वप्नांनी रात्री सजून जायच्यात. बायको म्हणून
तिची प्रतिमा कायम नजरेसमोर यायची. अजूनही लग्न करू शकलो नाही. घरून लग्नासाठी
दबाव वाढत चालला आहे. सरकारी नोकरी असल्याने अनेक संबंध चालून येत आहेत. किती काळ
नकार द्यायचा आता.
महाविद्यालयीन जीवन म्हणजे
मृगजळ. कुणाच्या हाताला लागतं, कुणाच्या नाही. आयुष्यात पहिल्यांदा प्रेमाचा अनुभव
घेत होतो.
आपलं भविष्य काय? याची चिंता
कायम लागून रहायची. म्हणून पुण्याला जायचा निर्णय घेतला.
आयुष्यात जर तर ला महत्त्व नाही. एक छोटंसं समीकरण जुळवायचा
प्रयत्न करत होतो. ती आणि मी. पण समीकरण अपूर्ण राहिलं. तिने दिशा बदलली तर मी
दिशाहीन झालो. आयुष्य बदललं आहे. कॉलेजात मुलं-मुली घोळक्याने पाहताना मला ते सगळं
आठवतं. भूतकाळाला आठवणीच्या कप्यात बंद करून पुढे निघालो.
अनेक आठवणींना उजाळा देत असताना ट्रेन ची वेळ कधी झाली ते समजलंच
नाही. ट्रेन आली आणि तो निघून गेला. पण
त्याची हि कथा मला काही स्वस्थ बसू देईना. संध्याकाळी मी त्याला फोन केला आणि हा
अनुभव शब्दबद्ध करण्याची परवानगी घेतली नाव न लिहिण्याच्या अटीवर.
हे लिखाण फक्त त्याच्या आठवणीतील तिच्यासाठी....तिची आठवण म्हणून.
-सचिन भगत