Wednesday, September 2, 2020

वर्क फ्रॉम होम (Work From Home)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झालं. परिणाम व्हायचा तो झाला. उद्योगधंदे, कंपन्या यांचे कामकाज ठप्प झाले. जेथे शक्य तिथे वर्क फ्रॉम होम ची सुविधा कर्मचाऱ्यांना दिली गेली. वर्क फ्रॉम होम चा येत्या काळात काय परिणाम होईल ते तर दिसून येईलच परंतु जॉब चे संदर्भ कसे बदलले आहेत ते लक्षात घेणे गरजेचे आहे. घरी बसून काम करता येत असल्याने कंपनीत जायची गरज नाही. त्यामुळे वाहतूक व्यवसायात असलेले कॅब चालक, ऑटो चालक यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. जवळपास  ३ लाख आयटी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण निम्मे झाले. त्यामुळे प्रदूषण सुद्धा कमी झालेय.

'वर्क फ्रॉम होम'मुळे लोकांचा प्रवासाचा खर्च, कपडे, खाद्य पदार्थ इत्यादी गोष्टींवर होणारा खर्च कमी खूप कमी झालाय. वरवर पाहता ते कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायद्याचा दिसतेय.  त्यांचा प्रवासात जाणारा वेळ वाचतोय. हे असलं तरी घरी तसा सेट अप तयार करणे, इन्टरनेट या बाबींची पूर्तता त्यांना करावी लागणार आहे.

कंपन्यांना ही ते फायद्याचे आहे. मग ती ऑफिस मधील विजेची बचत असो की ओघाने येणारे अनेक खर्च टाळले जात आहे. त्यामुळे भविष्यात अनेक कंपन्या  वर्क फ्रॉम होम चा पर्याय कायमस्वरूपी निवडू शकतात. अलीकडे आरपीजी या कंपनीने कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम चा पर्याय दिल्याची बातमी झळकली. ४ बिलियन डॉलर मूल्य असलेल्या या ग्रुपची टायर, आयटी, आरोग्य, ऊर्जा, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये मोठी उलाढाल आहे.  सेल्स विभागाचे सर्व कर्मचारी कायमस्वरुपी घरातून काम करतील असं धोरण आरपीजीने तयार केलं आहे. इतर कंपन्याही वर्क फ्रॉम होम च्या  धोरणात बदल करण्याची शक्यता आहे. भारतात कॅविनकेअरने आपली कॉर्पोरेट कार्यालये बंद करत जूनमध्ये वर्क फ्रॉम होमचा स्वीकार केला. ट्विटरनेही आपल्या कर्मचाऱ्यांना हव्या तेवढ्या कालावधीपर्यंत वर्क फ्रॉम होमची निवड करण्याचा पर्याय दिला आहे. गुगल आणि फेसबुकनेही वर्क फ्रॉम होम वाढवलं आहे.

वर्क फ्रॉम होम चा काय परिणाम होईल ते दिसून येईलच. अलीकडे एका सर्वेक्षणात वर्क फ्रॉम होम च्या जॉब्स  मध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय.



वर्क फ्रॉम होम चे फायदे:

वेळेची बचत

रहदारी कमी

पैश्याची बचत

कामाच्या तासांमध्ये शिथिलता

कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येईल

ताण-तणाव कमी

कामाच्या बाबतीत स्वातंत्र्य

वर्क फ्रॉम होम तोटे:

घरात लहान मुले असल्यास व्यत्यय जास्त

घर आणि काम यात फरक जाणवत नाही

क्रयशक्ती कमी

स्वाथ्यास हानिकारक जीवनशैली

इतरांशी असलेला संवाद कमी

एकाकीपणाची भावना वाढीस लागू शकते.

कामगिरीचे मूल्यमापन करणे कठीण

वर्क फ्रॉम होम करताना खालील गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे:

केंद्रित

स्वयंशिस्त

वेळेचे नियोजन

संघटीत आणि संरचित

एकटे काम करण्याची सवय

 

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव