Friday, October 26, 2018

बदलता काळ, बदलते संबंध -३


जसा काळ बदलला, तसा माणूस बदलला. मनोरंजनाची अफाट साधने निर्माण झाली. पूर्वी ती नव्हती तेव्हा लोकांमध्ये संवाद भरपूर असायचा. ग्रामीण भागातलं चित्र पाहिलं तर ते प्रकर्षाने दिसून येईल. आता तंत्रज्ञान आलं. मनोरंजनाची साधने आली. आणि माणसाचा स्वभाव, वर्तन बदलत गेलं. पूर्वी संपूर्ण गावात एक-दोन टी. व्ही. संच. तेही फक्त दूरदर्शन. रेडीओ बर्यापैकी असायचा. विविधभारती चे कित्येक कार्यक्रम लोकप्रिय. ते जयमाला असो की सखी सहेली, पिटारा, संगीत-सरिता. खरं तर विविधभारती रेडियो वाहिनी ही प्रसिध्द झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे. बरंच काही बोलता येईल त्याबद्दल. क्रिकेटची मॅच जेव्हा असायची तेव्हा तेव्हा रेडिओची कॉमेट्री ऐकणे मजाच. मराठी समालोचन ऐकणे एक आनंदाची बाब असायची. चेंडु नुसताच तटवला ( प्लेड केला ), झेल घेतला ( कॅच घेतला ), धावबाद ( रन-ऑउट ), यष्टीरक्षक ( विकेटकिपर), गोलंदाज/ गोलंदाजी ( बोलर/ बोलींग ) हे शब्द तर ऐकणे आता दुरापास्त झाले आहे.
अलीकडच्या काळात सारं बदललं. प्रत्येकाच्या घरात टी.व्ही. चा प्रवेश झाला. टाटा स्काय, डिश टी. व्ही. एअर टेल सारख्यांनी भरपूर channels उपलब्ध करून दिली. आज २००-३०० channels सहज उपलब्ध आहेत २००-३०० रुपयांमध्ये. 
रेडिओ रोजचा राहिला नाही. एफ. एम. रेडिओ सुरु झाला, पण त्याच्यामध्ये ती मजा राहिली नाही. त्यात मध्ये मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि फालतू जोकमुळे तर अजूनच वैताग. शहरांमध्ये तर कानात हेडफोन टाकून एफ.एम. ऐकणार्यांची संख्या काही कमी नाही. त्यात भर सार्वजनिक वाहतूक सेवेच्या बस मधील एफ. एम. ची. जिकडे-तिकडे फक्त गोंगाट. आपण हरवलो आहे या गोंगाटात. 
पूर्वी संध्याकाळी लोकं एकत्र यायची. चावडीवर, पारावर, कट्ट्यावर बसायची. हिवाळ्यात शेकोट्या पेटवून अवती-भवती बसेलेले लोकं नित्याचंच. गप्पा व्हायच्या. परिस्थिती बदलली आहे. आज तसं नाही. चावडी, पार ओस पडलेत. शेकोट्या अभावानेच आढळतात. कुणाच्याही घरी जा टी. व्ही. सुरु असतो. अख्ख कुटुंब टी. व्ही. त मग्न. कुठंय चर्चा, कुठंय संवाद. कुणी पाहुणे आले तर ते पण टी. व्ही. पाहण्यात मग्न. सिरिअल्स च तर विचारायला नको. त्यांची कल्पनाशक्ती तर कधी नव्हे तेवढी रसातळाला गेलीय. लॉजिक चा पत्ता नाही. सासू-सुना वाद असो कि अजून काही चोथा केलंय त्याच-त्याच गोष्टींचा. हातात मोबाईल तर नेहमीचाच. त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे कित्येक पालकांना ठाऊकच नाही. भारतात तर पाहता पाहता गरीब-श्रीमंत, मालक-कामगार, स्त्री-पुरुष , तरुण-तरुणाई या सर्वांच्याच कानाला मोबाइल लागला. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या आवाजात त्यावरून बोलणे, अश्लील एसएमएस पाठविणे, वाहने चालविताना अपघात होण्याची तमा न बाळगता त्याचा वापर करणे वगैरे वगैरे. सुद्धा ओघाने आलंच. 
लहान मुल रडतंय म्हणून त्याचा हातात मोबाईल देणार्यांची संख्या काही कमी नाही. त्यात कौतुक. त्याला सगळं कळत. यु.ट्यूब लावता येत वगैरे वगैरे. घरात पालकच हल्ली स्मार्टफोन वरील फेसबुक व वॉट्स अ‍ॅप सारख्या सुविधांमुळे घरातील आपला वेळ या अ‍ॅप्सवर घालवतात. जिथे पालकच आपलं दायित्व विसरून गेलेत तिथे काय अपेक्षा करणार. खेळण्या-बागडण्याच वय वाया चाललं आहे. मोबाईल दिल्याशिवाय तो/ती जेवतच नाही असे कित्येक लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतंय.
पूर्वी शाळेतून घरी आलो, दप्तर फेकलं कि बाहेर खेळायला जाणारी मुलं आज घरातच अडकली आहेत. आउट डोअर गेम्स ची जागा कम्प्युटर गेम्स/ मोबाईल ने घेतलीय. मैदानी खेळ सुटल्याने मुलं व्यायामाला मुकत चालली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत आहे.
जीवन हि रिमोट झालंय आजकाल. लोकं ही रिमोट झालेत. news channels तर विकाऊ झालेत. त्यांना जे हवं असतं तेच आपल्याला पाहावं लागतं. या सार्यांचा परिणाम आपल्यातला संवाद नाहीसा किंवा कमी होण्यात झाला. संवेदना कमी होत चालल्या आहेत. ईतरांशी काहीच देणं-घेणं उरलं नाही. कामापुरते काम. पुढच्या १०-१५ वर्षात गंभीर चित्र दिसेल. त्याचे परिणाम हि आपल्याला भोगावे लागतील. तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा हे ठरवावे लागेल. शिक्षण द्यावं लागेल. जागरुकता निर्माण करावी लागेल. अतिरेकी वापर थांबवायला हवा. एकत्र यायला हवं. चर्चा झडल्या पाहिजेत. संवाद झाला पाहिजे. 
                                                                                                                                                       सचिन भगत