Wednesday, September 11, 2019

माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान आणि शिक्षण

गेल्या आठवड्यात एका स्कूल मध्ये जाणे झालं. सोबत असलेल्या तिथल्या शिक्षकाने त्या संपूर्ण स्कूल चा फेरफटका घडवून आणला. काही क्लासरूम दाखवले. प्रोजेक्टर, कंप्युटर वगैरे उपलब्ध. नर्सरी च्या वर्गाजवळून जाताना तिथे प्रोजेक्टर वर पोएम सुरु होत्या. काही मुलं बसलेली तर काही इकडे-तिकडे फिरण्यात मग्न. शिक्षक मात्र बाहेर फिरत होत्या. आता शिक्षक वर्गात नाही म्हटल्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे ठरवलेली उद्दिष्टे सध्या होऊ शकत नाही.
मला ते चित्र फार काही पटलं नाही. माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान नेमकं कसं वापरायला हवं यावर सुद्धा कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत.  ते शिक्षकांना पर्याय नाही तर त्यांच्या मदतीला आहे. एखादी कठीण संकल्पना सोपी करून सांगण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान वापरावर भर देण्यात आलेला आहे. त्याचाच वापर करायचा की योग्य तेथे वापर करायचा यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे.
काळ बदलला. शिक्षण पद्धती बदलल्या. पारंपारिक शिक्षण पद्धतीची जागा आता तंत्रज्ञानयुक्त साधनांनी घेतली. पूर्वी शिक्षक वर्गात यायचे तर हातात पुस्तक, डस्टर, खडू असं साधारण चित्र असायचं. आता तसं राहिलं नाही. आज-काल शिक्षक पेन ड्राईव्ह हातात घेऊन वर्गात जातात. कंप्युटर ला पेन ड्राईव्ह लावला की प्रोजेक्टर वर शिकवायचं पीपीटी च्या माध्यमातून. म्हणजे काय तर शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल झालेत. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) शिरकाव झाला. स्मार्ट क्लासरूम निर्माण झालेत. प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिसून येतोय. एखादी संकल्पना  शिकवताना दृश्य दाखवले तर त्याचा परिणाम अधिक. त्यामुळे तास रटाळ होत नाही.  मात्र आपण त्याचा वापर कसा करतो यावर सारं काही अवलंबून आहे.
आजकाल मी कित्येकांना पीपीटी (पॉवर पोइंट प्रेझेन्टेशन) वापरताना पाहिलंय. परंतु एकदा पीपीटी बनवली की वर्षानुवर्षे तिच राहते. बरं त्या स्लाईड वर भरपूर माहिती दाखवली जाते. वर्गात जाऊन फक्त त्या स्लाईड वर पेस्ट केलेलं वाचून दाखवायचं. त्यामुळे मूळ हेतूलाच धक्का पोचतो आहे.
तंत्रज्ञान हे मदतीसाठी आहे. ते प्राथमिक होऊ शकत नाही. गणितासारखा विषय पीपीटी वर दाखवून चालणार नाही. शिक्षक ज्ञानदान पद्धतीमधील सर्वात महत्त्वाचा घटक. त्यामुळे त्याची जबाबदारी ही जास्त.
माहिती प्रक्षेपित करण्यासाठी, साठविण्यासाठी, तयार करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी किंवा तिची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे म्हणजे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. यामध्ये व्हिडियो, डिव्हिडी, स्मार्ट फोन, संगणक आणि त्याला लागणारे  हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ई. चा  समावेश होतो.
इन्टरनेट मुळे क्रांती झाली. आवश्यक असलेली माहिती तत्काळ उपलब्ध होते. गुगल, याहू, बिंग सारख्या सर्च इंजिन वर फक्त क्लिक करा. किती सारे पेजेस उपलब्ध होतात.
आजच्या काळातील विद्यार्थी हा फक्त शिक्षकांवर अवलंबून नाही. यामुळे आतापर्यंत शिक्षककेंद्रित असणार्‍या शिक्षणपद्धतीत नवा बदल घडून आला आहे. आतापर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत असत मात्र आता विद्यार्थी देखील स्वतः इंटरनेट वापरून माहिती मिळवू शकतात. म्हणजेच शिक्षणपद्धती विद्यार्थी केंद्रित होत आहे.
मागणी आणि प्रतिसाद या तत्वावर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान काम करते. त्यामुळे शासन, खाजगी उद्योगधंदे, शाळा, विद्यापीठे एवढेच नव्हे तर अशासकीय संस्थासुद्धा माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करतात.  आय.सि.टी. चा फक्त शिक्षण क्षेत्रात नव्हे तर बँकिंग, मेडिकल,लॉं, टुरिझम अशा अनेक क्षेत्रात शिरकाव झालाय.
आज आपण घरी बसून आपण ऑनलाईन कोर्स जॉईन करून शिकू शकतो. मासिव ओपन ऑनलाइन कोर्सेस जसे की खान अकॅडेमी, स्वयम/एन.पि.टी.ई.एल. सारखे पोर्टल उपलब्ध आहेत. व्हिडीओ लेक्चर्स च्या माध्यमातून माहिती आपल्यापर्यंत पोचते.  त्यांच्या परीक्षा ही ऑनलाइन.
यामुळे वेळेची, पैशाची बचत होते. कित्येक विद्यार्थ्यांना मोठ-मोठ्या शहरात जाऊन क्लासेस लावणे शक्य होत नाही. मग ते ऑनलाइन कोर्सेस चा आधार घेतात.
शिक्षकांसाठी भरपूर अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. गूगल क्लासरूम, मूडल, गुगल फॉर्म सारख्या सुविधा वापरून विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहता येते. त्यांच्याकडून हवं ते करवून घेता येते.
विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न आता ते स्वतः शोधू शकतात आणि त्याचे समाधान करू शकतात. पारंपारिक शिक्षणाच्या सोबत तंत्रज्ञानाचा वापर केला तरच ते अधिक फायदेशीर ठरेल. 
आज नर्सरी पासून स्मार्ट क्लासरूम आहेत. प्रोजेक्टर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कथा/कविता शिकवल्या जातात.  यु-ट्यूब वर हजारो व्हिडीओ उपलब्ध आहेत कुठल्याही विषयावर.
एवढं सारं असून आव्हानं कमी नाहीत. किती शिक्षक तंत्रज्ञाचा वापर करतात? किती शिक्षकांना ते माहित आहे? किती शाळांमध्ये तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता आहे. यावर सर्व अवलंबून.
सुविधा असून चालत नाही. त्यांचा योग्य प्रमाणे वापर व्हायला हवा.
गुगल क्लासरूम किती लोकांना माहित आहे? हा मोठा प्रश्न.
प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेच्या विद्याथ्यांना परिपक्वता कमी असते. त्यांना आपण कसं शिकवतो/घडवतो ते महत्त्वाचं. त्यांच्या हाती तंत्रज्ञान देणं कितपत योग्य. आजकाल मोबाईल वापरणारी पिढी काय सर्च करते ते पाहिलं तर आव्हानं किती जास्त आहेत हे लक्षात येईल.

ICT असूनही शिक्षकाचं महत्त्व कमी होत नाही. व्हर्च्युअल होणं हे काही उद्दिष्ट होऊ शकत नाही.
ज्ञानाची आदान-प्रदान करताना माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान याचा आपण वापर कसा करतो त्यावर त्याची परिणामकारकता अवलंबून.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव