Thursday, December 12, 2019

घर...


काल नट सम्राट हा चित्रपट पाहत होतो. चौथी-पाचवी वेळ असेल. कितीही वेळा पाहावं मन तृप्त होत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक व्याक्य यांचे अर्थ मला नव्याने गवसतात प्रत्येकवेळी. गवसत जातात.  काल ही तसंच झालं.
तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या प्रतिभेने विस्तारलेले नाटक 'नटसम्राट'. त्यावर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' हा चित्रपट.
काल त्या नट सम्राट च्या ह्या ओळी आवडल्या. आणि कित्येक वेळ मी त्यावर चिंतन करत राहिलो.
कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का ?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या
मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय.
जिथून  कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.
कुणी घर देता का घर ?...


घर...इवलासा  शब्द. पण अक्ख आयुष्य बदलण्याची ताकद ठेवणारा. त्याच्यासाठी संघर्ष तसा प्रत्येकाचा.
स्वप्न...प्रत्येक व्यक्तीचं. गरीबांपासून मध्यमवर्गपर्यंत. आजही कित्येक विद्यार्थी शिक्षण घेत असताना नोकरी लागल्यानंतर घर प्रत्यक्षात आणायचं स्वप्न उराशी बाळगतात. कधी लवकर कधी उशिरा. प्रत्यक्षात येते पण. आपलं स्वतःच घर असावं असा विचार न करणारा व्यक्ती जगाच्या पाठीवर सापडणार नाही.
मी  पण त्यातला एक. पावसाळ्यात रात्री-बेरात्री कोसळणारा पाऊस आणि कुठे कुठे गळतेय त्याचा शोध घेऊन खाली काहीतरी म्हणजे भांडी वगैरे ठेवण्यासाठी उडालेली तारांबळ, हिवाळ्यात कडाक्याची थंडी.  अस्वथ रात्री. त्या प्रत्येक रात्रीने एक स्वप्न तयार केल. लढण्याची प्रेरणा दिली.
घराबाहेर पडलो ते त्या घरासाठी. पण प्रत्येक गोष्ट वाटते तेवढी ही सोपी नाही. नोकरी लागली म्हणजे घर होत नाही. भांडवल उभारणे हा पहिला प्रश्न. त्यात खाजगी नोकरी असेल तर बँका ही टोलावतात. तसंच झालं. सरकारी बँकांचे उंबरठे झिजवून झाले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी एका फायनान्स कंपनीकडून भांडवल उभं झालं. व्याज तसं जास्तच. आणि मग ई.एम.आय. चं चक्र सुरु झालं. असो.
घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून अशी एक म्हण प्रचलित आहे. त्याचा प्रत्यय घेतलाय. या दोन्ही गोष्टींवर कितीही खर्च करा समाधान कधीच मिळत नाही. प्रत्येकजण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतो या दोन्ही गोष्टींवर. लोकं काय म्हणतील, समाज काय म्हणेल असे अनेक प्रश्न असतात मनात.  
घर...स्वतःच असलं काय आणि भाड्याचं असलं काय...काय फरक पडतो? आपण समज करून घेतलेय वेगवेगळे. निवारा हवाय. कुठल्या घरात मिळत मिळतो ते महत्त्वाची नाही. पण आपल्याला तेच महत्त्वाचे झालंय दुर्दैवाने.
मध्यंतरी एक मित्र म्हटला, घर कधी घेणार आहे?
आहे की गावाला. आता अजून कशाला? ते पुरेसं आहे. मी उत्तरलो.
मग इथे भाड्याचा घरात राहणार का आयुष्यभर? त्याने विचारलं.
हो...काय होतं. छान आहे. मी उत्तरलो.
स्वतःच्या घराचं समाधान तुला नाही कळणार? तुला काय माहिती? तो सहज बोलून गेला.
मी म्हटलं, असेलही. पण मला माहित ही करून घ्यायचं नाही.
त्यानं विषय पुढे रेटला नाही. मी ऐकणार नाही हे त्याला माहित होतं. तो तसा हुशार. जिथे संदेश पोचवायचा तिथे त्याने पोचवला. म्हणजे  माझ्या बायकोला मात्र सांगितलं. त्याला घर घ्यायला सांग म्हणून. आता पुढचं काही सांगायची काय गरज नाही. कारण सगळ्यांचे अनुभव सारखेच. कॅसेट सुरु.
या घराणे कित्येकांच्या मनात घर केलंय. ते काही पिच्छा सोडत नाही. म्हणजे कसं सारं ठीक सुरु असताना आपल्याकडे अजून हे नाही ही भावना वृद्धिंगत करणे आणि वर्तमान अस्वस्थ करणे नाही का?
घर...प्रतिष्ठा..स्टेटस चं प्रतिक. मी हे केलंय ते केलंय चा जयघोष.
एकदा एका शहरात गेलो होतो. एक मित्र अचानक भेटला. अनेक वर्षानंतर.
बरं झालं तू भेटला. चल, तुला घर दाखवतो. नवीन घेतलंय. अजून शिफ्ट झालो नाही.
पुढचा अर्धा तास त्या घरात फिरून झालं. बिल्डर ने काय दिलं. आपण additional काय करवून घेतलं. किचन, बाथरूम, toilet (इंडिअन/वेस्टर्न), या दिशेला त्या दिशेला, बेडरूम एरिया चांगला आहे. किती लाखात झालं. कॅश. वगैरे वगैरे पुराण.  मला त्यात फार काही रस नव्हताच. अनेक वर्षांनी भेटलो तर थोड्या गप्पा होतील अशी आशा होती. पण तसं काही झालं नाही. मी ही सोडून दिलं.  हाय-बाय करून निघालो.
किती घरांना घरपण राहिलंय? किती घरांमध्ये मोकळा श्वास घेता येतोय? आज त्या घरापेक्षा नाती टिकवणं, घरपण टिकवणं महत्त्वाचं झालंय. कितीही देखणं घर झालं म्हणून शांती, सुख नाही मिळत.
पूर्वी झोपड्या असायच्या. पण घरपण होतं. सकाळी...संध्याकाळी एकत्र जेवण्याची पद्धत होती. बायका सकाळी उठून सडा-सारवण करायच्या.  हे चित्र हद्दपार झालंय. आता घरं मोठ्ठी होताहेत...जेवढ्या भिंती त्या घरात आहेत त्यापेक्षा जास्त भिंती मनामनात झाल्या आहेत. दिसणारी भिंत पार करता येईल पण मनातल्या न दिसणाऱ्या भिंतींच काय? त्या दिवसेंदिवस वाढत जाणार. जाताना आपलं माणूसपण ही घेऊन जाणार.
कुणीतरी म्हटलंय:
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

आजकाल वेगळ्याच प्रथा पडल्या आहेत. त्यातली एक म्हणजे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळणे. ‘ग्रेट डेन, लॅब्रेडोर रिट्रीवर, बुलडॉग, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन असे अनेक. त्यांच्याशी गप्पा मारणे, संवाद साधने असं दैनंदिन जीवनात अथवा चित्रपटांमध्ये दाखवलं जाते. आसपास लोकं असताना आपला संवाद समाप्त संपलाय. प्रत्येक ठिकाणी असं होतं असंही नाही. काही अपवाद आहेत. घरपण टिकवून आहेत. अजूनही काही घरांमध्ये किमान एक वेळेस सोबत जेवण्याची प्रथा आहे.

एकत्रित कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धतीकडे आपण झुकलोय. घराला शोभा येते ती लोकांनी भिंतीनी किंवा कलरिंग ने नव्हे. कुणाला प्रायव्हसी तर कुणाला काय हवंय जे एकत्रित कुटुंब पद्धतीत शक्य नाही. यात कोण चुकीचं हे ठरवणं ही अवघड. कारण प्रत्येक जण आपल्याजागी योग्य. मग नेमकी काय गफलत आहे. चूक कोणाची हा प्रश्न उरतोच.
एकदा एका मित्रासोबत एका शहरात गेलो होतो. त्या शहरात काय काय विशेष म्हणून तो दाखवत राहिला. शेवटी म्हटला चल आता आपण प्लॉट पाहू. अलीकडेच घेतलाय. तो तिथं घेऊन गेला. रोड टच. नवीन वस्ती. मेन रोड लागून. दोन्ही बाजूला रोड. एवढी किंमत. असं ठरलं. तसं ठरलं. गुंतवणूक. भविष्यात राहायचं ठरलं तर बेस्ट लोकेशन अश्या अनेक डिटेल्स मिळाल्यात. माझ्या दृष्टीने हे सुद्धा पुराण. १५-२० मिनिटे तिथे उभे होतो.
येताना मी त्याला गमतीने म्हटलं, प्लॉट दाखवायला घेऊन आला होतास का?
दिलखुलास हसला. कमीना है तू. मुझे पता था तू ऐसा ही कहने वाला था. चांगला मित्र असल्याने गमती-जमती ओघाने आल्याच. 
घर ते घरचं...कुणाची झोपडी असेल, कुणाचं तीन-पत्र्याचं असेल, कुणाचं दगड-मातीचं असेल,  कुणाचं कॉंक्रीट चं असेल, कुणाचं छोटं, कुणाचं भलं मोठ्ठ जसं टू-थ्री बि.एच. के., कुणाची टोलेजंग इमारत, तर कुणाचं गगनचुंबी अपार्टमेंट मधलं एक. वगैरे. घरं तर मोठ्ठी झालीत. पण त्या घरांमध्ये लोकांची कमतरता आहे. भयाण शांतता. किलबिल नाही, गोंगाट नाही. गजबजलेला सहवास नाही. आपल्या आजूबाजूला कोण म्हणजे शेजारी कोण याचा पत्ता नाही. आजकाल मुला-बाळांना ही वेगवेगळ्या रूम्स आहेत अनेक ठिकाणी. सारे बंदिस्त. एकाच छताखाली पण कोसो दूर मनानं. कुणाच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा मागमूस नाही. सोबत असून नसल्यासारखी.

कुठल्या तरी देशात त्यांनी खेडी निर्माण केली आहेत म्हणे. लोकं येऊन राहतात तिथं काही दिवस पैसे देऊन. काय तर नैसर्गिक सान्निध्य. चुलीवरची भाकर म्हणजे स्वयंपाक.  जे सोडून गेलो आज त्याचा ध्यास.
पूर्वी पोळी मिळणे दुरापस्त होतं. आज भाकर मिळणे दुरापास्त झालंय. कित्येकदा हॉटेल मध्ये गेल्यावर ज्वारी, बाजरी ची भाकर आहे का म्हणून विचारणारे अनेक.
घर असलंच पाहिजे. पण आपला आवाका जपून. वेळ आली की होईलच ना. त्यावर आतापासून कशाला विचार करायचा? वैयक्तिक मत. सारेच सहमत होतील असं नाहीच. घरापेक्षा सध्याच्या घराला घरपण कसं येईल असा विचार करता येईल? सिमेंट च्या भिंती कधी पार करता येतील?  माणसा-माणसांमध्ये निर्माण झालेलं अंतर कधी कापता येईल?

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव