Friday, November 24, 2017

मुकेश च्या वाढदिवसानिमित्त...

गेल्या वर्षी च हे लिखाण पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. पण तो अपूर्ण राहिला. ते अर्धवट राहिलेलं लिखाण  ११ तारखेला पूर्ण करायला घेतलं. आणि आता पोस्ट करेपर्यंत एडिटिंग सुरु होतं. कारण ज्या व्यक्तीबद्दल मी लिहित होत्तो ती व्यक्ती म्हणजे शब्दांच्या पलीकडे...शब्दात त्याचं वर्णन शक्य नाही हे माहित असून सुद्धा मी तो प्रयत्न केला.
१९९- ला मी धामणगाव बढे येथील एम.. एस. हायस्कूल ला प्रवेश घेतला. आठ-नऊ किमीच अन्तर. तेव्हा वाहतुकीची एवढी साधनं नव्हती. त्यामुळे सकाळी गेलो कि संध्याकाळी परत. महामंडळाच्या बसेस हि मर्यादित. गावात नुकतीच सुरु झालेली हायस्कूल असूनही मी तेथे गेलो. तिथेच माझी ओळख एका खोडकर, गोर्या-गोमट्या, चलाख आणि हुशार विद्याथ्याशी झाली. तो दिसायला जेवढा साधा तेवढा नव्हताच हे कळायला नंतर ची बरीच वर्षे लागली. आम्ही डबे न्यायचो त्यामुळे एकत्रित जेवण. कधी डबा नाही नेता आला तर त्याच्याच डब्यात ताव. वर्षभर मी तेथे होतो. मैत्री वगैरे ह्या संकल्पना त्यावेळी फार काही कळत नव्हत्या.
त्या एक वर्षात अभ्यास सोडून सगळं केलं. भटकंती, भांडणं, मौजमस्ती असं सर्व. त्यामुळे माझा अभ्यास रसातळाला गेला होता. निकाल लागल्यावर त्याचे परिणाम हि दिसलेत. टक्केवारी झटक्यात खाली आली. पण त्याने मात्र प्रथम क्रमांक टिकवला. सगळ्या गोष्टीत सहभागी असून त्याने कधीच अभ्यास सोडला नव्हता. त्या वातावरणातून मी निघायचे ठरविले आणि १९९८-९९ ला मी तेथील प्रवेश रद्द करून गावातल्या हायस्कूल ला नवव्या वर्गात प्रवेश घेतला. एक वर्ष मी येणे-जाने केलं. त्या काळी मोबाईल क्रांती झालेली नव्हती. त्यामुळे संपर्काचे साधने नव्हतीच. कधी तरी धामणगाव गेलो तर त्याला भेटत होतो पण ते क्वचितच.
आमच्या गावाकडे दरवर्षी जगदंबा देवीची यात्रा असते पिंपळगाव देवीला. त्या दिवशी मी शेतात गेलो होतो. तूर तयार करणे सुरु होतं आणि हा पठ्ठ्या मला शोधत शोधत शेतापर्यंत आला. -३ किमी च अंतर पायी चालून. यात्रेला जाऊ म्हणाला. त्याला नाही म्हणता आलं नाही. घरी गेलो.-१० रुपयाच्या पलीकडे खिश्यात काहीच नव्हतं. तसंही त्यावेळी कित्त्येक लोकं पायीच यात्रेला जात. तीन-चार किमीच अंतर काही वाटत नव्हतं. फ्रेश होऊन त्याच्यासोबत यात्रेला गेलो. आमचं अठरा विश्व दारिद्र्य असल्याने नवीन  कपडे वगैरे ह्या संकल्पना नव्हत्याच. त्या काळी मनोरंजनाची साधने कमी असल्याने यात्रा म्हणजे एक उत्सव. आम्ही यात्रेत गेल्यानंतर टुरिंग टोकीज चे पोस्टर पाहत बसलो. आता आम्ही कुठल्या प्रकारचे पोस्टर पाहणार हे काही सांगायची गरज नाही. दिवस चांगला गेला. नंतर २-३ वर्षे फार संपर्क झाला नाही. ११-१२ ला मी भुसावळ तर तो बुलडाण्यात होता. त्यामुळे संपर्क पूर्णपणे बंद होता. पदवी साठी मी जळगाव गेल्यानंतर तो हि तेथे आला आणि नंतर पुण्यातही. तेथून आमच्या मैत्रीच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. पुढे ७-८ वर्षे आम्ही सोबत होतो. सोबत भरपूर फिरलो. पुण्यामध्ये मी त्याच्या एक वर्ष आधी गेलो. आमचे पत्रव्यवहार चालायचे तेव्हा. फोन केल्यानंतर हल्लो मी बोलतोय हे त्याचं पहिलं वाक्य. खिशात जेवढे कॉईन असतील तेवढे त्या बॉक्समध्ये गेल्याशिवाय आमचं बोलणं संपायचं नाही. सविस्तर पत्रामध्ये असायचं.
मला  वाचन, लिखाण याचा गंध हि नव्हता. या गोष्टींची सवय त्याच्याच सानिध्यात लागली. तो सोबत नसता तर? याचं उत्तर मला अजूनही सापडलं नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो माझ्या मागे खंबीर उभा होता. आर्थिक असो कि अजून कुठलीही समस्या त्यानेच सोडविली. तसं मी त्याला नेहमीच गृहीत धरत गेलो. पण तो एवढा परिपक्व होता कि माझ्या कित्येक चुका त्याने दुर्लक्ष केल्या. मी बोलायला फटकळ. याउलट तो कधी कुणाला दुखावत नव्हता. मी मात्र पावलागणिक लोकं दुखावलीत. त्यामुळे कित्येक लोकं माझ्या दूर गेलीत. मी जसा आहे तसा स्वीकारणारा पहिला तो. माझी दुसरी बाजू हि त्याने कित्येकांना पटवून दिली. तो, मी आणि एक कॉमन दोस्त असं एक समीकरण तयार झालं. दिवसागणिक ते घट्ट होत गेलं. अपयशाच्या काळात तो माझ्यासोबत होता. माझी कुठलंही गुपित फक्त त्यालाच माहित. म्हणजे अशी एकही गोष्ट नाही कि मी त्याला सांगत नाही. पण तो सांगत नाही तेही खरं. पण काय न त्या सर्व गोष्टी मला माहित होतातच.
त्याच्याबद्दल काय सांगू. त्याचं वाचन अफाट आहे, उत्कृष्ट लिहितो. लोकांशी संपर्क चांगला आहे. हुशार तर आहेच. साधा दिसायला आहे पण खरं काय ते फक्त मी आणि आमचा एक कॉमन दोस्त जाणतो. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असं म्हटलं तरी चालेल. आपण त्याला एखादी गोष्ट सांगितली तर तो त्याच प्रकारातली दुसरी गोष्ट आपल्याला सांगतो. म्हणजे सिमिलर इव्हेंट. खरं काय खोटं काय त्यालाच माहित.
जळगाव ला असताना मी याच्या रूम मध्ये असायचो. माझी रूम दुसरी पण वास्तव्य मात्र याच्याकडे. त्या रूम मध्ये अजून इतर दोन होते. आम्ही रूमवर नसलो कि हा दुसर्या ला काहीतरी सांगत असायचा. आम्ही रूम मध्ये गेलो कि मग वादविवाद सुरु व्हायचे. भांडण व्हायची. त्यावेळी हा पुस्तकात डोकं घालून मला काही माहीतच नाही असं दर्शवायचा. भांडणाच कारण काय हे कळायला आम्हाला बरेच दिवस लागलेत. त्याला गमतीने आम्ही आगलाव्या संबोधत होतो. तो नेहमी रूमलाच असायचा. कॉलेज ला कधीच जात नव्हता. शेवटी मग प्रक्टिकल ला त्याची धावपळ व्हायची. बनावट कंपन्या आणि त्यांचे बनावट शिक्के तयार करून तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा. म्हणजे नुसता उचापती प्रत्येक बाबतीत. अंघोळ करणे म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासारखे होते त्याच्यासाठी. कधी कधी १०-१२ दिवसांचा ब्रेक. -३ दिवस तर नित्याचंच.  
बारावीत असताना त्याने एक वर्ष ड्रोप घेतला त्यामुळे तो एक वर्ष मागे पडला. नंतर त्याने सी.. व्हायचं ठरवलं. म्हणून सायन्स नंतर कॉमर्स व्हाया सी ए ची सिपिटी. नंतर पुढे ते मागे पडलं. एम.कॉम, एम.फिल व्हाया  नेट ते प्राध्यापक अशी त्याची वाटचाल. एकदा एका मैत्रिणीला त्याने ते चार दिवसअशा शीर्षकाचा  वर्तमानपत्रातला लेख वाचायला दिला तेही लेक्चर सुरु असताना. त्यानंतर तीने त्याच्याशी बोलणेच बंद केलं. ती का बोलत नाही हे त्याने मला ४-५ वर्षानंतर सांगितलं. पुण्यात असताना तो क़्वचितच ग्रंथालयात अभ्यासासाठी गेला असेल.
एकदा मी कॉलेज मध्ये मैत्रिणीशी गप्पा मारत होतो. तेवढ्यात हा एक रूम पार्टनर सोबत आला आणि म्हटला कि तुझ्या रीलेटीव चा फोन आला होता. तुला फोन करायला सांगितला आहे. मी तेथून निघालो. समोर आल्यावर मात्र हे दोघंही हसायला लागले. त्यांनी माझी विकेट घेतली हे कळाल होतं. मग काय हासडल्या शिव्या.
पैसे नसताना एका डब्यात दोन हि अडजस्त झालो. पुण्यात कधीतरी पैसे आलेत तर चौपाटीवर जाऊन लोलीपोप चा आनंद घ्यायला हि विसरलो नाही. मी जॉब करत असताना विजय थिएतर तर ठरलेलं. तिथे कित्येक चित्रपट बघिलेत. रात्री-बेरात्री गाडीवर कित्येकदा भटकंती व्हायची. वादविवाद, जुगलबंदीही भरपूर झाल्यात, होतात पण ते तिथेच संपवण्याची कला आमच्यात पूर्वीपासून च आहे. आजही संवाद झाला म्हणजे शिव्या ची देवाण-घेवाण झाल्याशिवाय होत नाही. कुठल्याही औपचारिकतेला जागा नाही.  वाढदिवसाला संदेश नाही कि फोन नाही, किवा अजून कुठल्याही विशिष्ट प्रसंगी आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत नाही. अश्या अनेक गोष्टी सांगता येतील. फेसबुक ला वगैरे त्याचा मेसेज आला म्हणजे तो बर्याच वेळी आय लव यु म्हणतो. फालतू औपचारिकता आम्ही कधी पाळल्या नाहीत.
माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. एक आदर्श मुलगा या संकल्पनेत बसणारा. पण खरं कधीच सांगत नाही. पुण्यात एकदा तो मैत्रिणीसोबत तरी बाहेर गेलेला. फोन केला तर म्हणे मी चांदणी चौकात आहे. तसं काही नव्हतच. कामाप्रती त्याची साधनाच प्रचंड आहे. साधना म्हणजे त्याच्यासाठी राणी आणि तो राजा आता एका खर्याखुर्या राणीच्या शोधात आहे.  पुण्याच्या आसपास बरीच भटकंती केली. माझ्या गाडी चालवण्यावर त्याची कधी खात्री नव्हती. एकदा पुण्यात तो मागे बसलेला होता. एका टर्निंग ला त्याला वाटलं मी समोरच्या वाहनाला धडक देणार तर पठ्ठ्याने मला ओढल आणि मग काय दोन्ही हि पडलो. त्याला दोन-चार शिव्या दिल्या आणि पुन्हा निघालो. सॉरी किंवा थंक यु हे शब्द आमच्या संवाद मध्ये कधी आले नाही.
गावाकडे आम्ही बर्याच वेळा भेटतो. तिथल्या बगिच्यामध्ये तासंतास गप्पा सुरु असतात. इतिहासाची उजळणी आणि हास्याचे फवारे सुरु असतात.  
मध्यंतरी तो घरी माझ्या मुलाला भेटायला आला. त्याच्यासोबत खेळत असताना त्याने नुकताच घेतलेला फोन माझ्या मुलाच्या हातात दिला. त्याने तो सरळ जाऊन कुलरच्या पाण्यात टाकून दिला. आणि त्याचा मोबाईल स्वाहा झाला. मला जेव्हा कळाल तेव्हा मी म्हटलं बर झालं साल्या ...एवढा उशिरा भेटायला आला तू माझ्या मुलाला. दुसरं कुणी असतं तर ते त्या झालेल्या नुकसानीबद्दल चर्चा केली असती. पण आमच्यासाठी तो विषय तिथेच संपला होता.
गेली १८-१९ वर्षे आम्ही संपर्कात आहोत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. अजूनही आम्ही भेटलो कि नेहमी भेटतो असं वाटते. आमच्यात काय साम्य आहे ते माहित नाही. आचार-विचार एकदम टोकाचे आहेत.  तरीपण आम्ही जुळवून घेतलं किंवा त्याने जुळवून घेतलं असंही म्हणता येईल. एकमेकांना आहे तसं आम्ही स्वीकारलंय. बदल कधी अपेक्षित केले नाहीत. नाहीतरी आजकाल सगळ्यांना आपल्यात बदल हवा असतो. वुई शुड रिस्पेक्ट द डीफरन्सेस. हेच आम्ही करत गेलो.
आज त्याचा वाढदिवस. या आधी कधी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यानिमित्ताने हे लिखाण म्हणजेच शुभेच्छा. असंख्य गोष्टी खोट्या प्रतिष्ठेपायी लिहिता आल्या नाहीत. तसंही त्याला शब्दात मांडता येणार नाहीच. शेवटी आपली प्रीतच न्यारी आणि तीच प्रीती कायम राहावी हीच काय ती मनिषा.

सचिन भगत