Monday, June 1, 2020

परीक्षेची परीक्षा...


गेल्या कित्येक दिवसांपासून अंतिम वर्षाच्या परीक्षांबद्दल चर्चा सुरु होती....काल तो प्रश्न मिटला....परीक्षा रद्द झाल्या आणि सरासरी च्या आधारावर गुण देऊन निकाल जाहीर करण्याचं ठरलं...यावर चर्चा होत राहील...योग्य कि अयोग्य यावर उठसुठ कुणीही बोलत राहील...
परीक्षा....शिकायला लागल्यापासून परीक्षा आपल्या मागे लागल्या....त्यात मिळणारे गुण यावर आपली गुणवत्ता ठरायला लागली...त्यातून हुशार, साधारण, ढ...अशा कॅटेगरी निर्माण झाल्या...आपली परीक्षा पद्धती चा विचार केला तर घोकंपट्टी...पाठांतर....च्या आधारावर केलेली चाचणी असं म्हणता येईल...आपण सर्वच हे करत आलो...करतोय...
पुस्तकी शिक्षण आणि व्यावहारिक शिक्षण यातला फरक प्रचंड आहे. मार्केट मध्ये किती गुण मिळाले हे कुणी विचारात नाही. तुम्ही काय शिकलात...त्याचा कसा उपयोग करू शकता यावर सर्व काही अवलंबून...
मग एखाद्या सेमिस्टर ची परीक्षा रद्द झाली तर काय फरक पडतो...परीक्षा महत्त्वाची कि जीव?....
कधी नव्हे तसं संकट उभं ठाकल आहे...त्यामुळे जीव धोक्यात घालणे परवडणारं नाही...
...असंही आपल्याकडे परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्याचं मुल्यांकन करणारे शिक्षक याचा कुठेही ताळमेळ नाही...
परीक्षा पद्धती म्हणजे भूलभुलैया...कागदपत्री शंभर टक्के दिसत असले तरी व्यावहारिक जीवनात त्याचा काहीच उपयोग होत नाही...
या परीक्षेचा एक प्रसंग:
माझ्या एका मित्राची गोष्ट...पदवी चं शेवटच वर्ष होतं...एकूण सहा विषय...वार्षिक परीक्षा होती तेव्हा...स्पेशलायझेशन चे चार विषय आणि दोन ऐच्छिक... स्पेशलायझेशन च्या विषयांचा प्रोब्लेम नव्हताच...सातत्याने अभ्यास असायचा...पण ऐच्छिक विषयाकडे त्यानं वर्षभर ढुंकून हि पाहिलं नाही....वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक जेव्हा जाहीर झालं तेव्हा प्रत्येक पेपर साठी एक-दोन दिवस gap होता....त्यामुळे त्याने ठरवलं कि तेव्हाच अभ्यास करायचा...त्याचे ऐच्छिक विषय भूगोल आणि राज्यशास्त्र.... स्पेशलायझेशन चे चार विषय आणि भूगोल यांचे पेपर चांगले गेले...शेवटच्या पेपर साठी दोन दिवस अवधी होता...syllabus पाहून त्या दिवशी तो ग्रंथालयात गेला आणि राज्यशास्त्र विषयाशी सबंधित एक-दोन पुस्तके घेऊन आला. जाड-जुड पुस्तके....आठ विचारवंत होते अभ्यासक्रमात.....कार्ल मार्क्स, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी वगैरे वगैरे....
वाचायला घेतलं तर हे विचारवंत काही डोक्यात घुसेना...हे करू कि ते करू...कुठल्या विचारवंता पासून सुरुवात करू ....त्यात एक दिवस असाच निघून गेला. दुसर्या दिवशी रात्र थोडी सोंगे फार अशी परिस्थिती...त्याने ठरवलं कि आठ पैकी फक्त चार विचारवंत अभ्यासायचे....चार सोडून द्यायचे...ते ठरवताना त्याने मार्क्स सारखे समजायला कठीण सोडून दिले....जे समजायला सोपे होते फक्त तेच अभ्यासले...म्हणजे महत्त्वाचे विचारवंत ज्यावर हमखास प्रश्न येतात असे सोडले आणि कसे-बसें उरलेले चार विचारवंत अभ्यासून तो परीक्षेला गेला...प्रश्नपत्रिका जेव्हा हातात आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि ज्याचा त्याने अभ्यास केला आहे त्यावर फक्त पंधरा मार्क चे प्रश्न आहेत आणि उरलेला पेपर जे अभ्यासले नाही त्यावर.... तारांबळ उडाली त्याची....काय करावं ते सुचेना....आयुष्यात पहिल्यांदा असं घडलं होतं.....करून घेऊ...एक दोन-दिवसात होऊन जाईल अभ्यास....हा अतिआत्मविश्वास, निष्काळजीपणा अंगलट आला होता....
...पंधरा मार्कांचा पेपर सोडवून झाल्यावर त्याने ठरवलं कि जे विचारवंत अभ्यासले आहेत त्यांचीच माहिती इथे लिहायची फक्त नावे बदलून...म्हणजे गांधींचे आर्थिक विचार अभ्यासले असतील तर मार्क्स च्या नावाखाली खपवायचे...तेच नाही तर स्वतःला जे वाटते ते या विचारवंतांच्या नावाखाली खपवायचे.....संपूर्ण पेपर त्याने असाच सोडवला...एक-दोन पुरवण्या लावल्या आणि बाहेर पडला.....निकाल लागेपर्यंत जीव टांगणीला लागला....आपला पेपर जर वाचला तपासनार्याने तर दहा-बारा गुणांच्या पलीकडे मिळणार नाहीत....दिवसामागून दिवस जात राहिले....जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा त्याला त्या विषयात शंभर पैकी ८१ गुण होते....त्याला हि धक्का बसला...हीच का ती परीक्षापद्धती? मग हे जे मूल्यमापन होते ते खरं आहे कसं मानायचं....अमुक पहिला...तमुक पहिला...ऐंशी टक्के...नव्वद टक्के...सारं भुलभुलैय्या...
अभ्यास करून जेवढे गुण कधी मिळाले नाहीत तेवढे गुण मिळालेत...कसा विश्वास ठेवावा या व्यवस्थेवर...या परीक्षा पद्धतीवर...मुल्यांकन करणारे काय करत असतील यावरून समजेल....
प्रथम क्रमांक मिळवणारे, ढीगभर टक्के मिळवणारे  कुठे लुप्त होतात हे कधीच समजल नाही... रट्टे मारणारी मंडळी उत्तम गुणांनी पास होते...एवढं मात्र खरं...

...ज्यांना कमी गुण मिळतात त्यांना येणारं नैराश्य ...त्यातून निर्माण होणार्या मानसिक समस्या याकडे हि लक्ष द्यायची गरज आहे.
त्यामुळे टक्केवारीच्या या प्रवाहात अडकून न पडता काय गरजेचं आहे यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे...
आपली परीक्षा पद्धती च आरोपीच्या पिंजर्यात आहे...त्यात बदल गरजेचा आहे...काही प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत...केस स्टडी, ओपन बुक टेस्ट हा त्यातील एक प्रकार...
शिकलेलं समजलं पाहिजे...त्याचा दैनंदिन जीवनात वापर करता आला पाहिजे असा व्यावहारिक दृष्टीकोन ठेऊन बदल व्हायला पाहिजेत...
पुस्तकांत सामाविष्ट करण्यात आलेले धडे समजावून न घेता केवळ घोकंपट्टी हा प्रकार बंद व्हायला हवा...पालकांनी गुणांच्या मागे न लागता कौशल्य वाढीकडे लक्ष द्यायला पाहिजे...
त्यामुळे परीक्षा रद्द झाली काही फरक पडणार नाही...ज्यांच्याकडे कौशल्ये आहेत त्यांना प्रचंड वाव आहे...
काही तथाकथित विद्यार्थी संघटनांना न जुमानता सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घेतला हे बरं झालं....


सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव