Friday, January 26, 2018

जागो ग्राहक जागो –भाग ३

दीड-दोन वर्षापूर्वीची गोष्ट. मी एकदा गॅस बुक केला होता. एका नंबरवर मिस कॉल दिला म्हणजे गॅस बुक व्हायचा. मी घरी नसताना गॅस सिलेंडर घरी मिळाले. जेवढी किंमत होती त्यापेक्षा वीस रुपये अधिक त्या वितरीत करणाऱ्या लोकांनी माझ्या बायकोकडून घेतले. तिने विचारलं असं का तर दुसर्या मजल्यावर आणावा लागला त्यासाठी असं उत्तर तिला मिळालं. ति काही बोलली नाही. पैसे देऊन टाकले. मला कॉल केले परंतु त्या वेळेस माझं लेक्चर सुरु होतं. मी काही फोन उचलला नाही. लेक्चर संपल्यावर मी माझ्या कॅबिन ला आलो तेव्हा तिचे दोन-तीन मिस कॉल्स दिसले. मी लगेच फोन केला तर तिने घडलेला प्रकार सांगितला. याआधी जेव्हाही सिलेंडर मिळायचं तेव्हा मी घरी असायचो. पैसे देताना मी सहजच १० रुपये शिल्लक देत होतो. त्याबाबत मला कधी काही वाटले नाही. पण आताचा प्रसंग वेगळा होता. ती लोकं वीस रुपये जास्त घेऊन गेली होती.
सुरुवातीला जाऊ द्यावसं हि वाटलं. पण मन काही मानत नव्हतं. स्व-इच्छेने देणे आणि खोटं सांगून घेणे यात फरक आहे.

भारत गॅस ची वेबसाईट पाहिली आणि वाचून काढली. त्यात स्पष्ट असं म्हटलंय कि दिलेल्या पत्त्यावर पोचविण्याची जबाबदारी ही वितरकाची आहे. जेवढ्या रुपयांचे बिल आहे तेवढेच पैसे ग्राहकाने द्यावे. पण हे गॅस सिलेंडर पोचवणारे कामगार कित्येक लोकांकडून १०-२० रुपये घेत असतात. रक्कम फार कमी असल्याने कुणी मनावर घेत नाही. आपण सोडून देतो आणि इथेच आपली गफलत होते. आणि या लोकांची वृत्ती बळावत जाते.
तक्रार करावी कि करू नये या द्विधा मनस्थितीत होतो. वीस रुपये...फार छोटी रक्कम पण तिचं महत्त्व किती होतं भूतकाळात. त्या वीस रुपयांसाठी शेतात ५-६ तास काम करावं लागत होतं. पुण्यात असताना शिवाजी नगर पासून विद्यापीठापर्यंत पायी जात होतो कारण दहा रुपये वाचविण्यासाठी. भूक कितीही लागली तर नाश्त्यासाठी १०-१५ रुपये नसायचे. असे कित्येक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आले. आता त्या रकमेची भलेही किंमत नव्हती. ते मला खटकलं नाही फार. खटकलं ती पैसे उकळण्याची पद्धत. खोटं सांगून तुम्ही असं नाही करू शकत.
मग काय तक्रार करायची असं ठरवलं आणि भारत गॅस च्या वेबसाईट वरून कस्टमर केअर चा नंबर घेतला आणि फोन केला. दोन-तीन वेळेस फोन लावला. कधी बिझी तर कधी कट असं सुरु होतं. कट झालाच तर प्रत्येकवेळी दुसरा प्रतिनिधी बोलतो. त्याला पुन्हा सगळा प्रकार सांगावा लागतो. सुरुवातीला स्वागत,विविध पर्याय, हा यासाठी हा अंक त्यासाठी तो अंक, भाषा निवडा, प्रतिनिधीकडे फोरवर्ड करत आहोत असं भरपूर काही असते. असे कित्येक अडथळे पार करून माझं त्या प्रतिनिधीशी बोलणं झालं. सविस्तर प्रकार सांगितला. ठिकाण, वितरकाची माहिती, माझ्या कनेक्शन चे डिटेल्स असं सर्व काही सांगितलं आणि मला माझे पैसे आताच परत हवेत म्हटलं.
प्रतिनिधी म्हटला कि १५ मिनिटात तुमच्या समस्येच समाधान करतो. फोन झाला आणि मी माझं काम करत बसलो. थोड्याच वेळात मला वितरकाचा फोन आला आणि तुम्ही कशाला दिले वगैरे म्हणत होता. मी एकच म्हटलं कि हे तुमचे कामगार आहेत; तुम्ही त्यांना योग्य निर्देश द्या जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत आणि माझे वीस रुपये आताच परत करा. बोलताना आवाज चढत्या स्वराचा होता. बोलणे झाले आणि मी फोन बाजूला ठेवला. १५-२० मिनिटांनी मला बायकोचा फोन आला आणि त्याने पैसे परत आणून दिले आणि माफ करा असं म्हटला.


थोड्या वेळाने वितरीत करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला आणि सर माफ करा, पुन्हा असं होणार नाही आणि आमच्या साहेबाना फोन करून पैसे मिळाले हे सांगा म्हटला. मी फार काही बोललो नाही. हो ला हो केलं.  यानंतर मी ऑनलाईन पैसे पे करायला लागलो.  
प्रश्न २० रुपयांचा नव्हताच. ज्या मार्ग त्याने वापरला तो खटकला. आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला.  आपण हॉटेलात जातो तर सहज १०-२० रुपये टीप म्हणून देतोच की. ती स्व-इच्छा. द्यायलाच पाहिजे असं नाही.

                                                                                                                      सचिन भगत

Thursday, January 25, 2018

जागो ग्राहक जागो –भाग २

तीन-चार वर्षापूर्वीचा अनुभव. मला वैयक्तिक कर्ज हवं होतं. सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांचे उंबरठे झिझवले पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी कर्ज देण्यास नकार दिला. पैश्याची अत्यंत निकड होती. म्हणून मी एचडीएफसी बँकेत गेलो आणि तेथील मनेजर ला भेटलो. किती लोन हवंय तुम्हाला त्यांचा प्रश्न. दोन लाख मी उत्तरलो.  मिळेल म्हटले. त्यांनी मला आवश्यक कागदपत्रे घेऊन यायला सांगितले. आवश्यक कागदपत्रे घेऊन मी दुसर्या दिवशी बँकेत गेलो आणि सादर केले. व्याज किती आणि कसं असं कसलंच काही मी विचारलं नाही. “तुमची फाईल पुढे पाठवतो आणि मंजूर झाल्यावर कळवतो”, असे ते मनेजर म्हटले.

दोन-तीन दिवसांनतर मला त्यांचा फोन आला. “तुमचे लोन मंजूर झालंय, बँकेत या आणि प्रक्रिया पूर्ण करा” असं म्हटले. माझी काम आटोपून मी बँकेत गेलो. त्यांच्या कक्षामध्ये गेलो. ते म्हटले अडीच लाख घ्यावं लागेल. मी हो म्हटलं. त्यांनी दुसर्या कर्मचार्याला बोलावले आणि प्रक्रिया पूर्ण करायला सांगून ते तिथून निघून गेले.
आता हे नवीन महाशय म्हटले कि तुम्हाला एक विमा पण घ्यावा लागेल त्याशिवाय लोन मिळत नाही. माझी इच्छा नव्हती.
 “कितीचा विमा घ्यायचा आहे, मी विचारलं.
“५० हजार पुढील पांच वर्षांसाठी आणि दहा वर्षानंतर तुम्हाला फायदे मिळतील,” ते महाशय उत्तरले.  
ती रक्कम ऐकून मी थबकलोच. माझ्याकडे पन्नास रुपये नाहीत आणि हा माणूस मला पन्नास हजारांची पोलीसी घ्यायला लावतोय. काय करावं मलाही सुचेना. मी म्हटलं २० हजार रुपयांचा चालेल मला. पण ते नाही म्हटले. बर्याच वेळ मी त्यांच्याशी ओढाताण करत राहिलो. शेवटी तो म्हटला किमान चाळीस हजार रुपयांचा विमा काढावा लागेल अन्यथा लोन मिळणार नाही.  गरजवंताला अक्कल नसते त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. मी होकार दिला. त्याने माझ्या सह्या घेतल्या. त्या विम्याबद्दल मी काहीच माहिती घेतली नाही. फॉर्म हि त्यानेच भरले. दोन तीन दिवसानंतर माझी खात्यात पैसे जमा झालेत आणि त्यानंतर विम्याचे पैसे डेबिट झालेत. प्रोसेसिंग फी वगैरे जाऊन उरलेले दोन लाख माझ्या खात्यात पडलेत. मी गावाकडील पत्ता दिलेल्या असल्याने विम्याचे कागदपत्रे घरी पोचलेत. घरी कुणाला इंग्रजी वाचता येत नाही त्यामुळे ते पडून राहिले.
मी दोन महिन्यानंतर घरी गेलो. ती कागदपत्रे वाचून काढलीत. त्यात हा विमा पंधरा हजार रुपयांपासून सुरु करता येतो असं होतं. आणि ते बँकेतले महाशय मला चाळीस हजारांच्या खाली नाही म्हणत होते. मला फसवलं गेलं होतं. आता काय करावं हा प्रश्न होता. मी तो विषय सोडणार नव्हतोच. विमा रद्द करण्याचा कालावधी हि संपला होता. त्याला फ्री लुक पेरिड असं म्हणतात म्हणजे विम्याची कागदपत्रे मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला मला ते नकोय म्हणून रद्द करता येते. पण तो पर्याय हि माझ्या समोर नव्हता.
मी त्या ब्रांच मनेजर ला फोन केला आणि तुम्ही मला चुकीची माहिती सांगून विमा काढला, असं करायला नको होतं. “सर ते तुमच्या भल्यासाठीच आम्ही केलं” असं ते म्हटले. माझं चांगलं-वाईट मला कळते, तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही असं म्हणून मी फोन कट केला. तेव्हा माझ्याकडे स्मार्ट फोन नव्हता त्यामुळे सात-आठ किमी अंतरावर असलेल्या नेट कफे वर गेलो. एचडीएफसी लाइफ च्या वेबसाईट ला भेट देऊन तक्रार कुठे नोंदवायची त्याची माहिती घेतली आणि मेल पाठवला. शिकलेल्या लोकांचे जर हे हाल असतील तर गरीब, अशिक्षित लोकांच काय? असे नानातऱ्हेचे प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होते. याचा आता पाठपुरावा करायचाच.
दोन-तीन दिवसानंतर माल त्या मनेजर चा फोन आला आणि तुम्ही हे काय केलंय असं म्हटला. काही नाही जे योग्य वाटलं ते केलं. भेटायला या म्हणे. भेटतो म्हटलं शेगाव ला आल्यानंतर. सोमवारी मी शेगाव ला गेलो. त्या मनेजर चे कित्येक फोन आलेत मी उचलेले नाहीत. शेवटी त्याने एक प्रतिनिधी मला भेटायला कॉलेजला पाठवला. मला शोधत शोधत तो माझ्या विभागात आला. त्यानं माझ मन वळवायचा प्रयत्न केला. तक्रार मागे घ्या. मी नकार दिला. तुम्ही काहीपण केलं तरी मी तक्रार मागे घेणार नाही असं मी त्याला सरळ सांगितलं. कमीत-कमी बँकेत येऊन मनेजर साहेबाना तरी भेटा म्हणे. मी होकार दिला आणि संध्याकाळी येतो म्हटलं बँकेत. मी मुद्दाम उशिरा गेलो. सात वाजले असतील संध्याकाळचे. परत तिचं चर्चा. मनेजर म्हटले मी माझा रिप्लाय पाठवतो म्हणे. मी माझ्या मतावर ठाम होतो.  काहीच होणार नाही म्हणे. तुम्ही सह्या केल्या आहेत. जे होईल ते होईल म्हटलं, पाहू आणि मी तिथून निघून आलो.
दोन दिवसांनतर मला मेल आला. त्यात असं म्हटलं होतं कि आमच्या प्रतिनिधीने तुम्हाला टर्म्स सांगितल्या होत्या आणि तुम्ही त्या मान्य केल्यात.  फ्री लुक कालावधी पण संपलाय त्यामुळे तुमची पॉलीसी रद्द होऊ शकत नाही.
आता काय करावं मी विचारात पडलो. एखादी सरकारी संस्था असावी कि जी विमा क्षेत्र नियंत्रित करते असा विचार माझ्या डोक्यात आला. नेट सर्च करून आयआरडीए ची माहिती मिळाली. ती वेबसाईट एक दिवस वाचून काढली आणि एका ठिकाणी मला एक मुद्दा मिळाला. त्यात असं म्हटलं होतं कि जर पोलिसीधारक शिक्षित असेल तर त्याने संपूर्ण कागदपत्रे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं पाहिजे. माझ्या बाबतीत तर मी फक्त सह्या केल्या.
पुन्हा एकदा मेल लिहिला आणि ESCALATION 1 ला पाठवला. हि पुढची पायरी. जर तुमचं HDFC LIFE कडून समाधान झालं नाही तर इथे तक्रार नोंदवायची असते.  मी सर्व सविस्तर नमूद केलं आणि मेल पाठवला. दहा दिवसात मला उत्तर मिळेल असं त्याचं उत्तर आलं. मी दिवस मोजत गेलो पण मला उत्तर मिळालं नाही. मी पुन्हा त्याना मेल केला पण काही उपयोग झाला नाही.
आता काय करायचं हा प्रश्न पडला. इथून रिप्लाय नाही मिळाला तर पुढे काय याचा शोध घेतला आणि ESCALATION २ ला मेल केला. पुन्हा तेच दहा दिवसात उत्तर मिळेल आणि मला उत्तर मिळालं. सोबत त्यांनी फॉर्म पाठवला. त्याची प्रिंट घेऊन भरायचा आणि बँकेत जमा करायचा. आणि आठ दिवसात पैसे परत मिळतील असं म्हटलं होतं. मी जाम खुश झालो.  
मी बँकेत गेलो तर ते पण आश्चर्यचकित झाले. त्यानाही माहित नव्हतं. इकडे-तिकडे फोन करून त्यांनी माहिती घेतली. मी ते सादर केलं. मनेजर साहेब म्हटले माझ्या संपूर्ण करिअर मध्ये पहिल्यांदा असं घडलंय. विम्याची रक्कम फ्री लुक नंतर भेटत नाही. आयुष्यात बर्याच गोष्टी पहिल्यांदाच घडतात, मी उत्तरलो.  त्या मनेजर ला विमा क्षेत्रात चांगला बिजनेस केला म्हणून पुरस्कार मिळालेला होता. आता मला समजल कि तुम्ही बिजनेस कसा केला ते असं मी बोललो आणि तेथून निघालो. चार-पांच दिवसांनी माझ्या अकाऊंट पैसे जमा झालेत आणि तो विषय संपला.
किती फसवेगिरी असते आपल्या आसपास. कित्येक लोकं ते स्वीकारून घेतात.  चुकीची माहिती देऊन तुम्ही असं करू शकत नाही. काही नैतिकता पाळायला हवी. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना गड्ड्यात टाकायचं. दुर्दैवाने तेच होतंय आज-काल. मी माझ्या आयुष्यात एक-एक रुपयासाठी संघर्ष केला आणि या माणसाने मला तब्बल चाळीस हजारांनी गंडवल. हि कल्पनाच मला जगू देत नव्हती आणि त्यातूनच हे सर्व सुरु झालं.  “सत्य परेशान जरूर होता है लेकीन पराजित नही.” दोन महिने सलग याचा पाठपुरावा करत राहिलो. पर्सनल लोन ला विमा काढायची आवश्यकता नसते मला हे माहित नव्हतं.  पण समोरचे प्रश्न इतके गंभीर होते कि त्याची माहिती तेव्हा घ्यावीशी वाटली नाही. आणि हा सगळा प्रकार घडला.
नंतर जेव्हा जेव्हा त्या बँकेत गेलो त्यांना वाटायचं काहीतरी समस्या आहे आता.
*संपूर्ण संभाषण सोबत जोडले आहेत.






सचिन भगत

Monday, January 22, 2018

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१६

कमवा आणि शिका योजना
जळगाव मध्ये पदवी करत असताना पुणे विद्यापीठात जायचं एम. ए. करण्यासाठी असं ठरवलं होतं. तिथल्या कमवा आणि शिका योजनेबद्दल ऐकलं होतं. म्हणूनच तिथे जाऊ शकलो. अन्यथा पुणे विद्यापीठाचा विचार कधी डोक्यात आला नसता. कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना पावलागणिक संघर्ष असतो. सुदैवाने एम. जे. कॉलेज ला हि योजना असल्याने पदवी होऊ शकली. पुढे विद्यापीठात प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश मिळाला आणि तिथेही कमवा आणि शिका योजनेत सहभागी झालो. पुणे विद्यापीठात जाण्याचे धाडस करू शकलो ते यामुळेच.  ही योजना नसती तर पुणे विद्यापीठात शिकणे कल्पनेपलीकडे होतं. सुरुवातीचे सर्व अडथळे पार करून मी तिथे गेलो. खिश्यात दमडीही नव्हती. दोन वर्षे मी या योजनेत काम केलं. पहिलं वर्ष स्वच्छतेच काम आणि दुसर्या वर्षी भोरे सरांच्या हाताखाली कार्यालयीन काम केल. हे करत असताना कधीही अडचण आली नाही. मागेल त्याला काम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे माहित असल्याने विद्यापीठात पाउल टाकलं.

'रयत'चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वप्रथम 'कमवा आणि शिका' हा मूलमंत्र दिला. त्यानंतर ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रसार झाला. आज  'कमवा आणि शिका' ही योजना आज कित्येक शैक्षणिक संस्थामध्ये राबवली जाते. उच्च शिक्षण घेत असताना, विद्यार्थांवर श्रमसंस्कार व्हावेत, त्यांनी हा ठेवा निरंतर जपावा, या हेतुने कमवा व शिका योजना सुरु झाली आणि पाहता पाहता हि योजना प्रचंड विस्तारत गेली. परिस्थितीमुळं अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागतं. शिकण्याच्या वयात अनेकांना कुटुंबासाठी पैसा मिळवावा लागतो. बऱ्याच वेळा आसपास शाळा नसते. दुसरीकडं जायचं  ठरवलं तर राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा खर्च कोण करील? यासारखे एक ना अनेक प्रश्न समोर ठाकतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठानं या योजनेची आखणी केलीय. रोज सकाळी ६ ते ९ प्रती दिन तीन तास विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसर स्वच्छ करणं, परिसरातील बागांना, झाडंझुडपांना पाणी घालणं, परिसराची निगा राखणं, झाडं लावणं, त्यांची काळजी घेणं, माळीकाम करणं, विद्यापीठातील कार्यालयीन काम करणं आदी कामांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पुढं जाऊन विद्यार्थी स्वावलंबी बनावेत, त्यांनी एखादा व्यवसाय करावा, या दृष्टीनंही या योजनेत व्यावसायिक कामं दिली जातात. कमवा आणि शिका योजनेचा फायदा करून घेत विद्यापीठाला आवश्‍यक लिफाफे आणि फाइल या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेणे,  तसेच या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे म्हणून रिटेल सेल, नर्सिंग असिस्टंट, ऑटो सेल्स कन्सल्टंट आदीचे प्रशिक्षण मोफत देणे  अश्या घोषणा मध्यंतरी विद्यापीठ प्रशानाकडून झाल्यात.
कित्येक विद्यार्थी या योजनेत काम करतात. सुरुवातीला मुलाखत वगैरे होत होत्या. पण काम मिळून जायचं. आता भरपूर बदल झालेत या योजनेत. महिन्याला मिळणारा मोबदला हि भरपूर वाढला आहे. दिवसाला तीन काम. आता तासाला ४५-५० रुपये मिळतात असं ऐकिवात आहे. या पैश्यात मेस चा खर्च तर निघतोच पण काही शिल्लक हि राहतात. कारण निवास मोफत असायचा वसतिगृह सहा ला. आता ही योजना विद्यापीठाला संलग्नित महाविद्यालामध्ये हि सुरु आहे. विद्यापीठ भरपूर खर्च करते या योजनेवर.
विद्यार्थ्यांची संख्या खूप असल्याने वेगवेगळ्या गटात विभागणी व्हायची. प्रत्येक गटाचा एक लीडर. आणि या सर्वांचा एक लीडर. अशी रचना होती. विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे राबवल्या जाणार्या या योजनेचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू. याच योजनेतून कित्येक विद्यार्थी नेतृत्व निर्माण झालेत. एक वेळेस च्या जेवणाची सोय नसलेले विद्यार्थी घडलेत आणि आता स्वतःच्या पायावर उभे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. गरिबी प्रगतीची आड येऊ नये. प्रत्येकला सन्मानाने शिकता यावं. आपला भविष्य घडवता यावं. हा हेतू सफल झालेला दिसतोय.
सकाळी ६ ते ९ च्या पुणे विद्यापीठात फिरायला बाहेर पडा. २००-३०० विद्यार्थी काम करताना नजरेस पडतील. विद्यापीठातील विविध विभागांची, वाचनालयाची स्वच्छता किंवा गार्डन ची निगा राखणे अशी विविध कामे विद्यार्थी करतात.  फक्त कामच नाही तर बौद्धिक पण असायचं शेवटी अर्धा तसं. व्यक्तिमत्त्व विकासाची पायाभरणी तिथेच झाली. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे आचार-विचार हि तिथेच कळाले. हि योजना फक्त काम करण्यापुरती आणि त्याचा मोबदला इतकी मर्यादित कधीच नव्हती. समोर येऊन मत –मतांतरे मांडण्याची सवय इथेच लागली, आत्मविश्वास मिळाला  आणि त्याचा उपयोग कित्येक आंदोलनात झाला.
कामाचा मोबदला बँकेत जमा होतो. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा बँकेत खात उघडावं लागलं. पैसा नव्हता तर अकाऊंट  कुठून असणार बँकेत.

आता या योजनेत सर्व काही आलबेल असतं असंही नाही. काही विद्यार्थ्यांनी या योजनेचा दुरुपयोग हि केला आहे. काही लीडर्स हि त्याचं प्रकारातले होते. काम करणारे सर्वच गरीब असतात असंही नाही. कधी मोबदला वाढवण्यासाठी आंदोलनं हि झालीत. म्हणून या योजनेचं महत्त्व कमी होत नाही. सन्मानाने जगण्याचा जो मार्ग विद्यार्थ्यांना मिळतो तो प्रशंसनीय आहे. त्याबाबत आपण विद्यापीठाचे आभार मानायला हवेत.  माझ्यासारखे कित्येक या योजनेविना शिक्षणापासून वंचित राहिले असते.
पुण्यात जाऊन शिकणे सोपं नाही. राहण्या-खाण्याचा खर्च प्रचंड आहे. सामान्य लोकांना ते शक्य नाही. हि योजना म्हणजे त्यांचा आधार.
मी विद्यापीठात असताना डॉ. संभाजी पठारे हे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक होते. कित्येकदा सकाळी ते कामाची पाहणी करत होते. स्वतः लक्ष असायचं त्याचं.  त्यांच्या उल्लेखाशिवाय या योजनेवर भाष्य होऊ शकत नाही.  त्यांच्या काळात हि योजना खूप वाढली. या योजनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांनी बदलला, या योजनेत काम करण्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.  स्वावलम्बनातून सन्मान विद्यार्थ्यांना मिळाला. जेव्हा जेव्हा ते संवाद साधायचे फक्त ऐकत राहायचं असं वाटायचं. मुल्ये त्यांनी रुजवली आणि फुलवली.
याच कमवा आणि शिका चे विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.  गरज असतना आधार बनलेली हि योजना कित्येकांच्या दृष्टीने महत्त्वाची होती आणि आहे. अभ्यासात या योजनेचा कधीही व्यत्यय आला नाही. याउलट स्वावलंबन ची शिकवण मिळाली. स्वतःच्या पायावर उभं राहता आलं.

हि योजना म्हणजे गेमचेंजर आहे.  कित्येकांच आयुष्य फुललं आहे. गरीबीवर मात करता आलीय. आयुष्य बदलता आलंय. भरकटलेल्या, शिक्षणाचा गंध नसलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायचे असेल तर प्रत्येकाने पुढे यायला हवं. सर्वांनाच विद्यापीठात प्रवेश मिळेल असंही नाही. कित्येक प्रवेश्यापासून वंचित राहतात. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने काही प्रमाणात का होईना याची सुरुवात करायला हवी. 

Friday, January 19, 2018

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१५

व्यक्तिविशेष: (उत्तरार्ध)
जेवढेही लोकं आपल्या आयुष्यात येतात त्या प्रत्येकाशी आपली मैत्री होऊ शकत नाही किंवा त्यांची आपल्याशी होऊ शकत नाही. एकमेकांना जवळ आणणारे काही धागे असतात त्यामध्ये सारख्या सवयी असतील, किंवा समान आचार-विचार किंवा अजून काही.  माझे विभागातील मित्र कमी आणि इतर विभागांचेच जास्त. माझा संपर्क सगळा माझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या सोबत. त्यामुळे कदाचित भरपूर गोष्टी शिकता आल्या. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलता आला. समवयीन मित्र फार कमी. कित्येक जण आहेत ज्यांच्यावर लिखाण होऊ शकते. त्यामध्ये राहुल राजपूत, तानाजी काळे, बालाजी सूर्यवंशी, सुनील कनकटे ई. चा समावेश होतो.
३ श्रीमंत जाधव:
काय लिहावं या माणसाबद्दल. पुण्यात फक्त नेट-सेट च्या अभ्यास करण्यासाठी आणि  निवास ते हि सांगवीत. रोज विद्यापीठात ये-जा. मुळ औरंगाबाद चे. कायम चष्मा आणि शर्टिंग. ग्रंथालयामध्ये आमची ओळख झाली. नवीन जयकर ला बसायचो तेव्हा आम्ही. संपर्क वाढत गेला तसा धागा जोडला गेला. त्यांच्यासोबत खूप क्षण घालवलेत. पत्रकारिता करत असताना सोबत जाने-येणे असायचे रानडे ला. पत्रकारितेला प्रवेश मिळाला तेव्हा प्रवेशाची फी पाच हजार रुपये नव्हते माझ्याकडे. खिश्यात काहीच नव्हते. शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही दिवसभर अनिकेत कॅन्टीन ला बसून होतो. कित्येकांना तिथे बसूनच फोन केलेत. पण पैश्याची जुळवाजुळव काही होईना. सकाळी ८-९ वाजेपासून ते संध्याकाळी ५-६ वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. त्यांनी कित्येक फोन केलेत माझ्यासाठी. समस्या माझी होती पण ती त्यांची समजून त्यांनी प्रयत्न केलेत. काय-काय उद्योग नाही केले या माणसाने. पण नेट पास व्हायचे या उद्देशाने झपाटलेला. यश लांबत गेलं पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. आता एका महाविद्यालयात रुजू झालाय. वैवाहिक जीवन सुरु झालंय. विद्यापीठात असतांना माझ्या चुकीच्या गोष्टींच हि समर्थन करणारा माणूस. माझ्यावर या माणसाचा प्रचंड विश्वास माझ्यावर. स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवलेला माणूस. पण हार मानली नाही. लढत राहिला. आणि शेवटी हवं ते मिळालं. आता कित्येक दिवस झाले संपर्क नाही. श्रीभाई चं स्थान आमच्या आयुष्यात खूप मोठ आहे. जयकर, अनिकेत कॅन्टीन, सेवक चाळ चा  नेहमीचा प्रवास कसा विसरणार. मला पंढरपूर एका महाविद्यालयात मुलाखतीला जायचं होतं. यांची सोबत होती. बाईकने पुणे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुणे असा प्रवास केला. माझ्यासाठी सर्व सोडून ते कुठेही यायला तत्पर. “साले तू मुझे नेट पास नही होणे देगा” असं बर्याच वेळा ते गमतीने म्हणायचे. माझ्याकडे बाईक होती तेव्हा भरपूर भटकंती केली आम्ही. ते सांगवीत असताना मी कित्येक वेळा रात्री त्याना भेटायला जात होतो.
४ ज्ञानेश्वर चोथवे:
मुळचे लातूर कडचे. माझे सिनिअर. एम.ए. करत असताना कधी संबंध आला नाही. संपर्क आला तो एम. फिल करत असताना. त्यावेळेस ५ नंबरच्या वसतिगृहात राहत होतो. नेमकी पहिली भेट आठवत नाही. पण सेवक चाळीत जाने हा एक समान धागा आणि त्या धाग्याने आम्हाला एकत्र आणले. एलीस गार्डन च्या बाजूला सेवक चालीकडे जाणार्या रस्त्याच्या कडेने कित्येक वेळ घालवलाय. तिथेच आमच्या चर्चा चालायच्या. प्लेन हार्तेड (Plain Hearted) माणूस हा. त्याच्या मनामध्ये दुसर्याविषयी कधीच राग, चीड वगैरे काहीच नाही. तसंही माझं फार लोकांशी जुळत नाही पण जुळल्यानंतर ते कायम राहत.
आम्ही एकाच विषयाचे. कित्येकदा विषयावर चर्चा व्हायची. मते-मतांतरे असायची. त्यांच्यामुळेच नामदेव पवार, सुनील कनकटे, शिवाजी मोटेगावकर यांच्याशी संपर्क आला. सोबत भटकंती झाली आणि आठवणी निर्माण झाल्यात. अनिकेत कॅन्टीन च्या बाजूला किती घालवला असेल कुणास ठाऊक.  कधी कधी संपर्क होतो. संवाद कमी असेल पण नातं कायम आहे. आता खारघर ला आहेत कुठल्यातरी अभियांत्रिकी महाविद्यालयात.
५. दीपक जाधव: सोलापूरचा. राज्याशास्रात एम. ए. करत होता. माझं लिखाण त्याच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कमवा आणि शिका चे एका ग्रुप चे सदस्य. झाडताना आम्ही नेहमी चर्चा करत असायचो. असा कुठलाच विषय नाही कि ज्यावर चर्चा नाही. सोबतीला तानाजी, राहुल होते. आम्ही आलो एकत्र आलो म्हणजे एकच प्रश्न किती पतंग उडवले. रोज त्यावर चर्चा. समवयीन असल्याने बंधन नव्हती. तानाजी आणि राहुल खूप चांगले व्यक्ती. प्रत्येकाचा एक वेगळा संघर्ष.
दिपक आणि मी खूप वर्ष सोबत होतो होस्टेल ला. काय लिहू त्याच्याबद्दल. सोलापूर ते पुणे येण्याचा संघर्ष लिहू कि पत्रीकारिता करीत असताना सायकल ने रानडे ला जाण्याबद्दल लिहू , का त्याच्या प्रेमाबद्दल लिहू. आता पत्रकार आहे एका वृत्तपत्रात. खरं सांगतो, आणि खरं मांडतो. म्हणून मी पण त्याच्याबद्दल तोच मार्ग अवलंबतो.
त्याच असं कि हा माणूस म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्त्व. कॅन्टीन ला गेल्यानंतर टीटी एमएम मी याच्याकडून शिकलो पण त्याचा अवलंब फक्त त्याच्यासोबतच केला. रोज सकाळी उठला कि तो कुणाला तरी फोन करून गुड मोर्निंग म्हणायचा. मग आम्ही इतर सकाळी उठलो कि त्याच्या समोर एकमेकांना गुड मोर्निंग म्हणत होतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहिले कि आमचा हास्यकल्लोळ. हा एकमेव ज्याच्या लग्नाला आम्ही शिर्डी ला गेलो होतो बाईकने. अवर्निनीय प्रवास होता. मुकेश, मिश्रा सर आणि अजून इतर सोबत होतेच. पत्रीकारिता करत असताना हि तो जयकर ला येत होता.  
तो रात्री जॉब करून आला कि डायरी लिहायचा. आमच्या ते ध्यानात आलं आणि मग काय कधी याची डायरी वाचायला मिळते याची उत्सुकता होती. आणि एके दिवशी ती संधी मिळालीच. त्याची डायरी तो त्याच्या बॉग मध्ये विसरला. मग सामुहिक वाचन झालं त्या लिखाणाच. खूप काही लिहिलं होतं त्याने त्यात. छान लिहिलं होतं. वैयक्तिक होतं पण भावलं.  हा अजून एक ज्यावर मी प्रचंड टीका करत होतो. पण त्याचं मोठेपण असं कि त्याने ते कधीच मनाला लाऊन घेतलं नाही. कधी कधी फोन येत असतो त्याच्या.  मोठा पत्रकार आहे आता. सेट ची परीक्षा हि पास झालाय. आणि हो प्रेमविवाह च आहे.  त्याच्याकडे गाडी आल्यानंतर तो खूप जपत होता तिला. सहजासहजी कुणाला देत नव्हता. त्यात अयोग्य हि काही नाही. गरिबीतून पुढे आल्यावर किमत असते कमावलेल्या प्रत्येक गोष्टीची. जॉब , ती , जयकर आणि आमच्यासोबत अधिवास असा तो विभागाला गेला होता.
माझ्यावर टीका करणाऱ्यांची संख्या विद्यापीठात काही कमी नव्हती. पण जी लोकं माझ्या आयुष्यात आलीत त्यांनी पूर्णपणे स्वीकारलं. माझा एका इंग्रजी वाक्यावर प्रंचड विश्वास-If you want to avoid criticism, Say Nothing, Do nothing and Be Nothing. But I did something and it invited criticism. अनेक शुभचिंतक भेटलेत.
बालाजी सूर्यवंशी, हिंदी विभागाचा विद्यार्थी, ला कसं विसरणार. गेट वर चा तो अंडा राईस आणि आपले विद्यापीठ ग्राउंड वरील प्रताप कसे विसरणार.  कित्येक दा आपण एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटलाय. हा माणूस म्हणजे कवी. विद्यार्थी दशेतच कविता संग्रह प्रकाशित. हाल-अपेष्टा आपल्या कवितेतून मांडणारा. भाई आपली ए गांधीजी ची कविता अफलातून. एलीस गार्डन मधली आपली झालेली नजरानजर मी विसरलो नाही अजून.  सुरुवातीला फार काही सख्य नव्हतं आमच्यात. पण सान्निध्यात आल्यानंतर स्वभाव कळलेत. आपण जे ऐकतो किंवा इतर जे सांगतात यावर विश्वास ठेवायचा नाही. आपण अनुभवायचं आणि ठरवायचं हि शिकवण विद्यापिठात मिळाली. त्यामुळेच कित्येकांच्या मनात असलेले समज-गैरसमज कालांतराने दूर झालेत. समान ध्येयान पछाडलेले आम्ही.  
या लोकांशिवाय विद्यापीठातील आयुष्याची कल्पना होऊ शकत नाही. आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त झाला. कुणीच परिपूर्ण नाही. मी हि नाही. But the relations strengthen when you respect the differences. That is something most of us did. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात मग्न आहे. आता भलेही आनंदी आनंद आहे. पण भूतकाळातल्या दुखात –अडचणीत जी मजा होती, संघर्ष होता, तो काही औरच.  मुळात विद्यापीठात येणारे अनेक गरिबीची झळ पोचलेले असतात. त्या विद्यापीठात काय जादू आहे काय माहित. ते कधीच खाली परत पाठवत नाही. प्रत्येकजण काहीतरी सोबत घेऊन जातो. आठवणी तर विचारूच नका. कित्येक चांगले वाईट अनुभव इथेच मिळतात. विद्यापीठ म्हणजे एक खेडेगाव असं मी नेहमी म्हणत होतो. माझ्या संपर्कात आलेली कित्येक जण सक्रीय लोकं होते. काय नाही केलं. आंदोलनं तर नित्याचीच.
लिहिण्या आधी भरपूर गोष्टी डोक्यात होत्या. सगळं काही लिहिता आलं नाही. कोण कसं घेईल याचीही चिंता होती. सोशल नेटवर्किंग वर काय टाकावं आणि काय नाही याचे हि काय नियम असतात. त्याचं अनुकरण केलंय. म्हणून लेखाला व्यक्ती-चरित्र ऐवजी व्यक्तिविशेष असं म्हटलंय. बाकी आपण जाणकार आहातच. मी न लिहिलेल्या गोष्टी आपल्या डोक्यात आल्या म्हणजे लिखाण सफल झालं.  
भरपूर वर्ष गेलीत. या सार्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यावेळेस आम्ही स्पर्धक होतो. आता वेगळंच आयुष्य आहे. घडलेल्या घटनांबद्दल कुठलाही आकस नाही. किंबहुना आकर्षण आहे. आठवण आहे. मिस यु ऑल. मिस युवर कंपनी. मिस युवर को-ऑपरेशन. यु मेड माय लाइफ मोअर इंटरेस्टींग.


पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१४

व्यक्तिविशेष: (पूर्वार्ध)
पुणे विद्यापीठात शिकत असताना अनेक व्यक्तींशी संबंध आला. त्यातले काही कायम लक्षात राहिले कुठल्या ना कुठल्या कारणाने. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण. प्रत्येकाची आपली स्वतंत्र शैली होती, आचार-विचार वेगळे होते. एवढ्या सार्या भिन्नता असूनही कुठल्यातरी धाग्याने आम्ही बांधले गेलो. आठवणीत असलेल्या व्यक्तींबद्दल लिहावेसे वाटले. प्रत्येकाबद्दल लिखाण शक्य नाही किंवा माझ्या शब्दांच्या मर्यादा आहेत. त्यातील काही -
१ श्रीकांत मिश्रा:
हिंदी विभागाचे विद्यार्थी.कधीपण हातात दोन-तीन पुस्तके असायची. हिंदी मध्ये बोलायचे. मराठी समजते आणि बोलता पण येते. आमचा संवाद हिंदीत असायचा. त्यांच्यामुळे आम्हीही हिंदी मध्येच बोलायचो. उंच, तब्बेतीन हि सुदृढ पण साध-सरळ व्यक्तिमत्त्व. त्याचं चालणं म्हणजे पळण्यासारख. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आणि जयकर कडे प्रस्थान करणारं व्यक्तिमत्त्व. डोक्यावरच्या समोरच्या भागातील केसांची गळती स्पष्ट दिसत होती. उरलेल्या केसांची मात्र ते कुठलंतरी लाल रंगाचं तेल वापरायचे मालिश करताना. आमच्यासाठी तो थट्टेचा विषय. मुळचे उत्तरप्रदेशचे. मुंबईत आले आणि नन्तर इथे. प्रचंड संघर्षमय जीवन. पण त्याची वाच्यता नाही. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची वृत्ती. ओपन मधील विद्यार्थ्यांना नेट पास होणे मम्हणजे मोठी कसरत. अपयश येत असताना आम्ही त्याना पाहिलंय, अनुभवलंय. त्यांचा चेहरा सर्व काही सांगून जायचा. पण पुन्हा त्याच चिकाटीने ते अभ्यास करायचे, पेटून उठायचे. प्रंचंड ज्ञान असूनही यशाने त्यांना हुलकावणी दिली. पण माणूस डगमगला नाही. हाल-अपेष्टा सहन करून पुढे जात राहिला. असं खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून. सोशल नेटवर्किंग खूप. इतर विभागाचे विद्यार्थी, कॅन्टीन, मेसवाले हि त्याना ओळखायचे. जयकर ग्रंथालयात त्यांची अभ्यासाची जागा ठरलेली. कधी तरी नजर गेलीच तर सुवाच्च अक्षरातील त्यांच्या नोट्स लक्ष वेधून घ्यायच्या. सारं कसं शिस्तबद्ध. कायम टी-शर्ट वर असायचे. आमच्यासाठी ते मार्गदर्शक.
मी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्याशी संपर्क आला तो कमवा आणि शिका या योजने-अंतर्गत. या योजनेत अनेक विद्यार्थी सहभागी असतात. आर्थिक परिस्थिती बेताची असणार्यांसाठी पुण्यात जगण्याचा आणि शिकण्याचा एक चांगला मार्ग. भरपूर विद्यार्थी या योजनेत काम करत असल्याने ते वेगवेगळ्या ग्रुप विभागले जायचे. त्या ग्रुप चा एक लीडर अशी रचना. मी यांच्या ग्रुप मध्ये होतो. जेमतेम १५-२० विद्यार्थी आमच्या ग्रुपमध्ये. सकाळी सहा वाजता आमचं काम सुरु व्हायचं. काम काय तर फिजिक्स विभाग आणि जयकर वाचनालय स्वच्छ करायचं. हातात झाडू घेतला कि तो किमान अडीच तास तरी सुटायचा नाही. पुणे विद्यापीठात झाडांची संख्या खूप असल्याने पाला-पाचोळा खूप असायचा. सुरुवातीला झाडू हातात घ्यायची लाज वाटत होती परंतु ते नित्याचेच झाले होते. कित्येकवेळा आमच्या वर्गामधील मुलं-मुली हाय-बाय करायच्या. आपल्या हातात झाडू आणि ते कॅन्टीन ला वगैरे नाश्ता करायला जात असत. एक वेगळीच भावना असायची मनात. पण पर्याय नव्हता.
मिश्रा सर ग्रुप लीडर असूनही आमच्या सोबत काम करायचे. त्याना ते करण्यात आनंद वाटत होता. काळानुसार आमच्यात हि बदल झालेत. त्यांच्याकडे पाहून आम्हीही बिनधास्त झालो. तसं ग्रुप लीडर ने काम नाही केलं तरी काही हरकत नव्हती किंवा त्यांनी फक्त काम करून घ्यायचं असं होतं. पण याचं व्यक्तिमत्त्व वेगळ होतं. आमच्यात ते मिळून-मिसळून राहायचे. त्याचं वाचन अफाट. त्यांच्या जीवन जगण्याच्या ठराविक संकल्पना. सत्याचे पुरस्कर्ते. परखड व्यक्तिमत्त्व. हिंदी विभाग म्हणजे त्यांच्या एकतेसाठी ओळखला जायचा. जेवताना सगळे एकत्र. कित्येकवेळा आम्ही सोबत रूमला खिचडी करत असायचो. जेवतानाची ती मजा काही औरच. वेगवेगळ्या विषयांवरून मी त्याना चिडवत होतो. मुलींसोबत दिसले कि रात्री रूम ला टिंगल ठरलेली असायची.
एम.फिल ला असताना आम्ही भरपूर दिवस एकाच रुममध्ये. अनुभवांची देवाण घेवाण होत राहिली. एकमेकांचा जीवन प्रवास ठाऊक होता. खेचा-खेची कायम चालायची. मी टीका करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. ते सर्व त्यांनी कधी मनाला लाऊन घेतलं नाही किंवा तसं झालं असले तरी कधी बोलून दाखवले नाही. एकदा त्यांच्या मोबाईल मधले मेसेज मी त्याना न कळत वाचून काढलेत. त्याना कळल्यावर प्रंचड राग आला होता. नंतर मात्र सुरळीत सुरु राहिलं. त्याचं नियोजन ठरलेलं असायचं. ठराविक पैश्यांमध्ये महिना निघून जायचा. आमचं उलट होतं. पैसे आले कि आमची उधळपट्टी सुरु. त्यांनी कित्येक वेळा उपदेशाचे डोस पाजले असतील पण आमच्यावर कधी फरक पडला नाही किंवा समजून आम्ही पाडून घेतला नाही. आम्ही त्याना बडे भाई म्हणत होतो. कित्येक आंदोलनामध्ये सहभाग. स्पष्टवक्ता असल्याने कायम विद्यापीठ प्रशासन विरोधी. त्यांच्या विभागात त्याच्या ज्ञानाबद्दल तोड नव्हती. आपल्या विषयात पारंगत. चर्चा-टिंगल-टवाळी नेहमीची असायची. आम्ही सगळे नेट -सेट चा अभ्यास करत होतो. कित्येक वेळा अपयश आलं असेल पण जिद्द मात्र होती. निकालाची चिंता न करता त्यांचा अभ्यास सुरु असायचा. जयकर ला कधी दांडी मारली नाही. कालांतराने आम्ही सगळे नेट पास झालो. प्रत्येकाची जगण्याची दिशा बदलली आहे. ते पुण्यात आहेत. जॉब सुरु आहे. अधून-मधून संपर्क असतो. विद्यापीठात श्रीकांत मिश्रा ये नाम हि काफी है. त्यांच्या लग्नाला जाता आलं नाही उत्तरप्रदेशात. त्यांनी खूप शिव्या हासडल्या मला. खंत आहे नक्कीच. सर आपने हि हमे सत्य के मार्ग पर चलने को कहा और जो तत्त्व आपने सिखाये वो आज भी याद है.

2 नामदेव पवार:
नामदेव पवार हे दुसरं व्यक्तिमत्त्व. मुळचे लातूरकडचे. आमचा संपर्क आला तो पाच नंबरच्या होस्टेलला. ओळख होतीच. ओळख म्हटल्यापेक्षा विरोध असणारं नातं. त्याला कारणेही होतीच. एकमेकाला समजायला बराच वेळ गेला. पवार सर म्हटलं कि कुठल्याही विषयवार पोट-तिडकीने बोलणारा माणूस. अभ्यास चांगला-विषयाचं ज्ञान चांगलं पण नेट परीक्षेने कित्येक वेळा हूल दिली. नेहमी तिसर्या पेपर मध्ये ८०-८८ च्या दरम्यान गुण. पास व्हायाल नव्वद ची आवश्यकता. अपयश कसं पचवायचे हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. ती वेदना कुणीच समजू शकत नाही. तिची तीव्रता हि शब्दांच्या पलीकडे. पण या माणसानं जिद्द सोडली नाही यश मिळेपर्यंत. राज्यशास्त्र विभागाचं एक वैशिष्ट असायचं ते म्हणजे जो कोणी त्या विभागात प्रवेश घ्यायचा तो काही दिवसात स्वतःला राजकीय तज्ञ समजत होता. जसं-काही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयाची जाण फक्त त्यांच्याकडे. त्यामुळे कित्येकांचा पाहण्याचा दृष्टीकोन तसाच असायचा. पवार सर मात्र त्याला अपवाद ठरले. मी त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर खर्या अर्थान त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची ओळख झाली. त्याना कित्येक विषयांची समज होती. आपल्या विषयात ते पारंगत होते. त्यांच्या बोलण्यातून ते नेहमी जाणवत राहायचं. वेळप्रसंगी ते विभागाविरोधात हि जायला घाबरले नाहीत. इतरांसारखे लांगुल-चालन हि त्यांनी केले नाही. स्वतःची प्रतिमा नेहमी कायम ठेवली. आंदोलनामध्ये हि त्यांचा सहभाग असायचा. त्याआधी आमच्यात सौदाहार्याचे नाते नव्हते. एकदा काय झालं कि राज्यशास्त्राच्या एका मुलासोबत आमच्या विभागातील एक मुलगी सोबत फिरत होती. मी पुढाकार घेऊन त्या मुलीला समजावलं. अर्थातच इतर अजून हि सोबत होते. पण हे सगळं राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना खटकलं. तिथूनच तो विरोध सुरु झाला ते एम.ए. होईपर्यंत. माझे एक सिनिअर ज्ञानेश्वर चोथवे यांच्या ग्रुप चे. त्यांच्या माध्यमातून माझा पवार सरांशी संबध आला. विचारांची देवाण-घेवाण सुरु झाली. समज- गैरसमज गळून पडले होते. कित्येकवेळा आम्ही सर्वजन गडांची किंवा पुण्याच्या आसपास भटकंती केली. ते क्षण खरंच अनमोल आहेत. आणि तोरणा गडाकडे जाताना झालेला अपघात कसा विसरणार. आम्ही दोघेही पडलो होतो. ते चालक आणि मी मागे बसलेलो. गाडीचं थोडं नुकसान झालं होतं पण जीवनात मानसं महत्त्वाची आहेत. वस्तूंमध्ये माझा जीव कधीच नव्हता आणि आजही नाही. पवार सरांनी नंतर भरपाई म्हणून पैसेही दिलेत. ते मला नको होते. पण मी नाही म्हणू शकलो नाही त्याची खंत आहे. जयकर मधील त्यांच्याबद्दल च्या खूप आठवणी लिहिता येतील. पण त्या इथे अनावश्यक आहेत.
मी पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर अधून-मधून संपर्क झाला. त्याचं व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहिलं. सचिन तू एक पुस्तक लिही असं बर्याचदा म्हटले ते. मी कित्येक मित्रांच्या लग्नाला गेलो नाही. पण त्यांच्या पत्रिकेची वाट बघतोय. कारण जायचं आहे. भेटायचं आहे. आता कुठल्यातरी महाविद्यालयात जॉब सुरु आहे त्यांचा.
काही लोकं शोधून सापडत नाहीत. हवा तसा सहवास नेहमीच मिळत नाही. पण काही लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या काहीतरी शिकवून जातात. मिश्रा सर आणि पवार सर दोघेही माझ्या पेक्षा वयाने मोठे. दोघांच वैशिष्ट म्हणजे त्यांनी कधी चाटुगिरी केली नाही. विद्यापीठात चाटुगिरी करण्याची आणि मिळेल ते पदरात पडून घेण्याची खूप मोठी परंपरा आहे. हे त्याला अपवाद. मोठे असून त्यांनी मला सांभाळून घेतलं. माझ्या चुका दुर्लक्ष केल्या. आपल्यासोबत झालेल्या चर्चेने मला स्वतःची प्रतिमा बदलता आली. आय मिस यु बोथ.

सचिन भगत

Thursday, January 18, 2018

अपघात...(काल्पनिक)

साधारण १०-१२ वर्षापूर्वीचा प्रसंग. नुकतीच मी पदवीला प्रवेश घेतला होता. महाविद्यालयीन जीवन म्हणजे एक वेगळा अनुभव. आपल्यावर फार काही बंधनं नसतातच. तासाला जा किंवा काहीही करा. कुणाला कशाचीच फिकीर नसते. कुणी काय करावं काही सांगत नाही. वाटेल तिकडे बोंबलत फिरायचं कॉलेज मध्ये. पार्किंग, कट्टा किंवा कॅन्टीन हे नेहमीचे अड्डे. चुकून कधीतरी पावलं ग्रंथालयाकडे पडायची ते हि परीक्षेच्या कालावधीत. तासाला जायचं म्हटल्यावर तर पावलं हि वळायची नाही. कॉलेज ला तर जायचं पण तासाला जायचं नाही. नाहीतरी भारतातली शिक्षण पद्धती अशी कि तुम्ही परीक्षेत काही पण लिहा गुण मिळतातच.
आमची पहिली पिढी कुठं शिक्षण घ्यायला लागली होती. त्याआधी शिक्षणाचा मागमूस हि नव्हता. मग ध्येय किंवा मार्गदर्शन हा काही प्रकार अस्तित्वात नव्हताच. आपण कशासाठी शिकतोय वगैरे प्रश्न कधी पडलेच नाहीत. शिकायचं ते फक्त काहीतरी नोकरी मिळेल त्यासाठी. आवड-निवड आम्हाला कधी कळली नाही. शहरात शिकण्याचे काही फायदे असतात. विविध ठिकाणाहून येणारे विद्यार्थी, त्यांची ध्येय, आणि बरंच काही समजायला लागते. वसतिगृहात राहत असल्याने पूर्ण स्वातंत्र्य. सगळं मस्त सुरु होतं. अडचणी खूप होत्या. पण कित्येकांच्या मदतीनं त्या दूर होत होत्या. घराबाहेरचं जग समजू लागलं होतं. व्यवहार कळायला लागला होता. सामाजीकरण सुरु होतं. कित्येक जण जोडली जात होती. हुशार, मध्यम, किंवा इतर काही कौशल्य असणारे असा सगळ्यांचा समूह म्हणजे वसतिगृह. मेसमधील सामुहिक भोजन आणि टीका टिप्पणी. सारं काही अवर्णनीय.
leaving hands साठी इमेज परिणाम

एकदा एका तासाला सहज गेलो आणि शेवटी जाऊन बसलो. तिथं मला ती भेटली आणि माझा दिनक्रम बदलून गेला. काय होतं तिच्यात काय ठाऊक पण मी मात्र तिच्या विचारात गढून गेलो.  नकळत पावलं वर्गाकडे वळायला लागली होती.  मर्यादित विद्यार्थी असल्याने ओळख व्हायला वेळ लागला नाही. जसा जसा संवाद वाढत होता तसा तसा मी तिच्यात गुंतत होतो. साधारण दोन-तीन वर्ष असंच सुरु राहिलं पण मनातलं ओठांवर आलं नाही.
पदवी संपल्यावर मला दुसरीकडे जावं लागलं आणि तो संवाद, त्या भेटीगाठी फक्त आठवणी होऊन गेल्या. तंत्रज्ञान नव्हतं त्यामुळे संपर्क संपला होता. आयुष्यात किती मुली आल्या पण तिला विसरता आलं नाही. तारुण्यात आल्यावरच ते पहिलं  प्रेम आणि शेवटचं. नंतर कुणी भावलीच नाही. प्रत्येक मुलीत मी तिलाच शोधत होतो. माझा शोध सुरूच राहिला आणि तिचा संसार मात्र कधीच सुरु झाला होता. माझ्यासमोर करिअर चा प्रश्न होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अठराविश्वे दारिद्र्यातून बाहेर पडायचं होतं. मधल्या काळात तिचा काहीच थांगपत्ता नव्हता. कुठे आहे वगैरे काहीच माहित नव्हतं. भरपूर प्रयत्न केला पण कित्येक वर्ष सापडलीच नाही. मी तिच्यात एवढा गुंतत गेलो कि काय सांगावं. तिचं आयुष्य सुरु झालं होतं. पण तरीही ती माझ्या आयुष्यात होती, माझ्या स्वप्नांमध्ये होती. तिचं अस्तित्व मला कायम जाणवत राहिलं. तिच्या आवडी-निवडी सारं काही तोंडपाठ होतं. पण जशी ती अचानक माझ्या आयुष्यात आली तशीच अचानक निघून गेली. तिचं लग्न झालं अशी बातमी कुणीतरी एकदा दिली होती. पाहिलेली स्वप्ने क्षणार्धात भंग पावली. सेट झाल्यावर तिला मागणी घालायचं ठरवलं होतं. पण माझं सेट होणं लांबत गेलं. तशीच तीही निघून गेली पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. 
मधल्या काळात कित्येक वर्ष निघून गेलीत. झालेल्या सगळ्या गोष्टी इतिहासजमा झाल्या होत्या.  एके दिवशीं एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हल्लो, मी बोलतेय. मला काही समजलं नाही. मी कोण, माझा प्रतिप्रश्न. अरे विसरलास का? मी म्हणजे...बोलतेय. मला धक्काच बसला. स्वत:ला सावरून मी म्हटलं, “बोल, कशी आहेस आणि कुठे होतीस इतके दिवस?”.  मजेत आहे, आज तुझा नंबर मिळाला आणि मग फोन केला.
बर्याच वर्षानंतर तिचा आणि माझा संवाद झाला. मिळालेली संधी सोडायची नव्हती.  बोलता-बोलता मी तिला सगळं सांगून टाकल. तंत्रज्ञानाने बरं केलंय. समोरासमोर जे सांगता येत नाही ते फोन च्या माध्यमातून किंवा मेसेज द्वारे काही सेकंदात पोचवता येते. कुणी कुणाच्याही प्रेमात पडू शकते किंवा कुणी कुणावरही प्रेम करू शकते. कुणीतरी आपल्यासाठी वेड होतं हे ऐकून फार चांगलं वाटलं. असं बरंच काही म्हटली ती. 
सांगायचं नं रे मग. धाडस हवं तेवढं. ती म्हणे. पण काही गोष्टी सांगायच्या नसतातच. त्या समजून घ्यायच्या असतात. तिला समजून ही तिने दुर्लक्ष केले. मला कळायचं रे ते पण मी तसा कधी विचार च नव्हता केला, ती म्हटली. मला तिला सांगता आलं नाही तेव्हा. कित्येक वर्षानंतर तिचा संपर्क झाला. एकदाचं सांगून टाकलं सार.  तीन वर्ष तिचा पाठलाग केला. पण घर काही सापडलं नाही तिचं. कित्येकदा पाठलाग केला असेन. सापडणार हि कसं. मी पायी आणि ती गाडीवर. मला सांगायची मी सांगितला असता तुला पत्ता, ती उत्तरली.  
मी फक्त बोलत गेलो आणि ती ऐकत होती.  माझं बोलण संपल तेव्हा ती पण निशब्द होती. फोन सुरु होता....पण शांतता होती. साधारण दोन मिनिटे ते तसच ...मी पुढाकार घेऊन म्हटलो...जाऊ दे तो भूतकाळ होता आणि आपला वर्तमान वेगळा आहे. आपले मार्ग वेगळे आहे. 
मी व्यक्त झालो त्यादिवशी पहिल्यांदा मनावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटले. नाहीतर आयुष्यभर खंत वाटत राहिली असती.  मी तिच्या प्रेमात पडणं हा एक अपघात होता. तिला ते नं सांगण हि चूक होती. मी आधीच व्यक्त व्हायला हवं होतं. माझ्या भावना तिच्यापर्यंत पोचवणं गरजेचं होतं. पण कुठलाही अपघात काहीतरी परिणाम करून जातो. तिने मला स्वप्ने दिलीत, आठवणी दिल्यात, प्रेम काय असते हे समजता आलं.  अजून काय हवंय. ते पुरेसं आहे.