२००९-१० ची गोष्ट असेल. एम.ए. संपलं होतं. एम.फिल
फक्त विद्यावेतन आणि होस्टेल या दोन गोष्टींपुरते मर्यादित होतं. विद्यावेतन
मिळण्याचा कालावधी संपण्याचा मार्गावर होता. पुण्यात राहायचं असेल तर जॉब करणे
गरजेचं होतं. सी. एच. बि. वर सिनिअर कॉलेज ला जॉब करायचा नव्हता. कारण सी. एच. बि.
वाल्यांचे हाल जाणून होतो. अभियांत्रिकी
ला एम.ए. इंग्लिश ची आवश्यकता असते हे माहित होतं. त्यामुळे इंजीनिरिंग कॉलेज ला जॉब करायचा असं
ठरलं. रोज वर्तमानपत्र चाळत होतो. आणि एके दिवशी जाहिरात सापडली. Walk-In –Interview for the post of assistant professor in
Communication Skills.
एम. ए. विथ सिक्स्टी पर्सेंट. मराठवाडा मित्र
मंडळ चं कॉलेज होतं. त्या दिवशी रेझुमे तयार केला आयुष्यात पहिल्यांदा. त्याला
आम्ही बायोडेटा म्हणत असू तेव्हा.आता तो वेगळ्या अर्थाने वापरला जातोय.
मुलाखतीच्या दिवशी त्या महाविद्यालयात पोहचलो. नाव नोंदणी केली. चांगला तीस हजार
रुपये पगार त्यांनी जाहीर केला होता. जसे-जसे
उमेदवार येत होते तसे तसे एका रूम मध्ये जायला सांगितलं जात होतं. एका जागेसाठी
तब्बल तीस उमेदवार. सगळे कसे टिप-टाप. एक
बाई वर्गात आली आणि म्हटली प्रत्येकाला आता डेमो द्यावा लागणार. लिस्ट नुसार डेमो
द्यायचा. माझा क्रमांक चौदावा. आता डेमो म्हणजे काय? मला काही सुचेना. म्हटलं पाहू
काय होते ते. थोड्या वेळाने ५-६ प्राध्यापक वर्गात आले. पहिल्या क्रमांकच नाव
पुकारण्यात आलं. महिला होती. चांगली तयारी करून आलेली होती. तिनं पी.पी.टी. सुरु
केली आणि फाड-फाड ईंग्रजी बोलायला लागली. जसा तिचा वेग वाढत होता, तसे तसे माझ्या
हृदयाचे ठोके वाढत होते. आयुष्यात कधी पुढे जाऊन बोललो नाही. आता कसं होणार. जसा
जसा माझा नंबर जवळ येऊ लागला तशी धडधड वाढली. काय त्यांची ती भाषा. आत्मविश्वास.
स्टेज डेरिंग. मी अचंबित होतो. तेरा डेमो झाले. आता माझाच होता. माझं नाव
पुकारण्यात आलं. एकदा-दोनदा-तीनदा. मी काही जागेवरून उठलो नाही. सुदैवाने कुणी
ओळखीचं नव्हतं. माझं नाव पुकारल्यावर मीच आजूबाजूला कोण आहे हा म्हणून विचारपूस
करत होतो. शेवटी कंटाळून त्या बाईने पुढचा नंबर घेतला. बर झालं सुटलो. म्हणून
थोडंस हायसं वाटलं. ते तरी बर कि नोंदणी
करणारे वेगळे आणि इथे आलेले वेगळे होते.
थोड्या वेळाने मला फोन आला असं भासवून मी फोन कानाला
लावला आणि मागच्या दरवाज्यातून बाहेर पडलो. विद्यापीठ गाठेपर्यंत मागे वळून ही
पाहिलं नाही.
आयुष्यात कधी पी.पी.टी. पाहिली नव्हती. पुढे
जाऊन बोलण्याचा तर कधी संबंधच नाही. फक्त पुस्तकी ज्ञान. ते किती तकलादू आहे हे
लक्षात आलं. जॉब मिळणं सोपं नाही हे कळून चुकलं होतं. आता काय होणार या चिंतेने
त्रस्त झालो, अस्वस्थ झालो. बोलल्या शिवाय पर्याय नाही. कुठं चुकलं असेल? आपली
शिक्षण पद्धती तर चुकीची नाही? लिहिता येते मग बोलता का येत नाही. उत्तर सोपं
होतं. कधी प्रयत्नच केला नाही.
पाचव्या वर्गापासून इंग्रजीची सुरुवात झाली. ए
फॉर अप्पल पासून झेड फॉर झेब्रा पर्यंत. नंतर टेन्स आले आणि आयुष्य च टेन्स मध्ये
आलं. भाषा कुणी शिकवली का आजपर्यंत? कुणीच नाही. सर्वांनी भाषेबद्दल शिकवलं. (We learn about language and not language). बि.ए. इंग्लिश, एम. ए. इंग्लिश. आऊट पुट शून्य.
काय फायदा या शिक्षणाचा? असंख्य प्रश्न निर्माण झाले माझ्या मनात. बर शिकलो काय तर
कथा, कविता, कादंबर्या, नाटकं. पण वाचली का कधी? नाहीच. समरी वर काम चालायचं. काही
प्राध्यापक महाशय तर समरी वाचून दाखवायचे. संपलं तिथं. आम्हीही तेच केलं.
दुर्दैवाने कुठल्याच विद्यापीठात भाषा शिकवली
जात नाही. ते अजून ही त्या बीसी डीसी, अंगलो-सेक्शन ते पोस्ट-मोडर्ण पर्यंत अडकले आहेत. हीच लोकं
पुढे जाऊन प्राध्यापक होतात. आणि तोच कित्ता गिरवतात. नोकरी मिळवण्या लायक कौशल्ये
कुठे आहेत? वानवा आहे त्यांची.
आता काय करावं अश्या विचारात पडलो. एका विख्यात
प्राध्यापकाकडे गेलो. सर, ईंग्रजी कसं बोलावं असा प्रश्न केला. ते महाशय म्हणाले
ग्रामर, वोकबुलरी, प्रत्येक दिवशी ०५ नवीन शब्द पाठ कर असं बरंच काही मार्गदर्शन
केलं त्यांनी. आभार मानून मी तिथून काढता पाय घेतला. हेच तर केलंय आतापर्यंत. आणि
हा परत तेच सांगतोय. हा एवढा मोठा कसा काय झाला असा प्रश्न पडला.
बर मराठी किंवा हिंदी शिकताना कुठलं ग्रामर चं
पुस्तक वापरलंय. कुठली डिक्शनरी. काहीच नाही. We
speak Hindi or Marathi before the identification of alphabets. Then where is
the question of grammar and vocabulary? स्पोकन इंग्लिश च्या
नावाखाली पैसा कमावणे सुरु आहे. झटपट भाषा शिकवू असे कित्येक लेखकांची पुस्तके
मिळतात बाजारात. पण किती जण शिकलेत. शून्य.
भाषा शिकण्याची प्रक्रिया एकच आहे. एल.एस.आर.डब्ल्यू
(Listening-Speaking-Reading-Writing). हे माझ्या लक्षात आलं.
आपलं उलट आहे. आपण सुरु करतो शेवटून. मग वेगळ काय घडणार. प्रोसेस जर फॉलो झाली
नाही तर तेच होणार.
पुढचे तीन-चार महिने एकच काम केलं. स्वतःशी
बोलत गेलो आणि भाषा अवगत झाली. कित्येक हास्यापद प्रसंग ही घडले या दरम्यान. एकदा एकटाच विद्यापीठाच्या बाहेर चालत होतो.
त्या ई स्क्वेअर जवळ होतो. रहदारी भरपूर होती. स्वतःशीच बोलत बोलत चाललो होतो.
अचानक मी मागे वळून पाहिलं तर दोन व्यक्ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत
होत्या. त्यांना नक्की वाटलं असेल की याला काहीतरी मानसिक समस्या आहे. त्यांना
टाळण्यासाठी मागून येणाऱ्या पी. एम. टी. मी चढलो. शिवाजी नगरला उतरलो आणि दुसर्या
पी. एम. टी. ने परत विद्यापीठात. काय
वाटलं असेल यार त्यांना. जाऊ दे ते कुठं ओळखतात मला. म्हणून तो विषय मी सोडून
दिला. नंतर फार सतर्क झालो. मागे-पुढे कुणी आहे कि नाही याची खात्री करत होतो.
त्या दिवशी संध्याकाळी मी ओपन कॅन्टीन ला चहा पीत होतो. माझं लक्ष एका कोपर्यात
होस्टेल च्या बाजूने फोन वर बोलत असलेल्या मुलीकडे गेलं. फार मोठ्या आवाजात बोलत
होती. फार कुणी लक्ष देत नव्हतं. मला तो दुपारी घडलेला प्रसंग आठवला. त्या व्यक्तीचे
हाव-भाव आठवलेत. आणि हिच्याकडे मात्र कुणीच लक्ष देत नाही. चहा संपला. मी मोबाईल
बंद केला आणि दुसर्या कोपर्यात गेलो. आणि बोलायला लागलो. कित्येकदा मी मोबाईल बंद
करून फोनवर बोलत राहायचो ते पण इंग्रजीत. कसलीच अडचण नाही. दुसरा मार्ग सापडला
होता. आयुष्यात कुठलीच गोष्ट निरर्थक नाही. बंद केलेला मोबाईल ही कामाला आला.
व्यावहारिक ईंग्रजी कडे कुणी लक्षच देत नाही. त्यामुळे
सुशिक्षित बेरोजगारांची फौज निर्माण होतेय. कला शाखेचं तेच झालंय. गुण एकीकडे तर
कौशल्ये दुसरीकडे. यांचा मेळ घालायला हवा. पण किती प्राध्यापकांना वेळ आहे? एवढे द्या आणि पेपर प्रकाशित करा. असा धंदा
जोरात सुरुय. एम.फिल साठी एवढे पैसे, पी.एच डी. साठी एवढे. हेच सुरुय.
भाषा ही कला म्हणून शिकलं पाहिजे. त्यामध्ये
ज्याला येते तो फार मोठा वगैरे प्रकार नकोतच. आताच्या काळात टिकायचं तर बदलावं
लागेल. शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. नाहीतरी इंग्लिश मेडीअम स्कूल्स चा
बाजार मांडलाय या लोकांनी. दोन-तीन हजार रुपयांवर काम करणारे शिक्षक मिळत आहेत. कसा
पुढे जाणार भारत?
मी रविवार ला आठ, नऊ, आणि दहावी च्या
विद्यार्थ्यांना शिकवायला जात असतो. एकदा मी
शिकवत असताना बोर्डवर एक वाक्य लिहिलं –“I
brought my luggage.” आणि ते वाचलं.
वर्गात ९० च्या आसपास विद्यार्थी होते. जसं मी “आय ब्रॉट माय लगेज “असं म्हटलं
तिकडून सर्वांची एकदमाने प्रतिक्रिया आली, “सर, इट इज ब्राउट.” क्षणभर मी थबकलो. त्याचा
उच्चार सांगितला. डिक्शनरी दाखवली. तेव्हा त्याचं समाधान झालं. कुणी सांगितलं तर
मिस ने असं बोलले. आता ही जर परिस्थिती असेल तर काय होणार? उत्तर एकच-घंटा.