Thursday, May 14, 2020

असंच काहीतरी-६


....तुझा आणि माझा सहवास हा अलीकडच्या काळातला...... म्हणजे गेल्या सहा-सात वर्षातला. आमच्या सारख्या सामान्य माणसापर्यंत यायला तुला फार वेळ लागला. साधा संभाषण पुरता मर्यादित असलेला तू हळू हळू जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला. म्हणजे अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजा मध्ये तुझाही क्रमांक लागला. जीवनाचा प्रत्येक भाग तू पादाक्रांत केलास. पूर्वी आत्मनिर्भर असणारं आमचं जीवन निर्भर कसं झाल समजलं नाही..............
आता हे  बघ ना, या लॉक डाऊन मध्ये सगळे घरात आहेत............भेटी-गाठी होईनात.....  तरी कोण काय करतेय ते तू पोचवतो आहेस ना सगळीकडे. फक्त toilet चं रिपोर्टिंग बाकी राहिलंय आता. येत्या काळात कुणास ठाऊक ते ही होईल.  ते रिपोर्टिंग बद्दल तर व्हिडीओ, स्टेटस येतात. काय करतोय, काय खातोय, कुणी बनवलं, कसं बनवलं अशा कित्येक गोष्टी तसेच  anniversery, वाढदिवस त्या मध्ये वन मंथ, टू मंथ पासून पुढे, अमका दिवस-टमका दिवस, शुभेच्छांचा वर्षाव, स्टेटस आणि नंतर स्टेटस चे स्टेटस रिपोर्टिंग करतो तू. बघणारे झूम करू करू बघतात रे पिक्चर फाटेपर्यंत... ओघाने येणारे लाईक आणि कमेंट पाहून आनंदाच्या उकड्या फुटतात रे.....काहीतरी वेगळ असल्याचा, सेलिब्रिटी असल्याचा भास.....तू नसता तर कसं झालं असतं ना या लॉकडाऊन मध्ये. केवढा तुझा आधार सर्वाना.....
तसा मलाही...पण काल परवा तुझा अपघात झाला ...तो होणारंच होता...हवी तशी काळजी घेतली नाही की कधी कधी अपघात होणारंच...अपघात झाल्यावर एक दिवस कसाबसा तू काढला आणि निरोप घेतला. ऐरवी मी आणि तू एक समीकरणच. तू नेहमी सोबतच. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत. तू सोबत असलास की जगात मी एकमेव ज्ञान संपन्न असल्याची भावना साऱ्यांचीच. हल्ली तू एवढं वेड लावलय की लहान पासून वृद्धांपर्यंत तुझी क्रेझ आहे. जिकडे बघावं तिकडे तुझं साम्राज्य आहे. तू घड्याळ, calculator संपवले आता टीव्ही सेट वर तुझा डोळा आहे. ते ही तू येत्या काही वर्षात संपवणार यात शंका नाही.

आज तुझ्याविना दिवस काढला. कधी नव्हे ते दुपारी निवांत झोप काढली. हाताच्या बोटांना, डोळ्यांना आराम मिळाला.  आपल्याकडे भरपूर वेळ उपलब्ध आहे हे कित्येक वर्षानंतर समजलं. सर्व सामान्य लोकांच्या आवाक्यात तू जेव्हा पासून आला तेव्हापासून लेखक, कवी, तज्ञ, गायक, संशोधक, राजकारण/समाजकारण/आर्थिक अशा सार्या क्षेत्रातील विचारवंत गल्ली-गल्ली मध्ये निर्माण झालेत. तुझ्यामुळे लोकांची Creativity बहरली आहे. आता बघा ना काहींनी चड्डी प्रकरण सुरु केलंय. त्यावर विनोद, कविता, विडंबन जोरात सुरु आहे. जगासामोराचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असल्यागत भाव जाणवतोय. एकीकडे कोरोना ने हाहाकार केलाय आणि आपली लोकं, तथाकथित विचारवंत, विचारप्रणालीचे अनुयायी एकमेकांवर तुटून पडत आहे....मात्र चड्डी कोण धुणार...मी नाही...ज्याचं त्याने...वगैरे वगैरे...आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न असू शकतो. लोकांच्या कल्पकतेला बारा तोफांची सलामी द्यायला हवी........
तू लोकांना जोडलं की तोडलं संभ्रम आहे मनात. It has brought the world closer असं वाक्य अनेकदा कानावर पडलं. पण आजकाल जिकडे पाहावं तिकडे भांडणं सुरु असतात कित्येकांची, कधीही न भेटलेल्यांची. भाषेचा स्तर तर विचारायला नको. सुसंस्कृत वगैरे शब्द फक्त बोलायचे झाले. त्या झुक्याने वाल उपलब्ध करून दिली. पोस्टी च्या पोस्टी असतात तिथे. चांगल्या, वाईट, सोज्वळ, अश्लील, विनोदी, गंभीर, प्रबोधनपर, राजकीय/अराजकीय अश्या सगळ्या प्रकारात मोडणाऱ्या. तिथे समाधान नाही झालं तर टीव टीवाट, टिक-टोकं आहेच ना.............
तू याला कारणीभूत आहे की माणूस हा प्राणी मुळातच तसा आहे. मत-मतांतरे असू शकतात. तू माणसाच्या हातात आला आणि झपाटून टाकलं त्यांना. कशाचीच भ्रांत नाही. समोरच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही. बरं तू त्या मायाजाल च्या साथीनं एवढं काही उपलब्ध करून दिलं की खरं काय आणि खोटं काय यातच गफलत होऊन बसली. तू त्यावर थांबला नाहीस तर जगाला ज्ञान-समृद्ध करणाऱ्या पुस्तकांनाही  निवृत्त करून टाकलस. भाषेचं तर विचारायची सोय नाही. जेवढी मोडतोड केलीय ती आजगायत कधीच झालेली नसेल............
तू एवढ्यावर थांबत नाहीस. लोकांचे रंग/रूप ही बदलून देतो. मी किती छान दिसतो अथवा दिसते ची जाणिव करून देतो ती पण खोटी खोटी. आभासी. आभास. सत्यापासून लांब घेऊन जातोस सार्यांना.....
तुझ्या एका क्लिक नं समोर भांडार उघडते. त्या भांडरातल मात्र नको असलेलं घेतलं जाते आणि कामाचं सोडून दिलं जाते. जे वैयक्तिक आहे, खाजगी बाब आहे त्याचा ही तू भांडाफोड करायला भाग पाडलस लोकांना. आणि जगासमोर आणण्याची चढा-ओढ सुरु झाली. हल्ली लोकं तुला चड्डी कपडे  घालायला लागले मात्र स्वतः घालायला विसरून जात आहेत. किती बदल झालेत तुझ्यात. सुरुवातीला अतिशय साधा होतास तू. अल्पावधीत  स्मार्ट झालास पण आम्ही मात्र मात्र गाढवं. माणसाची प्रगती झाली की अधोगती यात गफलत आहे.  तू स्टेटस सिम्बॉल झालास सर्वांसाठी. तू किती महागडा यावरून श्रीमंतीचा अंदाज येऊ लागला. डोळ्यांनी फार दिसत नाही तरी तपासणी करून चष्मा लावत नाही लोकं, सत्तर –पंच्याहत्तर हजारांची गाडी घेतलेला व्यक्ती हजार रुपयाच हेल्मेट घेत नाही किंवा चाळीस पन्नास हजाराचा laptop घेतला की दोन-तीनशे रुपये security साठी घालवत नाही. पण तुझ्या बाबतीत व्यक्तीचा स्वभाव वेगळा. तुला विकत घेतला की लगेच कपडे परिधान केले जातात सुरक्षित राहावं म्हणून...........
माझ्या ओळखीत ल्या एका व्यक्तीन मुलगी हट्ट करून बसली म्हणून पंधरा हजार रुपये व्याजाने घेऊन तुला खरेदी केलं............  
एवढंच काय तुझ्या मदतीनं कोण कुठं फिरायला गेलं त्याची इत्यंभूत माहिती माहिती मिळते. ते पण लाइव्ह.  पण त्या तुझ्या माहितीनं आमच्या घरात राडे होतात ना भाऊ. काय सांगू तुला? आमचं सुखी आयुष्य ही तुला पाहवत नाही राव................
तू प्रवेश केला आणि अर्थकारण बदललं. तुझ्या मदतीने नाही किती गले-लट्ठ झालेत. अच्छे दिन आणलेत की  कित्येकांना.....
तुझ्या येण्यानं जगण्याचे संदर्भ बदलले. चोवीस तास सोबत असतो तू. क्षणा-क्षणाची खबर बात कळत असते. सकाळी toilet ला गेलो तरी तू साथ सोडत नाही. किंवा तुझी साथ सोडवत नाही. प्रत्येकाला तू हवा-हवासा वाटतो........  
आज दिवसभर कसं शांत वाटलं.............जगात काय सुरुय याचा गंध ही नाही............. कोण काय म्हटलं, कोण ट्रोल झालं, कुणी टीका केली, कुणाचं काय प्रत्युत्तर ....काहीच माहित नाही. मेंदूला ही आराम मिळाला. अन्यथा कोण बरोबर, कोण चूक यावर विचार करण्यात किती वेळ जातो काय सांगू.............
तुझ्याशिवाय जगणं कठीणच. मी पुन्हा तुझ्याकडे येईलच.............
तो पर्यंत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतो. तसंही आमच्या ५६ इंच वाल्यांनी, आत्मनिर्भर भारतचे प्रणेते, जुमालाकार, प्राईम टाईम वाले भाषण बहाद्दर यांनी आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिलाच आहे.  (पण सगळे आत्मनिर्भर झाले तर सृष्टी कशी टिकायची हा प्रश्न मला भंडावून सोडतो.)...................जमलं तर ठीक नाहीतर तू आहेसच की.............    
तो पर्यंत अलविदा!!!

सचिन भगत (९९२२१२७३८५)                                              
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव