ती शेवटची भेट...(काल्पनिक)
तिची गाडी पार्किंगमधून सुसाट निघाली...पाहता
पाहता तिची पाठमोरी आकृती हि दिसेनाशी झाली आणि मी त्या कॉलेज कट्ट्यावर बसून तिला
थांबवता आलं असता का याचा विचार करत राहिलो. वेळ नव्हताच. शिक्षणानिमित्त
संध्याकाळी दुसर्या शहरी जाण्यासाठी निघायचं होतं. ती नजरेआड गेली ती कायमचीच.
पुन्हा कधी हि नं भेटण्यासाठी. ती आमची शेवटची भेट. अर्धा तास थांबली होती फक्त.
काहीतरी सांगायचं होतं. पण राहून गेलं सगळं. ती माझ्या भविष्याबद्दल बोलत होती आणि
मी तिच्यात माझं भविष्य शोधत होतो. कित्येक तास त्या कट्ट्यावर बसून होतो.
गेली
तीन वर्षे काय झालं काय नाही सगळं डोळ्याखालून जात होतं. तिची ती पहिली भेट अजूनही
आठवतेय.
Excuse me, Where is the FY class?
त्या पोर्चमध्ये हे वाक्य ऐकून माझी तारांबळ
उडाली. बापजन्मी आपण कधी इंग्रजी ऐकलं नाही...बोलणे तर दूर. क्षणभर विचार केला आणि
आपल्या ग्रामीण भाषेत उत्तरलो...त्या रूम ले हाये पोरं बसेल पण आता ब्रेक आहे.
ती हसल्यासारखं चेहरा करून त्या रूम च्या
दिशेने गेली. मला हि कळेना नेमकं काय झालं. आपण बरोबर तर सांगितलं मग तरीपण
चेहऱ्यावर हास्य. मला वाटल कदाचित हे
शहरातले पोरं-पोरी माहिती सांगितल्यावर हसत असतील. नन्तर कधीतरी तिने सांगितलेलं
कि ती माझ्या भाषेला हसली होती म्हणून. एका मुलीने आपल्याला विचारलं म्हटल्यावर
मलाही स्वर्गात गेल्यासारखं झालं.
ती निघून गेली अन मी मात्र तिचाच विचार करत
राहिलो. लव at फर्स्ट साईट असते ना काहीतरी तसं च काहीतरी झालं. ब्रेक नंतर
नेहमीप्रमाणे शेवटच्या बाकावर जाऊन बसलो. तिथे बसण्याचे भरपूर फायदे असतात. एकतर
सर्व वर्गाला पाहता येतं आणि समोर काय चाललं आहे याच्याशी काही देणं-घेणं नसते.
पूर्ण तासभर ती कुठे बसली आहे ते शोधत राहिलो पण दिसलीच नाही. तास संपल्यावर बाहेर
आल्यानंतर बाहेर उभी दिसली.
नवीन शहर-नवीन मानसं-नवीन चालीरीती-चांगलं
राहणीमान-शुद्ध भाषा. सगळं वेगळंच. खेड्यातून शहरात गेल्यावर असं होतेच. काही
कालानतराने आपण हि शिकून घेतो हे सगळं.
कधीतरी तिची आपली ओळख होईल या आशेवर दिवसामागून
दिवस जात राहिलेत. एव्हाना मी रुळलो होतो नवीन वातावरणात.
तिच्याशी बोलण्याचा योग मात्र परीक्षेच्या वेळी
आला. वर्षभर शेवटच्या बाकावर बसून, तिथं जिथं जाते तिकडे जाऊन बघण्यातच समाधान मानलं. योगायोगाने एकाच ब्लॉक
मध्ये होतो. पेपर संपला होता. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या
तोंडातून एकदाचे शब्द निघाले
"हाय, कसा होता पेपर?
छान गेला पण बघू आता. ओके, बाय, मला जायचंय.. "
"बाय.. माझा पण छान गेला पेपर". न
विचारता मी माहिती पुरवली. ती काही न बोलता निघून गेली.
एका वाक्यात संभाषण समाप्त. सुट्ट्या पाहिजे
असं वाटायचे पूर्वी आणि आता सुट्ट्या कशाला हव्यात असं वाटतं होतं. पूर्ण
सुट्ट्यांमध्ये कॉलेज कधी सुरु होईल असं वाटत होतं.
निकाल लागल्यानंतर दुसर्या वर्षाची प्रवेश
प्रक्रिया सुरु झाली होती. कॉलेज सुरु झालं आणि मला कधी नव्हे तेवढा आनंद झाला.
दोघांचा हि विषय सारखा असल्याने संवाद वाढला.
रोज आम्ही भेटत होतो. तास सोडून गप्पा सुरु होत्या. असाही तासला जाणारे कमीच असत. कॉलेज
च्या कॅन्टीन मधील चहा-कॉफी कंटाळवाणी झाल्यानं पावलं आपसूकच बाहेर पडली. बाहेर
हॉटेलात कसं सर्व शांत. मी तिच्यात कसं गुंतलो किंवा गुंतत गेलो ते मला समजलं
नाही. ती कॉलेज ला आली नाही कि कंटाळा येत होता. सुट्या हि नको वाटत होत्या. सरकारी
सुट्या कमी झाल्या पाहिजेत असं मत बनलं होतं.
मनातलं सगळं सांगून टाकावं असही वाटलं. पण ते
कधी जमलं नाही. तिला काय वाटेल या विचाराने ते कधी बाहेर आलंच नाही. तिच्या
सान्निध्यात पदवी संपली होती. माझी पावलं दुसर्या शहराकडे वळत होती. एकीकडे भविष्य
तर दुसरीकडे ती. गुंतागुंत होती. नेमकं काय करावं ते सुचेना. त्यावेळी तंत्रज्ञान
एवढं प्रगत नव्हतं. त्यामुळे मी ते शहर सोडल्यानंतर कधी संपर्क झालाच नाही. नाही
म्हणायला तिचा फोटो होता स्लमबुक मध्ये.
आयुष्यातलं पहिलं प्रेम मनात्तच गुदमरून गेलं.
ती पुन्हा कधी भेटलीच नाही. जशी अचानक आयुष्यात आली तशीच निघून गेली. एकदा कुठून
तरी कळल कि तिचं लग्न झालंय. त्यादिवशी तिचा तो स्लमबुकमधला फोटो हि स्वहः केला.
त्या शहरात गेल्यावर ते कॉलेज... कट्टा...तीच्या
गाडीची पार्किंग ची जागा.. कॅन्टीन ...ते बाहेरचं हॉटेल अशा अनेक ठिकाणी मला ती
दिसते. तिथं बसलेल्या घोळक्यांमध्ये मला आमची प्रतिकृती दिसते. (One sided
love never reaches to the destination. )
ती सध्या काय करते?... कुणास ठाऊक?
सचिन भगत