पुणे विद्यापीठात नवीन होतो तेव्हा. जयकर ला अभ्यासाला जायचं नेहमीचं झालं. मी कमवा आणि शिका योजनेत असताना सकाळी जयकर ला जाता येत नव्हतं. सकाळी काम करून मग सगळं सुरु व्हायचं. मला काम मिळालं ते फिजिक्स विभागात. काम काय तर तो परिसर स्वच्छ करायचा. सकाळी काम करत असताना कित्येक वर्ग मित्र मैत्रिणी हाय बाय करायच्या. सुरुवातीला खूप लाज वाटत होती झाडू मारायची. नंतर ते अंगवळणी पडलं. कमवा आणि शिका एक आदर्श आहे पुणे विद्यापीठात. लोकांचा दृष्टीकोन पण चांगला होता. त्यावेळेस चे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक यांनी हि योजना एका चांगल्या पातळीवर नेऊन ठेवली. काम न करता पैसे घेणारे विद्यार्थी हि पाहिलेत. चाटुगिरी करणारे तर फार पुढे गेलेत.
त्याचं झालं असं कि ६ ते ९ काम करून नंतर जयकर ला जाने सुरु झाले. तरी सकाळी जागा सांभाळून ठेवत होतो. आमचा बराच ग्रुप झाला होता. दिवसामागून दिवस जात राहिलेत. जयकर मध्ये माझी एक मैत्रीण नेहमी माझ्या सोबत असायची. वयाचा दोष म्हणा कि अजून काही. मला ती आवडायला लागली. ती जवळ असली कि कधी अभ्यासात मन लागलं नाही. मला कळत होतं कि मी ईथे कशासाठी आलो आहे पण मन मानत नव्हतं. मग एकदा ठरवलं कि तिला सांगून टाकायचं. दोन-तीन महिने झाले होते फक्त मला विद्यापीठात जाऊन. एके दिवशी दुपारी मी एका कागदावर लिहील कि तू मला फार आवडतेस...लग्न करशील का. तिच्या जवळ जाऊन तिला तो कागद दिला. अचानक असा कागद दिल्याने तिला आश्चर्य वाटलं. काय आहे म्हटली. मी म्हटलं तू वाच नि सांग मला. मी तेव्हा वरती बसत होतो. थोड्या वेळाने मला तिने बोलावलं नि चहाला जाऊ म्हटली. आतून मी घाबरलो होतो. तिच्या नजरेला नजर काही मला देतं येईना. मग तीच म्हटली कि मी विचार केला पण उत्तर देऊ शकत नाही. तिने ना होकार दिला ना नकार. बघू म्हटली पुढे. पुढे काही झालंच नाही. ती मला आवडते असं म्हणता म्हणता मला अश्या कित्येक आवडल्या. मी पण तिला कधी काय विचारलं नाही.
त्यानंतर मात्र आम्ही खूप चांगले मित्र झालो. तिनं प्रत्येक वेळी मला मदत केली. मी वाईट हि खूप वागलो तिच्याशी. आता तिचा नि माझा संपर्क नाही. प्रत्येक अडचणीत तिने मला साथ दिली. आम्ही दोघे भिन्न आर्थिक परिस्थितीचे. ती चांगल्या श्रीमंत घराची तर माझी दोन वेळेस च्या जेवणाची समस्या. आयुष्यात कुणाला तरी पहिल्यांदा प्रपोज केलं ते पण जयकर ग्रंथालयात. जिथं सगळे अभ्यासाला जातात. पण हा दुसराच अभ्यास झाला. हे मीच केलं असं नाही. जयकर मध्येच कित्येक प्रेम प्रकरणं सुरु झालेली आम्ही पाहिली. किती काळापर्यंत टिकली तो भाग अलाहिदा. पण मला जयकर कधीच पावलं नाही. तिथं बसून ना नेट पास झालो ना इतर काही झालं. आता माझं तिच्यावर खूप प्रेम होतं असं मी म्हणणार नाही कारण नंतर मला कित्येक मुली आवडल्या नि कित्येक वेळी प्रेमात पडलो. Love does not happen once in life. It happens many times in life. माझं एक पक्क मत आहे....प्रेम वगैरे काही नसते ...असते ते फक्त शारीरिक आकर्षण....प्रेम हा शब्द फक्त एक mask आहे.....LOVE IS ONLY A MASK…..IT ALWAYS ASKS FOR THE UNION OF TWO BODIES….LOVE DOES NOT EXIST IN SUCH CASES (EXCEPTION...PARENTS AND CHILDREN).
एकदा आमच्या विभागातल्या विद्यार्थ्यांनी टी शर्ट बनवायचे ठरवले. मग त्यासाठी त्यांना एक चांगलं वाक्य हवं होतं आम्हाला. खूप विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वाक्य सांगितली पण आम्हाला ती काही आवडली नाही. शेवटी मी एक वाक्य सांगितलं ...LIBRARY IS ALSO THE PLACE WHERE LOVE BEGINS. माझ्या काही मित्रांनी सपोर्ट केलं मला. पण मुली ऐकायला तयार नव्हत्या. माझ्या या वाक्यावर खूप वाद-विवाद झालेत. हे सुरु असताना माझा एक मित्र मुलींना उद्देशून म्हटला कि तुम्ही असे कपडे घालतात कि आम्हाला तुमच्याकडे पाहण्याची पण लाज वाटते मग या वाक्याने काय होणार आहे. बस मग काय. भन्नाट शिव्या दिल्या त्यांनी आम्हाला. ते वाक्य मी कुठंतरी वाचलेलं होतं. म्हणून सांगितलं. पण त्यावर वाद होईल असं वाटलं नव्हतं. काही मुलींनी तर आमच्याशी बोलणेच सोडून दिलं होतं काही दिवस.
वाद आणि मी एक घट्ट समीकरण. विभागात प्रवेश घेतल्यापासून तर विद्यापीठ सोडेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकरणात मी अडकत राहिलो. काही मित्रांनी मला खूप साथ दिली त्यामुळे कशातच अडकलो नाही. मला नको तिथं हस्तक्षेप करण्याचा फार हौस. यातूनच एकदा राज्यशास्राच्या विद्यार्थ्यांशी वाद ओढवून घेतला. त्यातले कित्येक जन नंतर माझे खूप चांगले मित्र झालेत. झालं गेलं आम्ही विसरून गेलो. तेव्हा त्यांनी म्हणे मला मारायचं ठरवलं होतं. पण ते काही माझापर्यंत आले नाहीत. ती माझी आणखी एक चूक. मला त्या प्रकरणात पडायची काही गरज नव्हती. पण रहेमानी किडा कुठं शांत बसू देतो. ते असं होतं कि आमची एक जुनिअर मुलगी राज्यशास्राच्या एका मुलाबरोबर फिरायला लागली होती आणि तेच मला खटकलं होतं. मी त्यात पुढाकार घेतला आणि आम्ही काही मित्रांनी तिला ते समजावून सांगितलं. तिने त्याच्यासोबत चे संबंध तोडलेत. (काय होतं त्याचं याबद्दल मी अजूनही अनभिज्ञ आहे). पुढे माझा एक मित्र तिच्या प्रेमात पडला. तिनेही होकार दिला. त्याचं सगळं व्यवस्थित सुरु आहे. या प्रकरणावरून माझ्यावर भरपूर टीका झाली. हेल्थ सेंटर च्या प्रकरनासारखा इथेही माझा काही संबंध नव्हता. पण अडकलो मीच. लोकांनी खूप तोंडसुख घेतलं माझ्यावर.
मी पुण्यात आयुष्य घडवायला गेलो होतो. पण नकळत मी या सगळ्या प्रकरणात गुंतत गेलो. विद्यापीठ एक मायाजाल आहे. तिथे आपलं जीवनच बदलून जाते. मी झपाट्याने बदलत गेलो. मला त्या मार्गाने जायचं नव्हतं. ते माझं उद्दिष्ट हि नव्हतं. माझा खूप वेळ वाया गेला यात. त्याची किंमत हि मी चुकवली. त्या आधी माझं जीवन मर्यादित होतं. सहसा कुठल्याही भानगडीत मी पडत नव्हतो. मी स्वप्नांचा पाठलाग करत होतो. स्वप्नांवर जगण्यात मला आनंद वाटत होता. कित्येक वाईट प्रसंग मी फक्त आशेवर निभावून नेलेत. पण काय झालं कुणास ठाऊक. पुण्यात गेल्यानंतर माझी स्वप्नेच हरवली. कधी हरवली मला कधी कळाल नाही. वर्तमान खराब होता. तो बदलायचा म्हणून मी पुण्यात गेलो. कदाचित या नको त्या प्रकरणांमध्ये गुंतलो नसतो तर लवकर यश मिळालं असतं. पण आयुष्यात जर तर ला काही महत्त्व नाही. म्हणून जे झालं ते योग्य होत असं म्हणून मी पुढे चालत राहतो. कारण जीवनात एकदा केलेली चूक दुरुस्त करता येत नाही. ती फक्त टाळता येते. आणि आज फक्त चुका टाळण्याचा प्रयत्न करतोय.