आजकाल फक्त प्रश्न पडतात. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामागे
धावावं तर नवीन प्रश्न समोर आ वासून उभे असतात. उत्तर कशाचच मिळत नाही. आसपास काय चाललं
आहे, काय नाही याचा वेध घेता घेता स्वतःच्या आयुष्यात काय चाललं आहे याचं भान राहत
नाही. सगळं काही सुरळीत असल्याचा भास. पण तो फक्त भास. त्याला काही तर्क नसतो.
एखादी गोष्ट भंडावून सोडते. पण ते सोडून पुढे निघून जायचं. त्या गोष्टीच्या नादाला
लागायचं नाही. आजचा दिवस गेला ना. तसा उद्याचा पण जाईल. फार संकल्प करायचे नाहीत.
संकल्प सिद्धीस जात नाहीत. अपेक्षित होत नाही. हा पूर्वानुभव. मग कशाला हवेत नव-नवीन
संकल्प. जे समोर आलं त्याला सामोरे जायचं. सर्व काही असून नसल्याचा भास आणि नसून
असल्याचा हेच ते चक्र. पसारा वाढवत जातो आपण.हाव...दुसरं काय? पण हिच हाव नवीन
प्रश्न घेऊन येते…
व. पु. काळे यांनी वपुर्झा मध्ये म्हटलंय:
“प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणार्याला
गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...”
आयुष्यातला प्रत्येक
निर्णयाची एक किंमत असते. Each decision in
life has its own price tag. ती
किंमत आपल्याला कधीच माहित नसते. ती फक्त आपण चुकती करतो. कळत ही नाही कशी. आपण
सतत धावत असतो. हे झालं की ते. पसारा वाढला की प्रश्न वाढत जातात. ते सोडवता
सोडवता नाकी नऊ. जगण्याच्या अनेक संकल्पना
असतात. प्रत्येकाच्या वेगळ्या. माणूस हा मुळातच बुद्धिवादी प्राणी. म्हणून तो
इतरांपेक्षा वेगळा. तो सतत नाविन्याच्या शोधात असतो…
कित्येकदा ओळखीचे चेहरे
अनोळखी वाटायला लागतात. अंगवळणी पडलेल्या पाउल वाटा ही दिसेनाश्या होतात. मी कोण, मी
कोण आक्रोश सुरु होतो. वाटेतले खाच-खळगे, अगणित समस्या, पण मी थांबत नाही. पायाला कायम
भिंगरी. जशी पायाला तशी विचारांना. unstoppable…
गर्दी. जिकडे तिकडे फक्त
गर्दी. आसपास माणसांची गर्दी. डोक्यात प्रश्नांची गर्दी. या गर्दीत आपण कधी हरवून जातो
समजत नाही…
खिशातलं पाकीट जाड झालंय.
सहजच पाकीट उघडलं तर जुन्या-पुराण्या किराण्याची मालाची यादी, बिल, एटीएम च्या
पावत्या, थोडे-बहुत पैसे यापलीकडे काहीच नाही. पाकिटात पण गर्दी झाली होती
अनावश्यक गोष्टींची. जुन्या-पुराण्या पावत्या-बिल. एक-एक करून फेकून दिल. आता
पाकीट हलकं झालं होतं. शेवटी एटीएम, क्रेडीट कार्ड तेवढं उरलं फक्त. का सांभाळून
ठेवलं एवढं सारं माहित नाही. उपयोगाचं नसून सुद्धा. हेच ओझं घेऊन आपला प्रवास सुरु
राहतो…
कॉलेज च्या वेळेला कॉलेज ला
गेलो. मी आल्याची सही केली ती सही माझ्यापेक्षा महत्त्वाची आहे. पायर्या चढून कॅबीन
उघडून मध्ये शिरलो. दरवाजा बंद केला. हिवाळ्यात डास खूप असतात. त्यामुळं दरवाजा तसा
नेहमी बंदच. टेबल वर लक्ष गेलं तर टेबल
पूर्ण व्यापलेला. एक कंप्युटर, मोउस, सीपीयू,
laptop आणि चार्जर, हार्ड डिस्क, यूपीएस, दोन-तीन
नेट केबल,तीन-चार पेन ड्राईव्ह, मोबाईलचं चार्जर, हेडफोन, डायरी, चार-पाच पुस्तकं,
दोन-चार पेन, डस्टर, चार-पाच खडू, स्टेपलर, पंचिंग मशिन, इपीएबिएकस extension फोन, पाण्याची बॉटल एवढं
सारं. जशी डोक्यात विचारांची गर्दी झालीय तशीच टेबल वर पण. किती सार्या अनावश्यक
गोष्टींनी गर्दी केलीय डोक्यात. म्हटलं तर डस्ट बिन. पण ती डस्ट बिन कधी रिकामी
केली जात नाही. काय होणार. दुर्गंध. आपल्या आचारात-विचारात सगळीकडे…
काही कमी करता येईल का
असा विचार करता करता खुर्चीत बुड टेकवलं तेवढ्यात फोन वाजला. आणि हे बाजूला
राहिलं, सुरु झाली दुनियादारी. जगण्यासाठीचा संघर्ष. कधीही न संपणारा. मला काय
वाटतंय, काय हवंय त्यापेक्षा लोकांना काय वाटते, काय हवंय ते पूर्ण करण्याचा
प्रवास. या प्रवासात मी विसरलोय स्वतःला. जे लोकं दाखवतात तेच पाहतो. त्यांना जे
आवडते तेच बोलतो, तेच करतो. माझ्या विचारांना, कल्पनांना तिलांजली दिलीय…
क्षणभंगुर आहे सगळं. या
जगात शाश्वत असं काहीच नाही. मग तरी पकडून ठेवण्याचा का अट्टहास?
गर्दीची सवय झालीय. पण या
गर्दीत मी कुठंय? माहित नाही. या गर्दीचा एक भाग न दिसणारा.
“समय बलवान होता है. और
ये समय ही तो है जो भी चलने को मजबूर करता है. आज नाही तो कल इसी चक्र मे हम फसे हुये है.”
आजकाल फोन वाजत नाही.
वाजलाच तर आपल्यासाठी नाही एवढं मात्र नक्की. प्रत्येकाचा फोन करण्याचा एक अजेंडा
असतो. काहीतरी काम असते. ते संभाषण म्हणजे बिजनेस. कित्येक फोन मी उचलत नाही. त्या
truecaller ने बरंच केलंय. नंबर सेव्ह
नसला तरी कुणाचा आहे ते समजते. अचानक आलेले फोन मी उचलत नाही. माझ्या आयुष्यात काय
चाललंय वगैरे कुणाला काही देणं-घेणं नाही. तरी कुणाला काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण
करण्याचा प्रयत्न. कामानिमित्त संभाषण. ज्या संभाषणाचा हेतू मुळात व्यापार आहे त्यात आत्मीयता
संबंध आलेत कुठून? मग न उचललेला बरा. काम असलं म्हणजेच फोन. हे मनाला फार पटत नाही.
काय करणार?...
कुठंतरी एक वाक्य वाचनात आलेलं...लेखकाचं
नाव आठवत नाही: “असूनही जी दिसत नाही,पण मनाला जाणवते,ती भावना.जे नजरेला दिसतं,तो व्यवहार.” व्यवहार...म्हणजे यश आलं की पैसा येतो आणि पैसा आला की आसपास गर्दी होत जाते. नको
नको ते, दूर-दूरचे संबध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात काहीपण करून. कधी वाहवा...खुशमस्करी
करून. आपल्याला ही ते आवडतं कारण आपला शब्द प्रमाण...जे बोलतो ते सत्य. या प्रक्रियेत
आपण स्वतःला विसरून जातो. अस्तित्वात नसलेली प्रतिमा तयार करून घेतो स्वतःची. सत्य
कधी समोर येतच नाही. आसपास ची गर्दी तसं होऊ देत नाही. कारण प्रत्येकाचा एक अजेंडा.
साला हा व्यवहार कधी समजला नाही. म्हणून फसगत झालीय…
अनेकदा शांततेच्या
अपेक्षेने माणूस घरी जातो. घरी गेल्यावर मात्र तुम्हाला काही समजत नाही, हे करा, ते करा, हे असं , ते तसं, हे आणावं लागेल वगैरे अनेक सूचना असतात. बरं...ठीक
आहे एवढा काय तो आपला प्रतिसाद. तो चहा
घश्याखाली उतरत नाही, झिंग येत नाही तोवर पुढचा प्रवास ठरलेला असतो.
आणि घाई-घाईत कपडे बदलून पुन्हा आपण धावायला सुरुवात करतो. हरवलेल्यांना शोधणं सोपं नक्कीच नाही…
सोनेरी भविष्याची स्वप्ने
रंगवत रंगवत आपण जगत राहतो. ती स्वप्ने कधी हवेत विरून जातात कळत नाही. आपण ती शोधत
राहतो. पण मिळत कधीच नाही. अथांग समुद्राची खोली जशी मोजता येत नाही तसंच आयुष्याचं
ही गणित कधी कळत नाही…
“So it comes to this; one doesn’t need rest. Why bother
about sleep if one isn’t sleepy? That stands to reason, doesn’t it? Wait a
minute, there’s a snag somewhere; something disagreeable. Why, now, should it
be disagreeable? …Ah, I see; it’s life without a break.”
― Jean-Paul Sartre, No Exit
चक्रव्यूह जो कधी भेदता येत
नाही. मुद्दा असा की या चक्रव्युहात आपण स्वतः शिरतो परत कधीही बाहेर न येण्यासाठी.
आणि आपल्याला घेऊनच तो संपतो.
शेवटी-
वि.स. खांडेकर (अमृतवेल)-
" भग्न स्वप्नांच्या
तुकड्यांना कवटाळुन बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ
भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचुन बांधुन ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांच
वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पहाणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं
म्हणुन धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं
आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरुन रक्ताळलेल्या
पायांनी दुस-या स्वप्नामागनं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला
अर्थ येतो तो यामुळं!! "
सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज
अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव