Tuesday, October 8, 2019

ती... अ गर्ल टू रिमेंबर (काल्पनिक)


आज मी जळगाव ला जायला निघालो. एकटा प्रवास करणं तसं जिकिरीचं काम. आजकाल एकटं जायचो इच्छा होत नाहीकिती उच्छाद मांडलाय या पावसानं यंदा. ऐरवी चार पाच सलग दांडी मारली. कुठं- आला आणि कुठं गेला समजला नाही. या वर्षी मात्र तो नाकीनऊ आणतोय. कधी वातावरण बदलेल आणि पाऊस येईल सांगता येत नाही. आपण झोपेत असताना तो धो धो बरसतो विजांच्या कडकडाटासह.
ट्रेन मध्ये बसलो.  थोड्याच वेळात धो-धो पाऊस सुरू झाला. त्या पावसानं मला आज तिची आठवण करून दिली. पावसाचा जोर जसा जसा वाढत गेला तशी तशी ती मला गवसत गेली, आठवत गेली.
नकळत मी मोबाईल मध्ये मी टाईप करत गेलो. तो प्रवास उलगडत गेलो. प्रवासात नाही का किती लोकं आपल्याला भेटतात ओळखी-अनोळखी म्हणून ते जीवनाचे भाग होतात का? नाहीच. माझ्या बाबतीत ही असंच झालं.
ती...कोण? कुठली? पासून सुरु झालेला प्रवास ते तिची ओळख. सारं काही अनपेक्षित. ती भेटल्यापासून माझा प्रवास विस्कळीत झाला. मला भेटली पहिल्यांदा....पुण्यात. अचानक... अपघातानं...अन वादळ निर्माण करून गेली माझ्या आयुष्यात.
अचानक आली आणि तशीच निघून गेली पुन्हा कधी ही भेटण्यासाठी.
तिरसट आहेस तू... सरळ बोलूच शकत नाही... तुला असल्या गोष्टी, असलं वागणं सुचत तरी कसं?  ती नेहमी विचारायची.
असाच आहे मी. आता तस होत मी काय करू त्याला.” मी इतरांना जसं पाहिजे तसे वागणार नाही. माझा नेहमीचा बचाव.
ती कायम माझ्या आसपास राहिली. मलाही तिची सवय झाली होती. तिची सोबत हवी होती. ती भेटली नाही की अस्वस्थ होऊन जायचो. आपण कशासाठी आलोय इथं आणि काय होतंय. एकदा तिने तिचा फोटो अल्बम मला दाखवायला आणला. तिचे ते फोटो पाहून माझं मन भरकटलं. एक दिवस अल्बम माझ्याकडे होता. कित्येकदा पाहिला असेल. दुसर्या दिवशी भेटली ती कॅन्टीन ला आणि चहा घेत असताना तिला बोलून टाकलं... आयुष्यभर सोबत राहशील का?
उद्या पेपर आहे आपला. अभ्यास कर आधी.” ती उत्तरली.
हा पण पेपर आहे माझ्यासाठी. परीक्षेच्या पेपर पेक्षा कठीण आणि अधिक महत्त्वाचा.
मूर्ख आहेस का रे तू? जा.
 तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस.” असं म्हणून उत्तर देणं टाळलं. पुन्हा मी तिला कधी विचारलं नाही. तिनेही कधी विषय काढला नाही.
व्यवहारीक प्रश्न. कशातच गुंतायच नाही. म्हणून वेळ घालवला नाही.
लग्न ठरलं तेव्हा बोलली होती ठामपणे ... तुला यायलाच हवं. पण मी गेलो नाही. लग्नापूर्वी एकदा मूव्ही ला गेलो होतो. ती शेवटची भेट. पुन्हा कधी संपर्क झाला नाही. ना तिने केला, ना मी.
ती कुठंय... काय करते... माहीत नाही. कधी जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही.
आठ- दहा वर्षे झाली असतील. तिची आठवण मला नेहमी येत राहिली. तिचा क्लास वेगळा... सगळं वेगळं. पण तिने जुळवून घेतलं. माझी प्रत्येक अडचण दूर केली. वेळ प्रसंगी मदत हि केली.
ती नसती तर माझा प्रवास कसा राहिला असता? तिला साधं धन्यवाद सुद्धा म्हणता आलं नाही
वॉक टू रिमेंबर... हे पुस्तक तिने भेट दिलेलं वाढदिवसाला. मध्यंतरी  ते एका कप्प्यात पडलेलं दिसलं.
नक्की वाच  म्हटली होती. तिने कित्येकदा विचारलं, वाचलं का. वाचन करेल असं म्हणता म्हणता दहा वर्षे उलटून गेली.   
काल परवा ते वाचायला घेतलं. एकदा हातात घेतलं तर संपेपर्यंत खाली ठेवलं नाही. पहिल्या पानावर सुंदर अक्षरात लिहिलं होत टू माय बेस्ट फ्रेंड. विथ बेस्ट विशेश फ्रॉम...निशा. अंधार...काळोख. जसं तिचं नाव तसं ती. आणि नावाप्रमाणे गायब. पुन्हा कधी दिसण्यासाठी.
तिने हेच पुस्तक दिलं असेल? मी मग्न झालो विचारात.  ती का विचारात होती, वाचलं का म्हणून. असे अनेक प्रश्न निर्माण झाले माझ्या मनात. तिचा साधा फोटो ही नाही.  सोशल नेटवर्किंगवर पण सापडली नाही. किती शोधलं असेल तिला?
एकदा हॉटेल ला नूडल्स मागवलं तिने. प्लेट समोर आली आणि मी सवयीप्रमाणे हाताने सुरू केलं खायला.
स्टुपिड,” असं खातात का ते. स्पून कशासाठी आहे?  गावंढळ. ती बोलली.
मी काय करनार मला माहित नाही. पहिल्यांदा पाहतोय हे. आणि हो, आमच्या आयुष्यात भाजी- भाकर शिवाय काहीच आलं नाही. तुला नाही कळणार ते. आणि ते स्पून ने खायचा प्रयत्न करताना मी गरिबिवर भाषण ठोकल. 
तुला कसं जमता रे असं बोलायला.” तिनं विचारलं.
 अनुभवलय.  जीवनाचा भाग आहे. तेच जीवन आहे. तेच येणार.” मी उत्तरलो.
तिचा वाढदिवस होता. काय द्यावं तिला असं विचार करत होतो. मग ठरवलं की तिला पण पुस्तक द्यायचं.
मार्केट ला गेलो आणि पानसरे याचंशिवाजी कोण होता?” हे भेट म्हणून दिलं.
रात्री तिचा मेसेज आला. “तुला काही अक्कल नाही.  मुलींना काय गिफ्ट द्यावं एवढा पण कॉमन सेन्स नाही तुला. 
मी रिप्लाय दिला..गिफ्ट कल्चर नाही आमच्यात. ना घेण्याची ऐपत, ना देण्याची.
शिकणार कधी आहेस. एवढे दिवस झाले आपण सोबत आहोत काही शिकला नाही का माझ्याकडून.”
(खरं तर तेवढंच एक स्वस्त पुस्तक घ्यायची ऐपत होती.)
पण काय ना तू  भेटली की तुझ्याशिवाय काही सुचत नाही. मग शिकणार कसा?” कसंतरी हिम्मत करून मी मेसेज केला. तिचा काही रिप्लाय आला नाही.
ते फिल्मी वगैरे नाही हा. ते रब वगैरे तसं ही  नाही. तिच्यात तीच दिसत होती. ती बोलायची आणि मी ऐकायचो. एवढंच. बाकी काही नाही. मध्यंतरी एका मित्राने सांगितलं ती अमेरिकेत असते. तिथेच स्थायिक झाली म्हणून. बोंबला आता. गाव सोडून आपण कुठं जात नाही.
...त्या दिवशी खूप पाऊस होता. चांगलाच होता माझ्यासाठी. त्यानिमित्ताने तिला जाता आलं नाही ग्रंथालयात. त्या नामदेव सभागृहाजवळ उभा होतो पाऊस थांबेल या आशेने. ती केव्हा आली आणि एका बाजूला उभी राहिली लक्षच नाही. जेव्हा लक्ष गेलं तेव्हा हाय केलं. एकाच क्लास मध्ये असल्याने तोंड ओळख फक्त. त्या हाय पासून हळू हळू सुरु झालेल्या संभाषणाने कसा वेग घेतला लक्षात नाही आलं. भरपूर वेळ मिळाला गप्पा करायला. चेहऱ्याने ओळख होती फक्त. पण त्या पावसानं सारं बदलून टाकलं. पाऊस थांबला तेव्हा चहा घेशील का सहज बोलून गेलो. तिने होकारार्थी मान डोलावली. कुणासोबत पहिल्यांदा कॅन्टीन ला. येणारे जाणारे पाहत होते. बातमी सर्वदूर.
नेहमी एकटा किंवा मित्रांसोबत असणारा मी चक्क मुलीसोबत. जो तो कुतूहल नजरेने पाहत होता. मोबाईल नंबरची देवाण घेवाण झाली. भेटी-गाठी वाढल्या. संवाद वाढला. तो पाऊस मला त्या मुळे आवडला. या पावसाला काय दोष देऊ? निसर्गात रूप पालटवतो . तसंच आपलं आयुष्य ही.
मी कसा आहे असं मी कित्येकदा विचार करतो. पण तिच्यापेक्षा चांगलं, खरं वर्णन कुणीच केलं नाही. तिच्या त्या तीन चार शब्दांत मी सामावून गेलो. त्यापेक्षा वेगळी ओळख मला कधीच कळली नाही. समजली नाही.
तिचे ते तीन-चार शब्द म्हणजे माझं आयुष्य होऊन बसलं.
तिच्यासाठी मी बदललो नाही. जसा होतो तसाच राहिलो. एखाद्याने आपल्याला जसं आहे तास स्वीकारायला हवं.
घरून आली की टिफीन वगैरे घेऊन यायची. बोलवायची मला त्या कॅन्टीन ला. घे रे तू. मी खाऊन आलीय घरून. मम्मी दिलाय. मी सांगितलंय तिला तुझ्याबद्दल.  विचारात असते ती तुझ्याबद्दल नेहमी.
कधी कधी माझी मेस बंद असली की मेस ला जेवता टिफीन घेऊन यायची. मग त्या कॅन्टीन ला आम्ही तो टिफीन फस्त करत होतो. त्या फर्ग्युसन रोड च्या सर्व हॉटेल्स पालथ्या घातल्या. गुडलक पर्यंत.
माझ्याकडे सांगण्यासारखा फार काही नसायचं त्या अभ्यासाव्यतिरिक्त.  मी तसा वेंधळाच. तिने त्या वेंधळेपणा ला आकार दिला. कधी नव्हे ते मी कसा दिसतो, कसं राहायला हवं ते विचार करायला लागलो. फक्त विचार, कृती नाही.
वेळ नाही. मग्न झालोय संसारात. कधी तरीच काहीतरी आठवतं.  तिच्या बद्दल काय सांगू?...दिसायला सुंदर, सडपातळ, बोलण्यात पटाईत. आधुनिक...प्रत्येक बाबतीत. हिंदी, मराठी, इंग्रजी मध्ये संभाषण करणारी. हिंदी जरा जास्तच. क्लास. 
ठरवुन आयुष्यात काहीच होत नाही. सारं नकळत. एक स्वप्न म्हणू की आठवण की अजून काही.
ती अजुनही आहे माझ्या मनात, माझ्या आयुष्यात. तीचं आणि माझं नातं तरी काय. मित्र की अजून काही.
मी निरुत्तर आहे.
करीयर च्या नादात ती विस्मरणात गेली. आमचं मागासलेपण एवढं की तिच्याबद्दल फार काही माहिती ठेवली नाही.

तू नेट ची परीक्षा पास झाला ना तर सर्वात आधी मला सांगायचं. “आय नो, यु विल गेट इट वन डे. आय विल बि हैप्पीएस्ट पर्सन. असं बोलली होती ती. पण मी नेट व्हायला उशीर झाला होता. तोपर्यंत ती निघून गेली होती. ती सहज बोलून जायची. मला प्रोत्साहन देऊन जायची. 
सगळं मनासारखं झालं पाहिजे असं हि नाही. रंग भरले तीने आयुष्यात.
तुझ्या बद्दल सांग ना काहीतरी. मी किती सांगत असते माझ्याबद्दल. नेहमी विचारायची ती.
माझं उत्तर ठरलेलं. “माझ्याबद्दल सांगण्यासारख असं काहीच नाही. मी म्हणजे माझा प्रवास... माझं असणं, माझं नसणं. माझी ओळख माझी प्रतिमा सारं मीच.  तुझा क्लास वेगळा आहे, माझा क्लास वेगळा आहे.  माझ्यातला असणं तुझ्यातला नसणं आहे. तुझ्यातला नसणं माझ्यातला असणं आहे.” 
मध्येच मला थांबवून...तुला सोपं बोलायला शिकवलं नाही का रे कुणी? नेहमी आडवाटेने. कधी तरी सरळ उत्तर देत जा.  ती म्हणायची.
आणि पुन्हा मी सुरु...आयुष्यच सरळ करण्याचा प्रयत्न करतोय. ते सरळ नाहीच. म्हणून सरळ करण्याचा अट्टाहास. सरळ ची ओळख नाही झाली. आडवाटेने प्रवास सुरू झालाय सुरूवातीपासून.  त्या आडवाटेने शिकवलंय, घडवलय. प्रवास संपला नाही अजून. तो कधी संपेल माहीत नाही. पण संपेल याची खात्री, याची आशा.. ती आशा आहे म्हणून श्वास आहे आणि श्वास आहे म्हणून मी. म्हणून माझं अस्तित्व. माझ्या अस्तित्वात इतरांच अस्तित्व आहे. मी स्वप्न आहे, आशा आहे कित्येकांसाठी.  म्हणून क्षणभंगुर, निरस प्रवास आनंदाने सुरू आहे. ओळख निर्माण व्हायची आहे. त्यासाठी झगडतोय.”
ती फिलॉसोफी सांगू नको रे. विचारलं काय आणि तू सांगतो काय.?
ती फिलॉसोफी नाही, ते  वास्तव आहे. माझ्या जीवनाचं. मी असल्याचा पुरावा.
कित्येकदा ती म्हणायची, एक विचारू का... आणि लगेच नको नको राहू दे. पुन्हा तू ते तुझं नेहमीचं आडवाटेचा प्रवास,अस्तित्व  वगैरे सुरू करशील.
बर्याच मी म्हणायचो, मला मुक्त आयुष्य जगायचं होत पण नाही झालं. 
बेकेट, काफ्का, सार्त्रा वाचलास ना तू? कधी तरी त्यांना समजून घे. जीवन म्हणजे काय ते कळेल?
त्यावर ती म्हणायची, मी परीक्षे पुरतं वाचते. तुझ्यासारख त्यावर विचार नाही कळत. एवढं करून काय तर तुला माझ्या पेक्षा मार्कस कमीच मिळतात ना.
बेकेट, काफ्का  ने काय परीक्षे साठी नव्हतं लिहिलं होत. त्यांना विचार पोचवायचा होता. पण तो विचार पोचला नाही. त्यांना ही  ही आपण परीक्षा पद्धतीत बांधून ठेवलंय. असं प्रत्येक थोर व्यक्तींबद्दल झालंय.
एकदा तीन विचारलं, प्रेम म्हणजे काय?
माझं उत्तर होत, एक व्यवहार...बस इतकंच...या पलीकडे काहीच नाही.
ती काहीच बोलली नाही.
कधी कधी ती म्हणायची,तू खरंच मूर्ख आहेस. 
माझं उत्तर असायचं त्याला. सांगायचो मी तिला. “मूर्ख नाही वास्तव वादी आहे. तो वास्तववाद तुला नाही कळणार. तो प्रत्येकाला नाही कळत. मलाही अजून पूर्णपणे कळला नाही.”
पुस्तकांनी मला फक्त एका वर्गातून दुसऱ्या वर्गात ढकललं. खरं शिक्षण, खरी शिकवण तर जीवनाने ने दिली. आसपासच्या, जवळच्या, दूरच्या लोकांनी दिली. आयुष्यात घडणार्या चांगल्या वाईट अनुभवांनी दिली. 
म्हणून तो बेकेट आवडला, तो काफ्का आवडला. खरे बोलणारे जीवनाच्या परीक्षेत नापास होतात. खोटं बोलणार्यांचा बोलबाला आहे.
ट्रेन जळगाव ला पोचली.  मित्र घ्यायला आला होता. मोबाईल बंद झाला तसच ती ही. पुन्हा कधी आठवणीत येईल, कधी स्वप्नात भेटेल. काही वर्षे माझ्या आयुष्यात रंग भरणाऱ्या, जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या तिला शब्दात पकडणं शक्य नाही. माझ्या शब्दांची मर्यादा. कधीतरी तिच्या हे वाचनात येईल. पुन्हा तेच. आशा. हे लिखाण तिची आठवण म्हणून.
माझ्यासाठी ती गर्ल टू रिमेंबर होऊन गेली.  एवढंच...

प्रा. सचिन भगत  (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव