Saturday, March 10, 2018

अनुभव-३

माझं गाव आकाराने आणि लोकसंख्येने ही लहान. दहावी पर्यंत शिक्षण ही तिथेच झालं. मी लहान होतो. फार काही कळत नव्हतं. मुळात त्या वयात काही कळण्याची अपेक्षा ही नसते. हिवाळ्यामध्ये आमच्या गावामध्ये दररोज सकाळी सहा वाजेच्या आसपास पाव विक्रेते यायचे. गल्ली-गल्लीतून फिरत असताना ते “ए पाव वाले म्हणून ओरडायचे”. थंडीचे दिवस असल्याने उशिरा उठणे तसं नेहमीच असायचं. पण ते “ए पाव वाले” ऐकू आलं कि मला जाग यायची. उठून मी रोज घराबाहेर येत होतो. आर्थिक परिस्थिती काहीच नसल्याने पाव कधी मिळायचे नाहीत. दोन-तीन पाव विक्रेते असल्याने हा गेला कि तो असं चक्र सुरु असायचं. जो पर्यंत ते फिरत असायचे तो पर्यंत मी भिंतीवर बसून त्यांच्याकडे पाहत असायचो. कधीतरी आपल्याला मिळेल या आशेवर तो हिवाळा निघून जायचा. दुसर्या वर्षी पुन्हा तेच. असं कित्येक वर्ष हे चक्र सुरु राहील म्हणजे समज येईपर्यंत. कित्येकदा तो पाव वाला माझ्या स्वप्नात दिसायचा पण स्वप्नातही ही हुलकावणीच दिली. स्वप्न तर चांगलं यावं. ते ही नशिबी नव्हतं.
कोवळं मन. जे हवं होतं ते कधी मिळालंच नाही. किती आघात एका छोट्याश्या गोष्टीसाठी. एक प्रकारे अत्याचारच. चार आण्याला एक पाव. ती सुद्धा ऐपत नव्हती. मी मात्र त्या केविलवाण्या नजरेने त्या विक्रेत्यांना पाहत राहायचो. साधारण एकतास त्या भिंतीवर बसून असायचो. आपल्याला ते मिळणार नाही हे माहित असायचं.पण ते वयच तसं. त्यात कसलीही जाणीव नसतेच.मला आजही ते प्रसंग जसेच्या तसे आठवतात. कित्येकदा मी घरी मागत होतो पण व्यर्थ. तो रडवेला चेहरा , ती भिंत , तो पाव वाला कधी कधी म्हणायचा पाहिजे का? मी फक्त नकारार्थी मान हलवत होतो. ते गेल्यानंतरही तो आवाज ए पाववाले हा आवाज माझ्या कानात घुमत असायचा. ४-५ लहान मुलंही त्यांच्या मागे फिरत असायची. काही मुलं रोज ते पाव विकत घ्यायचे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला की माझ्या निराशेत अजून भर पडायची. काही तर मला ते पाव दाखवून पळून जात होते. त्या वयात ह्या गोष्टी म्हणजे नेहमीच्याच. त्यात काही विशेष नाहीच. तेच तर लहानपण. इंनोसंस म्हणतो ना ते. नंतर ते लुप्त होऊन जाते. 


पण या परीस्थीनेच मला घडवलंय. त्या नकाराने च मला बळ दिलं आहे ते बदलण्याचं. अश्या लहान-सहान प्रसंगातून आमची जडण-घडण झाली. त्या २५ पैश्याची किंमत कदाचित आता नाही कळणार. पण किंमत ती खूप होती. नाही मोजता येणार. त्यातून येऊ शकत असलेला आनंद ही आता उपभोगता येऊ शकत नाही. गरिबी काय असते ते अनुभवलंय. पावलागणिक संघर्ष आणि फक्त संघर्ष. त्या संघर्षानेच मन घट्ट झालंय. कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण झालीय. नंतर ही कित्येक समस्या आल्या. कुठलीही समस्या सोडविण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते ती म्हणजे -कधी माणसांची, कधी पैश्याची तर कधी वेळेची गरज असते. सुदैवाने ते सहकार्य मिळत गेलं आणि प्रवास सुरु राहिला.
आजही भूतकाळात जातो तर अश्या कित्येक गोष्टी नजरेसमोर येतात. पण प्रत्येक गोष्ट नाही लिहिता येत. हे चित्र माझ्या बाबतीत नाही तर कित्येकांनी ते अनुभवलंय.
सचिन भगत