Tuesday, October 2, 2018

त्याची गोष्ट (काल्पनिक)


सकाळी पाच वाजेच्या आसपास त्याला जाग आली. स्वतः चहा करून त्याने त्याचा आस्वाद घेतला आणि सरळ शेताकडे निघाला. दोन-तीन किमी अंतरावर त्याचं शेत. दिवस पूर्णपणे उजाडला नव्हता. रस्ता त्याला आता परिचयाचा झाला होता. गेल्या दोन-एक वर्षापासून तो शेती करत होता. तसा अल्पभूधारक. दोन एकर शेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसातरी व्हायचा.  शेत आणि तो हे समीकरण झालं होतं. फारसा कधी कुणात मिसळत नव्हता. कामाशी काम. लोकांचे नाना तर्हेचे प्रश्न टाळण्यासाठी तो जास्तीत जास्त वेळ शेतात घालवत असे. त्या शेताच्या बांधावर बसून त्याचं विचारचक्र सुरु असायचं. भूतकाळ आठवला कि त्या आठवणी त्याला स्वस्थ्य बसू देईनात.
स्वप्न काय होती आणि काय करतोय. एक चांगला विद्यार्थी म्हणून त्याचा नावलौकिक. पदवी-पदव्युत्तर सारं काही. मग शेती करतोय? कुठं चुकलं? जर-तर ला आयुष्यात महत्त्व नसतेच. एकदा का चूक झाली तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात. आयुष्य चूक दुरुस्त करण्याची संधी देत नाही कधी. त्याचं ही तेच झालं. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याला पुणे विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. पुण्यात गेल्यानंतर आयुष्य बदलते असे कित्येक जण सांगतात. याचाही त्यावर विश्वास बसला होता. विद्यापीठाचा ती नैसर्गिक संपदा, ते नैसर्गिक सौंदर्य, विस्तीर्ण परिसर, देशाच्या कान्याकोपार्यातून येणारे हजारो  विद्यार्थी आणि बरंच काही. भांबावून गेला तो. आपलं खेडं सोडून फार कुठे जाता आलं नाही त्याला या आधी.
सुरुवातीचे काही दिवस मस्त गेलेत. रुळला होता त्या वातावरणात. विभागातील तास आटोपले कि कमवा-शिका आणि थेट ग्रंथालय गाठत होता. शिकण्याची जिद्द होती, तळमळ होती. गरिबीतून बाहेर पडायचं होतं आणि शिक्षण हे माध्यम होतं. मनासारखं घडलं तर आयुष्य बदलणार होतं.
शेताकडे जाताना सतत विचारचक्र सुरु असते त्याचं. वर्तमान आणि भूतकाळ यांचं द्वंद सुरु असते. किती छान दिवस होते ते. त्या एलीस गार्डन मध्ये किती वेळ घालवाल असेल तिच्यासोबत.  ती मेन बिल्डींग तर कायमचीच. ओपन कॅन्टीन, अनिकेत, आदर्श किती वेळा पालथ्या घातल्या असतील. मोजमापच नाही.
बाहेर फेरफटका मारलाच तर शनिवारवाडा, सारसबाग, पार्वती अशी कितीतरी ठिकाण भटकून झाली. त्याची परिस्थिती बेताचीच. खर्च सगळा तिचाच असायचा.
तो नेहमी म्हणायचा “Library is also the place where love begins.” नेमकं त्याला प्रेम कुठं झालं? अजूनही त्याला तिची ती पाहिली भेट आठवते. लगबगीने तो ग्रंथालयाकडे चालला होता. रस्त्यात ती त्याला भेटली. आठ-दहा दिवस झाले ती विभागात आलीच नव्हती. या कालावधीत काय-काय शिकवल्या गेलं असं विचारल्यावर तो जो सुरु झाला ते झालाच. पुढचे १५-२० मिनिटं तो  बोलत राहिला. एक प्रकारची उजळणीच.  ती पण इम्प्रेस झाली असावी कदाचित. जेव्हा कुठे समोरासमोर आले तर हाय-बाय सुरु असायचं.
हा संध्याकाळी नेहमी ग्रंथालयात असायचा. एकदा ती पण ग्रंथालयात आली आणि याच्या शेजारीच बसली. कित्येक वेळ याचं लक्षच नव्हतं. शेवटी तिनेच त्याला हाय केलं. बारीक आवाजात थोडं बोलणं झालं आणि तो परत अभ्यासात मग्न झाला. त्या दिवसापासून ती नियमित वाचनालयात येऊ लागली. मिळेल त्या जागेवर बसू लागली. कारण जागा हवी असेल तर सकाळी लवकर यावं लागतं. काही दिवसांनी तो तिची जागा आरक्षित करू लागला. मग काय अभ्यास, चर्चा, सोबत कॅन्टीन असं चक्र सुरु झालं.
आणि त्या चक्रात तो गुंतून पडला. रात्री तिला लेडीज होस्टेल पर्यंत सोडायला जात होता. कधी ती नाहीच आली तर ती का आली नसेल असा विचार त्याच्या मनात यायचा. त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल ही नव्हता. त्यामुळे संवाद फक्त भेटले तेव्हाच.
असंच एकदा चर्चेत दोघांना  समजलं की ते एकच समाजाचे आहेत म्हणून. तेव्हापासून का कुणास ठाऊक त्याच्या मनात वेगळंच काही सुरु झालं. तो तिच्यात गुंतत गेला. मनातली घालमेल तिला सांगून टाकावी पण त्याची हिम्मत होईना. एकदा तो वाचनालयात बसलेला असताना ती आली आणि फोटो चा अल्बम त्याच्याजवळ पाहण्यासाठी दिला. बराच वेळ अल्बम पाहत राहिला तो. कित्येक फोटो होते तिचे. साडीत तर अफलातून दिसत होती.   धारदार नाक, गौरवर्ण, तेजस्वी डोळे, कमरेपर्यंत लांब केस असं तिचं ते सौंदर्य पाहून त्याच्या मनाची घालमेल वाढली होती.
त्या दिवशी रविवार होता. बाहेर रिम-झिम पाऊस सुरु होता. त्याच्याही मनाला बरसायचं होतं. तो तिच्या येण्याची वाट पाहत होता. दहा वाजेच्या आसपास  ती वाचनालयात आली. तुला काही सांगायचं आहे, तो म्हटला. सांग ना मग, ती उत्तरली.  त्याने तिला सांगून टाकलं. तो व्यक्त झाला चक्क त्या वाचनालयात.  तिनेही नकार दिला नाही. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्या विद्यापीठातच त्याचं प्रेम बहरलं. तिच्या सानिध्यात अनेक आठवणी निर्माण झाल्या. आठवणीतले कित्येक प्रसंग आहेत त्याचे. ग्रामीण आणि शहरी संस्कृतीमधील चालीरीती, राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी यातील फरक त्याला पदोपदी जाणवत राहिला.
एकदा ती त्याला चौपाटीला ला घेऊन गेली. नुडल ऑर्डर केलेली. याच्या समोर प्लेट आली आणि हा पट्ट्या हातानेच ताव मारायला लागला. कित्येकांनी त्याच्याकडे पाहिलं असेल. तिलाही अवघडल्यासारखे झालं. नंतर तिने त्याला ते कसं खायचं यावर व्याख्यान दिलं. अरे पण चमच्याने खाल्ल काय नि हाताने खाल्ल काय. शेवटी पोटातच जाते ना. असं त्याचं मत.
गरिबांच्या आयुष्यात कुठं आलंय हो नुडल.  कित्येक गोष्टी त्याला माहीतच नव्हत्या. सो काल्ड मेनर्स चा पत्ताच नव्हता. त्याचा  बाह्य जगाशी संबंध कधी आलाच नाही. असे कित्येक हास्यापद प्रसंग आलेत.  स्टुपिड, इडीअट, बावळट, मूर्ख हे शब्द त्याला नित्याचेच झाले होते. पण तिच्या-तोंडून ऐकायला त्यालाही चांगले वाटे.
असंच एकदा ते एका चांगल्या हॉटेल म्हणजे सायली ला जेवायला गेले. जेवण झालं आणि वेटर ने त्यांच्यासमोर दोन बाऊल ठेवलेत. त्यात लिंबू पण होत. त्याला वाटलं प्यायला दिलंय. त्याने तो बाऊल सरळ तोंडाला लावला. पाहतो तर काय कोमट पाणी. “अरे स्टुपिड ते हात धुण्यासाठी आहे”, ती उत्तरली. 
त्या ए-स्क्वेअर ला मुम्ही ला गेलेत. ती तिकीट घेऊन आली. त्याने तिच्या हातातील तिकीट घेऊन म्हणे मी मध्ये जाऊन जागा सांभाळतो, तू ये आरामात. बावळट,थांब, ती उत्तरली. त्याला काही समजलच नाही. ग्रामीण भागात तर असंच करतात.  गावाकडच्या जत्रेत नाही का एक जण तिकीट काढून आपली जागा सांभाळतो. इथं मात्र वेगळंच. मध्ये गेल्यानंतर त्याला कळाल कि जागा आधीच ठरलेली असते. तिकिटावर दिलेलं असते. त्या थिएतर मध्ये भन्नाट शांतता. गावाकडे कसं चित्रपट पाहावा कि आपल्या लोकांचे संवाद. भन्नाटच सगळं. इथे मात्र कुणालाच कुणाशी देन-घेण नाही. जो-तो ज्याच्या त्याच्या आयुष्यात. एवढ्या शांततेत चित्रपट पहिल्यांदा पाहिला असेल त्याने.  
एकदा ते आप्पा बळवंत चौकात फिरत होते. तुला ईमारती आवडतात का रे , तिने विचारलं. नाही, मला बंगलो आवडतात त्याने उत्तर दिलं. ती हसली. ती का हसली असेल असा प्रश्न पडला त्याला. नंतर कधीतरी समजलं कि ईमारती हा जिलेबी सारखा खाण्याचा पदार्थ असतो. आपल्या गावंढळपणाची त्याला कधी कधी लाज ही वाटे. असे कित्येक प्रसंग असतील. ते नाही का मोठ-मोठ्या दुकानांच्या दरवाज्यावर पुल/पुश लिहिलेलं असते. पण कुणीकडे हा प्रश्न त्याला नेहमीच पडत होता.
कधी कधी त्यांच्यात भांडणे ही झालीत. रुसवे-फुगवे तर नित्याचेच. एकदा तो तिला न सांगताच गावी गेला होता. परत आल्यावर तिने त्याला चांगलंच फैलावर घेतलं होतं. चार-पाच दिवस त्याला भेटली ही नव्हती. अशा असंख्य आठवणी त्याची पाठ सोडेनात.

तो लवकर यशस्वी होईल अशी त्याला खात्री होती. हिच्यासोबतच लग्न करावं असं त्यानं पक्क केलं. एकमेकांच्या सानिध्यात दोन वर्षे भुर्कन उडून गेलीत. त्याची नेट-सेट ची तयारी सुरु होती. ती घरी निघून गेली. अधून-मधून संपर्क व्हायचा तो पण मर्यादित.
पदव्युत्तर परीक्षेचा निकाल लागला आणि एक दिवस ती विद्यापीठात आली ती लग्नाची पत्रिका घेऊनच. त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला. तुझा अजून काहीच ठावठिकाणा नाही रे, मी नाही थांबू शकत तुझ्यासाठी असं म्हणून तिने ती पत्रिका त्याच्या हातावर टेकवली आणि निघून गेली ती कायमचीच. पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. प्रेम, सोबत राहण्याच्या घेतलेल्या आणाभाका सारं क्षणात संपलं. त्याला  बोलण्याची संधीच दिली नाही तिने. त्या दिवशी तो कधी नव्हे एवढा खचला. त्याच्या तोंडून शब्द ही निघाला नाही. सारं स्विकारत आला होता आजपर्यंत आणि तो दिवस ही त्याला अपवाद नव्हता.
गरिबांना प्रश्न विचारण्याचे, मत मांडण्याचे अधिकार नसतातच. बोलले तरी तिकडे फार कुणी लक्ष देत नाही.  त्यांनी फक्त सहन करायचं. या भारतीय समाजात तेच होतंय. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचा उदो-उदो. ते म्हणतील ती पूर्व दिशा. पैश्यावर मोजमाप सुरुय. जिथे-जिथे पैसा तिथे तिथे खुशमस्कर्याची फौज. गरीबांचा आवाजच दडपून टाकलाय या समाज व्यवस्थेने. न्यूनगंड निर्माण केला गेलाय त्यांच्यात.
त्याच्याही बाबतीत तेच झालंय. कित्येक प्रश्न होते त्याच्या मनात. पण कधी बाहेर आलेच नाहीत. त्या दिवसा नंतर त्याची अस्वस्थता वाढत गेली.
अभ्यासात  मन लागत नव्हतं. पदव्यत्तर नंतर वर्ष झाली पण नेट-सेट मध्ये काही यश मिळालं नाही. खचला तो पूर्णपणे. एके काळी सुंदर वाटणारं ते विद्यापिठ त्याच्यासाठी कटू आठवणींचं बनलं. तो जिथे कुठे जाईल त्याला तिचं अस्तित्व जाणवत राहिलं. ज्या ठिकाणी आपण एवढी स्वप्ने पाहिली त्याचं ठिकाणी ती नष्ट झाली. ते विद्यापीठ त्याला नकोसं झालं.
याच मानसिकतेतून त्यानं विद्यापीठ सोडण्याचा निर्णय घेतला. तो गावी परतला पुन्हा कधीही तिथे न जाण्यासाठी . कित्येक मित्रांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं काही ऐकलं नाही.
यंदापावसाची दांडी मारली होती. कपाशीला आलेली फुलं कोमेजून जात होती. हाता-तोंडाशी आलेला घास जाणार होता. त्यात आणि त्याच्या आयुष्यात त्याला साधर्म्य वाटत होतं. त्याचं ही नाही का तसचं झालंय. सर्व काही छान फुलणार असं वाटत असतानाच नशिबानं दगा दिला. सारी स्वप्ने क्षणात उद्धवस्त झाली. कशी झाली, का झाली, काहीच कळाल नाही.
आता रोज शेतात जातो. मेहनत करतोय. भूतकाळात काय झालंय हा विसरण्याचा प्रयत्न सुरुय. पण त्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देईनात.
तिने असं का केलं असेल? तिचं प्रेम नव्हतं का? नव्हतं तर हो का म्हटली? कशाला सवय लावावी एखाद्याला आपली? मी का गुंतलो तिच्यात? बरं होतं आपलं आयुष्य. असे कित्येक प्रश्न त्याची पाठ सोडेनात.
सोनेरी भविष्याची स्वप्ने पाहता पाहता कसा अंधार झाला आयुष्यात आणि आता सर्व काही दिसेनासं झालं. काय करावं तेही समजत नाही. बरीच वर्षे उलटून गेली. पुस्तकांना उघडून पाहिलं नाही. प्रवाहातून बाहेर पडलाय.
आता शेती हाच अभ्यास झालाय. वाट भरकटली. उद्दिष्ट भरकटलं. आणि आता आयुष्य भरकटलेल झालंय. काय कराव त्यालाही सुचत नाही.
आठवणींनी भरलेला भूतकाळ. त्या दीड-दोन वर्षाच्या काळात किती बदलला होता तो.  ती त्याच्या आयुष्यात येण्याआधी तो विद्यापीठाबाहेर कधीतरीच गेला असेल  ते पण फक्त अब चौक.  पण ती त्याच्या आयुष्यात आली आणि सारं पुणे पालथं घातलं. फर्गुसन रोड वरील कुठलीच हॉटेल सुटली नाही. त्याचं जग मर्यादित होतं. अभ्यास आणि फक्त ती. तिने त्याला बाहेरचं जग दाखवलं. शॉपिंग मोल्स, मल्टीप्लेक्स आणि बरंच काही.
तिचं करिअर बद्दल  फार काही नियोजन नव्हतं. आर्थिकदृष्ट्या सक्षम त्यामुळे डिग्री हवी होती फक्त. त्याचं मात्र उलट होतं. ठरलेलं ध्येय होतं. काहीतरी करायचं होत. नोकरी गरजेची होती. गरिबीतून बाहेर पडायचं होतं.  त्यामुळे त्याचं आयुष्य कायमच पुस्तकांभोवती फिरत राहिलं. चाकोरीबद्ध आयुष्य. फार कुणी जवळचं नाही. कधीच कशातच सहभाग नाही.
त्या पुण्यात गेला स्वप्नांचं गाठोडं घेऊन, स्वप्नपूर्ती होईल या उद्दिष्टाने. सगळं सुरळीत चाललं होतं. पण ती भेटली आणि हा स्वतःला हरवून बसला. ती गेल्यानंतर तो सैरभैर झाला. तिच्या सहवासाची त्याला सवय झाली होती. वाचनालयात जात होता पण अभ्यासावर लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे अपेक्षित यश मिळत नव्हतं. स्वतःवरचा विश्वास उडाला होता. 
त्या शेताच्या बांधावर बसून पाऊस कधी येईल याची वाट पाहतोय आता. त्याचं मन ही त्या कोमेजलेल्या पिकासारखं झालंय.
तिच्या संसार वेलीवर फुलं उमलली होती. याच्या वेली मात्र फुलण्या आधीच कोमेजल्या गेल्या.
तिचं छान चाललंय. लंडन मध्ये असते नवर्यासोबत. अभियंता आहे तो. अशी पुसटशी माहिती मित्रांकडून कळली होती त्याला.
मित्रांशी असलेला संपर्क ही तुटलाय. त्यानेच तोडला म्हटलं तरी चालेल.  प्रत्येकजण त्याला एकच प्रश्न करायचा,काय झालं होतं नेमकं? त्याच्याकडे उत्तर नव्हतंच. कुणाकुणाला सांगणार आणि काय सांगणार.
कपाशी च्या पिकाकडे रोज पाहत असतो. काही झाडे चांगली वाढलेली तर काहीची वाढ खुंटलेली. असं का होत असेल. बियाणं एकच , मशागत सारखीच. मग त्याला ते ऑर्वेल चं वाक्य आठवायचं “ऑल अनिमल्स आर इक्वल बट  सम आर मोअर इक्वल दन अदर्स.”
निरभ्र आकाशाकडे पाहत त्याच्या मनात विचार आला...पण ऑर्वेल असं का म्हटला असेल?
(टिप: हे लिखाण काल्पनिक आहे. साम्य आढळल्यास योगायोग समजावा.)
सचिन भगत