Friday, February 24, 2017

माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवस निमित्त...


आज माझा मुलगा “विहान” एक वर्षाचा झाला. मी वाढदिवस वगैरे साजरा करत नाही. पण मी करत नाही म्हणून त्याचा का नाही हा प्रश्न निर्माण होतोच. लग्नानंतर वर्षभरात त्याचा जन्म झाला आणि माझा दिनक्रमच बदलून गेला. एरवी इकडे तिकडे फिरण्यात मग्न असलेला मी नकळत घराकडे वळत गेलो. तो घरी नसला कि कंटाळा येतो. त्याच्या सहवासाची एवढी सवय झालीय. त्याची प्रत्येक गोष्ट अथवा कृती जवळून पाहिलीये. पालथा पडण्यापासून ते चालायला लागला तोपर्यंत प्रत्येक गोष्ट नजरेत कैद झाली. बाबा हा त्याच्या तोंडून निघालेला पहिला शब्द...त्या शब्दाने मला जबाबदारीची जाणीव झाली. ती नव्हती असंही नाही. पण ती भावना खोलवर रुजली.
शेक हंड म्हटलं कि हात पुढे करणार, हलो कर म्हटलं कि हात कानाजवळ जाणार, हाय म्हटलं कि हात वर करणार, वन म्हटलं कि एक बोट दाखवणार...असं कित्येक आणि काय. घरामध्ये आपल्या मागे मागे फिरत असतो...आपण जिकडे जाणार तिकडे त्याचा झेंडा... एकटा खेळायचं म्हटलं कि ड्रेसिंग टेबल चे कप्पे उघड-झाप सुरु असते...किचन मध्ये आला कि भांड्यांची आदळआपट सुरु करतो...आणि जे दिसेल ते खायचा  प्रयत्न...जेवण करताना त्याची सर्व झेप आपल्या ताटावर...त्यामुळे एकत्रित जेवण नाहीच...एकाने सांभाळायचं आणि दुसर्याने जेवायचं...  म्हणजे कायम फक्त धुडगूस... पूर्ण घरात त्याची खेळणी पडलेली असतात..फेकझोक सुरु असते इकडे-तिकडे... पाणी प्यायच्या ऐवजी फुर्रर...बरं त्याची भाषा आपल्याला कळत नाही आणि आपली त्याला...सगळं कसं अंदाजे अंदाजे...भूक लागली असेल...तहान लागली असेल....महिन्यातून एकदा दवाखान्याला भेट होतेच...असं बरंच काही.
त्याला खेळवण्यात किंवा त्याच्यासोबत खेळण्यात वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. आता सगळं काही छान चाललेलं असतं असंही नाही. कित्येक वेळा रार्त्री बेरात्री उठून तो आमची झोप हिरावून घेतो. अधून मधून  कीर कीर .....कधी कधी दोन-तीन फटके द्यावेसे वाटतात. पण काय ना माय-बाप म्हटलं कि हे सर्व सहन करावं लागणार. पण त्याच्या त्या विश्वात मी हि स्वत:ला हरवून बसतो.
सकाळी उठल्यापासून ते मी कॉलेज ला जाईपर्यंत वेळ नकळत निघून जातो. त्याला काय हवं काय नाही. काय करतोय, कुठं जातोय, काय खातोय...म्हणजे कायम त्याच्या विश्वात. संध्याकाळी गाडीवर एक-दोन चक्कर ...सुटीच्या दिवशी ग्राउंड वर...fan, टीव्ही, चंद्र कुठंय म्हटलं कि तो इकडे तिकडे पाहणार... पूर्वी मोबाईल मध्ये आमचे फोटो असायचे आणि आता मोबाईल त्याच्या फोटोनी भरलाय...
बालपण...प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर टप्पा...प्रत्येकाला आपलं बालपण आठवेल असंही नाही. तंत्रज्ञानाने ते आता साठवता येतं...पूर्वी तसं नव्हतंच. कित्येकांना तर आपण बालपणी कसे होतो हे पण माहित नाही...मी त्यातलाच एक. कुणीतरी म्हटलंय...लहानपण नव्हतच माझं लहानपण, कमी वयात शिकावं लागलं शहानपण” आणि असंच काहीतरी झालंय आमचं.
कळत नकळत माझं हरवलेलं बालपण मी त्याच्यात शोधात असतो...हो हरवलेलच...कारण ते कधी जगताच आलं नाही...समजायला लागल्यापासून या धकाधकीच्या आयुष्यातून कसं बाहेर येता येईल याचे मार्ग शोधत होतो.
मला हव्या असलेल्या आणि न मिळालेल्या सर्व गोष्टी मी त्याला न मागता द्यावात हि स्वत:कडून अपेक्षा...त्यालाही जगता यावं मनासारखं..मनसोक्त...जे मला जमलं नाही. आयुष्याचा प्रत्येक रंग अनुभवावा ...
खरं तर मला त्याचं नाव विलिअम्स ठेवायचं होतं...पण आपण भारतीय न स्वतःला फक्त सुशिक्षित समजतो पण आमलात आणत नाही. कारण त्या विलिअम्स शेक्सपिअर वर आलेल्या निबंधामुळे मी पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पास झालो होतो...तेच नाही तर एम. फिल च्या प्रवेश परीक्षेतही त्यावर लिखाण होतं. म्हणून ते नाव जवळचं. आपण भारतीय म्हणजे रूढी, परंपरा यात गुरफटलेले. त्यातून बाहेर येणं अशक्यच.


तुकाराम महाराजांची फार सुंदर रचना आहे:
लहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्‍न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगीं मोठेपण ।
तया यातना कठीण ॥३॥
तुका ह्मणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ॥४॥
(महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ॥५॥)
लोकं म्हणतात बायको आल्यावर आपलं स्वातंत्र्य जातं...पण खरं स्वातंत्र्य जातं ते अपत्य प्राप्तीनंतर...आपण एका अपत्याचे बाप आहोत हि भावनाच आपल्याला कुठंतरी बंदिस्त करून टाकते.
(हे अनुभव प्रत्येकालाच येतात. मी शब्दबद्ध केले इतकेच...)

सचिन भगत