Wednesday, June 3, 2020

गुंतागुंत


नेहमी...कायम...सातत्याची...अखंड...अविरत...कितीही प्रयत्न करा बाहेर पडायचा...गुंता काही सुटत नाही....
तो कशाचाही असो मग...भावनिक...व्यावहारिक...आर्थिक...राजकीय अथवा सामाजिक....प्रत्येक ठिकाणी ती गुंतागुंत...
गोष्टी सोप्या करायला जावं तर कठीण होऊन बसतात...सोडून दिलं कि गुंता अधिकच वाढत जातो...कशा-कशातून सुटका करावी?
स्पष्ट बोललं कि गुंता सुटतो पण नाती तुटतात...नाती टिकवायला गेलं कि गुंता वाढत जातो...फसगत होत राहते नेहमी.....मग निमुटपणे सहन करत राहायचं....
आजकाल प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत...त्या अपेक्षांची पूर्ती करणं कित्येकदा शक्य होत नाही...त्यातून सुरु होते आपली प्रतिमा हनन....भूतकाळातले अनुभव आपली पाठ सोडत नाही आणि वर्तमान जगू देत नाही अशी अवस्था....
जेव्हा जेव्हा हि बंधने झुगारण्याचा प्रयत्न करावा, आसपास ची लोकं आडकाठी करायला सुरु करतात....समाजाला अपेक्षित जगावं कि स्व-इच्छेने ...द्वंद...गुंतागुंत....इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती...
विचारप्रणाली...डावी...उजवी कि अजून कुठली...माणसाला जगण्यासाठी कुठल्यातरी विचारधारेचा आधार लागतो असंही म्हटलं जातं बर्याचदा...
या जगात एकच विचारप्रणाली होऊ शकते ती म्हणजे योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य...डाव्या...उजव्या या फंदात पडलं कि गोंधळ होतो...चुकीचं हि समर्थन करण्याची शक्यता असते किंवा असतेच...आजकाल ते सर्रास दिसून येते....मला हि विचारधारा आवडते म्हणून सारं काही बरोबर असं होऊ शकत नाही...
माणुसकी...माणूसपण हे विचारधारा होऊ शकत नाही का?
आज कुठे हि जा...लोकं सरळ-सरळ दोन गटात विभागले गेले आहेत....कुठलीही विचारधारा परिपूर्ण नाही...गुण-दोष आहेतच...त्यामुळे ते स्वीकारणं कठीणच...
मानवी कल्याणासाठी जो झटतो त्याची विचारधारा पहायची नसते… विचारधारा खायला देत नाही...पोटाचा प्रश्न सोडवत नाही...

गुंतागुंत आहे सगळी...नेमकं काय करावं हे सुचत नाही...आसपास चं वातावरण ही दिवसेंदिवस गढूळ होत चाललंय...निरागसता लोप पावत चाललीय....गोंधळ उडालाय विचारांचा सगळीकडे...सोपं...साधं...सरळ काही उरलं नाही...प्रत्येक गोष्ट किचकट होऊन बसली...गफलत होऊन बसली आहे...
हा गुंता कधीतरी सुटेल हीच काय ती आशा...

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

अनुभव ९


प्रत्येकाचं आयुष्य हे चढ-उतारांनी भरलेलं आहे...प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या दिव्यातून जावं लागतेच...मी हि त्याला अपवाद नाही...
बर्याच वर्षापूर्वी ची गोष्ट आहे...शिक्षण सुरु होतं...नुकताच ग्रामीण भागातून शहरी भागात गेलो होतो....एकानं सल्ला दिला ...शिक्षण सोडून दे...शिकून तरी काय होतं....त्यापेक्षा कंपनीत जा...काम कर...आता साठ रुपये रोज आहे...वाढेल हळू हळू....मी काही बोललो नाही.
फार अपेक्षेने मी त्यांच्याकडे गेलो होतो....सुरुवातीच्या काही दिवसात त्यांचा शिक्षणा-बद्दलचा दृष्टीकोन फार बरा नाही हे कळून चुकलं होतं...त्यामुळे आज ना उद्या असं काहीतरी होईल असं मला माहित होतं...
....व्यावहारिक सल्ला होता त्यांचा...वर्तमान परिस्थितीत तो लागू होता...कारण त्यावेळी आर्थिक आवक नव्हतीच...शिकणं म्हणजे हि कसरत होती...आणि भविष्याचं काही खरं नव्हतं...सर्व काही माहित असूनही पण तो सल्ला मला रुचला नाही...
प्रोत्साहन देण्या ऐवजी हिरमोड करणारा सल्ला होता....गरिबांची स्वप्ने प्रत्यक्षात येत नाही...त्यांनी स्वप्ने पाहू नये असा आपला समज आहे...तेच प्रत्येकाच्या बाबतीत होत राहते...मी त्याला अपवाद कसा असणार?
वारंवार त्यांच्याकडून येणाऱ्या दबावाला बळी पडलो आणि एका कंपनीत आठ दिवस जाऊन काम केलं...पण जमेना...स्वप्न आणि वास्तव यात संघर्ष सुरु होता...मन लागत नव्हतं....काम करण्याचं वय हि नव्हतं....अंग मेहनतीचं काम होतं...सहन होईना.....सोडून दिलं मग...मिळकत हि फार कमी....श्रमाला मोल नाही आपल्या देशात...मेहनत करून लोकांच्या हातात तुटपुंजा पैसा येतो हे तेव्हा कळल...
माझी त्यातून सुटका झाली...प्रत्येकाची होईल असेही नाही....जे वाटतं ते करायला हवं....निर्णय चुकला तरी चालेल, त्यातून शिकायला मिळेल....इतरांच्या सल्ल्यानुसार केलं आणि फसगत झाली तर त्यांना शिव्या घालण्यात आयुष्य जाईल...
मी मनाला जे पटेल ते केलं...भविष्य चांगलं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे माहित होतं...त्यामुळे कुणालाही भिक घातली नाही...पार्ट टाईम काम करून शिकलो....पुढे जात राहिलो...मार्ग सापडत गेला...काही चांगली लोकं भेटली...त्यांनी तो प्रवास सोपा केला....कित्येक अडचणी सोडवल्या...
अजूनही आसपास कित्येक जण आर्थिक कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही...अर्ध्यावर सोडून देणारेही अनेक...शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार...त्यांना तो मिळायला हवा...तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा...
इच्छा तेथे मार्ग...दुसरं काय?

मागे वळून पाहतो तेव्हा इतरांचं ऐकलं नाही ते बरं झालं असं वाटते...नाहीतर तर कुठेतरी तुटपुंज्या मिळकतीवर काम करावं लागलं असतं... स्वतःच्या आयुष्यातील निर्णय स्वतःच घ्यावेत...आसपास चे लोकं चांगला सल्ला देतीलच असे नाही.
अडचणी असंख्य आल्या...पण ती प्रत्येक अडचण काहीतरी शिकवून गेली...अनुभव देऊन गेली...


सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव