Friday, October 12, 2018

अनुभव ६


अभियांत्रिकी कडे वळण्याआधी मी एका वरिष्ठ महाविद्यालयात सी. एच. बी. वर वर्षभर जॉब केला. या काळात भरपूर अनुभव आले. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून गेला. वृत्तपत्र पदविका सुरु होती. त्याचे तास संध्याकाळी असायचे. त्यामुळे सी. एच. बी. वर जॉब मिळतो का याची शोध-शोध सुरु होती. एका मित्राकडून एका महाविद्यालायचा संदर्भ मिळाला. त्याने आधीच बोलणं केलेलं होतं. ठरलेल्या दिवशी मी त्या महाविद्यालयात पोचलो. डेमो झाला. आणि सी. एच. बी. वर जॉब मिळाला. सकाळी सात च्या आसपास विद्यापीठ सोडावं लागत होतं. सी. एच. बी. असलो तरी कॉलेज सुटेपर्यंत थांबावं लागे. विद्यापीठापासून ८-१० किमी असेल कॉलेज. कधी-कधी पैसे नसले कि सकाळी लवकर उठून पायीच मार्गक्रमण व्हायचं. तीन-चार वेळेस पैदलवारी झालीय. एवढं चालून काय शिकवण्याची स्थिती राहील. पोट भरल्याशिवाय डोकं चालत नाही. कॉलेज संपल्यावर डबे जायच्या आधी यावं लागे विद्यापीठात. सारी कसरतच. आयुष्यातला एक काळ असतो. त्याला सामोरे जायचं फक्त. तो काही कायम राहत नाही.
सी. एच. बी. वाल्यांचे प्रश्न किती गंभीर असतात त्याची जाणीव झाली. कदाचित त्यामुळेच सी. एच. बी.वर जॉब करायचा नाही हे ठरवता आलं. एक तर त्यांचे पैसे वर्षभर मिळत नाही. किती चकरा व्हायच्या त्या अकाऊंट सेक्शन ला. पण काही उपयोग नाही. बर विभागप्रमुख फक्त आश्वासनं द्यायचा. पण कधी लवकर पैसे मिळावेत असा विचार त्यांनी कधी केलाच नाही. कायम स्वताबद्दल बढाया मारण्यात गुंग. माझे खटके तिथेच उडाले. मी पाठपुरावा कधी सोडला नाही. त्या अकाऊंटवाल्या  बरोबर वाद ही झाला. तिथे दोन प्राध्यापक होती. एक अनुपस्थितीत असला कि त्याच्याबद्दल दुसरे महाशय माहिती पुरवत.  असं नेहमी व्हायचं. चांगलं तर सांगतच नव्हते हे उघड च आहे.  
तिथे बरेच निवृत्त प्राध्यापक यायचेत. तास घायचे. एकदा तिथे एक कॉन्फरन्स आयोजित केली होती. रिसर्च पेपर चे पुस्तक छापणार होते. कॉन्फरन्स ला ईंग्रजी विषयाचे एक मोठे व्यक्ती उपस्थित राहणार होते. त्यांचा रिसर्च पेपर बनवायचा होता. त्या विभागप्रमुखांनी एका निवृत्त प्राध्यापकाला बोलावलं आणि पेपर तयार करून द्या असं सांगितलं. त्यांनी  laptop उघडला आणि गुगल सर्च सुरु झालं. जे जे मिळालं ते कोपी होत गेलं. साधारण एक-दीड तास फक्त कॉपी आणि पेस्ट सुरु होतं त्याचं. ३५-४० पेजेस झाले असतील. मग सुरु झालं एडिटिंग. आणि रिसर्च पेपर तयार झाला.  तीन तासात रिसर्च पेपर तयार. संशोधन काय आहे? लाखो लोकं एम.फिल. पी.एच.डी. होतात वर्षभर. हीच काय ती प्रक्रिया. आपण सगळे सारखेच. खरं संशोधन करणारे क़्वचितच. त्या निवृत्त प्राध्यापकाची कीव यायची कधी कधी. किती हाव असावी. निवृत्त झालास ना आता. सन्मानाने जग. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.  असो.
तिथे distance लर्निंग पण होतं. दर रविवारी तास असायचे. पण कधी झालेत माहित नाही. एकही विद्यार्थी कधी आला नाही. ते यायचे फक्त परीक्षेला. प्राध्यापकांची बिले मात्र निघत राहिली. वाईट अवस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोग असो, NAAC असो. काय करतात माहित नाही. ग्रेडिंग कशावर देतात. नियंत्रण काय. कसलाच पत्ता नाही.
मला कित्येक गोष्टी पटत नव्हत्या. मला जे वाटेल ते मी करत गेलो. त्यामुळे दुसर्या वर्षी मला काय ठेवणार नाहीत मला माहित होतं. मी त्यांना भेटायला गेलो. “सचिन, आपल्या बाजूच्या महाविद्यालयात सी. एच. बी. व्याख्याता वर पाहिजे”, असं मी काही न बोलता त्या विभागप्रमुखांनी सांगितलं. मी फोन केलाय तिथे. आदर म्हणून मी हो ला हो केलं. आणि त्या कॅम्पस मधून बाहेर पडलो.
ते महाविद्यालय जवळच असल्याने त्यांनी सुचविलेल्या महाविद्यालयात गेलो. जायला काय हरकत आहे. प्राध्यापक महिला विभाग प्रमुख होत्या. त्यांना भेटलो. त्यांनी तारीख दिली डेमोची. ठरलेल्या दिवशी मी डेमो द्यायला गेलो. आम्ही दोन उमेदवार होतो. दुसरी उमेदवार महिला होती. आधी तिचा डेमो झाला आणि नंतर माझा. ती जे काही बोलली ते अर्धवट आणि कधी मराठीत तर कधी हिंदीत तर क़्वचित इंग्रजीत. त्यामुळे मला तो जॉब मिळेल अशी खात्री झाली. त्यामाने माझा डेमो चांगला होता.  “नंतर कळवते मी”, असं त्या विभागप्रमुख म्हणाल्या. मी विद्यापीठात निघून गेलो. संध्याकाळी मला त्यांचा मेसेज आला. मेसेज खूप मोठा होता. तो मेसेज असा: Dear Sachin. I am sorry. You are the right choice but I can’t appoint you. Another candidate is the daughter of a professor who is a BOS member. He called me in the morning and I said, yes. He has promised me to approve my candidature as the authorized guide of Pune University. I have been trying for it since a couple of years and I don’t want to lose this chance. Once again, sorry.  All the best for your future.
त्या बाईचा मेसेज वाचला. काही का असेना त्या बाईन खरं सांगून टाकलं होतं. तेवढा प्रामाणिकपणा कायम होता. मी काही उत्तर दिलं नाही. पण तो मेसेज मी कधीच डिलीट केला नाही.  योगायोग असा कि ती बाई ज्या व्यक्तीबद्दल बोलत होती ते माझे एम.फिल चे गाईड होते. माझं एम.फिल. अजून बाकी होतं. काहीच बोलू शकत नव्हतो. त्यामुळे मी तो विषय सोडून दिला. प्रत्येक व्यक्ती आपले हितसंबंध जोपासण्यात मग्न आहे. सत्ता आणि पैसा असला कि काहीही करता येतं.. उच्च शिक्षणात काय सुरु आहे यावरून आपल्याला अंदाज येईलच. संशोधनाची दुरावस्था झालीय. संशोधन नाही तर प्रगती कुठून येणार. असे अनेक प्रकार सुरु आहेत. राजकारण घुसलय शिक्षण-क्षेत्रात.  त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयात सी. एच. बी. साठी प्रयत्न केले नाहीत. त्या विभागप्रमुखांचे  धन्यवाद. त्यांच्यामुळे वेगळ्या वाटेन जाता आलं. विचार करता आला. परत कधी भेट झाली नाही. माझ्या मित्राने बर्याच शिव्या घातल्यात मला. तुला शांत नाही बसता येत. तू कधी सुधारणार नाहीस म्हणे. वगैरे वगैरे.  व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.

हा प्रश्न माझाच नाही. कित्येक तासिका तत्त्वावर काम करणार्यांचे हेच हाल आहेत. निमुटपणे सहन करतात. जे बोलतात ते बाहेर फेकले जातात. आपण सिस्टम बदलण्याच्या गोष्टी करतो. पण लोकं एवढी निर्ढावलेली झाली कि त्यांना काहीच फरक पडत नाही. आजही कित्येक प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करत आहेत. कधीतरी जागा निघेल आणि त्याचं काम होईल या आशेवर. आशा फार वाईट. ती करायला भाग पाडते. आणि आपण करत जातो, सहन करतो. बदल कधी होईल? माहित नाही.