Thursday, January 25, 2018

जागो ग्राहक जागो –भाग २

तीन-चार वर्षापूर्वीचा अनुभव. मला वैयक्तिक कर्ज हवं होतं. सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांचे उंबरठे झिझवले पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी कर्ज देण्यास नकार दिला. पैश्याची अत्यंत निकड होती. म्हणून मी एचडीएफसी बँकेत गेलो आणि तेथील मनेजर ला भेटलो. किती लोन हवंय तुम्हाला त्यांचा प्रश्न. दोन लाख मी उत्तरलो.  मिळेल म्हटले. त्यांनी मला आवश्यक कागदपत्रे घेऊन यायला सांगितले. आवश्यक कागदपत्रे घेऊन मी दुसर्या दिवशी बँकेत गेलो आणि सादर केले. व्याज किती आणि कसं असं कसलंच काही मी विचारलं नाही. “तुमची फाईल पुढे पाठवतो आणि मंजूर झाल्यावर कळवतो”, असे ते मनेजर म्हटले.

दोन-तीन दिवसांनतर मला त्यांचा फोन आला. “तुमचे लोन मंजूर झालंय, बँकेत या आणि प्रक्रिया पूर्ण करा” असं म्हटले. माझी काम आटोपून मी बँकेत गेलो. त्यांच्या कक्षामध्ये गेलो. ते म्हटले अडीच लाख घ्यावं लागेल. मी हो म्हटलं. त्यांनी दुसर्या कर्मचार्याला बोलावले आणि प्रक्रिया पूर्ण करायला सांगून ते तिथून निघून गेले.
आता हे नवीन महाशय म्हटले कि तुम्हाला एक विमा पण घ्यावा लागेल त्याशिवाय लोन मिळत नाही. माझी इच्छा नव्हती.
 “कितीचा विमा घ्यायचा आहे, मी विचारलं.
“५० हजार पुढील पांच वर्षांसाठी आणि दहा वर्षानंतर तुम्हाला फायदे मिळतील,” ते महाशय उत्तरले.  
ती रक्कम ऐकून मी थबकलोच. माझ्याकडे पन्नास रुपये नाहीत आणि हा माणूस मला पन्नास हजारांची पोलीसी घ्यायला लावतोय. काय करावं मलाही सुचेना. मी म्हटलं २० हजार रुपयांचा चालेल मला. पण ते नाही म्हटले. बर्याच वेळ मी त्यांच्याशी ओढाताण करत राहिलो. शेवटी तो म्हटला किमान चाळीस हजार रुपयांचा विमा काढावा लागेल अन्यथा लोन मिळणार नाही.  गरजवंताला अक्कल नसते त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. मी होकार दिला. त्याने माझ्या सह्या घेतल्या. त्या विम्याबद्दल मी काहीच माहिती घेतली नाही. फॉर्म हि त्यानेच भरले. दोन तीन दिवसानंतर माझी खात्यात पैसे जमा झालेत आणि त्यानंतर विम्याचे पैसे डेबिट झालेत. प्रोसेसिंग फी वगैरे जाऊन उरलेले दोन लाख माझ्या खात्यात पडलेत. मी गावाकडील पत्ता दिलेल्या असल्याने विम्याचे कागदपत्रे घरी पोचलेत. घरी कुणाला इंग्रजी वाचता येत नाही त्यामुळे ते पडून राहिले.
मी दोन महिन्यानंतर घरी गेलो. ती कागदपत्रे वाचून काढलीत. त्यात हा विमा पंधरा हजार रुपयांपासून सुरु करता येतो असं होतं. आणि ते बँकेतले महाशय मला चाळीस हजारांच्या खाली नाही म्हणत होते. मला फसवलं गेलं होतं. आता काय करावं हा प्रश्न होता. मी तो विषय सोडणार नव्हतोच. विमा रद्द करण्याचा कालावधी हि संपला होता. त्याला फ्री लुक पेरिड असं म्हणतात म्हणजे विम्याची कागदपत्रे मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला मला ते नकोय म्हणून रद्द करता येते. पण तो पर्याय हि माझ्या समोर नव्हता.
मी त्या ब्रांच मनेजर ला फोन केला आणि तुम्ही मला चुकीची माहिती सांगून विमा काढला, असं करायला नको होतं. “सर ते तुमच्या भल्यासाठीच आम्ही केलं” असं ते म्हटले. माझं चांगलं-वाईट मला कळते, तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही असं म्हणून मी फोन कट केला. तेव्हा माझ्याकडे स्मार्ट फोन नव्हता त्यामुळे सात-आठ किमी अंतरावर असलेल्या नेट कफे वर गेलो. एचडीएफसी लाइफ च्या वेबसाईट ला भेट देऊन तक्रार कुठे नोंदवायची त्याची माहिती घेतली आणि मेल पाठवला. शिकलेल्या लोकांचे जर हे हाल असतील तर गरीब, अशिक्षित लोकांच काय? असे नानातऱ्हेचे प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होते. याचा आता पाठपुरावा करायचाच.
दोन-तीन दिवसानंतर माल त्या मनेजर चा फोन आला आणि तुम्ही हे काय केलंय असं म्हटला. काही नाही जे योग्य वाटलं ते केलं. भेटायला या म्हणे. भेटतो म्हटलं शेगाव ला आल्यानंतर. सोमवारी मी शेगाव ला गेलो. त्या मनेजर चे कित्येक फोन आलेत मी उचलेले नाहीत. शेवटी त्याने एक प्रतिनिधी मला भेटायला कॉलेजला पाठवला. मला शोधत शोधत तो माझ्या विभागात आला. त्यानं माझ मन वळवायचा प्रयत्न केला. तक्रार मागे घ्या. मी नकार दिला. तुम्ही काहीपण केलं तरी मी तक्रार मागे घेणार नाही असं मी त्याला सरळ सांगितलं. कमीत-कमी बँकेत येऊन मनेजर साहेबाना तरी भेटा म्हणे. मी होकार दिला आणि संध्याकाळी येतो म्हटलं बँकेत. मी मुद्दाम उशिरा गेलो. सात वाजले असतील संध्याकाळचे. परत तिचं चर्चा. मनेजर म्हटले मी माझा रिप्लाय पाठवतो म्हणे. मी माझ्या मतावर ठाम होतो.  काहीच होणार नाही म्हणे. तुम्ही सह्या केल्या आहेत. जे होईल ते होईल म्हटलं, पाहू आणि मी तिथून निघून आलो.
दोन दिवसांनतर मला मेल आला. त्यात असं म्हटलं होतं कि आमच्या प्रतिनिधीने तुम्हाला टर्म्स सांगितल्या होत्या आणि तुम्ही त्या मान्य केल्यात.  फ्री लुक कालावधी पण संपलाय त्यामुळे तुमची पॉलीसी रद्द होऊ शकत नाही.
आता काय करावं मी विचारात पडलो. एखादी सरकारी संस्था असावी कि जी विमा क्षेत्र नियंत्रित करते असा विचार माझ्या डोक्यात आला. नेट सर्च करून आयआरडीए ची माहिती मिळाली. ती वेबसाईट एक दिवस वाचून काढली आणि एका ठिकाणी मला एक मुद्दा मिळाला. त्यात असं म्हटलं होतं कि जर पोलिसीधारक शिक्षित असेल तर त्याने संपूर्ण कागदपत्रे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं पाहिजे. माझ्या बाबतीत तर मी फक्त सह्या केल्या.
पुन्हा एकदा मेल लिहिला आणि ESCALATION 1 ला पाठवला. हि पुढची पायरी. जर तुमचं HDFC LIFE कडून समाधान झालं नाही तर इथे तक्रार नोंदवायची असते.  मी सर्व सविस्तर नमूद केलं आणि मेल पाठवला. दहा दिवसात मला उत्तर मिळेल असं त्याचं उत्तर आलं. मी दिवस मोजत गेलो पण मला उत्तर मिळालं नाही. मी पुन्हा त्याना मेल केला पण काही उपयोग झाला नाही.
आता काय करायचं हा प्रश्न पडला. इथून रिप्लाय नाही मिळाला तर पुढे काय याचा शोध घेतला आणि ESCALATION २ ला मेल केला. पुन्हा तेच दहा दिवसात उत्तर मिळेल आणि मला उत्तर मिळालं. सोबत त्यांनी फॉर्म पाठवला. त्याची प्रिंट घेऊन भरायचा आणि बँकेत जमा करायचा. आणि आठ दिवसात पैसे परत मिळतील असं म्हटलं होतं. मी जाम खुश झालो.  
मी बँकेत गेलो तर ते पण आश्चर्यचकित झाले. त्यानाही माहित नव्हतं. इकडे-तिकडे फोन करून त्यांनी माहिती घेतली. मी ते सादर केलं. मनेजर साहेब म्हटले माझ्या संपूर्ण करिअर मध्ये पहिल्यांदा असं घडलंय. विम्याची रक्कम फ्री लुक नंतर भेटत नाही. आयुष्यात बर्याच गोष्टी पहिल्यांदाच घडतात, मी उत्तरलो.  त्या मनेजर ला विमा क्षेत्रात चांगला बिजनेस केला म्हणून पुरस्कार मिळालेला होता. आता मला समजल कि तुम्ही बिजनेस कसा केला ते असं मी बोललो आणि तेथून निघालो. चार-पांच दिवसांनी माझ्या अकाऊंट पैसे जमा झालेत आणि तो विषय संपला.
किती फसवेगिरी असते आपल्या आसपास. कित्येक लोकं ते स्वीकारून घेतात.  चुकीची माहिती देऊन तुम्ही असं करू शकत नाही. काही नैतिकता पाळायला हवी. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना गड्ड्यात टाकायचं. दुर्दैवाने तेच होतंय आज-काल. मी माझ्या आयुष्यात एक-एक रुपयासाठी संघर्ष केला आणि या माणसाने मला तब्बल चाळीस हजारांनी गंडवल. हि कल्पनाच मला जगू देत नव्हती आणि त्यातूनच हे सर्व सुरु झालं.  “सत्य परेशान जरूर होता है लेकीन पराजित नही.” दोन महिने सलग याचा पाठपुरावा करत राहिलो. पर्सनल लोन ला विमा काढायची आवश्यकता नसते मला हे माहित नव्हतं.  पण समोरचे प्रश्न इतके गंभीर होते कि त्याची माहिती तेव्हा घ्यावीशी वाटली नाही. आणि हा सगळा प्रकार घडला.
नंतर जेव्हा जेव्हा त्या बँकेत गेलो त्यांना वाटायचं काहीतरी समस्या आहे आता.
*संपूर्ण संभाषण सोबत जोडले आहेत.






सचिन भगत