कमवा आणि शिका योजना
जळगाव मध्ये पदवी करत असताना पुणे विद्यापीठात
जायचं एम. ए. करण्यासाठी असं ठरवलं होतं. तिथल्या कमवा आणि शिका योजनेबद्दल ऐकलं
होतं. म्हणूनच तिथे जाऊ शकलो. अन्यथा पुणे विद्यापीठाचा विचार कधी डोक्यात आला
नसता. कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना पावलागणिक संघर्ष असतो. सुदैवाने एम. जे. कॉलेज
ला हि योजना असल्याने पदवी होऊ शकली. पुढे विद्यापीठात प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश
मिळाला आणि तिथेही कमवा आणि शिका योजनेत सहभागी झालो. पुणे विद्यापीठात जाण्याचे धाडस
करू शकलो ते यामुळेच. ही योजना नसती तर
पुणे विद्यापीठात शिकणे कल्पनेपलीकडे होतं. सुरुवातीचे सर्व अडथळे पार करून मी
तिथे गेलो. खिश्यात दमडीही नव्हती. दोन वर्षे मी या योजनेत काम केलं. पहिलं वर्ष
स्वच्छतेच काम आणि दुसर्या वर्षी भोरे सरांच्या हाताखाली कार्यालयीन काम केल. हे
करत असताना कधीही अडचण आली नाही. मागेल त्याला काम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार
नाही. हे माहित असल्याने विद्यापीठात पाउल टाकलं.
'रयत'चे संस्थापक कर्मवीर
भाऊराव पाटील यांनी सर्वप्रथम 'कमवा आणि शिका' हा मूलमंत्र दिला. त्यानंतर ग्रामीण भागातील
तळागाळात शिक्षणाचा प्रसार झाला. आज 'कमवा आणि शिका' ही योजना आज कित्येक शैक्षणिक संस्थामध्ये राबवली जाते. उच्च शिक्षण घेत
असताना, विद्यार्थांवर
श्रमसंस्कार व्हावेत, त्यांनी हा ठेवा निरंतर
जपावा, या हेतुने कमवा व शिका
योजना सुरु झाली आणि पाहता पाहता हि योजना प्रचंड विस्तारत गेली. परिस्थितीमुळं अनेक
मुलांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागतं. शिकण्याच्या वयात अनेकांना कुटुंबासाठी
पैसा मिळवावा लागतो. बऱ्याच वेळा आसपास शाळा नसते. दुसरीकडं जायचं ठरवलं तर राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा खर्च कोण करील? यासारखे एक ना अनेक
प्रश्न समोर ठाकतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर
ठेवून विद्यापीठानं या योजनेची आखणी केलीय. रोज सकाळी ६ ते ९ प्रती दिन तीन तास
विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसर स्वच्छ करणं, परिसरातील बागांना, झाडंझुडपांना पाणी घालणं, परिसराची निगा राखणं, झाडं लावणं, त्यांची काळजी घेणं, माळीकाम करणं, विद्यापीठातील कार्यालयीन काम करणं आदी कामांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा
विचार करून पुढं जाऊन विद्यार्थी स्वावलंबी बनावेत, त्यांनी एखादा व्यवसाय करावा, या दृष्टीनंही या योजनेत
व्यावसायिक कामं दिली जातात. कमवा आणि शिका योजनेचा फायदा करून घेत विद्यापीठाला
आवश्यक लिफाफे आणि फाइल या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेणे, तसेच या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना
कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे म्हणून रिटेल सेल, नर्सिंग असिस्टंट, ऑटो सेल्स कन्सल्टंट
आदीचे प्रशिक्षण मोफत देणे अश्या घोषणा
मध्यंतरी विद्यापीठ प्रशानाकडून झाल्यात.
कित्येक विद्यार्थी या योजनेत काम करतात.
सुरुवातीला मुलाखत वगैरे होत होत्या. पण काम मिळून जायचं. आता भरपूर बदल झालेत या
योजनेत. महिन्याला मिळणारा मोबदला हि भरपूर वाढला आहे. दिवसाला तीन काम. आता
तासाला ४५-५० रुपये मिळतात असं ऐकिवात आहे. या पैश्यात मेस चा खर्च तर निघतोच पण
काही शिल्लक हि राहतात. कारण निवास मोफत असायचा वसतिगृह सहा ला. आता ही योजना
विद्यापीठाला संलग्नित महाविद्यालामध्ये हि सुरु आहे. विद्यापीठ भरपूर खर्च करते
या योजनेवर.
विद्यार्थ्यांची संख्या खूप असल्याने
वेगवेगळ्या गटात विभागणी व्हायची. प्रत्येक गटाचा एक लीडर. आणि या सर्वांचा एक
लीडर. अशी रचना होती. विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे राबवल्या जाणार्या या योजनेचा
विद्यार्थी हा केंद्रबिंदू. याच योजनेतून कित्येक विद्यार्थी नेतृत्व निर्माण
झालेत. एक वेळेस च्या जेवणाची सोय नसलेले विद्यार्थी घडलेत आणि आता स्वतःच्या
पायावर उभे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. गरिबी प्रगतीची आड येऊ नये.
प्रत्येकला सन्मानाने शिकता यावं. आपला भविष्य घडवता यावं. हा हेतू सफल झालेला दिसतोय.
सकाळी ६ ते ९ च्या पुणे विद्यापीठात फिरायला
बाहेर पडा. २००-३०० विद्यार्थी काम करताना नजरेस पडतील. विद्यापीठातील विविध
विभागांची, वाचनालयाची स्वच्छता किंवा गार्डन ची निगा राखणे अशी विविध कामे
विद्यार्थी करतात. फक्त कामच नाही तर
बौद्धिक पण असायचं शेवटी अर्धा तसं. व्यक्तिमत्त्व विकासाची पायाभरणी तिथेच झाली.
देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे आचार-विचार हि तिथेच कळाले. हि
योजना फक्त काम करण्यापुरती आणि त्याचा मोबदला इतकी मर्यादित कधीच नव्हती. समोर
येऊन मत –मतांतरे मांडण्याची सवय इथेच लागली, आत्मविश्वास मिळाला आणि त्याचा उपयोग कित्येक आंदोलनात झाला.
कामाचा मोबदला बँकेत जमा होतो. त्यामुळे
आयुष्यात पहिल्यांदा बँकेत खात उघडावं लागलं. पैसा नव्हता तर अकाऊंट कुठून असणार बँकेत.
आता या योजनेत सर्व काही आलबेल असतं असंही
नाही. काही विद्यार्थ्यांनी या योजनेचा दुरुपयोग हि केला आहे. काही लीडर्स हि
त्याचं प्रकारातले होते. काम करणारे सर्वच गरीब असतात असंही नाही. कधी मोबदला
वाढवण्यासाठी आंदोलनं हि झालीत. म्हणून या योजनेचं महत्त्व कमी होत नाही. सन्मानाने
जगण्याचा जो मार्ग विद्यार्थ्यांना मिळतो तो प्रशंसनीय आहे. त्याबाबत आपण
विद्यापीठाचे आभार मानायला हवेत. माझ्यासारखे
कित्येक या योजनेविना शिक्षणापासून वंचित राहिले असते.
पुण्यात जाऊन शिकणे सोपं नाही. राहण्या-खाण्याचा
खर्च प्रचंड आहे. सामान्य लोकांना ते शक्य नाही. हि योजना म्हणजे त्यांचा आधार.
मी विद्यापीठात असताना डॉ. संभाजी पठारे हे
विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक होते. कित्येकदा सकाळी ते कामाची पाहणी करत
होते. स्वतः लक्ष असायचं त्याचं. त्यांच्या उल्लेखाशिवाय या योजनेवर भाष्य होऊ
शकत नाही. त्यांच्या काळात हि योजना खूप
वाढली. या योजनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांनी बदलला, या योजनेत काम करण्याला
त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वावलम्बनातून
सन्मान विद्यार्थ्यांना मिळाला. जेव्हा जेव्हा ते संवाद साधायचे फक्त ऐकत राहायचं
असं वाटायचं. मुल्ये त्यांनी रुजवली आणि फुलवली.
याच कमवा आणि शिका चे विद्यार्थी आज विविध
क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.
गरज असतना आधार बनलेली हि योजना कित्येकांच्या दृष्टीने महत्त्वाची होती आणि
आहे. अभ्यासात या योजनेचा कधीही व्यत्यय आला नाही. याउलट स्वावलंबन ची शिकवण
मिळाली. स्वतःच्या पायावर उभं राहता आलं.
हि योजना म्हणजे गेमचेंजर आहे. कित्येकांच आयुष्य फुललं आहे. गरीबीवर मात करता
आलीय. आयुष्य बदलता आलंय. भरकटलेल्या, शिक्षणाचा गंध नसलेल्या लोकांना मुख्य
प्रवाहात सामील करून घ्यायचे असेल तर प्रत्येकाने पुढे यायला हवं. सर्वांनाच
विद्यापीठात प्रवेश मिळेल असंही नाही. कित्येक प्रवेश्यापासून वंचित राहतात. प्रत्येक
शैक्षणिक संस्थेने काही प्रमाणात का होईना याची सुरुवात करायला हवी.