आज त्या
गोष्टीला जवळपास नऊ वर्ष झालीत. विसरून गेलो होतो ते सगळं. २००३ साली मी जळगाव ला
गेलो पदवी पूर्ण करण्यासाठी. सगळं नवीन होतं. पहिल्यांदाच वसतिगृहात राहत होतो.
स्वतंत्र असल्याचा भास व्हायला लागला होता. वाटेल तेव्हा झोपायचं नि वाटेल तेव्हा
उठायचं. सगळ कसं छान चाललं होतं. नवीन मित्र-मैत्रिणी मध्ये वेळ निघून चालला होता.
पहिलं वर्ष कसं संपलं ते नाही कळल. खरं तर कळण्याचा कधी प्रयत्न नाही केला. सगळ्या
गोष्टी व्यवस्थित सुरु होत्या. आनंदात जगणं सुरु होतं. जळगाव या शहरानं खूप काही
दिलं. बरेच चांगले वाईट प्रसंग हि दिलेत. पण जीवनाचा एक भाग म्हणून मी ते सोडून हि
दिलेत.
दुसर्या
वर्षाला सुरुवात झाली होती. काही नवीन चेहरे वर्गात दिसायला लागले होते. नवीन
प्रवेश घेतलेला त्यांनी एम जे कॉलेज मध्ये. पहिलं वर्ष दुसर्या कुठल्यातरी कॉलेज
मध्ये केलं असेल. या चेहऱ्यामध्ये एक चेहरा माझ्या कायम लक्षात राहिला. तसं तिची
नि माझी ओळख नव्हतीच. मग काय सुरु झाला तिचा विचार. माहित नाही पण तिचं ते वावरणं मला
भावून गेलं. दिवसांमागून दिवस जात राहिले. माझी झोप हि कुठतरी हरवली होती. काही पण
करून तिच्याशी बोलायचं होतं. पण तशी संधी ती येऊ देतच नव्हती. दोघांचे विषय हि
वेगळे होते. माझी अस्वस्थता वाढत चालली होती.
मला आजही तो
दिवस आठवतो जेव्हा तिच्याशी माझं पहिल्यांदा बोलणं झालं. १४ जानेवारी २००५. मकर
संक्रांतीच निमित्ता न आमच बोलणं झालं. तिथून खरी सुरुवात झाली. भेटी वाढल्या
होत्या. काहीतरी निमित्त काढून मी बोलण्याचं प्रयत्न करत होतो. माझ्यासाठी ते नवीन
होत. नेहमी सगळे तास करणारा मी वर्गात कमी आणि बाहेरच जास्त राहत होतो. ती कधी
येते नि कधी जाते. पाठलाग करून कुठ राहते सगळी माहिती तयार होती माझ्याकडे. मला
तिच्याशिवाय करमत नव्हतं कॉलेजला. ज्या दिवशी ती यायची नाही तो दिवस माझ्यासाठी निराशेचा
होतं. तिला पाहिल्याशिवाय मनाला शांती मिळत नव्हती. या चक्रात अभ्यास बाजूला पडला होतं.
ध्येय तर विसरलो होतो. सगळं कळून पण वळत नव्हतं.
असंच एके
दिवशी ती ११ वाजता कॉलेजला आली. मी वाट पाहत होतोच. हि वेळ म्हणजे तास संपलेले
असायचे. थोडं फार बोलणं झाल्यानंतर मी तिला म्हटलं “चल, चहा घेऊया बाहेर”. ती हो
म्हटली. तो आंनद शब्दात सांगता येणार नाही. आणि तसा आनंद परत कधी माझ्या आयुष्यात
आला नाही. तास-दोन-तास गप्पा झाल्या. नंतर ती निघून गेली. पण मी मात्र तिथेच होतो.
सगळे प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होतो. तो दिवस फार आनंदात गेला. पण हे किती दिवस
चालणार. एके दिवशी सांगूनच टाकूया म्हटलं तिला. पण ते काही जमलं नाही. म्हटलं तर
आम्ही रोजच भेटत होतो. पण तिला मला तू खूप आवडते अस सांगायची हिम्मत कधी झाली
नाही.
तिच्या
प्रेमात तीन वर्ष कसे संपलेत हे समजण्याआधीच मी जळगाव सोडण्याचा निर्णय घेतला.
पुणे विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर तिला जाण्याआधी एकदा भेटलो. खूप गप्पा
केल्या. ती बोलत होती नि मी ऐकत होतो. स्थळ होतं “पपिलोन”. ती आमची शेवटची भेट.
परत तिला कधी पाहण्याचा योग आला नाही. प्रेम मनात राहून गेलं. पुण्यात गेल्यानंतर काही
काळ संपर्क होता पण तो हि नंतर बंद झाला. आजही तिचा तो निरागस चेहरा आठवला कि
अस्वस्थ होतो. तीची ती शेवटची भेट मी कधीही विसरू शकत नाही. तिचं ते शेवटचं वाक्य “तुला
काहीतरी सांगायचं आहे पण तू नेट-सेट पास झाल्यानंतरच सांगेन”. दुर्दैवाने मला पास
व्हायला तीन-चार वर्ष लागलीत. मध्यंतरी तिचं लग्न झालं असं कळाल. सगळी आशा संपली. काय
सांगायचं होत तिला हा प्रश्न अजून हि त्रास देतो मला. तीही माझ्या प्रेमात होती
का? तेच तिला सांगायचं होत का? कुणास ठाऊक.
हे नाही तर काय सांगणार होती ती. मला कधी कळलंच नाही. आज हि तो प्रश्न
मनाला सतावतो. आजही तिची खूप आठवण येते. खूप विसरण्याच्या प्रयत्न केला. पण जेवढा
जास्त प्रयत्न केला तेवढी तिची जास्त आठवण येत राहिली. तिच्यासोबत घालवलेले सगळे क्षण
आठवतात.
तिला पाहण्यासाठी किती वेळा ओमकारेश्वर च्या मंदिरावर
गेलो. प्रत्येक सोमवार ला ती तिथं यायची. फक्त तिला पाहण्यासाठी हा खटाटोप चालायचा.
आयष्यात खूप वेळा प्रेम झालं पण तिची जागा कुणी घेऊ शकलं नाही. प्रत्येक गर्ल
फ्रेंड मध्ये मी तिलाच शोधायचो. त्यामुळे कुठलंच प्रेम चार-पाच महिन्यांच्या
पलीकडे गेलं नाही. मला हि त्याचं कधी काही वाटलं नाही. तिला पाहण्याची आजही इच्छा
आहे फक्त एकदा. ती कुठं आहे माहित नाही आणि मी जाणून घेण्याचा प्रयत्न हि केला
नाही. तरी पण ती कुठंतरी भेटेल या आशेवर जगतोय. फक्त तिला बघायचं आहे एकदा
डोळेभरून. बाकी काही नाही.
खूप वेळा वाटलं माझंच चुकलं. मी तिला सांगायला हवं
होतं. पण मला गमवायचं नव्हतं तिला माझ्या आयुष्यातून या भीतीनं मी कधी काही बोललो
नाही. कित्येक कठीण प्रसंगी तिनं मला साथ दिली. हक्कासारखं बोलतं होती. रागवत होती,
पण काही क्षणापुरतं. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव अजून मनातनं जात नाहीत. तिला विसरू
शकत नाही पण विसरावं लागणार हे सुद्धा तेवढं च सत्य. काय होईल ते माहित नाही. पण
माझं तिच्यावर प्रेम होतं ,आहे आणि राहणार. ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे.
तिच्यामुळे कठीण वाटणार्या कित्येक गोष्टी सोप्या झाल्या. मला यशस्वी व्हायचं होतं
ते फक्त तिच्यासाठी. आज सगळं आहे पण ती नाही. तिला अपेक्षित असलेलं मी मिळवलं आहे
हे सांगायला हि ती जवळ नाही. वाईट वाटत ते याचं. जळगाव ला गेल्यानंतर आजही आम्ही
जिथं भेटायचं तिथं जातोच. नकळत भूतकाळात जातो. ती सगळी दृश्य नजरेसमोर येतात आणि मनात
भावनांची गर्दी होते. जळगाव साठी आत्मीयता आहे ती तिच्यामुळे. तिला खूप शोधून झालं
फेसबुक वर पण नाही सापडली. किती वेळा शोधलं. पण नाही सापडली. तरी पण आशा अजूनही आहे
कधीतरी सापडेल. एकदातरी तिच्याशी बोलतं येईल. मी वाट पाहीन तिची शेवटच्या
क्षणापर्यंत.
-सचिन भगत
No comments:
Post a Comment