आपलं जीवन हा एक अखंड चालणारा प्रवास आहे. जो
कसा जाईल, कुठं जाईल किंवा कधी संपेल काहीच माहित नाही. या प्रवासात अनेकांची साथ
लाभते. काही सोबत येतात तर काही मागे पडतात किंवा पुढे जातात. पण प्रत्येक
महत्त्वाचा. त्याच्यामुळे प्रवास सुखकर होतो किंवा सुलभ होतो. एकमेकांना घट्ट
ठेवायचं काम संवाद करतो. त्यामुळे संवाद हवाच. जेव्हा जेव्हा तो लुप्त होतो तेव्हा
तेव्हा तो परिणाम करून जातो. आजच्या हरवलेला संवाद आणि जीवनशैली माणसांमध्ये
दुरावा निर्माण करत आहे. संवाद म्हणजे संवेदनशील
होणं. संवेदना आली की संवाद सुदृढ होतो.
समर्थ रामदासस्वामी
मनाच्या श्लोकात सांगतात:
तुटे वाद, संवाद त्यातें म्हणावे|
विवके अहंभाव याते जिणावे॥
अहंता गुणे वाद नाना विकारी|
तुटे वाद, संवाद तोे हीतकारी॥
प्रत्येकाच्या आयुष्यात हे सारं कमी-अधिक
फरकाने आलंच.तंत्रज्ञानाच्या जगात ढासळत्या संवादाचे कित्येक उदाहरणे सांगता
येतील. जळगाव ला पदवीच्या पहिल्या वर्षाला होतो. काही काळ नातेवाईकांकडून अप-डाऊन
सुरु होतं. कॉलेज ते बस-स्टोप पायीच चालत जात होतो. कित्येक विद्यार्थी हाच कित्ता
गिरवत. तसंही कला शाखेकडे जाणारे बहुतांशी गरीब घरातलेच. त्यांना ऑटो वगैरे
परवडणारं नव्हतंच. बस स्टोप जवळच एक मंदिर आहे. बस ला वेळ असली की त्या मंदिरात मी
बर्याच वेळ घालवत होतो. म्हणजे तिथे बसून निरीक्षण. सुसाट वेगानं जाणार्या गाड्या,
फेरीवाले, ऑटोवाले,फुटपाथवर ची लोकं, त्यांची चाललेली धडपड अनुभवता येत होती. कधी पैसे असलेच तर भुईमुगाच्या शेंगा घ्यायचं
आणि ते खात आपला वेळ घालवायचा. तसं ते
नित्याचंच. असंच एकदा पायी चालत असताना तो भेटला. त्याची नी माझी पाहिली ओळख त्या
भुईमुगाच्या शेंगा खातानाच. तिथेच मला तो गवसला थोडाफार. हळू-हळू भेटी गाठी
वाढल्या. विचारांची आदान-प्रदान झाली. तसा तसा तो मला गवसत गेला. तो वेगळाच होता. त्याचे
विचार वेगळे. त्याचं राहणीमान अतिशय चांगलं. ताप-टिप कपडे, डोळ्याला चष्मा, शर्टिंग
केलेली, पायात शूज वगैरे वगैरे. कपड्यांचा शौकीन. पण काय कुणास ठाऊक तो भेटला आणि
जीवनाचा एक भाग बनून गेला. किती चर्चा रंगल्या असतील, भविष्याची स्वप्ने पाहिली
असतील. त्याला मी विवेकानंद म्हणत होतो. कुठल्या मुलीबद्दल बोललेलं चालायचं नाही.
नेहमी गंभीर. आणि माझा आणि गंभीरते चा संबंध नव्हता. त्याला किती वेळ चिडवलं असेल
मुलींवरून. चुकीचा समज आहे तुझा असं म्हणून तो टोलवून लावायचा. कधी कधी फालतू विनोद केले तर तो खूप हसायचा.
नॉन-व्हेज चा विषय सोडला तर तो ईतर कुठल्या
गोष्टींवर भरभरून बोलतो याची उत्सुकता राहायचीच. प्रत्येक गोष्टींवर चर्चा
व्हायची. पण या छोट्या-मोठ्या गोष्टींमधून मला तो उमगत गेला. त्यानं ठरवलं कि ते
होतच असे. हुशार होताच. धीरगंभीर...मग्न . त्याच्या अभ्यासात आमच्या सारखे अडथळे
नव्हते. मर्यादित जग. कमी बोलणं. त्याच्या घरी पण कित्येकदा जाणं झालं. त्याच्या
कित्येक पर्सनल गोष्टी माहित होत होत्या. काही अपेक्षित काही अनपेक्षित. त्याच्या कौशल्यांवर
विश्वास होता. माझ्या आधी तो यशस्वी होईल असं माझं अंतर्मन सांगत होत आणि त्याला
मी कित्येकदा सांगितलं आणि झालंही तसंच. माझ्या आधी त्याची नौका किनार्याला लागली होती.
मनीषा पूर्ण झाली होती.माझा प्रवास अडथळ्यांची शर्यत पार करत होता. किनार्यावर
जाईल कि नाही याची शास्वती नव्हती.
सगळं काही आलबेल होतं असंही नाही. समज-गैरसमज
ने कधी पाठलाग सोडला नाही आणि त्यातून एक अंतर निर्माण झालं, पोकळी निर्माण झाली. आणि
संवाद ला उतरती कळा लागली . बराच काळ लोटलाय. त्याचं मजेत सुरु आहे असं ऐकिवात आहे.
आज लिहायला घेतलं आणि त्या भूतकाळात तो भेटला.. तो भेटला मला त्या महाविद्यालयात,
त्या बस स्टोप जवळ. त्या पहिल्या भेटीपासून ते त्या विद्यापीठापर्यंत. कित्येक
वर्षे तो आसपास होता.आधार होता. चांगल्या-वाईट गोष्टींचा साक्षीदार होता. आमची
नौका पुढे जाण्यात तो हि एक भागीदार.
कुठलंही नातं टाकाऊ नव्हे तर टिकाऊ असलं
पाहिजे. सारं काही आलबेल नाही म्हणून कुणाचं सहकार्य, योगदान किंवा मोठेपण नाकारता
येत नाही.
“ओळखी
केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले
माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने
त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की "
आता हा असा का वागला ?"” – व. पु. काळे
संवाद कमी झाला कि गैरसमज वाढतात आणि गैरसमज
झालेत कि संवाद बंद होतो.
सचिन भगत