कोरोना आला आणि सगळ्या गतीविधी स्तब्ध झाल्या. शिक्षण-क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल? त्याला पर्याय म्हणून आपण ऑनलाइन शिक्षणाकडे वळायला सुरुवात केली. यु-ट्यूब व्हिडीओ, झूम, ऑफिस टिम, गुगल मिट, गुगल फॉर्म, टेलेग्राम, मूडल, वेबेक्स असे अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात झाली. सुरुवातीला शिक्षकांना ही ते कठीणच गेलं. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपण सगळे भांबावलो. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल कंटेंट आपल्याकडे नव्हता. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असे सर्वच चिंताक्रांत.
मंदीतही संधी निर्माण झाली ती लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट
ई. निर्मिती करणाऱ्यांना कारण त्यांचा खप वाढला.
मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून कित्येकांनी ऐपत नसताना खर्च केला.
परंतु ज्यांची ऐपत नाही त्याचं काय? असंघटीत
क्षेत्रात काम करणारे, रोजंदारीवर काम करणारे, कष्टकरी, आदिवासी
अशा लोकांनी काय करावे? एकतर हाताला काम नाही. उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर ठाकला आहे.
त्यात शाळा, महाविद्यालयांकडून फी भरण्याचा तगादा आणि ऑनलाइन शिक्षणाचा रेटा.
त्या पालकांनी काय करावं?
त्यांच्या पाल्यांनी काय करावं? फी भरली नाही म्हणून कित्येक शाळा त्यांना
ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. समान संधी या तत्त्वाला हरताळ फासली गेली.
कुठलीही गोष्ट अमलांत आणण्यापूर्वी
पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार करण्याआधी आवश्यक
पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यात ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधने, नेटवर्क, विज
यांचा समावेश आहे. आपल्याकडे तसं झालं
नाही. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यापूर्वी
ज्या सुविधा गरजेच्या आहेत त्याकडे ना सरकारने लक्ष दिलं ना शाळांनी. उच्च
वर्गातील लोकांना अडचण नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा विचार केला तर ग्रामीण भागात
परिस्थिती वाईट. स्मार्ट फोन नाही, नेटवर्क
नाही, विज नाही. विद्यार्थ्यानी काय करावं? कित्येक घरात स्मार्ट फोन असलाच तर साधारण
दोन-तीन मुले शिकत असतात. आता एक स्मार्ट फोन दोन-तीन जण कसे वापरणार? संगणक,
laptop ई.
चा तर ते लोकं विचार ही करू शकत नाही. कारण तेवढी गुंतवणूक करण्याची त्यांची
आर्थिक कुवत नाही. मग गरीब पार्श्वभूमीतून आलेले विद्यार्थी जर शिक्षणापासून वंचित
राहत असतील तर त्याची जबाबदारी कुणाची?
पारंपारिक शिक्षणाला पर्याय ऑनलाईन
शिक्षण आहे का याचाही विचार केला गेला पाहिजे. वस्तुस्थिती पाहिली तर असं लक्षात
येते की ऑनलाईन शिक्षण यावर पूर्णपणे आपण अवलंबून राहू शकत नाही. पारंपारिक
शिक्षणाला ऑनलाईन ची जोड देऊन शिक्षण पद्धती अधिक चांगली करता येईल. प्रत्येक
पद्धतीचे तसे फायदे-तोटे असतात. पारंपारिक पद्धतीत विद्यार्थांना जे सोशल स्किल्स
प्राप्त होतात, मानसिक जडण-घडण होते, व्यक्तिमत्व विकास होतो ते ऑनलाईन पद्धतीत होत
नाही. जगण्यासाठी पुस्तकी ज्ञान कामी येत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालंय. ते फार तर
पैसे कमविण्यासाठी कामात येते परंतु समाजात जगताना, कुटुंब एकसंघ ठेवताना जी सामाजिक कौशल्ये लागतात ती पारंपारिक शिक्षण
पद्धतीत मिळतात. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग, मित्र-मैत्रिणी, स्पर्धा, यश-अपयश, खेळ
यातून अनेक गोष्टी विद्यार्थी शिकतात. ऑनलाईन मध्ये याचा गंध ही नाही.
शिक्षण समाजातील सर्व घटकांपर्यंत
पोचलं पाहिजे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. याबाबत सरकारने विचार करायला हवा. ऑनलाईन शिक्षणाचा अट्टहास करताना गरीबांपासून
श्रीमंतांपर्यंत काय परिणाम होतील याचा विचार व्हायला हवा.
प्राथमिक शिक्षण म्हणजे नर्सरी ते
साधारण चौथीपर्यंत ऑनलाईन शिक्षण कितपत फायदेशीर ठरणार? कारण त्या वयोगटातील मुलांना फार काही समज
नसते. मुळात भारतात तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कश्यासाठी करायचा याचं भान नाही. तेव्हा प्राथमिक
शिक्षणाबाबत गोंधळ निर्माण होईल. स्क्रिन ला ही मुले बळी पडण्याची शक्यता आहे.
त्यांच्यावर मानसिक परिणाम कसे होतील? Screen Addiction मुळे काय समस्या निर्माण होऊ शकतात? अशा अनेक बाबींचा विचार झाला पाहिजे. म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा
अट्टहास करताना पायाभूत सुविधा निर्माण करणे,
नियोजन करणे, कुठल्या वयोगटासाठी काय योग्य याचा आराखडा तयार करणे या बाबी
महत्त्वाच्या आहेत.
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव