Wednesday, May 21, 2014

असंच काहीतरी ...३

खूप दिवसांनी काहीतरी लिहायला घेतलंय. म्हटलं तर कुठलाही विषय माझ्याकडे नाही. तरीपण काहीतरी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला. शिकत असताना आपण खूप स्वप्न रंगवली. तासनतास चर्चा झाल्यात. पण त्यापैकी कुठल्याही स्वप्नावर आपण आजगायत काम सुरु केलेलं नाही. कारणे अनेक असतील. ती तर नेहमी असतात. पण असं मर्यादित जीवन अपेक्षित नव्हत केल कधी. आपण आपलं जीवन बंदिस्त केलंय एका परिघात. त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे आता. किती दिवस मी आणि माझं कुटुंब या संकल्पनेत जगणार आहोत आपण. हे तर कधी ठरवलं नव्हतं आपण.

मी स्वप्नं पाहणं सोडून दिलंय आता. वास्तवात जगण्याची सवय करून घेतलीय. स्वप्नांवरनाहीजगता येत हे पण कळून चुकलंय आता. बारा वर्षाच्या बाहेरच्या जगात खूप काही अनुभवलं. आताकुठलाही अनुभव घ्यायची इच्छा उरली नाही. जीवन पण कस असतं. किती स्वप्नं दाखवतं पण प्रत्यक्षात काहीच येत नाही. मृगजळ आहे सगळं. आता त्यामागे लागण्यात अर्थ नाही म्हणून काहीतरी विधायक करावं म्हणतोय. काय ते निश्चित नाही. पण विचार केल्यावर काहीतरी निघेन. आयुष्य थांबल्यासारखं झालंय आजकाल. प्रत्येक दिवस येतो नि जातो. आजकाल फक्त महिना कधी संपतो नि पगार कधी हातात पडतो एवढच काय ते सुरु आहे. पगार आणि आपण. एक अदृध नातं निर्माण झालंय. पैसा आपल्याकडे येतो कि आपण पैश्यामागे धावतो काहीच कळत नाही. हेच का ते आयुष्य ज्याची आपण वाट पाहत होतो कित्येक वर्षांपासून. माझ्याकडे उत्तर निश्चितच नाही. अन कुनाकडे असेल असंही नाही. असलंच तर कुणी स्वीकारेल हि शाश्वती नाही.

आसपास सगळं बदललं आहे. अनुभवांनी कधी पाठलाग सोडला नाही. भटकत असताना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या वाक्याचा पुरेपूर अनुभव आला. जग बदलत गेलं. आसपास चे सगळे बदललेत पण मी मात्र अजूनही हि तसाच आहे. मूळ स्वभावात फार काही बदल झाला नाही. आतातर होणे पण नाही. मी खूप काही करेन असं मला नेहमी वाटायचं. सारं काही फक्त वाटलंच. प्रत्यक्षात येण्याआधीच सगळं अचानक नाहीसं झाल. कि मी नाहीसं केलं. माहित नाही.

जीवन जगणं सोपं झालंय भूतकाळाच्या तुलनेत. म्हणून प्रश्न संपलेत, अडचणी संपल्यात असंही नाही. पण ती मजा नाही येत जगण्यात. सगळं तेच तेच होऊन बसलय. लोकांचे प्रश्न ठरलेले अन आपली उत्तरे हि ठरलेली. नवीन असं काही घडत नाही. घडवण्याची ती उर्मी हि नष्ट झाली. दोन वेळेस च्या जेवणाचा प्रश्न मिटला कि व्यक्ती काही करत नाही. तसंच काही माझं झालंय. कदाचित माझी मानसिकता बदलली असेल काळाच्या ओघात. शून्यातून सगळं निर्माण करताना होणारी कसरत कुणाच्या वाटेला येऊ नये.

आता शांतता हवी आहे. पण ती मिळेना शी झाली. कधीकधी हे सगळं सोडून दूर जावं म्हणतो. नको त्या अपेक्षा, नको तो संसार, अन नको ते मानवी जीवन जे फक्त पावलागणिक त्रास देतं. या सगळ्यापासून सुटका करावीशी वाटते. पण पुन्हा प्रश्न तोच अन उत्तर हि तेच. नुसतं वाटून उपयोग नाही. खरं तर उपयोगासाठी करायचं नसतंच काही. मग काय चाललंय हे. फक्त लिखाण कि मनातलं द्वंद कि अजून काही. का मनाची अस्थिरता. शेवटी मनाची घालमेल का होत असते नेहमी? आपण स्वतःला का शोधत असतो नेहमी?

जीवन न उलगडणारं कोडं आहे. ते उलगडण्याचा निरर्थक प्रयत्न सुरु आहे. नेमकं आपल्याला काय हवं आहे. काही कळत नाही. पण काहीतरी हवं आहे. म्हणून हि सगळी खटाटोप सुरु आहे. आपण नेहमी उत्तरांच्या शोधात असतो. सोप्या गोष्टी हि कठीण करतो. सगळं आसपास असून पण नसल्यासारखं जाणवतं नेहमी. हे माझ्या बाबतीत कि प्रत्येकाच्या च. कुणासठाऊक काय चाललंय ते. लहान असताना लवकर मोठं व्हावसं वाटतं. मोठं झाल्यावर मात्र लहानपण च चांगलं होत हि जाणीव त्रस्त करते नेहमी. आपण नेहमी धावत असतो कशाच्या तरी मागे. मिळालं तरी धावणं मात्र थांबत नाही. मग आपण धावतोच कशाला सगळं माहित असून. निष्फळ आहे सगळं. तरी त्यात अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरु असतो आपला.

आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत. पण नाही. आपण स्वतंत्र नाहीच. आपण गुलाम आहोत. आपण तेच करतो जे इतरांना हवं असतं. आपण तसचं वागतो जे समाजाला अपेक्षित असतं. या पलीकडे आपण जात नाही. सगळे हेच करतात. मग कुठलं स्वातंत्र्य आहे आपल्याला. तरी आपण स्वतंत्र असल्याचा आविर्भाव आणतो नेहमी. कोणकुणाला फसवतं. आपण आपल्याला कि कुणी आपल्याला.भरकटत राहतो आपण अशा अनेक प्रश्नांभोवती. उत्त्तर नाही मिळालं तरी जगणं सुरूच असते. ते थांबतच नाही.अन आपण हि थांबत नाही. आपण शोध घेत असतो एका गोष्टीचा जी आपल्याला समाधान देईल. पण असं काही सापडतच नाही. तरी शोध मात्र सुरु असतोच अविरत. स्वतःला शोधताना आपण हरवून बसतो जे आपल्याकडे आहे. मग जे हरवलं त्याचाही शोध सुरु होतो. हे चक्र सुरु असतं सातत्याने.आपण मागे वळून कधी पाहत नाही. वर्तमानात काय आहे त्याकडे हि कधी लक्ष नसते आपलं. आपण नेहमी भविष्याचा विचार करत राहतो अन वर्तमान गमावून बसतो. अन हे कधी लक्षात येतच नाही. वेळपण कुठ असतो आपल्याकडे काय होतंय त्याचा विचार करायला. सगळं काही सुटेल पण माणसाची मिळवण्याची हाव काही केल्या सुटत नाही.आहे त्यात समाधान मानण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती. ती फक्त दाखवण्यासाठी. खरं तर आपण समाधानी कधी नसतोच.

वसतिगृहातील पण काय आयुष्य होत साल. कायम दगदग. खोलीनंबर बारा मध्ये घडलेल्या घटना, चर्चा, एका डब्यामध्ये दोन लोकांच जेवण.आबा च्या मेस चे प्रकरणं थेट डॉक्टर गडे कडे नेण्यापर्यंत ची मजल.जॉनी चे भांडण लावण्याचे उद्योग. भोई ते लिखाण अन त्यातले आपण खलनायक. असं बरच काही. तरीपण कसलाही ताण नाही घेतला. स्वीकारत गेलो ते हे सगळं बदलणार म्हणून. ते बदललं हि. पण भूतकाळ विसरता येतच नाही कितीही प्रयत्न केला तरी. एनेसेस चंते शिबीर. तिथल्या त्या आठवणी नाहीच विसरता येणार. दोन रुपयाचा तो भाभीचा चहा. रोज पाणी सोडायचा ते काम तुम्ही सगळ्यांनी शिकून घेतलं आणि मी नसताना पार पाडलं हि. अन ते तयार झालेलं समीकरण कायम घट्ट होत गेल अनेक अडचणींमधून.  

जळगावने शिक्षनापलीकडचं आयुष्य दिल. वेळ मिळाला कि चित्रपट मग तो चेतना असो कि अजय चा एखादा. मला पुण्याला जायचं नव्हतं. मला तर प्रवेश परीक्षा पण द्यायची नव्हती पण कुणीतरी कि उत्तीर्ण हो आणि जाऊ नको. यशस्वी तर होऊन दाखव. मग सगळं झालं अन पुण्याला जायचा मोह आवरला नाही. माझ्या मागे जॉन्या पण आला. मला तो मोठा आधार.अधून मधून तू आश्चर्याचे धक्के देतं राहिलास. कधी माझ्या वाढदिवसाला तर कधी भेटायला येत राहिलास. मग आपण पुण्याच्या आसपास केलेली भटकंती अवर्णनिय. फ्लिपकार्टा नं पाठवलेलं ते पुस्तक मध्यरात्री बनवून खाल्लेली खिचडी ना तुला विसरता येणार ना मला. माझा स्वभाव फार चांगला नसतानाही तुम्ही लोकांनी ज्याप्रकारे जुळवून घेतलं किंवा अजूनही घेताय ते शब्दांपलीकडे आहे. आणि म्हणूनही कित्येक लोक आयुष्यात आलेत आणि गेलेत. पण कुणाशी भावनिक नातं कधी निर्माण झालं नाही.
जळगाव या शहरानं खूप काही दिलं. तिथेच सगळी स्वप्ने पाहिली. एमजे चं वसतिगृह लक्षात राहील ते त्या स्वप्नांसाठी. मागेपुढे ते सगळं प्रत्यक्षात आलंही पण जीवनाला एक वेगळ वळण देऊन गेलं.

अश्या अनेक घटना न थांबता सांगता येतील. पण माझ्याकडे तेवढे शब्द नाहीत. तेवढा वेळ हि नाही. जगण्यासाठी धडपड सुरु आहे. ती हि संपेल कधीतरी. मग शांतपणे बसून हे सगळं आठवून वेळ घालवावा लागेल. म्हणून थांबतो. पण लिखाण  थांबणार नाहीत. अधून मधून ते सुरूच राहील मग मी कितीही मग्न का असेना कामात. लिहायला सुरुवात केली तेव्हा काहीच नव्हतं डोक्यात पण सुरुवात केल्यानंतर आपोआप येत गेल. विषय नव्हता माझ्याकडे. पण विषय नसताना लिहिण्याचा प्रयत्न केला.

सचिन भगत

एका मित्राला पाठवलेले पत्र.....

पुणे सोडून पंढरपूर ला गेलो. जिथं कुणी ओळखीचं नव्हतं. सुदैवाने काही चांगले लोक भेटलेत. म्हणून पंढरपूर सोडल्यानंतर एका मित्राला पत्र पाठवलं. जग जरी तंत्रज्ञानाने बदलले असले तरी मला आवडतो तो पत्र व्यवहार. मनातल्या गोष्टी कागदावर उतरवण्यात जी मजा आहे ती बोलण्यात नाही. मी लिहिलेलं पत्र ते असं: (नावाचा उल्लेख मुद्दाम टाळला आहे)


नमस्कार,



कित्येक दिवसांपासून पत्र लिहिण्याचा विचार मनात घोळत होता. काल रात्री आपलं बोलणं झालं. सगळं डोक्यात होतंच फक्त शब्दात आणायचं होतं. मग काय रात्री तीन वाजेपर्यंत पत्र तयार. मध्यंतरी सरांना पत्र लिहून पाठवलं. दोन्ही गोष्टी भिन्न आहेत म्हणून हे स्वतंत्र पत्र. खरं तर कुणाला पत्र लिहाव असे लोक फार कमी असतात. सगळ्याच गोष्टी शब्दात व्यक्त होतात च असं हि नाही. तरी हि हा पत्र प्रपंच. तो पण मराठीत. पंढरपूर मध्ये सर अन तुम्ही सोडले तर कुणी जवळचं नव्हतंच. खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. का अन कशामुळे नाही कळल कधी. म्हणून सरांना अन तुम्हाला पत्र लिहावं वाटलं. तरी हि मनात जे आहे ते बाहेर येतच नाही. ती माझी कमजोरी म्हणा कि अजून काही. कुणास ठाऊक? 

जवळपास तीन-चार महिने आपण सोबत होतो. भरपूर गोष्टींवर चर्चा झाल्यात. काही नाती निर्माण कराव्या लागत नाहीत. ती होत जातात. नकळत. सर अन तुम्ही त्यातलेच एक. नकळत झालेली भेट हि पुढे कधी वाढत गेली ते कळलचं नाही कधी. ज्या दिवशी मी पंढरपूर सोडलं तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. सरांना मी कॉलेज वर सोडलं, पण निघताना जी मनाची घालमेल झाली ती शब्दात नाही उतरवता येत. पूर्ण प्रवास याच विचारात गेला. नकळत सगळ्या गोष्टी मला आठवत गेल्या. ते दहा-बारा तास विचारचक्र सुरु होतं. सगळे चांगले वाईट अनुभव डोळ्यासमोर येऊन गेलेत. घरी पोहोचल्यानंतर कुठं ते बंद झालं. मला यायचं नव्हत. कॉलेज फार चांगल होत असं हि नव्हत. पण तुमच्या सगळ्यांमुळे पंढरपूर सोडायचं नव्हतं. काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. We are puppets in the hands of God. What else? आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या वेळेवर कधी मिळाल्या नाहीच. वेळ गेल्यानंतर ते सगळं माझ्याकडे येत गेलं. पण काय उपयोग. प्रत्येक गोष्टीला उशीर झाला. अजूनही तेच होतंय. तरी मी हार मानलेली नाही. त्यातच आनंद शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक निर्णय चुकला कि सगळं चुकत जात. माझ्या बाबतीत हि तेच झाल. माझा निर्णय पक्का होता म्हटलं तर तो बौद्धीक होता. पण मन मात्र मानायला तयार नव्हतच. ते मला नेहमी भूतकाळात घेऊन जात. तो प्रवास जड अंतकरणाने च झाला. भावनिक ऋणानुबंध. दुसरं काय. ते सहजासहजी होत नाहीच. 

कुणी आपलं म्हनाव असं शोधून मिळत नसतच कधी. तरी त्या बाबतीत मी नशीबवान म्हणायाल हवं. मी जिथं जिथं गेलो, तिथं तिथं मला आपली मानसं मिळालीच. तुमच्या सोबत घालवलेले ते क्षण कसे विसरू. पैसे नसताना खाल्लेली अंडा भुर्जी हि विसरता येणार नाही. पैसे असल्यानंतर शुभम. किती तो विरोधाभास. पण क्षण जगणं शिकलो. भूतकाळाचा गंध नाही अन भविष्याचा विचार नाही. तेच योग्य होतं. तुमचंते दिल-खुलास व्यक्तिमत्त्व नाहीच विसरता येणार कधी. क्षणार्धात आपलं स करून घेणारं, नाही विसरू शकत. मला पंढरपूर सोडायचं नव्हतच. पण ती वेळेची गरज होती. माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती ला काही करता येत नव्हत. माझा निर्णय योग्य होताच. अन तो योग्य ठरला हि. सुदैवाने इथ सगळं आहे. पण तुमच्या सारखी मानसं नाहीत. पैसा तर कुठे हि मिळतो. माझ्यासाठी पैसा कमावणं कधी कठीन नव्हतचं. पण माणसाचं काय? ते काय पैश्याने मिळतात? नाहीच ना? बस तीच कमतरता आहे इथ. बाकी काहीच नाही. 

तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण लक्षात राहील. मग तो रायगड दौरा अन तिथलं शून्य नियोजन असो, कि ते तुमचं ते औरंगाबादच प्रकरण, “Why take risk” कि “why to take risk “ यावर ची चर्चा, वेळेवर चंद्रभागेकाठी सुचलेल्या कविता, अन बरंच काही अजून हि तसच टवटवीत आहे आणि राहीन. ऐश्वर्या हॉटेल वर सरांसोबत झालेल्या मैफिली तर अवर्नानियचं. ज्या गोष्टी मी सरांसोबत बोलू शकत नव्हतो ते तुमच्या सोबत शेअर केलं. कारण सरांचं व्यक्तिमत्त्व वेगळ आहे. त्या गोष्टी मी त्यांच्या सोबत बोलू शकत नव्हतोच.त्यात आपण खूप दिवस सोबत राहिलो. मला आलेल्या कित्येक अडचणी तुम्ही अन सरांनी दूर केल्यात. का केल्यात त्याचा मी विचार नाही करत. नाही तरी वेळेवर मदत करणारी लोकं मिळतात कुठ. तसा मी फार लहान आहे तरी तुम्ही फार जुळवून घेतलं. म्हणूच च तुम्हा दोघांचं महत्त्व माझ्या दृष्टीने फार मोठं आहे. ते नाही मला मला शब्दात सांगता येणार. 

तुमचं ते साहित्यिक बोलणं मला नेहमीच आवडलं. म्हटलं तर हेवा पण वाटला. कारण ते सहजासहजी येत नाहीच हे मी चांगल जाणून आहे. ती रूम जिथं आपण राहिलो ती कित्येक घटनांची साक्षीदार आहे आणि राहील. खूप चांगले वाईट अनुभव आलेत. पण त्या रूम मध्ये प्रवेश केल्यापासून सगळं बदलत गेलं. म्हणून त्या निर्जीव वस्तू बद्दल पण आत्मीयता आहे. सर, तुम्ही, अन ती रूम यापलीकडे पंढरपूर नाहीच. पंढरपूर माझ्यासाठी संपलं. सुरुवात अन शेवट एकच. मला रूम स्वच्छ ठेवणं कधी जमल नाही. तुम्ही ते फार आनंदाने केलंत. रूम ची अवस्था काय होत असे ते वेगळ सांगण्याची गरज नाहीच. तसं मला समजुन घेण फार कठीण आहे आणि होतं. पण का कुणास ठाऊक सर अन तुम्ही ते कस केलत. कित्येक वेळा रूमवर झालेल्या पार्ट्या हि नाही विसरता नाही येणार. माझं तसं कुणी नव्हतंच तिथं. सरांनी एक कुटुंब अन मित्र अश्या दोन्ही गोष्टी दिल्यात. त्यात च मला खूप आनंद आहे. आयुष्यात भरपूर लोक येतात अन जातात. पण बोटावर मोजण्या इतकीच लक्षात राहतात. 

अजूनही तुम्हा लोकांना खूप मिस करतो. सोबत पार्टी करण्यायोग्य लोक आढळत नाहीत. तसल्या गप्पा होत नाहीत. म्हटलं तर लोक रसिक नाहीत. जे आपण केलं ते मनापासून केलं. ३०,९०, १२०, सोबत धुराडा इतरांसोबत शक्य नाहीच. कित्येक रात्री अश्या आनंदात गेल्यात. आज त्या रात्रींची आठवण येते. ते क्षण नेहमी आठवतात. मी आलो ते फक्त वेळ जाऊ देण्यासाठी. माझी कुठली महत्त्वाकांक्षा नव्हतीच. त्यामुळे पंढरपूर ला थांबणं शक्यच नव्हत. पण इतक्या लवकर सोडेन असं डोक्यात नव्हतं. माझी काही स्वप्नेही नव्हती तिथ. पण एवढ्या कमी वेळात खूप शिकायला मिळालं. तुम्हा सगळ्या लोकांचा सहवास मिळाला. नकळत शिकत गेलो. आज तेच कामाला येतंय.
शेगाव ला आलो. सुदैवाने चांगल कॉलेज मिळालं. म्हटलं तर अजून एक जुगार यशस्वी ठरला. एक कॉलेज सोडून दुसरीकडे जाण्यात धोका असतोच. मी तो पत्करला. निर्णय योग्य ठरला. नशिबाची साथ म्हटलं तरी हरकत नाही. 

प्रत्येक क्षण आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करतोय. म्हटलं तर तेच आपल्या हातात आहे. पण पंढरपूर कायम लक्षात राहील. जेव्हा जेव्हा पंढरपूरचा विषय येईल तेव्हा तेव्हा तुम्हा लोकांचा चेहरा समोर येईल. बाकी ना पंढरपूर मध्ये काही लक्षात ठेवण्याजोग आहे ना त्या कॉलेज मध्ये. ते कॉलेज म्हणजे गेमाडपंथियांचा अन हाजी हाजी करणारयाचा भरणा. या व्यतिरिक्त काही लक्षात राहील असं काही नाहीचं. पण त्यामुळे आपली भेट झाली म्हणून ते महत्त्वाचं. अन्यथा काहीच नाही. वेळोवेळी आपण केलेलं सहकार्य नक्कीच लक्षात राहील. आभार मी मानणार नाही, कारण आभार परक्यांचे मानायचे असतात. 

आयुष्य हे वेगळच आहे. पुन्हा कधीतरी भेटू. “माणूस आशेवर जगतो, मग ती आशा कितीही निराधार असो, माणूस स्वप्नांवर जगतो मग ती स्वप्ने कितीही असंभाव्य असोत. “(ययाती ) मनुष्याचं जीवन म्हणजे एका आशेकडून दुसऱ्या आशेकडे चाललेला प्रवास. तेच आपण करतोय. 

पंढरपूर सोडून पंधरवाडा उलटून गेला पण तिथल्या आठवणी काही पाठ सोडेनात. कमी कालावधीत आपली झालेली मानसं 

… चंद्रभागेच वाळवंट … तिथे आमच्या मित्रांनी केलेल्या कविता अन आमचं ते उस्फुर्त प्रोत्साहन आणि दाद याचा तो संगम

… रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्ट्या रंगणाऱ्या गप्पा बाजूला रिकाम्या बाटल्यांची रांगखोलीत पसरलेला धूर अन 

त्याच्या साथीला जगजित सिंग यांच्या गजल्स ती वातावरण निर्मिती तर अप्रतिम … सगळीकडे अस्तवस्थ पडलेले कपडे 

… तरी सकाळी लवकर उठून उशीर होऊ नये म्हणून कॉलेज ला जाण्याची लगबग … त्यात आंघोळीला थंड पाणी … निस्तेज 
झालेलं डोकं लगेच ठिकाणावर यायचं … सुट्टी असली कि सोलापूर चे दौरे … त्यांची हि एक वेगळीच कथा म्हटलं स्वतंत्र 

पुस्तक लिहिता येईल त्यावर … माझे ते ५० १ मानसं sam नं काही सोडली नाहीत मध्येच मेडीटेशन च प्रकरण खूप 

हसवून गेल … पी एच डी करतोय म्हणून मोठ्या गप्पा करणं पण प्रत्यक्षात काम शुन्य एक वर्ष होऊन पण … दीड -दोन 

वर्ष कसे निघून गेलेत नाही कळले … पुन्हा कधीतरी भेटूयात अन त्या आठवणींना उजाळा देऊयात …. आयुष्य फार मोठ


 आहे 

खूप दिवसानंतर मराठी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. खूप काही लिहायचं राहून गेलं. फक्त संदर्भ दिलेत. भावनांना शब्दात पकडण्याच कौशल्य माझाकडे नाही. तुमच्यासारखं बोलणं अन लिहिणं हि नाही जमणार. तरी हा एक प्रयत्न. त्यामुळे पत्रातील उणीवा आपण समजून घ्याल हा विश्वास. हि फक्त सुरुवात. हा पत्रप्रपंच असाच सुरु राहीन हि अपेक्षा.

धन्यवाद. 

आपला, 
सचिन भगत