Wednesday, July 23, 2014

पुणे टू शेगाव व्हाया पंढरपूर...


५ ऑगस्ट २००६ ला मी पुण्यात गेलो. सगळं काही नवीन होतं. कुणीही ओळखीचं नव्हतं. मला अजूनही आठवतो तो पहिला दिवस. करमत नव्हतं म्हणून मी शिवाजी पुतळ्याजवळ कित्येक तास घालवले. आपण इथं कशाला आलोय म्हणून विचार हि आला मनात. कारण मन जळगाव मध्ये गुंतलेलं होतं. तिथल्या आठवणी पाठ सोडेना. सुरुवातीचे काही दिवस फार कंटाळवाणे होते. हळू हळू मात्र पुणे उलगडत गेलं आणि मी तिथं रमत गेलो.  एम.ए. ची दोन वर्षे पाहता पाहता निघून गेली. त्यानंतर एम.फिल. आणि पत्रकारिता हि पूर्ण केलं.

पुण्यात पाच-सहा वर्षे झाली होती. जॉब सुरु होता पण मन लागत नव्हतं. त्यामुळे पुणे सोडायचं तर होतं पण योग्य संधी ची वाट पाहत होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जॉब साठी अर्ज करणं सुरु होतं. यातच पंढरपूर हून एके दिवशी कॉल आला मुलाखतीचा. २९ नोव्हेंबर २०११ ला मी तिथं गेलो. मुलाखत संपवून जॉब चं फायनल झालं होतं. प्रश्न होता मी कधी रुजू होतो ते. अचानक पुणे सोडणं कठीण होतं. परंतु माझ्यासमोर पर्याय नव्हता. त्याला कारण हि तसच होतं. पुणे विद्यापीठात मी असंख्य स्वप्नं रंगवली होती. त्यापैकी कुठलंच प्रत्यक्षात येत नव्हतं. पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचा माझ्या समोर चुराडा झाला होता. त्यामुळे एकेकाळी चांगलं वाटणारं विद्यापीठ असह्य झालं होतं. नजरेसमोर स्वप्नांचा पाचोळा होत असताना तिथं राहणं शक्य नव्हतंच. सगळी स्वप्ने हवेत विरून गेली होती. ती प्रत्यक्षात येणारंच नाही असं मला वाटायला लागलं होतं.
 
२६ डिसेंबर २०११ ला मी पंढरपूर ला रुजू झालो. तिथं कुणी ओळखीचं नव्हतं. सगळं नवीन होतं. तिथं जेमतेम दीड वर्ष थांबलो. या कालावधीत खूप गोष्टी घडल्या. पंढरपूर मध्ये मला खूप गोष्टी मिळाल्या. नेट उत्तीर्ण होणे, एम.फिल पूर्ण, आणि पि.एच.डी. ला प्रवेश सगळं पंढरपूर ला असताना घडलं. विठ्ठलाची कृपा म्हणावयास हरकत नाही. पण तिथं हि नकोसं झालं नंतर. दूर असल्याने घरी येणे व्हायचं नाही. सुट्ट्या फार कमी मिळायच्या. म्हणून इतरत्र जॉब शोधायला सुरुवात केली. आणि त्यातूनच शेगाव ला येणे शक्य झालं. सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर मी पंढरपूर सोडलं. आणि शेगाव ला रुजू झालो. मी जिथं जिथं गेलो तिथं मला जिवाभावाची मानसं मिळाली. काहींच्या कुटुंबाचा भाग झालो. त्यांनी मला स्वीकारलं माझ्या गुण-दोषांसहीत. म्हणून पंढरपूर सोडताना त्रास झाला. खरं तर मी जे काही शिकलो त्याचं सगळं श्रेय या लोकांकडेच जातं. अभियांत्रिकी काय ते पंढरपूर ला समजलं खऱ्या अर्थाने. त्यापूर्वी माझा काही फार अनुभव नव्हता. संधी मिळत गेली आणि मी शिकत गेलो. काही लोकांचा सहवास आपल्याला भरपूर काही शिकवून जातो.

एक वर्ष पूर्ण झालं शेगाव ला येऊन. आता बऱ्यापैकी रुळलोय इथं. भलेही पंढरपूर सारखी कंपनी नसेल पण कामाचं समाधान आहे. घरी जाने येणे होते.  बरीच मित्रमंडळी आसपास आहेत त्यामुळे भेटीगाठी होत असतात. इथे काम आपल्या परीने करण्याचे स्वातंत्र आहे. कुणाचा त्रास नाही. कित्येक दिवसांपासून चाललेली भटकंती आता थांबली आहे. पुढे काय होईल माहित नाही. कारण जेव्हा जेव्हा मला इथं आपण रुळलो असं जाणवायला लागलं तेव्हा तिथून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाली. हा माझा अनुभव आहे. आता काय होते तेच पाहायचे आहे.

अधून मधून जळगाव ला जात असतो. त्याच ठिकाणी खरी माझी सुरुवात झाली. त्याच शहरानं मला स्वप्ने दिलीत. जीवन जगण्याची नवी उमेद दिली. माझ्या विस्कळीत झालेल्या जीवनाला एक दिशा दिली. एक आशेचा किरण माझ्या मनात निर्माण केला. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. आणि मला जगण्याचं प्रेम निर्माण झालं. त्याचं शहरानं मला काही जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी दिलेत. एम. जे. चं ते मुलाचं वसतिगृह आणि तेथील रूम नंबर १२. अनेक चर्चा, वादविवाद यांच्यासाठी प्रसिद्ध. त्याचं रूम मध्ये मी चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहिली. काही प्रत्यक्षात आली तर काही काळाच्या ओघात नष्ट झाली.


माझ्या मनात स्वप्नरूपी अंकुर रुजवणारया त्या शहराला माझा मानाचा मुजरा.