अभियांत्रिकी मध्ये
संभाषण कौशल्ये (Communication Skills) म्हणून एक स्वतंत्र विषय आहे. प्रत्येक
विद्यापीठात आहे. काही ठिकाणी प्रथम वर्षाला तर काही ठिकाणी तृतीय वर्षाला असाच
काय तो फरक. व्यावसायिक क्षेत्रामध्ये टिकायचं असेल तर संभाषण कौशल्ये अवगत
केल्याशिवाय पर्याय नाही. फक्त ज्ञान पुरेसं नाही. ते व्यक्त करता यायला हवं. यावर
जास्त भर आहे. कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करताना यालाच जास्त महत्त्व देतात. हा
विषय शिकवायचा म्हणजे एक आव्हानच. एकतर विद्यार्थी फार गंभीरतेने घेत नाहीत आणि
दुसरं म्हणजे आपण शिकवून तरी काय शिकवणार. मार्गदर्शन करण्यापलीकडे आपल्याकडे काय
असते हो? ह्या सर्व गोष्टी स्वतःच कराव्या लागतात. जी काय थेरी असते ती दिसायला
सोपी असते पण अनुकरण कठीण. विद्यार्थी बोलते झाले पाहिजेत. असे बरेच प्रयत्न सुरु
असतात.
सुरुवातीला ते कसं
शिकवायचं हे मलाच शिकावं लागलं. हळू-हळू त्यात बदल करत गेलो. अभियांत्रिकी मध्ये
जॉब करत असताना अनेक आव्हानात्मक प्रसंग आलेत. त्यातला एक प्रसंग नेहमी आठवतो. मी
एक अभियांत्रिकी महाविद्यालय जॉईन केलं होतं.
सुरुवातीला मला मेकनिकल थर्ड
इयर मिळालं शिकवायला. विभागप्रमुखांनी बोलावलं मला. मी त्यांना भेटायला गेलो. टाईम
टेबल घेतलं. त्यांच्या परीने ते काय करायला पाहिजे वगैरे मार्गदर्शन करत होते.
आपलं हो-ला-हो सुरु होत. तेवढ्यात एक प्राध्यापक त्यांच्या
कॅबीन ला आला आणि मला थर्ड इयर ला शिकवायचं नाही असं म्हटला. विद्यार्थी ऐकत नाही.
शांत बसत नाहीत. चेहरा पडला होता त्या महाशयाचा. त्यांच्या चर्चेतून असं समजल कि
ते प्राध्यापक गोल्ड मेडल होते विद्यापीठात. त्याची ती परिस्थिती पाहून माझ्या
मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. एकतर आपल्याकडे भारदस्त व्यक्तिमत्त्व नाही. दोन डिविजन. ८० च्या आसपास विद्यार्थी संख्या
प्रत्येक क्लास ची. ए मध्ये फक्त मुले. तर बि मध्ये चार-पाच मुली आणि उरलेले सगळे
मुलं. त्यामुळे क्लास कंट्रोल कठीणच. त्यांना शिकवणे म्हणजे आव्हान होतं. बर्याच
चर्चा ऐकून होतो त्यांच्या.
तो टाईम टेबल घेऊन कॅबीन
कडे परत जाताना हातपाय गळून पडले होते. दुसर्या दिवसापासून क्लास घायचा होता. त्या
दिवशी रात्री झोप आलीच नाही. यांनी मुद्दाम आपल्याला तो क्लास दिलाय. आपला गेम
होणार असं वाटायला लागलं होतं. त्या प्राध्यापकाची परिस्थिती पाहून मलाही धडकी
भरली होती. कम्प्युटर, आय.टी. दिली असती तर बर झालं असतं. कारण तिथे मुलींची
संख्या जास्त. मुली त्या मानाने शांत असतात. मुली जास्त असल्याने मुलंही फार
सुसंस्कृतपणे वागतात. पण तसं काही झालं नाही.
अभियांत्रिकी मधलं ते पहिल
लेक्चर कसं विसरणार. नवीनच असल्याने युनिफोर्म नव्हता. मी प्राध्यापक आहे हे
त्यांना कसं कळणार. तसंही माझ्याकडे कुणीही पाहिलं तर विद्यार्थीच समजणार. युनिफोर्म किती महत्त्वाचा आहे ते समजल तेव्हा. बुडत्याला काठीचा आधार. पण तो ही नव्हता.
दुसर्या दिवशी कॉलेज ला
गेलो. काय शिकवायचं, कसं शिकवायचं यावर बराच विचार केला. एकतर या क्षेत्रात नवीन
होतो आणि त्यात ही परिस्थिती. बेल होण्याआधीच मी तिसर्या माळ्यावर क्लास रूम बाहेर
उभा राहिलो. बेल झाली आणि मी वर्गात शिरलो. हातात डस्टर आणि खडू. समोर जाऊन उभा
राहिलो. गोंगाट सुरु होता. विद्यार्थी जोर-जोरात ओरडत होते. डेस्क-बेंच वाजवत
होते. काही माझ्याकडे पाहून हसत होते. काय करावं मला सुचेना. कुठून येऊन पडलो इथ
असं झालं. एखादा प्राध्यापक समोर उभा आहे
पण मुलं भिक घालत नव्हती.
थोडा विचार केला. खडू
घेतला आणि बोर्डवर टोपिक च नाव लिहिलं. आणि बोलायला सुरुवात केली . जसा-जसा मी बोलत
गेलो तसा तसा क्लास शांत होत गेला. शेवटी हजेरी घेऊन क्लास मधून बाहेर पडलो तेव्हा
वर्ग अतिशय शांत होता. काय बोललो ते माहित नाही. जी तयारी केली होती त्यातला एक ही
शब्द बोललो नाही. नंतर कधीच अडचण आली नाही. दोन-तीन मुलं संध्याकाळी भेटायला आली.
ते म्हटले, सर, छान होतं लेक्चर. आमचा क्लास एवढा शांत कधी राहत नाही. मला थोडं बरं वाटलं. आत्मविश्वास मिळाला. तयारीविना
मी कधीच क्लास ला गेलो नाही. आव्हानं असली कि माणसाचा कस लागतो. आपण काहीतरी करतो.
नवीन शोधतो. शिकवण्याच्या पद्धती बदलतो. प्रगती आपलीच. खरं तर त्याचं क्लास ने मला
आत्मविश्वास दिला. वेग-वेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्याच शिक्षकांना अनुभव समृद्ध
करतात. तसा प्रसंग परत कधी आला नाही. खाजगी क्षेत्रात काम करताना पावलागणिक संघर्ष
आहे. कायम स्वतःची कौशल्ये वाढवावी लागतात. वेळेनुसार बदलावं लागतं. ज्यांना जमते
ते टिकतात नाहीतर बाहेर फेकले जातात. कौशल्यांना मागणी आहे. डिग्री फक्त नावापुरती
असते. व्यावहारिक किंवा व्यावसायिक ठिकाणी त्या डिग्री ची किंमत शून्य. आपण कुठल्या ठिकाणी किती काळ राहू हे सांगता येत
नाही. आपली उपयोगिता संपली कि आपला टोयलेट पेपर व्हायला वेळ लागत नाही.
सचिन भगत