२००४-०५
ची गोष्ट. एम.जे. कॉलेज च्या मुलांच्या वसतिगृहात रूम नंबर २ मी राहत होतो. रूम
नंबर १ आणि २ म्हणजे कमवा आणि शिका (काही तथाकथित लोकांच्या भाषेत “कमवा आणि
खा”)च्या विद्यार्थ्यांसाठी राखीव. एका रुममध्ये १०-१२ विद्यार्थी राहायचे. कॉट
फक्त ३. सगळे एकत्र रुममध्ये असले म्हणजे पाय ठेवायला हि जागा नसायची. रुमच्या
खिडक्या नेहमी उघड्या असायच्या. कारण हि तसचं. बाहेर मेन रोड आणि त्यापलीकडे
अपार्टमेंट. त्यामुळे रोडवर हिरवळ नसली तरी अपार्टमेंट मध्ये असायची. काही
खिडकीजवळ खुर्ची टाकून बाहेरचं सौंदर्य पाहत राहायचे. एवढे विद्यार्थी असल्याने
स्वच्छता नावाचा प्रकार नव्हता. कोण करणार हा पण एक गहन प्रश्न होता. कधी कधी
लिस्ट तयार करून प्रत्येकाचा स्वच्छता दिवस ठरवावा. ते काही दिवस चालायचं आणि पुन्हा
जैसे थे. रात्री कितीही अभ्यास करायचा प्रयन्त केला तरी शक्य नव्हतंच.
येणा-जाणार्या गाड्यांचे आवाज आणि रूम मधला गोंधळ ते कायमचेच. मी मात्र त्या
गोंगाटात स्वतःच भविष्य शोधण्याचं प्रयत्न करत होतो. कित्येकांचं ते हिरवळ
पाहण्यात पदवी संपली. मी सहसा त्या फंदात पडलो नाही. त्या हिरवळीपायी स्वतःच
आयुष्य उजाड रान होऊन जायचं म्हणून लक्ष दिलं नाही. याचा अर्थ असाही नाही कि मला
ती हिरवळ अनुभवावी वाटली नाही.
अभ्यासाचं
वातावरण तसं कधी निर्माण झालं नाही. वाचन मात्र चालायचं. आमच्यातला एक बहाद्दर
कायम पुस्तकं वाचत राहायचा. नन्तर कळाल कि तो वेगळंच साहित्य वाचत असायचा.
आमच्यातल्या बऱ्याच जणांकडे ते साहित्य फिरत असायचं. वाचनाने व्यक्ती प्रगल्भ
होतात असं ऐकलं होतं. ते किती प्रगल्भ झालेत हे त्यांनाच ठाऊक.
दुसर्या
वर्षाला होतो तेव्हा. राष्ट्रीय सेवा योजनेत रविवारी श्रमदानासाठी जायचो. त्यावेळी
प्रा.काटीकर सर कार्यक्रम अधिकारी होते. किंबहुना त्यांच्यामुळेच त्याचा एक भाग
झालो. सर म्हणजे अस्सल व्यक्तिमत्त्व. मराठी साहित्यात त्यांचा हातखंडा. प्रत्येक
गोष्ट सहज करून सांगण्यात ते प्रवीण. विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणारे, वाचनाची आवड असणारे असं काही सांगता येईल
त्यांच्याबद्दल.
एकदा
मी रूमला एकटाच होतो. बाहेरून कुणीतरी दरवाजा ठोकला. दरवाजा उघडला तर समोर एक रूम
नंबर १२ मधला विद्यार्थी बाहेर उभा. काय रे काय म्हणतो? तो
म्हटला, चल चहा प्याला जाऊ. म्हटलं ठीक आहे. मग
आम्ही चहा प्यायला बाहेर पडलो. फार ओळख नव्हती. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
आणि मग रोज सोबत चहाला जाने सुरु झालं. मी आर्ट्स ला तर तो बी.एस.सी. ला. भिन्न
शाखा असल्या तरी विचार आमचे थोडेबहुत मिळतेजुळते. तसं स्वभाव मात्र एकदम टोकाचे.
तो एकदम सद्गृहस्थ आणि मला मात्र तो शब्दच लागू पडत नाही. पुढे एन.एस.एस. च्या
शिबिरात (कानसवाडे) आमची मैत्री वृद्धिंगत झाली ती कायमचीच. माझ्या आयुष्यातला हा
दुसरा मित्र. पहिला मुकेश जाधव (स्वतंत्र लिखाणाचा विषय). आणि मी, मुकेश आणि तो हे समीकरण (A=B=C so C=A) घट्ट होत गेलं. आम्ही म्हणजे तीन
टोकाचे तीन बिंदू...तरी टोकाचे मतभेद बाजूला ठेऊन पुढे जाणारे. पदवी चं तिसरं वर्ष
त्यांच्याच रुममध्ये घालवलं. जळगाव ला भटकंती हि खूप केली. ओमकारेश्वर मंदिराकडील
फेरफटके, दोन डब्ब्यात तीन, मेस बंद असली कि चहा बिस्कीट, चित्रपटगृहाला दिलेल्या भेटी, आणि बरंच काही. वादविवाद नाही झालेत असंही
नाही. जीवनाचा एक भाग म्हणून ते कधीच मागे पडलेत. यश- अपयश या काळात सोबत राहिली.
पुढे
मी पुण्यात गेलो ते त्याच्यामुळेच. मला पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा द्यायची
नव्हती. जळगाव मध्ये मन लागलं होतं. पण तो म्हटला “परीक्षा तर दे, पास होऊन दाखव आणि जाऊ नको.” ते मला पटलं.
त्यावेळी सहजासहजी कुणी ती प्रवेश परीक्षा पास होत नव्हतं. मी ती पास झालो पण
पुण्याला जाने टाळू शकलो नाही. पुणे विद्यापीठात गेलो तरी आमचा संपर्क कायम होता.
नियमित पत्र व्यवहार आणि नंतर फोन. अधून मधून तो विद्यापीठात भेटायला येत असायचा. मी
घरी येणार असलो कि अगोदर जळगाव ला उतरायचो. आणि जाताना हि तसचं. एकदा त्याने मला
सकाळी फोन केला आणि सांगितलं कि माझा चुलतभाऊ काही निमित्ताने पुण्यात आलाय, आता तो विद्यापीठाच्या गेटवर आहे, त्याला पिक अप कर. मी गेट वर गेलो तर तोच समोर.
चकित करायची त्याला भारी हौस. पुणे जिल्ह्यातील भरपूर ठिकाणे आम्ही सोबत फिरलो.
आम्ही
कुठली गोष्ट सहसा एकमेकांपासून लपवून ठेवत नाहीत (अपवाद असू शकतात काही गोष्टी!).
मी जिथं जिथं गेलो तिथं तो भेट देत राहिला. अजूनही आमच्या भेटीगाठी सुरु राहतात.
फोन वर चा संपर्क तसा कमी झालाय. दोनाचे चार, चारचे
सहा झालेत, जबादार्या वाढल्यात त्यामुळे ते
साहजिक. आज हि कुठलीही अडचण असली आणि मला शक्य झालं नाही तर मी शेवटचा फोन त्याला
करतो.
जळगाव
मधून फोन असला म्हणजे त्याच्याच असणार हि आमची खात्री. मग मोबाईल वरून असो कि landline.
आमच्यात
औपचारिकता करायची पद्धत चं नाही. वाढदिवस, सणवार, नवीन वर्ष किंवा अजूनकाही असो आम्ही कधी
एकमेकांना शुभेच्छा देत नाही. त्यावर विश्वास नाही आमचा.
पण
हे लिखाण अपवाद...
आज
२४ नोव्हेंबर म्हणजे त्या मित्राचा वाढदिवस. पूर्वी शुभेच्छा दिलेल्या आठवत नाही.
त्यानिमित्ताने हे लिखाण...(तसंही कित्येक दिवस झाले काही लिहिलं नव्हतं. )
प्रा.
मनोज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून हे लिखाण... जीवेत शरद: शतम्