कित्येक वर्षानंतर आज एका
मैत्रिणीसोबत बोलणं झालं. साधारण १०-१२ वर्षे झाली असतील. फेसबुक ने बरं केलंय.
जुनी-पुराणी नाती जपलीय. व्हर्चुअलि का होईना. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यात.
बोलता बोलता ती म्हणाली-“तु contact ठेवले नाहीस.” आमच्या संभाषणातील फक्त हेच
वाक्य माझ्या डोक्यात राहील.
खरंच असं झालंय का? मी
विचारात मग्न झालो. नकळत मी कित्येक वर्षे मागे गेलो, भूतकाळात गेलो . समोर असलेली
काम सुरु होतं पण माझं मन भूतकाळात रमल होतं.
खरं आहे ते पण. बाहेर
च्या जगात आल्यापासून कित्येक लोकं जोडली गेलीत. काही थोड्या काळासाठी तर काही
कायमस्वरूपी. काही कामानिमित्त जोडले गेले, काही वैचारिक साम्यतेमुळे तर काही
स्वार्थासाठी. त्यात मी पण अपवाद नाही. माणसाचं जीवनच असं आहे. आता जो तो आपापल्या
संसारात मग्न आहे. ध्येय वेगळे आहेत. कधी तरीच संपर्क होतो. एकेकाळी खूप जवळ
असलेली लोकं इतकी दूर गेली आहेत कि परतीचे मार्ग बंद झालेत. कित्येक कारणे असू
शकतात. कोण चूक हा प्रश्न बाजूला. कधी माझं चुकलं असेल कधी त्याचं चुकलं असेल. त्यातून
संवाद कमी कमी होत गेला आणि आता पूर्ण बंद.
८-१० वर्षे मागे गेलो तर
ती सारी मंडळी आसपास दिसून यायची. चर्चा, वादविवाद, फिरस्ती सर्व काही चालायचं. एकमेकांबद्दल
जिव्हाळा होता, प्रेम होतं , आसक्ती होती. काळाच्या ओघात ते हळू हळू नाहीसं झालं. संवादाची
साधने वाढली. सोशल नेट्वर्किंग, मोबाईल क्रांती नं आपण सारे जोडले गेलो व्हर्चुअलि.
पण संवाद लुप्त झाला.साधने आहेत पण संवाद नाही. पूर्वी बरंच होतं. संवादाची साधने
कमी होती पण संवाद होता. भेटण्या-बोलण्याची उत्सुकता होती. आता ती उत्सुकता
संपलीये. मोबाईल मध्ये नंबर आहे पण तो कधी डायल चं होत नाही. बरं आता तर फुकटात
कॉलींग आहे. विशिष्ट प्रसंगी फक्त शुभेच्छांच फोरवर्डीग सुरु आहे. मेसेज केला की झालं. कुणालाही फोन
करावसं वाटत नाही. हीच मानसिकता झालीय प्रत्येकाची. मी पाठवलेला मेसेज मला किमान
१५-२० जणांकडून वापस येतो. चक्र सुरु आहे. ते coinbox
होते तेव्हा coin संपेपर्यंत बोलणारे
आम्ही. आता तर डायल बोटावर आलंय. ते कष्ट ही कशाला. त्या गुगल असिस्तंत ला
सांगितलं तरी फोन लागतो. पण नाहीच होत ते. एका
क्लिक वर आहे सारं. पण मनातून क्लिक होत नाही. आणि जो पर्यंत मनातून क्लिक होत नाही तोपर्यंत हे व्हर्चुयल क्लिक
निष्क्रिय. आपण दूर गेलोय एकमेकांपासून. सगळं आदान-प्रदान व्हर्चुअलि. आपण गुंतत चाललो आहे. संवेदना नष्ट होत चालल्या
आहेत. तंत्रज्ञानाने आचार-विचार बदलून टाकले आहेत. एकमेकांच्या आयुष्यात काय
चाललंय ते आता सोशल नेट्वर्किंग वर कळायला लागलंय. लाईक वर लाईक सूर आहे. मात्र नको इतका तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने संवाद
साधायला वेळ मिळेनासा झालाय. सजीव नात्याची प्रेमाने विणलेली घट्ट गुंफण
तंत्रज्ञाने विस्कटली. प्रत्यक्ष संवादातून निर्माण होणारा जिव्हाळा तंत्रज्ञानाच्या
संवादाने दूर गेला. सोशल नेट्वर्किंग वर हजारो मित्र आहेत, मोबाईल मध्ये हजार contact असतील. पण त्याचा काय
फायदा?
गेल्या १०-१५ वर्षात किती
लोकं जोडली गेली आणि किती दूर गेली याची सांगड घालत होतो. जी नवीन जोडली गेलीत ती
व्यावसायिक कारणाने. जी दूर गेलीत ती आपल्या आचार –विचार, अहंकार यामुळे. माझं मन
मला सांगत होतं. यश-अपयश, समाजातलं स्थान, आर्थिक सुबत्ता असे अनेक अडथळे नाते-संबंधात
निर्माण झाले आहेत आजकाल. त्यामुळे नाती टिकवणं अवघडच.
पूर्वी कसं होतं. सुख-दु:खात
सहभाग होता. पाठबळ, पाठींबा होता. सहवास होता. संवाद होता. थोडक्यात सपोर्ट सिस्टम होती. हसणं-खेळणं होतं.
प्रेरणा होती. आपण यशस्वी व्हायला पाहिजे असं वाटणारे शुभचिंतक होते. नाती सहज तोडता
येतात. पण नात्यामुळे निर्माण झालेल्या आठवणी नाही पुसता येत. त्या आपल्या
आयुष्याच्या अविभाज्य भाग बनून राहतात. जवळीकतेणे नातं अथवा मैत्री होत नाही. कुठलंही
नातं प्रगल्भ व्हायला मोठा काळ जातो. त्या काळात जे टिकलेत ते टिकलेत. काळाच्या कसोटीत तावून सुलाखून बाहेर पडणं तसं
कठीणच. खांडेकर उगाचच नाही म्हटले: “जग जिकंण्याइतंक मन जिकणं सोप नाही!”
जळगाव मध्ये पदवी ला
असताना काही चांगल्या लोकांचं सानिध्य लाभलं. कठीण वाटणारा प्रवास त्यांनी प्रवास
सोपा केला. प्रचंड उलथा-पालथी चा तो काळ. शून्यातून सुरु झालेली वाटचाल आणि त्या
मार्गात येणारे अडथळे अथवा समस्या. याच आस-पास च्या लोकांनी त्या समस्या उपटून
फेकायला मदत केली. व. पु.च्या शब्दात: “प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण
प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या
तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.” तेच अनुभवलंय. आयुष्यात
येणाऱ्या प्रत्येक माणसाचं महत्त्व आहेत. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती
काहीतरी शिकवण देऊन जाते. एका काळासाठी लाइफ-लाईन बनून जाते. उपयोगिता संपली कि
नातं संपलं. असं झालंय का? बरं तसं झालंय तर प्रत्येकासोबत का होत नाही. जर-तर ..चा
काय फायदा? वि. स. खांडेकर म्हटलेत: “जर आणि तर ! शब्दांची सुंदर प्रेते ! हे शब्द
कोषातून काढून का टाकत नाहीत?” एकेकाळी अत्यंत
जवळ असणारी कित्येक लोकं एवढी दूर गेलीत कि ती आता दिसेनासी झालीत. टाळी एका
हाताने वाजत नाही असंही म्हणतात. त्यात जायला नको. मेलेले मुडदे उकरण्यात काही अर्थ
नाही
विचार थांबत नव्हते. मन
अशांत होतं. मेंदू उत्तराच्या शोधात होता. प्रश्नाची गर्दी झाली होती. उत्तर
शोधता-शोधता निद्रेचा विजय झाला आणि दुसर्या दिवशी याचा मागमूस ही नव्हता. समोरचे
प्रश्न वेगळे आहेत. उत्तरे ही मलाच शोधायची आहेत. प्रश्न आणि उत्तर या चक्रात
गुरफटून गेलोय. कित्येक अनुत्तरीत आहेत. व. पु. नी म्हटलंय: “प्रश्नांपासून नेहमीच
पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्याला
गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत
नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते
सरळ रस्तेच...”
सचिन भगत