पेय म्हणा की अजून काही. सवय...नशा. प्रत्येकाच्या घरी सकाळी चहा होतोच. सर्वच आपल्या दिवसाची सुरुवात चहा पासून करतात. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत. कॉफी वगैरे अलीकडच्या काळातील. ग्रीन टी, लेमन टी, ब्लाक टी, हर्बल टी असे अनेक प्रकार.
चहा...दोन अक्षरी शब्द. कित्येकांना जोडतो. त्यातून निर्माण होणार्या आठवणी ही अनेक. चहा ने जोडलंय कित्येक लोकांना. मैत्री, दोस्ती प्रेम वगैरे ची सुरुवात. चहा घेत नाही असे नमुने क़्वचितच.
एका नातेवाईकाकडे होतो काही दिवस. तसं म्हटलं तर मी अनवांटेड गेस्ट. तिथे काही दिवस मुक्काम होता. एकदा दुपारी चहा बनवणे सुरु होता किचन मध्ये. आपल्याला ही मिळेल या आशेवर मी दुसर्या रूम मध्ये होतो. तिथे चर्चा सुरु होत्या. कुठलीही चर्चा सुरु असली की आपण कानोसा घेत असतोच. मी जरी दुसर्या रूम मध्ये असलो तरी काय चर्चा सुरु आहे ते ऐकत होतोच. एकाने विचारलं, त्याचा पण ठेवलंय का चहा? समोरून उत्तर-त्याला कशाला हवाय चहा? एक वेळ मिळाला ना. मग पुन्हा कशाला? जास्त लाड करायचे नाहीत. ते ऐकून मी सुन्न झालो. त्या रूममधील दरवाज्याने बाहेर पडलो. देऊ नका पण बोलू तरी नका. पण तसं घडत नाही. तो किचन मधला संवाद मला ऐकू यावा यासाठीच होता हे पण मला माहित होतं. तिथला मुक्काम तसा छोटाच. त्यांची प्रत्येक कृती तशी मला घालविण्यासाठी होतीच. मला पण जायचं होतंच. योग्य वेळी मी तेथून मार्गस्थ झालो ते कायमच पुन्हा कधी ही न येण्यासाठी, न भेटण्यासाठी. लोकं विसरतात आपण काय बोलून गेलो ते. वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते. एक छोटीसी गोष्ट. चहा ची किंमत तरी काय? माणसाचा वाईट काळ सुरु झाला की सगळे जवळचे-दूरचे टोलावतात. असे प्रसंग काही नवीन नव्हते. असो.
लहानपणापासून आम्ही चहा प्यायला शिकलो कारण दुध घेण्याची ऐपत नव्हती. त्या चहात थोडं दुध टाकलं जाई. आजकाल ची पिढी चहा, कॉफी, बोर्नव्हिटा घेतेय. त्यावेळेस आवाक्याबाहेरचं. असे अनेक छोटे छोटे प्रसंग घडले. ते पचविण्याच वय नव्हतं. आघातावर आघात होत राहिले. त्या शब्दांचे, प्रसंगांचे, त्याचे घाव अजुनही आहेत.
चहा आमचा आधार. मेस ला सुट्टी असली की चहा घेऊन भूक लांबवली जात होती . असं कित्येक वेळा. कधी त्याच्या सोबतीला पारले बिस्कीट चा पुडा.
कट्टा. रंगणाऱ्या गप्पा. हसणे-खेळणे. सुख-दुःखाची देवाण-घेवाण याच कट्ट्यावर झाली. काही नसलं की चला चहा घेऊ या. तिथे जाऊन बसायचं. कधी चहा चांगला वाटलाच तर अजून एक घ्यायचा का? उत्तर तसं होकारार्थी च. दिवसभरात चार-पाच कप चहा कधी त्यापेक्षा ही जास्त.
कॅन्टीन वाल्याने चहा चांगला नाही दिला तर तो ग्लास किंवा कप कित्येकदा स्वाहा
केलाय आम्ही. शिवाय सोबतीला शिव्यांची लाखोली.
साधा किंवा स्पेशल. कटिंग. टू बाय थ्री. असे अनेक संवाद प्रत्येकाच्या कानावर
पडले आहेतच. कुणाला गरम हवं तर कुणाला थंड.
चहाचे पार्टनर ही ठरलेले. काही व्यवहारी लोकं आज मी पैसे देतो उद्या तू दे
असंही करतात. जेव्हाही असं झालंय त्यानंतर त्याच्या सोबत पुन्हा कधी आम्ही फिरकत
नव्हतो. व्यवहारी प्रत्येकाने असावं. पण त्याचं प्रमाण असावं. तो व्यावहारिक
दृष्टीकोन स्वार्थात रुपांतर होऊ नये म्हणजे झाले. टी. टी. एम. एम. वाल्यांची (तू
तुझं, मी माझं) संख्याही कमी नाही. हे टी. टी. एम. एम. वाले नेहमी चेष्टेचा विषय.
ती कॅन्टीन ला गेली म्हणून आपण ही जायचं. इच्छा नसताना उगाच एका कोपर्यात बसून
चहा घायचा. असे करणारे ही अनेकदा दिसलेत.
चहा...त्याचं सेवन चांगला की वाईट. यावर विचार करायचा नाही. चहा घेणारे आहेत म्हणून कित्येकांच पोट भरते. अर्थव्यवस्थेला हातभार.
गर्दी च्या ठिकाणी चहाचे स्टोल्स पाहायला मिळतात. घेणारे ही महत्त्वाचे. बनवणारे ही महत्त्वाचे. संपूर्ण भारताचा विचार केला तर किती टर्न ओव्हर असेल. कल्पनेपलीकडे.
पूर्वी लोकं पाहुणे आले की चहा ठेवायची. काळ बदलतोय. कुणाला चहा चालतो, कुणाला नाही. त्यात ही वेगळे प्रकार. ग्रीन, लेमन वगैरे. कुणीही भेटलं तर आपण चला चहा घेऊया म्हणून सहज बोलून जातो. आमचा
प्रवास तसा चहापासूनच सुरु झाला. अजूनही सुरु आहे. सकाळी उठलो की चहा आधी बाकी नन्तर.
ते ब्रश वगैरे पण नंतर. बेड टी, इव्हिनिंग टी. काय काय संकल्पना आल्यात. पण चहा काही पिच्छा सोडत नाही.
कुणाला एक कप, कुणाला एक ग्लास. कमी शुगर, अधिक. आपल्या शुगर नुसार.
आपण देशासमोरील आव्हानांची चर्चा करतो. समस्यांची चर्चा करतो. ही पण राष्ट्रीय समस्या म्हणावी का?
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज
अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव