Monday, September 16, 2019

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१७


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळी लोकं भेटतात आणि आयुष्याचे भाग होऊन जातात.
पुणे विद्यापिठात असताना रीफेक्तरी (विद्यापीठाची खानावळ) कधी लावता आली नाही. त्याला अनेक कारणे होती. एक तर  एकाच वेळी भरण्यासाठी महिनाभराचे पैसे कधीच नव्हते, दुसरं तिथे गर्दी प्रचंड. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी. आम्हा सर्वांसाठी आधार म्हणजे डबेवाले. प्रत्येकाचं स्वतःच अस्तित्व. डब्यातील मेनू कधी सारखे, कधी वेगळे. बाजारात काय स्वस्त त्यावर ते अवलंबून.  वरण-भात ठरलेला. एक भाजी आणि चार पोळ्या. असं डब्याचं स्वरूप. चवी मध्ये थोडा बहुत काय तो फरक. कधी भूक व्हायची कधी नाही. पण त्या डब्यानेच कित्येक वर्षे न चुकता साथ दिली.
फिजिक्स विभागाच्या समोर दुपारी साडेबारा- एक च्या आणि रात्री साडेसात-आठ च्या दरम्यान डब्बेवाले हजर. ती त्यांची ठरलेली जागा. त्या वेळेत विद्यार्थ्यांची गर्दी तिथं. डबा घ्यायचा आणि आसपास जागा सापडेल तिथे घोळक्याने बसायचं. नजर जाईल तिकडे विद्यार्थी डबे खात दिसतील या वेळेत.
कित्येक जण डबे लावतात कारण पैसे मागेपुढे चालते. तेवढं ते सहकार्य करतात. आमचंही तसंच. जगण्यापुरत्या पैशाची ही तडजोड आवाक्याबाहेर व्हायची. त्यामुळे डबे लावण्याशिवाय पर्याय नव्हता.
विद्यापिठात असताना कित्येक वर्ष माझा डबा ढोकळे काका नावाच्या गृहस्थांकडे होता.  वयस्कर गृहस्थ. पन्नाशी ओलांडलेली असावी कदाचित. गौर वर्ण. डोळ्यांसाठी चष्मा. भारदस्त आवाज. मजबूत शरीरयष्टी. म्हणजे तब्बेत ही आडनावाप्रमाणे.
बाईकवरून ते डबे विद्यापिठात आणत असत. ठरलेली वेळ. कधी कधी मागे-पुढे.  कित्येक वर्ष त्यांच्याकडे डबा असल्याने चांगली ओळख होती. वेळेवर मी त्यांना कधीही पैसे दिले नाही. तारीख पे तारीख कायमचं. त्यांनी म्हणायचं आणि मी हो म्हणायचं. उद्या देतो, परवा देतो, या तारखेला, त्या तारखेला.  ती वेळ कधीच  पाळली गेली नाही. कधी कधी आता त्यांना काय सांगावं म्हणून ८-१० दिवस डबा घ्यायला जायचं नाही. दांडी. त्यांना दिसायचं पण नाही. “विचारलं तर सांग घरी गेलाय म्हणून”, असं मित्रांना सांगून ठेवत होतो. त्यांना एकदा ते समजलं. तर मला एका मित्राच्या माध्यमातूननिरोप पाठवला की त्याला सांग पैसे आले की दे पण आता डबा घेऊन जात जा. दुसर्या दिवशी मी त्यांच्याकडे जाऊन डबा घेऊन जाऊ लागलो. असं नको करत जाऊ एवढंच काय ते त्याचं वाक्य.
एकदा डबेवाल्यांनी पैसे वाढवायचे ठरवलं होतं. त्या विरोधात सगळे जमले होते. दुपारची वेळ. त्या फिजिक्स विभागाच्या समोर मी हे कसं अयोग्य म्हणून ५-७ मिनिटे भाषण ठोकलं. विद्यापीठाने यांच्याकडून पैसे घ्यायला हवेत. इथे फुकटात बिजनेस करतात.  बोलण्याच्या ओघात मी असं बरंच काही बोलून गेलो. सगळे डबेवाले ते पाहत होते.
काका  माझ्या मित्राला म्हणाले, या सचिन ने गेल्या तीन महिन्यापासून पैसे दिले नाहीत. तरी मी त्याला डबा देतोय. आणि हा आमच्याच विरोधात बोलतो. मला ते कधी प्रत्यक्षात बोलले नाहीत. कायम अडचण समजून डबा देत राहिले. उशिरा का होईना मी त्यांचे पैसे तसे चुकवत होतोच. माझ्या बोलण्याच त्यांना वाईट वाटलं असेल कदाचित.
उन-पाऊस काहीही असो डबेवाले येतातच.  त्यांच्या दिनचर्येत कधी डोकावून पाहिलं तर आव्हानं लक्षात येतात. सकाळी ५ वाजेपासून त्याचं काम सुरु होते ते रात्री अकरा बारा पर्यंत. सब्जी मंडी मधून भाजीपाला खरेदी करणे. स्वयंपाक करून डब्यात भरणे. आणि शेवटी डब्यांची स्वच्छता. त्यांना सवड असतेच कुठं. कितीतरी काम.  कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला वेळेवर डबे पोचवले जातात. माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांचे हे डबेवाले आधार. व्यवसाय आणि माणुसकी जपण्याचा प्रयत्न आजकाल कुणी करत नाही.  विद्यापिठात हजारो विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेण्यासाठी येतात. अनधिकृत ची संख्याही मोठी. कित्येकांना आर्थिक प्रश्न असतात. अश्या स्थितीत हेच डबेवाले कित्येकांना जगवतात. आधार देतात. काही विद्यार्थी फसवेगिरी ही करतात. भाजी आवडली नाही तर त्या डब्यांमध्ये दगड-माती टाकून देतात. डबा उघडायला त्रास झाला तर जेवण करून तो डबा लावून ठोकायचं म्हणजे त्यांना उघडायला त्रास होईल. काही पैसे बुडवतात. पण ते कटू अनुभव असून सुद्धा डबेवाले डबे देतातच.  गरज म्हणा की चांगुलपणा. पण त्यांच्यामुळेच विद्यापीठामधील जेवणाचा प्रश्न सुटतो.
मी विद्यापिठ सोडल्यानंतर ढोकळे काकांनी  डबे बंद केल्याचे ऐकले. कदाचित वयामुळे जमत नसेल. त्यांना भेटण्याची इच्छा होती. पण कधी जमलं नाही. पुण्यात कधी गेलोच तर त्यांचा शोध घेऊन भेटेन.
विद्यापीठातले ते दिवस आठवले की या गृहस्थांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांचा आधार नसता तर कित्येक अडचणी निर्माण झाल्या असत्या कदाचित.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं महत्त्व आहे. कधी आपल्याला ते जाणवतं. तर कित्येक वेळा जाणवत नाही.
माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे त्याचं ते लक्षण. आपण मंदिरात जातो पण आपले प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवायला आपल्याला आसपासचे लोकंच मदत करतात. दमडी खिशात नसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची पोटाची भूक भागवणारे हे डबेवाले. खिशात पैसे नसताना पोटाची भूक काय असते ते अनुभवलंय. कधी डबा नाहीच आला तर खाण्याची होणारी तारांबळ कशी विसरणार?
आज मी सहज डायरीची पाने चाळत होतो. त्यात डब्यांचा हिशेब लिहिलेला होता. या काकांची आठवण झाली आणि नकळत भूतकाळात गेलो.

चार-पाच वर्षे पोटाची भूक भागविणाऱ्या ढोकळे काका या गृहस्थाला सलाम. आज मला हे लिहावं वाटलं ते त्यांच्या कृतीमुळे. त्यांच्या चांगुलपणामुळे. गरजेच्या वेळी हात दिला म्हणून. नाहीतरी कुणावर लिहावं अशी मानसं आजकाल आहेत कुठे?

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव