Friday, September 27, 2019

बेरीज-वजाबाकी


आयुष्यात आपलं नेहमी बेरजेचं गणित सुरु असते. एक एक गोष्ट आपण जमा करत जातो. शिक्षण, नोकरी, बायको, मुलं-बाळ, घर, दुचाकी, चारचाकी असं कित्येक. आधी गरज म्हणून नन्तर गुंतवणूक. हे सारं करत असताना वजाबाकी कशाची होते ते आपल्याला कळत नाही. सतत धावपळ काहीतरी मिळवण्यासाठी. या धावपळीत काहीतरी राहून जाते. नेमकं काय ते कळण्याआधी वेळ निघून गेलेली असते.कधी-कधी आपल्याला कळतच नाही.
स्लामबुक होतं कित्येक दिवस जपून ठेवलेलं. त्यात सहसा कुणी खराब लिहित नाही. सगळे चांगलंच लिहितात. कित्येक वर्षांनी मी ते वाचायला घेतलं. काय-काय लिहून ठेवलेलं. वाचताना मला ते खटकत गेलं.  आपण असे नाहीतच. म्हणून एक एक करत त्यातले सगळे भरलेले पाने  स्वाहा केली. मनाला ते पटलं नाही.  जुने-पुराने फोटो, आठवणी ही नष्ट केल्या. वयानुसार माणूस बदलत जातो. पूर्वी ज्या गोष्टी चांगल्या वाटायच्या त्या आता मूर्खपणाच्या वाटतात.  काळाच्या ओघात चांगल्या वाटणार्या गोष्टी आता नको वाटायला लागल्याय. स्वतःची ओळख झाली की तसं होणारंच. समाजात वावरताना किती मुखवटे धारण करतो आपण. प्रत्येक ठिकाणी वेगळा चेहरा. पण स्वतःशी खोटं बोलता येत नाही. माझ्या ही बाबतीत तेच झालं. एक-एक  करत सगळ्या गोष्टी नाहीश्या केल्यात. आठवणी जपून ठेवाव्या असं म्हणतात. मी तसं केलं नाही. त्या आठवणी कधी ओझं होऊन जातात हे कळत नाही. मुक्तपणे जगण्याचा आनंद वेगळा. भूतकाळाची  आठवण  नाही आणि भविष्याचा विचार नाही. वर्तमानात जगायचं. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. कशाला कशाचं ओझं आणि चिंता हवी?
काळाच्या ओघात अनेक गोष्टी मागे मागे लागतात....म्हटले तर शेपूट. आपल्या सर्वांच्या जवळचा शब्द. शेपटाचा प्रवास फार रंजक. आपण विविध ठिकाणी त्याचा वापर करतो. काही करा कुत्र्याचं शेपूट वाकडंच. काल एक मित्र भेटला. आजकाल भेटणं होत नाही. बायको..पोरं-सोरं आहेत. शेपूट लागलंय मागे. आधी बायको...मग मुलं...आपल्यासाठी शेपूट. आपण म्हातारे झालो की आपण ही शेपूट होऊन बसतो मुलांसाठी. म्हणजे काय हे शेपूट ते शेपूट करता करता आपण शेपूट होऊन जातो. त्या शेपटाचा प्रवास आपल्यापासून सुरु होऊन आपल्याजवळ येऊन थांबतो.
नोकरी असो व्यवसाय असो की अजून काही. मागे लागलेलं शेपूट काही सुटत नाही. आयुष्यात केलेली प्रत्येक गोष्ट आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. जेवढा सोडवायचा प्रयत्न करावा तेवढं ते अजून मागे लागते. मानवाची उत्क्रांती ही तशीच. आदिमानवाला शेपटी होती. उत्क्रांती होत काळाच्या ओघात शेपटी नाहीसी झाली.
माझा एक मित्र. त्याला फोन केला की तो कधी कधी उचलत नाही. नंतर फोन करून सांगतो की मी जेवण करत होतो. पण मग फोन उचलून सांगायचं, जेवतोय नंतर बोलू. त्याला किती वेळा सांगितलं चांगलं बोलून, शिव्या घालून पण ते शेपूट वाकडंच.
किती सार्या गोष्टी आहेत ज्या समजायला लागल्यापासून पाठ सोडत नाही. कितीही प्रयत्न करा. त्याचा पाठलाग सुटत नाही.

वाढदिवसाला वगैरे परिचित-अपरिचित, फेसबुक फ्रेंड, एकमेकांना कधीही भेटलेले, मोबाईल मध्ये नंबर असूनही कधीही डायल केलेले, तोंड ओळख असणारे, मित्राचे मित्र असणारे  असे अनेक डिजिटली शुभेच्छा देतात. फोन करायला, भेटायला वेळ नाही. फेसबुक वर हजारो फ्रेंड्स आहेत, मोबाईल ची लिस्ट पाचशे-सातशे च्या घरात आहे.  खर्या अर्थाने संपर्कात कुणीच नाही. आदान-प्रदान  सारं काही डिजिटल. फोरवर्ड.
डिजिटल...प्रगत झाल्याचं लक्षण असं आपण सगळे मानतो. एखादी दुखद घटना घडली की आपण ती सर्वांसोबत शेअर करतो. सांत्वन ही डिजिटल. मग माणूस म्हणून निसर्गाने ज्या भावना दिल्यात, मन दिलं त्याचं काय? आपण काय रोबोट आहोत? नाही. पण आपण रोबोट झालोय. भावनाशुन्य आयुष्य सुरु झालंय. कशाचच  देणं-घेणं नाही.
आपला प्रवास सुरु आहे. काय मिळवलं. काय गमावलं. माहित नाही. सारं काही क्षणिक. आयुष्यातील होणारी बेरीज-वजाबाकी मात्र सुरु आहे सातत्याने आपल्याला न कळत.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव