Thursday, January 18, 2018

अपघात...(काल्पनिक)

साधारण १०-१२ वर्षापूर्वीचा प्रसंग. नुकतीच मी पदवीला प्रवेश घेतला होता. महाविद्यालयीन जीवन म्हणजे एक वेगळा अनुभव. आपल्यावर फार काही बंधनं नसतातच. तासाला जा किंवा काहीही करा. कुणाला कशाचीच फिकीर नसते. कुणी काय करावं काही सांगत नाही. वाटेल तिकडे बोंबलत फिरायचं कॉलेज मध्ये. पार्किंग, कट्टा किंवा कॅन्टीन हे नेहमीचे अड्डे. चुकून कधीतरी पावलं ग्रंथालयाकडे पडायची ते हि परीक्षेच्या कालावधीत. तासाला जायचं म्हटल्यावर तर पावलं हि वळायची नाही. कॉलेज ला तर जायचं पण तासाला जायचं नाही. नाहीतरी भारतातली शिक्षण पद्धती अशी कि तुम्ही परीक्षेत काही पण लिहा गुण मिळतातच.
आमची पहिली पिढी कुठं शिक्षण घ्यायला लागली होती. त्याआधी शिक्षणाचा मागमूस हि नव्हता. मग ध्येय किंवा मार्गदर्शन हा काही प्रकार अस्तित्वात नव्हताच. आपण कशासाठी शिकतोय वगैरे प्रश्न कधी पडलेच नाहीत. शिकायचं ते फक्त काहीतरी नोकरी मिळेल त्यासाठी. आवड-निवड आम्हाला कधी कळली नाही. शहरात शिकण्याचे काही फायदे असतात. विविध ठिकाणाहून येणारे विद्यार्थी, त्यांची ध्येय, आणि बरंच काही समजायला लागते. वसतिगृहात राहत असल्याने पूर्ण स्वातंत्र्य. सगळं मस्त सुरु होतं. अडचणी खूप होत्या. पण कित्येकांच्या मदतीनं त्या दूर होत होत्या. घराबाहेरचं जग समजू लागलं होतं. व्यवहार कळायला लागला होता. सामाजीकरण सुरु होतं. कित्येक जण जोडली जात होती. हुशार, मध्यम, किंवा इतर काही कौशल्य असणारे असा सगळ्यांचा समूह म्हणजे वसतिगृह. मेसमधील सामुहिक भोजन आणि टीका टिप्पणी. सारं काही अवर्णनीय.
leaving hands साठी इमेज परिणाम

एकदा एका तासाला सहज गेलो आणि शेवटी जाऊन बसलो. तिथं मला ती भेटली आणि माझा दिनक्रम बदलून गेला. काय होतं तिच्यात काय ठाऊक पण मी मात्र तिच्या विचारात गढून गेलो.  नकळत पावलं वर्गाकडे वळायला लागली होती.  मर्यादित विद्यार्थी असल्याने ओळख व्हायला वेळ लागला नाही. जसा जसा संवाद वाढत होता तसा तसा मी तिच्यात गुंतत होतो. साधारण दोन-तीन वर्ष असंच सुरु राहिलं पण मनातलं ओठांवर आलं नाही.
पदवी संपल्यावर मला दुसरीकडे जावं लागलं आणि तो संवाद, त्या भेटीगाठी फक्त आठवणी होऊन गेल्या. तंत्रज्ञान नव्हतं त्यामुळे संपर्क संपला होता. आयुष्यात किती मुली आल्या पण तिला विसरता आलं नाही. तारुण्यात आल्यावरच ते पहिलं  प्रेम आणि शेवटचं. नंतर कुणी भावलीच नाही. प्रत्येक मुलीत मी तिलाच शोधत होतो. माझा शोध सुरूच राहिला आणि तिचा संसार मात्र कधीच सुरु झाला होता. माझ्यासमोर करिअर चा प्रश्न होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अठराविश्वे दारिद्र्यातून बाहेर पडायचं होतं. मधल्या काळात तिचा काहीच थांगपत्ता नव्हता. कुठे आहे वगैरे काहीच माहित नव्हतं. भरपूर प्रयत्न केला पण कित्येक वर्ष सापडलीच नाही. मी तिच्यात एवढा गुंतत गेलो कि काय सांगावं. तिचं आयुष्य सुरु झालं होतं. पण तरीही ती माझ्या आयुष्यात होती, माझ्या स्वप्नांमध्ये होती. तिचं अस्तित्व मला कायम जाणवत राहिलं. तिच्या आवडी-निवडी सारं काही तोंडपाठ होतं. पण जशी ती अचानक माझ्या आयुष्यात आली तशीच अचानक निघून गेली. तिचं लग्न झालं अशी बातमी कुणीतरी एकदा दिली होती. पाहिलेली स्वप्ने क्षणार्धात भंग पावली. सेट झाल्यावर तिला मागणी घालायचं ठरवलं होतं. पण माझं सेट होणं लांबत गेलं. तशीच तीही निघून गेली पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. 
मधल्या काळात कित्येक वर्ष निघून गेलीत. झालेल्या सगळ्या गोष्टी इतिहासजमा झाल्या होत्या.  एके दिवशीं एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हल्लो, मी बोलतेय. मला काही समजलं नाही. मी कोण, माझा प्रतिप्रश्न. अरे विसरलास का? मी म्हणजे...बोलतेय. मला धक्काच बसला. स्वत:ला सावरून मी म्हटलं, “बोल, कशी आहेस आणि कुठे होतीस इतके दिवस?”.  मजेत आहे, आज तुझा नंबर मिळाला आणि मग फोन केला.
बर्याच वर्षानंतर तिचा आणि माझा संवाद झाला. मिळालेली संधी सोडायची नव्हती.  बोलता-बोलता मी तिला सगळं सांगून टाकल. तंत्रज्ञानाने बरं केलंय. समोरासमोर जे सांगता येत नाही ते फोन च्या माध्यमातून किंवा मेसेज द्वारे काही सेकंदात पोचवता येते. कुणी कुणाच्याही प्रेमात पडू शकते किंवा कुणी कुणावरही प्रेम करू शकते. कुणीतरी आपल्यासाठी वेड होतं हे ऐकून फार चांगलं वाटलं. असं बरंच काही म्हटली ती. 
सांगायचं नं रे मग. धाडस हवं तेवढं. ती म्हणे. पण काही गोष्टी सांगायच्या नसतातच. त्या समजून घ्यायच्या असतात. तिला समजून ही तिने दुर्लक्ष केले. मला कळायचं रे ते पण मी तसा कधी विचार च नव्हता केला, ती म्हटली. मला तिला सांगता आलं नाही तेव्हा. कित्येक वर्षानंतर तिचा संपर्क झाला. एकदाचं सांगून टाकलं सार.  तीन वर्ष तिचा पाठलाग केला. पण घर काही सापडलं नाही तिचं. कित्येकदा पाठलाग केला असेन. सापडणार हि कसं. मी पायी आणि ती गाडीवर. मला सांगायची मी सांगितला असता तुला पत्ता, ती उत्तरली.  
मी फक्त बोलत गेलो आणि ती ऐकत होती.  माझं बोलण संपल तेव्हा ती पण निशब्द होती. फोन सुरु होता....पण शांतता होती. साधारण दोन मिनिटे ते तसच ...मी पुढाकार घेऊन म्हटलो...जाऊ दे तो भूतकाळ होता आणि आपला वर्तमान वेगळा आहे. आपले मार्ग वेगळे आहे. 
मी व्यक्त झालो त्यादिवशी पहिल्यांदा मनावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटले. नाहीतर आयुष्यभर खंत वाटत राहिली असती.  मी तिच्या प्रेमात पडणं हा एक अपघात होता. तिला ते नं सांगण हि चूक होती. मी आधीच व्यक्त व्हायला हवं होतं. माझ्या भावना तिच्यापर्यंत पोचवणं गरजेचं होतं. पण कुठलाही अपघात काहीतरी परिणाम करून जातो. तिने मला स्वप्ने दिलीत, आठवणी दिल्यात, प्रेम काय असते हे समजता आलं.  अजून काय हवंय. ते पुरेसं आहे.