Tuesday, February 28, 2017

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग ११


होस्टेल नंबर पाच
पुणे विद्यापीठ शिकत असताना सगळ्यात जास्त आकर्षण होतं ते म्हणजे होस्टेल नंबर पाच. संशोधक विद्यार्थ्यांसाठीच ते वसतिगृह. वर्षभर सुरु असलेलं वसतिगृह. कधी तरी आपण हि तिथे राहू असं वाटायचं. सगळी होस्टेल्स एका बाजूला तर हे होस्टेल दुसर्या बाजूला. जवळचं स्टाफ क्वार्टर्स, आदर्श कटीन, बाजूला अड्मीन बिल्डींग, सेट भवन आणि एका बाजूला भलं मोठं मैदान.
रात्री-बेरात्री जयकर वरून होस्टेलला एकट यायचं म्हटलं कि कुणीही घाबरणार. आदर्श कॅण्टीन जवळ भुंकणारी कुत्री आणि गर्द झाडे....त्यामुळे बराच अंधार.  
एम. फिल ला प्रवेश मिळाल्यानंतर हे होस्टेल मिळालं आणि मला तिथे राहण्याची संधी मिळाली. क्षमतेपेक्षा कित्येक जास्त पटीने विद्यार्थी इथे राहतात. अर्थातच अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त. वसतिगृह मिळालं कि ओळखीचे, गावाकडचे, पूर्वीच्या कॉलेजचे मित्र, सिनिअर-ज्युनिअर, मित्राचे मित्र, मैत्रिणीचे मित्र, जवळचे-दूरचे नातेवाईक विद्यार्थी  असे सर्व सेटिंग सुरु करतात. आणि अशा तर्हेने एका सिंगल सिट रुममध्ये १५-२० विद्यार्थी राहायला लागतात. सगळे आपलं सामान जिथं जागा असेल तिथे कोंबतात. खुर्ची, टेबल होस्ट च्या ताब्यात.  अनधिकृत साठी अर्थातच काही अलिखित नियम आहेत. जसे कि सकाळी लवकर रूम सोडायची, दिवसभर रूमवर यायचं नाही  आणि रात्री उशिरा यायचे. जिथे जागा मिळेल तिथे झोपायचे आणि नसलीच तर बाहेर कुठंही म्हणजे व्हरांड्यात, टेरेसवर, बास्केटबॉल च्या ग्राउंड वर झोपायचं. रुममध्ये एकच कॉट त्यामुळे रूम ज्याच्या मालकीची त्यावर तो झोपणार. सकाळी बाथरूम असो कि टोयलेट...रांग असतेच. सोलर चं गरम पाणी मिळेल कि नाही याची शास्वती नाही. काहीना जयकर ला जायचे असते तर काहीना कुणासोबत नाश्त्याला जायचे असते. जमेल तसं आटोपून प्रत्येक जन आपल्या मार्गाला लागतो आणि रात्री गजबलेल वसतिगृह दिवसा मात्र ओस पडलेलं असते. प्रत्येकाचा दिनक्रम ठरलेला. होस्ट मात्र बर्याच वेळा दुपारी झोपण्यासाठी रूमला येतातच. त्याचा आनंद वेगळाच. बर्याच वेळा अनधिकृत विद्यार्थी होस्ट चा चहा, नाश्त्याचा खर्च सुद्धा उचलतात.
विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थी येतात. या संख्येत दरवर्षीच भर पडते. उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींची संख्या मोठी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सहज सामावून घेतील, अशी शासकीय वसतिगृहे शहरात नाहीत. त्यामुळेच एका-एका खोलीत १० ते १५ जणांना राहावे लागते.  अशा परिस्थितीत पुणे विद्यापीठातील वसतिगृह हे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा असतो. विद्यापीठातच एखाद्या शाखेत प्रवेश घ्यायचा आणि सोबतच स्पर्धा परीक्षांचा किंवा एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे आपल्या गावाकडील, भागातील एखादा ‘सिनिअर’ शोधायचा, त्याच्या हातापाया पडून रूमवर समान ठेवण्यापुरती जागा  असे करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप.
मुळात या विद्यापीठात दरवर्षी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या आणि उपलब्ध वसतिगृहांची संख्या यात मोठी तफावत आहे. एका विभागातील साधारपणे दोन किंवा तीनच विद्यार्थ्यांना वसतिगृहात अधिकृत प्रवेश मिळतो. इतर विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?  नाइलाजाने ‘पॅरासाईट’ म्हणून वसतिगृहात जागा शोधावी लागते. याशिवाय चांगला पर्याय कुठला असेल मग?
सध्याच्या वसतिगृहांमधील ढेकणांपासून स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेबद्दल तर बोलता कामा नये. ढेकुण आपले कायमचे साथीदार. कशीच शांततेची झोप लागू न देणारे. एखाद्या रविवार ला जयकर सुट्टी आणि रूम स्वच्छता तेही सगळे मिळून हे नित्याचंच. पण कितीही स्वच्छता करा...ढेकुण आपली साथ कधी सोडत नाहीत. अर्थातच क्षमतेपेक्षा कितीतरी विद्यार्थी राहत असल्याने मर्यादा येतातच. त्यामुळे विद्यापीठाला दोष देता येणार नाही.
रविवार म्हटला कि संध्याकाळी डबेवाले बंद. बाहेर खाणे परवडत नसल्याने कित्येक विद्यार्थी रूमवर खिचडी, चिकन-मटन शिजवतात. तेही मिळून. पैसे जमा करायचे आणि खर्च करायचा. हिटर, शेगडी, भांडी असं सर्व साहित्य बहुत्यांची विद्यार्थ्यांकडे असतेच. काही बहाद्दर एखादा डबा न चुकता लेडीज होस्टेल ला मैत्रिणीसाठी (?) पोचवतात.  
क्रिकेट च्या मचेस असल्या म्हणजे टीव्ही हॉल पूर्ण भरलेला. नकळत कित्येक जन एकमेकांच्या संपर्कात येतात. म्हटलं तर सामाजीकरण होतं आपलं. काही बाहेर नोकरी करत असूनही विद्यापीठात राहतात. योग्य कि अयोग्य ते अलाहिदा. पण खरी गरज कुणाला हा प्रश्न येतोच. सेक्युरिटी गार्ड फक्त नावाला. विद्यार्थी त्यांना जुमानतच नाहीत. त्यामळे इथे किती विद्यार्थी राहतात याचा आकडा कुणीच सांगू शकत नाही.
संशोधक विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह. पण संशोधन किती होतं हे माहित नाही.
ते काहीही असो पण कित्येक विद्यार्थ्यांचं करिअर इथेच घडलं पण आणि सडलं पण.  काही यशस्वी झालेत तर काही अयशस्वी. कमी खर्चात राहणं शक्य असल्याने कोण किती वर्ष राहतो हि चढा-ओढ. ८-१० वर्ष इथे राहणाऱ्यांची संख्या कमी नाहीच. होस्टेल चा दर हि अत्यंत कमी. सोबतीला कमवा-शिका असतेच. महिन्याला पुरेल इतके पैसे त्यातून मिळतातच. त्यामुळे सगळे निश्चिंत. या निश्चिंतपणामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे करिअर अनिश्चित झाले.

पुणे विद्यापीठात राहायला मिळणं म्हणजे एवरेस्ट सर करण्यासारखे आहे. त्याची मजा काही औरच. तेथून बाहेर पडताना एक वेगळं व्यक्तिमत्त्व म्हणून आपण बाहेर पडतो. पुण्यात परत कधीतरी गेल्यानंतर कुठलाही विद्यार्थी विद्यापीठाला भेट दिल्याशिवाय राहत नाही. 
                                                                      सचिन भगत