Wednesday, September 25, 2019

संभाषण कौशल्ये (Communication Skills)

काळ बदलला, शिक्षण पद्धती बदलली, मार्केट चं स्वरूप बदललं. त्यामुळे विविध कंपन्यांना लागणारं मनुष्यबळ ही वेगळ्या कौशल्याचं. व्यवसाय पूर्वीसारखा राहिला नाही. प्रोडक्ट्स कुठलेही असोत त्याचं मार्केटिंग केल्याशिवाय विकल्या जात नाही. ज्याचं सादरीकरण चांगलं त्याचा व्यवसाय चांगला. त्यामुळे चांगलं संभाषण कौशल्य असलेया लोकांना बाजारात मागणी आहे. आजकाल शालेय अभ्यासक्रमात संभाषण कौशल्य समावेशित करण्यात आले आहे. 
विद्यार्थी दशेपासून प्रत्येकाने ते आत्मसात करावे हा त्यामागील उद्देश. फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. लोकांसमोर ते मांडता यायला हवं. पुस्तकी ज्ञानाला व्यवहाराची, सादरीकरणाची, संभाषण कौशल्यांची जोड हवी. त्याशिवाय खाजगी क्षेत्रात नोकरी मिळविणे तर कठीण आहेच पण ती टिकविणे त्यापेक्षाही कठीण.  आय.टी. सेक्टर मध्ये तर संभाषण कौशल्या शिवाय पर्याय नाही.  पारंपारिक शिक्षण पद्धतीत कौशल्यांवर भर नव्हता. पण आता परिस्थिती बदलली आहे. घोकंपट्टी करून गुण मिळवणारे विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत. ज्याच्याकडे जास्त कौशल्ये त्याला नोकरीच्या संधी जास्त हे समीकरण झालंय.
आपण इतरांशी कसे बोलतो, कसा संवाद साधतो, आपल्या  चेहऱ्यावरील भावमुद्रा कशी, हाव-भाव कसे आहेत, देह-बोली कशी आहे, आपली भाषा कशी आहे, आपण कसं चालतो, उभे राहतो अथवा बसतो अशा अनेक गोष्टींवर आपलं संभाषण कौशल्य अवलंबून.
संभाषण कौशल्ये वृद्धिंगत करावी असं वाटत असेल खालील गोष्टी आत्मसात केल्याच पाहिजे-
•बोलण्याशी सुसंगत हावभाव, देहबोली आणि चेहऱ्यावरील भावमुद्रा
•बोलताना आत्मविश्वास हवा
•इतरांचे ऐकून घेण्याची क्षमता
•नजरेला नजर भिडवून बोलणे
•बोलताना आणि ऐकताना उत्साह दाखवणे
•बोलण्यात स्पष्टपणा हवा
•कमी शब्दात जास्त मांडण्याची कला असावी
•संदिग्ध बोलणे टाळावे
•भाषेचा प्रभावी वापर
संभाषण कौशल्यांचे महत्व वाढल्याने बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध या विषयावर. प्रशिक्षण संस्था आणि प्रशिक्षक चा ही बोलबाला आहे. वर्कशॉप, सेमिनार मधून मार्गदर्शन सुरु आहे.
चांगल्या संवादाने चांगलं व्यक्त होता येतं. मत चांगल्या पद्धतीने मांडता येते. इतरांशी बोलताना, संवाद साधना काही अलिखित नियम असतात त्याचं पालन करता यायला हवं. बहुतांशी राजकारणी लोकांकडे संवाद कौशल्ये असते. त्यामुळे ते लोकांना संमोहित करतात. त्याचं मत परिवर्तन करतात. ज्याचं संभाषण कौशल्य चांगलं त्याचं सादरीकरण चांगलं.

एका दिवसात संभाषण कौशल्ये आत्मसात करता येत नाहीत. त्याचा नेहमी सराव करावा लागेल. विद्यार्थ्यानी वक्तृत्व, वादविवाद या सारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. जिथे जिथे बोलण्याची संधी मिळेल तिथे तिथे बोलावं. आपल्या चुकांपासून सातत्याने शिकलं तर ही कौशल्ये लवकर आत्मसात करता येतील. फक्त अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर कुठल्याही शाखेतल्या विद्यार्थ्यासाठी हे महत्त्वपूर्ण.
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

व्यक्तिमत्त्व विकास (Personality Development):


व्यक्तिमत्त्व विकासआताच्या काळातील परवलीचा शब्द. बदलत्या शिक्षण पद्धतीत सुद्धा व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात आला आहे.
व्यक्तिमत्त्व आणि  विकास या दोन संकल्पना आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.
व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय?:
आपण जसं दिसतो ते व्यक्तिमत्त्व की आपल्या आत आहे ते की अजून काही. वयाने वाढलो किंवा शरीराने वाढलो किंवा चांगले कपडे घातले म्हणजे व्यक्तिमत्व विकास झाला का? याचं उत्तर नाही असंच आहे.
आपण जसं वयाने वाढत जातो तसे आपल्यात मानसिक, शारीरिक, बौद्धिक, भावनात्मक  बदल होत जातात. आपल्या आसपास असलेया प्रत्येक गोष्टीचा, जसे की कुटुंब, शेजारी, मित्र, शाळेतील वातावरण, आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो.
काही लोकं रागीट असतात तर काही प्रेमळ असतात. काही फटकळ असतात तर काही प्रेमाने संवाद साधतात. आपण जसं समाजात वावरतो, जसा संवाद साधतो त्यावर आपलं व्यक्तिमत्व ठरत असते. आपली समाजातील प्रतिमा ठरत असते. आणि चांगली प्रतिमा असणे कधीही फायद्याचीच.
थोडक्यात काय तर आपला सर्वांगीण विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास. मग तो मानसिक, शारीरिक, बौद्धिक किंवा आपल्या शी संबंधित सर्व काही. चार-चौघात, समाजात राहायचं अथवा नोकरी करायची तर इतरांची जुळवून घेणे ही महत्वाचे. त्यासाठी व्यक्तिमत्व विकास गरजेचा.
व्यक्तिमत्व विकास करायचा तर खालील बाबी अंमलात आणाव्या लागतील:
•उत्कृष्ट संभाषण कौशल्य / संवाद साधण्याची कला
•चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून ग्रीट करणे.
•इतरांची मते ऐकून घेण्याची क्षमता असणे.
•निर्णय क्षमता असणे.
•अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला घाबरून न जाता संयमाने सामोरे जाणे.
•रागावर नियंत्रण ठेवणे.
•चांगल्या सवयी अंगी बाळगणे
•संवाद साधने
•संयम बाळगणे
•आत्मविश्वास असणे
•सकारात्मक विचार करणे
•सतत कार्यक्षम राहणे
•उत्साही असणे
•प्रसंगावधान बाळगणे
•टिम वर्क
•ठरवून दिलेल्या वेळेत काम करणे.
•वेळेचं महत्त्व जाणणे
•इतरांच्या चुकांपासून शिकणे
•नियमित व्यायाम/योगा करणे
•निटनेटके राहणीमान/पेहराव

या सर्व गोष्टी जन्माने मिळत नाही. जन्माने मिळते ते शरीर. नैसर्गिक रित्या त्याची वाढ होत असते. त्या बरोबर आपल्याला ही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. शिकावी लागतात. मोठ-मोठ्या लोकांची चरित्रे/आत्मचरित्रे वाचून स्वतःमध्ये बदल घडवून आणता येऊ शकतो. सार्या गोष्टी एका वेळी आत्मसात केल्या जाऊ शकत नाही. हळू-हळू त्या शिकाव्या लागतात. व्यक्तिमत्व विकास झालेले व्यक्ती यशस्वी झालेले दिसतात. कारण त्यांना लोकांना समजून घेण्याची, त्यांचे प्रश्न समजून घेण्याची कला अवगत झालेली असते.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

सेल्फ एस्टीम (Self-Esteem) म्हणजे काय?


सेल्फ एस्टीम म्हणजे नेमकं काय? तो कसा वृद्धिंगत करावा? याबद्दल थोडंस...
आपले स्वतः बद्दलचे मत अथवा स्वतःची स्वतःला असली ओळख म्हणजे सेल्फ एस्टीम. स्वतःमधील गुण-दोष आपल्याला माहित असणे आणि त्यावर काम करणे हे चांगला सेल्फ एस्टीम असलेल्या व्यक्तींचं काम.  कित्येकदा आपण स्वतः बद्दल विचार करत नाही. आपल्या डोक्यात नेहमी इतरांचे विचार.  नकळत आपण तुलना करत जातो आपली इतरांशी. त्यात आपल्या स्वतः मध्ये काही कमी आढळलं की आपण स्वतःबद्दल नकारार्थी होत जातो. आत्मविश्वास ढासळतो. तिथूनच लो सेल्फ-एस्टीम ची सुरुवात होते. त्याचा आपल्या व्यक्तिमत्वा वर नकारात्मक परिणाम होतो. इतरांपासून आपण दूर जाण्याची भीती असते. लोकांचं आपल्याबद्दलच मत दुषित होऊ शकते. आपल्याला मिळणाऱ्या संधी हिरावून घेतल्या जाऊ शकतात.
त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सेल्फ एस्टीम बद्दल जागृत असणे गरजेचे आहे. तो व्यक्तिमत्त्व विकासाचा एक भाग.

सेल्फ एस्टीम वाढवायचा तर खालील गोष्टी केल्याच पाहिजे:
स्वतःबद्दल प्रेम / विश्वास असला पाहिजे.
आपण जसं आहोत तसं स्विकार करा.
स्वतःचा आणि इतरांचा आदर केला पाहिजे.
प्रत्येकाकडून चुका होतंच असतात. त्यात काही गैर नाही. त्यामुळे खचून न जाता चुकांपासून शिकलं पाहिजे.
आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. कारण परिपूर्ण या जगात कुणीच नाही.
आयुष्यात घडणार्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे.
चांगल्या / सकारात्मक वृत्ती असलेया लोकांच्या सान्निध्यात राहणे.
इतरांना मदत करणे.
नकारार्थी विचार अथवा कृती टाळता आली पाहिजे.
आपले आदर्श/तत्त्व याचं पालन करा.
आपले विचार इतरांसमोर स्पष्टपणे मांडा.
या गोष्टी जर आपल्यात नसतील किंवा आपण करत नसाल तर आपला सेल्फ एस्टीम लो आहे असं समजायचं.


सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव