Friday, January 19, 2018

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१५

व्यक्तिविशेष: (उत्तरार्ध)
जेवढेही लोकं आपल्या आयुष्यात येतात त्या प्रत्येकाशी आपली मैत्री होऊ शकत नाही किंवा त्यांची आपल्याशी होऊ शकत नाही. एकमेकांना जवळ आणणारे काही धागे असतात त्यामध्ये सारख्या सवयी असतील, किंवा समान आचार-विचार किंवा अजून काही.  माझे विभागातील मित्र कमी आणि इतर विभागांचेच जास्त. माझा संपर्क सगळा माझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या सोबत. त्यामुळे कदाचित भरपूर गोष्टी शिकता आल्या. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलता आला. समवयीन मित्र फार कमी. कित्येक जण आहेत ज्यांच्यावर लिखाण होऊ शकते. त्यामध्ये राहुल राजपूत, तानाजी काळे, बालाजी सूर्यवंशी, सुनील कनकटे ई. चा समावेश होतो.
३ श्रीमंत जाधव:
काय लिहावं या माणसाबद्दल. पुण्यात फक्त नेट-सेट च्या अभ्यास करण्यासाठी आणि  निवास ते हि सांगवीत. रोज विद्यापीठात ये-जा. मुळ औरंगाबाद चे. कायम चष्मा आणि शर्टिंग. ग्रंथालयामध्ये आमची ओळख झाली. नवीन जयकर ला बसायचो तेव्हा आम्ही. संपर्क वाढत गेला तसा धागा जोडला गेला. त्यांच्यासोबत खूप क्षण घालवलेत. पत्रकारिता करत असताना सोबत जाने-येणे असायचे रानडे ला. पत्रकारितेला प्रवेश मिळाला तेव्हा प्रवेशाची फी पाच हजार रुपये नव्हते माझ्याकडे. खिश्यात काहीच नव्हते. शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही दिवसभर अनिकेत कॅन्टीन ला बसून होतो. कित्येकांना तिथे बसूनच फोन केलेत. पण पैश्याची जुळवाजुळव काही होईना. सकाळी ८-९ वाजेपासून ते संध्याकाळी ५-६ वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. त्यांनी कित्येक फोन केलेत माझ्यासाठी. समस्या माझी होती पण ती त्यांची समजून त्यांनी प्रयत्न केलेत. काय-काय उद्योग नाही केले या माणसाने. पण नेट पास व्हायचे या उद्देशाने झपाटलेला. यश लांबत गेलं पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. आता एका महाविद्यालयात रुजू झालाय. वैवाहिक जीवन सुरु झालंय. विद्यापीठात असतांना माझ्या चुकीच्या गोष्टींच हि समर्थन करणारा माणूस. माझ्यावर या माणसाचा प्रचंड विश्वास माझ्यावर. स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवलेला माणूस. पण हार मानली नाही. लढत राहिला. आणि शेवटी हवं ते मिळालं. आता कित्येक दिवस झाले संपर्क नाही. श्रीभाई चं स्थान आमच्या आयुष्यात खूप मोठ आहे. जयकर, अनिकेत कॅन्टीन, सेवक चाळ चा  नेहमीचा प्रवास कसा विसरणार. मला पंढरपूर एका महाविद्यालयात मुलाखतीला जायचं होतं. यांची सोबत होती. बाईकने पुणे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुणे असा प्रवास केला. माझ्यासाठी सर्व सोडून ते कुठेही यायला तत्पर. “साले तू मुझे नेट पास नही होणे देगा” असं बर्याच वेळा ते गमतीने म्हणायचे. माझ्याकडे बाईक होती तेव्हा भरपूर भटकंती केली आम्ही. ते सांगवीत असताना मी कित्येक वेळा रात्री त्याना भेटायला जात होतो.
४ ज्ञानेश्वर चोथवे:
मुळचे लातूर कडचे. माझे सिनिअर. एम.ए. करत असताना कधी संबंध आला नाही. संपर्क आला तो एम. फिल करत असताना. त्यावेळेस ५ नंबरच्या वसतिगृहात राहत होतो. नेमकी पहिली भेट आठवत नाही. पण सेवक चाळीत जाने हा एक समान धागा आणि त्या धाग्याने आम्हाला एकत्र आणले. एलीस गार्डन च्या बाजूला सेवक चालीकडे जाणार्या रस्त्याच्या कडेने कित्येक वेळ घालवलाय. तिथेच आमच्या चर्चा चालायच्या. प्लेन हार्तेड (Plain Hearted) माणूस हा. त्याच्या मनामध्ये दुसर्याविषयी कधीच राग, चीड वगैरे काहीच नाही. तसंही माझं फार लोकांशी जुळत नाही पण जुळल्यानंतर ते कायम राहत.
आम्ही एकाच विषयाचे. कित्येकदा विषयावर चर्चा व्हायची. मते-मतांतरे असायची. त्यांच्यामुळेच नामदेव पवार, सुनील कनकटे, शिवाजी मोटेगावकर यांच्याशी संपर्क आला. सोबत भटकंती झाली आणि आठवणी निर्माण झाल्यात. अनिकेत कॅन्टीन च्या बाजूला किती घालवला असेल कुणास ठाऊक.  कधी कधी संपर्क होतो. संवाद कमी असेल पण नातं कायम आहे. आता खारघर ला आहेत कुठल्यातरी अभियांत्रिकी महाविद्यालयात.
५. दीपक जाधव: सोलापूरचा. राज्याशास्रात एम. ए. करत होता. माझं लिखाण त्याच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कमवा आणि शिका चे एका ग्रुप चे सदस्य. झाडताना आम्ही नेहमी चर्चा करत असायचो. असा कुठलाच विषय नाही कि ज्यावर चर्चा नाही. सोबतीला तानाजी, राहुल होते. आम्ही आलो एकत्र आलो म्हणजे एकच प्रश्न किती पतंग उडवले. रोज त्यावर चर्चा. समवयीन असल्याने बंधन नव्हती. तानाजी आणि राहुल खूप चांगले व्यक्ती. प्रत्येकाचा एक वेगळा संघर्ष.
दिपक आणि मी खूप वर्ष सोबत होतो होस्टेल ला. काय लिहू त्याच्याबद्दल. सोलापूर ते पुणे येण्याचा संघर्ष लिहू कि पत्रीकारिता करीत असताना सायकल ने रानडे ला जाण्याबद्दल लिहू , का त्याच्या प्रेमाबद्दल लिहू. आता पत्रकार आहे एका वृत्तपत्रात. खरं सांगतो, आणि खरं मांडतो. म्हणून मी पण त्याच्याबद्दल तोच मार्ग अवलंबतो.
त्याच असं कि हा माणूस म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्त्व. कॅन्टीन ला गेल्यानंतर टीटी एमएम मी याच्याकडून शिकलो पण त्याचा अवलंब फक्त त्याच्यासोबतच केला. रोज सकाळी उठला कि तो कुणाला तरी फोन करून गुड मोर्निंग म्हणायचा. मग आम्ही इतर सकाळी उठलो कि त्याच्या समोर एकमेकांना गुड मोर्निंग म्हणत होतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहिले कि आमचा हास्यकल्लोळ. हा एकमेव ज्याच्या लग्नाला आम्ही शिर्डी ला गेलो होतो बाईकने. अवर्निनीय प्रवास होता. मुकेश, मिश्रा सर आणि अजून इतर सोबत होतेच. पत्रीकारिता करत असताना हि तो जयकर ला येत होता.  
तो रात्री जॉब करून आला कि डायरी लिहायचा. आमच्या ते ध्यानात आलं आणि मग काय कधी याची डायरी वाचायला मिळते याची उत्सुकता होती. आणि एके दिवशी ती संधी मिळालीच. त्याची डायरी तो त्याच्या बॉग मध्ये विसरला. मग सामुहिक वाचन झालं त्या लिखाणाच. खूप काही लिहिलं होतं त्याने त्यात. छान लिहिलं होतं. वैयक्तिक होतं पण भावलं.  हा अजून एक ज्यावर मी प्रचंड टीका करत होतो. पण त्याचं मोठेपण असं कि त्याने ते कधीच मनाला लाऊन घेतलं नाही. कधी कधी फोन येत असतो त्याच्या.  मोठा पत्रकार आहे आता. सेट ची परीक्षा हि पास झालाय. आणि हो प्रेमविवाह च आहे.  त्याच्याकडे गाडी आल्यानंतर तो खूप जपत होता तिला. सहजासहजी कुणाला देत नव्हता. त्यात अयोग्य हि काही नाही. गरिबीतून पुढे आल्यावर किमत असते कमावलेल्या प्रत्येक गोष्टीची. जॉब , ती , जयकर आणि आमच्यासोबत अधिवास असा तो विभागाला गेला होता.
माझ्यावर टीका करणाऱ्यांची संख्या विद्यापीठात काही कमी नव्हती. पण जी लोकं माझ्या आयुष्यात आलीत त्यांनी पूर्णपणे स्वीकारलं. माझा एका इंग्रजी वाक्यावर प्रंचड विश्वास-If you want to avoid criticism, Say Nothing, Do nothing and Be Nothing. But I did something and it invited criticism. अनेक शुभचिंतक भेटलेत.
बालाजी सूर्यवंशी, हिंदी विभागाचा विद्यार्थी, ला कसं विसरणार. गेट वर चा तो अंडा राईस आणि आपले विद्यापीठ ग्राउंड वरील प्रताप कसे विसरणार.  कित्येक दा आपण एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटलाय. हा माणूस म्हणजे कवी. विद्यार्थी दशेतच कविता संग्रह प्रकाशित. हाल-अपेष्टा आपल्या कवितेतून मांडणारा. भाई आपली ए गांधीजी ची कविता अफलातून. एलीस गार्डन मधली आपली झालेली नजरानजर मी विसरलो नाही अजून.  सुरुवातीला फार काही सख्य नव्हतं आमच्यात. पण सान्निध्यात आल्यानंतर स्वभाव कळलेत. आपण जे ऐकतो किंवा इतर जे सांगतात यावर विश्वास ठेवायचा नाही. आपण अनुभवायचं आणि ठरवायचं हि शिकवण विद्यापिठात मिळाली. त्यामुळेच कित्येकांच्या मनात असलेले समज-गैरसमज कालांतराने दूर झालेत. समान ध्येयान पछाडलेले आम्ही.  
या लोकांशिवाय विद्यापीठातील आयुष्याची कल्पना होऊ शकत नाही. आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त झाला. कुणीच परिपूर्ण नाही. मी हि नाही. But the relations strengthen when you respect the differences. That is something most of us did. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात मग्न आहे. आता भलेही आनंदी आनंद आहे. पण भूतकाळातल्या दुखात –अडचणीत जी मजा होती, संघर्ष होता, तो काही औरच.  मुळात विद्यापीठात येणारे अनेक गरिबीची झळ पोचलेले असतात. त्या विद्यापीठात काय जादू आहे काय माहित. ते कधीच खाली परत पाठवत नाही. प्रत्येकजण काहीतरी सोबत घेऊन जातो. आठवणी तर विचारूच नका. कित्येक चांगले वाईट अनुभव इथेच मिळतात. विद्यापीठ म्हणजे एक खेडेगाव असं मी नेहमी म्हणत होतो. माझ्या संपर्कात आलेली कित्येक जण सक्रीय लोकं होते. काय नाही केलं. आंदोलनं तर नित्याचीच.
लिहिण्या आधी भरपूर गोष्टी डोक्यात होत्या. सगळं काही लिहिता आलं नाही. कोण कसं घेईल याचीही चिंता होती. सोशल नेटवर्किंग वर काय टाकावं आणि काय नाही याचे हि काय नियम असतात. त्याचं अनुकरण केलंय. म्हणून लेखाला व्यक्ती-चरित्र ऐवजी व्यक्तिविशेष असं म्हटलंय. बाकी आपण जाणकार आहातच. मी न लिहिलेल्या गोष्टी आपल्या डोक्यात आल्या म्हणजे लिखाण सफल झालं.  
भरपूर वर्ष गेलीत. या सार्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यावेळेस आम्ही स्पर्धक होतो. आता वेगळंच आयुष्य आहे. घडलेल्या घटनांबद्दल कुठलाही आकस नाही. किंबहुना आकर्षण आहे. आठवण आहे. मिस यु ऑल. मिस युवर कंपनी. मिस युवर को-ऑपरेशन. यु मेड माय लाइफ मोअर इंटरेस्टींग.


पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१४

व्यक्तिविशेष: (पूर्वार्ध)
पुणे विद्यापीठात शिकत असताना अनेक व्यक्तींशी संबंध आला. त्यातले काही कायम लक्षात राहिले कुठल्या ना कुठल्या कारणाने. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण. प्रत्येकाची आपली स्वतंत्र शैली होती, आचार-विचार वेगळे होते. एवढ्या सार्या भिन्नता असूनही कुठल्यातरी धाग्याने आम्ही बांधले गेलो. आठवणीत असलेल्या व्यक्तींबद्दल लिहावेसे वाटले. प्रत्येकाबद्दल लिखाण शक्य नाही किंवा माझ्या शब्दांच्या मर्यादा आहेत. त्यातील काही -
१ श्रीकांत मिश्रा:
हिंदी विभागाचे विद्यार्थी.कधीपण हातात दोन-तीन पुस्तके असायची. हिंदी मध्ये बोलायचे. मराठी समजते आणि बोलता पण येते. आमचा संवाद हिंदीत असायचा. त्यांच्यामुळे आम्हीही हिंदी मध्येच बोलायचो. उंच, तब्बेतीन हि सुदृढ पण साध-सरळ व्यक्तिमत्त्व. त्याचं चालणं म्हणजे पळण्यासारख. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आणि जयकर कडे प्रस्थान करणारं व्यक्तिमत्त्व. डोक्यावरच्या समोरच्या भागातील केसांची गळती स्पष्ट दिसत होती. उरलेल्या केसांची मात्र ते कुठलंतरी लाल रंगाचं तेल वापरायचे मालिश करताना. आमच्यासाठी तो थट्टेचा विषय. मुळचे उत्तरप्रदेशचे. मुंबईत आले आणि नन्तर इथे. प्रचंड संघर्षमय जीवन. पण त्याची वाच्यता नाही. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची वृत्ती. ओपन मधील विद्यार्थ्यांना नेट पास होणे मम्हणजे मोठी कसरत. अपयश येत असताना आम्ही त्याना पाहिलंय, अनुभवलंय. त्यांचा चेहरा सर्व काही सांगून जायचा. पण पुन्हा त्याच चिकाटीने ते अभ्यास करायचे, पेटून उठायचे. प्रंचंड ज्ञान असूनही यशाने त्यांना हुलकावणी दिली. पण माणूस डगमगला नाही. हाल-अपेष्टा सहन करून पुढे जात राहिला. असं खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून. सोशल नेटवर्किंग खूप. इतर विभागाचे विद्यार्थी, कॅन्टीन, मेसवाले हि त्याना ओळखायचे. जयकर ग्रंथालयात त्यांची अभ्यासाची जागा ठरलेली. कधी तरी नजर गेलीच तर सुवाच्च अक्षरातील त्यांच्या नोट्स लक्ष वेधून घ्यायच्या. सारं कसं शिस्तबद्ध. कायम टी-शर्ट वर असायचे. आमच्यासाठी ते मार्गदर्शक.
मी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्याशी संपर्क आला तो कमवा आणि शिका या योजने-अंतर्गत. या योजनेत अनेक विद्यार्थी सहभागी असतात. आर्थिक परिस्थिती बेताची असणार्यांसाठी पुण्यात जगण्याचा आणि शिकण्याचा एक चांगला मार्ग. भरपूर विद्यार्थी या योजनेत काम करत असल्याने ते वेगवेगळ्या ग्रुप विभागले जायचे. त्या ग्रुप चा एक लीडर अशी रचना. मी यांच्या ग्रुप मध्ये होतो. जेमतेम १५-२० विद्यार्थी आमच्या ग्रुपमध्ये. सकाळी सहा वाजता आमचं काम सुरु व्हायचं. काम काय तर फिजिक्स विभाग आणि जयकर वाचनालय स्वच्छ करायचं. हातात झाडू घेतला कि तो किमान अडीच तास तरी सुटायचा नाही. पुणे विद्यापीठात झाडांची संख्या खूप असल्याने पाला-पाचोळा खूप असायचा. सुरुवातीला झाडू हातात घ्यायची लाज वाटत होती परंतु ते नित्याचेच झाले होते. कित्येकवेळा आमच्या वर्गामधील मुलं-मुली हाय-बाय करायच्या. आपल्या हातात झाडू आणि ते कॅन्टीन ला वगैरे नाश्ता करायला जात असत. एक वेगळीच भावना असायची मनात. पण पर्याय नव्हता.
मिश्रा सर ग्रुप लीडर असूनही आमच्या सोबत काम करायचे. त्याना ते करण्यात आनंद वाटत होता. काळानुसार आमच्यात हि बदल झालेत. त्यांच्याकडे पाहून आम्हीही बिनधास्त झालो. तसं ग्रुप लीडर ने काम नाही केलं तरी काही हरकत नव्हती किंवा त्यांनी फक्त काम करून घ्यायचं असं होतं. पण याचं व्यक्तिमत्त्व वेगळ होतं. आमच्यात ते मिळून-मिसळून राहायचे. त्याचं वाचन अफाट. त्यांच्या जीवन जगण्याच्या ठराविक संकल्पना. सत्याचे पुरस्कर्ते. परखड व्यक्तिमत्त्व. हिंदी विभाग म्हणजे त्यांच्या एकतेसाठी ओळखला जायचा. जेवताना सगळे एकत्र. कित्येकवेळा आम्ही सोबत रूमला खिचडी करत असायचो. जेवतानाची ती मजा काही औरच. वेगवेगळ्या विषयांवरून मी त्याना चिडवत होतो. मुलींसोबत दिसले कि रात्री रूम ला टिंगल ठरलेली असायची.
एम.फिल ला असताना आम्ही भरपूर दिवस एकाच रुममध्ये. अनुभवांची देवाण घेवाण होत राहिली. एकमेकांचा जीवन प्रवास ठाऊक होता. खेचा-खेची कायम चालायची. मी टीका करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. ते सर्व त्यांनी कधी मनाला लाऊन घेतलं नाही किंवा तसं झालं असले तरी कधी बोलून दाखवले नाही. एकदा त्यांच्या मोबाईल मधले मेसेज मी त्याना न कळत वाचून काढलेत. त्याना कळल्यावर प्रंचड राग आला होता. नंतर मात्र सुरळीत सुरु राहिलं. त्याचं नियोजन ठरलेलं असायचं. ठराविक पैश्यांमध्ये महिना निघून जायचा. आमचं उलट होतं. पैसे आले कि आमची उधळपट्टी सुरु. त्यांनी कित्येक वेळा उपदेशाचे डोस पाजले असतील पण आमच्यावर कधी फरक पडला नाही किंवा समजून आम्ही पाडून घेतला नाही. आम्ही त्याना बडे भाई म्हणत होतो. कित्येक आंदोलनामध्ये सहभाग. स्पष्टवक्ता असल्याने कायम विद्यापीठ प्रशासन विरोधी. त्यांच्या विभागात त्याच्या ज्ञानाबद्दल तोड नव्हती. आपल्या विषयात पारंगत. चर्चा-टिंगल-टवाळी नेहमीची असायची. आम्ही सगळे नेट -सेट चा अभ्यास करत होतो. कित्येक वेळा अपयश आलं असेल पण जिद्द मात्र होती. निकालाची चिंता न करता त्यांचा अभ्यास सुरु असायचा. जयकर ला कधी दांडी मारली नाही. कालांतराने आम्ही सगळे नेट पास झालो. प्रत्येकाची जगण्याची दिशा बदलली आहे. ते पुण्यात आहेत. जॉब सुरु आहे. अधून-मधून संपर्क असतो. विद्यापीठात श्रीकांत मिश्रा ये नाम हि काफी है. त्यांच्या लग्नाला जाता आलं नाही उत्तरप्रदेशात. त्यांनी खूप शिव्या हासडल्या मला. खंत आहे नक्कीच. सर आपने हि हमे सत्य के मार्ग पर चलने को कहा और जो तत्त्व आपने सिखाये वो आज भी याद है.

2 नामदेव पवार:
नामदेव पवार हे दुसरं व्यक्तिमत्त्व. मुळचे लातूरकडचे. आमचा संपर्क आला तो पाच नंबरच्या होस्टेलला. ओळख होतीच. ओळख म्हटल्यापेक्षा विरोध असणारं नातं. त्याला कारणेही होतीच. एकमेकाला समजायला बराच वेळ गेला. पवार सर म्हटलं कि कुठल्याही विषयवार पोट-तिडकीने बोलणारा माणूस. अभ्यास चांगला-विषयाचं ज्ञान चांगलं पण नेट परीक्षेने कित्येक वेळा हूल दिली. नेहमी तिसर्या पेपर मध्ये ८०-८८ च्या दरम्यान गुण. पास व्हायाल नव्वद ची आवश्यकता. अपयश कसं पचवायचे हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. ती वेदना कुणीच समजू शकत नाही. तिची तीव्रता हि शब्दांच्या पलीकडे. पण या माणसानं जिद्द सोडली नाही यश मिळेपर्यंत. राज्यशास्त्र विभागाचं एक वैशिष्ट असायचं ते म्हणजे जो कोणी त्या विभागात प्रवेश घ्यायचा तो काही दिवसात स्वतःला राजकीय तज्ञ समजत होता. जसं-काही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयाची जाण फक्त त्यांच्याकडे. त्यामुळे कित्येकांचा पाहण्याचा दृष्टीकोन तसाच असायचा. पवार सर मात्र त्याला अपवाद ठरले. मी त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर खर्या अर्थान त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची ओळख झाली. त्याना कित्येक विषयांची समज होती. आपल्या विषयात ते पारंगत होते. त्यांच्या बोलण्यातून ते नेहमी जाणवत राहायचं. वेळप्रसंगी ते विभागाविरोधात हि जायला घाबरले नाहीत. इतरांसारखे लांगुल-चालन हि त्यांनी केले नाही. स्वतःची प्रतिमा नेहमी कायम ठेवली. आंदोलनामध्ये हि त्यांचा सहभाग असायचा. त्याआधी आमच्यात सौदाहार्याचे नाते नव्हते. एकदा काय झालं कि राज्यशास्त्राच्या एका मुलासोबत आमच्या विभागातील एक मुलगी सोबत फिरत होती. मी पुढाकार घेऊन त्या मुलीला समजावलं. अर्थातच इतर अजून हि सोबत होते. पण हे सगळं राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना खटकलं. तिथूनच तो विरोध सुरु झाला ते एम.ए. होईपर्यंत. माझे एक सिनिअर ज्ञानेश्वर चोथवे यांच्या ग्रुप चे. त्यांच्या माध्यमातून माझा पवार सरांशी संबध आला. विचारांची देवाण-घेवाण सुरु झाली. समज- गैरसमज गळून पडले होते. कित्येकवेळा आम्ही सर्वजन गडांची किंवा पुण्याच्या आसपास भटकंती केली. ते क्षण खरंच अनमोल आहेत. आणि तोरणा गडाकडे जाताना झालेला अपघात कसा विसरणार. आम्ही दोघेही पडलो होतो. ते चालक आणि मी मागे बसलेलो. गाडीचं थोडं नुकसान झालं होतं पण जीवनात मानसं महत्त्वाची आहेत. वस्तूंमध्ये माझा जीव कधीच नव्हता आणि आजही नाही. पवार सरांनी नंतर भरपाई म्हणून पैसेही दिलेत. ते मला नको होते. पण मी नाही म्हणू शकलो नाही त्याची खंत आहे. जयकर मधील त्यांच्याबद्दल च्या खूप आठवणी लिहिता येतील. पण त्या इथे अनावश्यक आहेत.
मी पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर अधून-मधून संपर्क झाला. त्याचं व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहिलं. सचिन तू एक पुस्तक लिही असं बर्याचदा म्हटले ते. मी कित्येक मित्रांच्या लग्नाला गेलो नाही. पण त्यांच्या पत्रिकेची वाट बघतोय. कारण जायचं आहे. भेटायचं आहे. आता कुठल्यातरी महाविद्यालयात जॉब सुरु आहे त्यांचा.
काही लोकं शोधून सापडत नाहीत. हवा तसा सहवास नेहमीच मिळत नाही. पण काही लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या काहीतरी शिकवून जातात. मिश्रा सर आणि पवार सर दोघेही माझ्या पेक्षा वयाने मोठे. दोघांच वैशिष्ट म्हणजे त्यांनी कधी चाटुगिरी केली नाही. विद्यापीठात चाटुगिरी करण्याची आणि मिळेल ते पदरात पडून घेण्याची खूप मोठी परंपरा आहे. हे त्याला अपवाद. मोठे असून त्यांनी मला सांभाळून घेतलं. माझ्या चुका दुर्लक्ष केल्या. आपल्यासोबत झालेल्या चर्चेने मला स्वतःची प्रतिमा बदलता आली. आय मिस यु बोथ.

सचिन भगत