Tuesday, August 20, 2019

जागो ग्राहक जागो- भाग ४


प्रत्येकाला पैसा हवाय. हाव. त्यामुळे चेन मार्केटिंग सारखे प्रकार बाजारात आले. थोडक्यात वैयक्तिक संबंधांच्या साखळीमधून विकण्याचे तंत्र. त्यासाठी प्रशिक्षण ही दिले जाते. मोठ-मोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्या होतात. सक्सेस स्टोरीज सांगितल्या जातात. आणि आपण त्याला बळी पडतो. सॅनिटरी नॅपकिन पासून आजकाल चेन मार्केटिंग सुरु झालीय. एकाने मेंबर व्हायचं आणि मेंबर कनेक्ट करत जायचं ठराविक रक्कम भरून. आपण मेंबर झालो की मग नातेवाईक,परिचित, मित्र, शेजारी असे आपणही जोडायला सुरुवात करतो. एवढे सदस्य झाले की एवढा वाटा तुमचा असं ते ढोबळ स्वरूप. खूप मोठ्या प्रमाणात कमिशनचे प्रलोभन दाखवले जाते.  आकर्षक व्याजदर/नफा वगैरे . कित्येक लोकं या प्रलोभानापायी बुडालीत. मैत्रेय चं बघा काय झालंय. कित्येक लोकांचे पैसे बुडालेत. मालक/प्रतिनिधी (मार्केटिंग एजंट) कमवून बसलेत. सामान्य माणूस लोभेपायी देशोधडीला लागला. पैसे कधीतरी मिळतील अशी आशा कित्येकांना आहे. तसं अशक्यच. जाऊ द्या.
विमा क्षेत्रात सध्या भरपूर गुंतवणूक सुरु आहे. मोठ-मोठ्या बँका, कंपन्या ग्राहक मिळवण्यासाठी सरसावल्या आहेत. कित्येक लोकं आपण गेल्यानंतर काय या भितीने विमा काढतात तर काही गुंतवणूक म्हणून. मुळात विमा कशासाठी काढावा याचं ज्ञान समाजात नाही. विमा पॉलिसी नेमकं काय हेच कित्येकांना माहित नाही. विमा प्रतिनिधी फक्त ज्यावर जास्त कमिशन तेच ग्राहकांना सांगतात. खरं-तर विमा म्हणजे गुंतवणूक नाहीच.  प्रतिनिधीना टार्गेट दिलेले असतात. खरं-खोटं बोलून ग्राहक मिळवण्याची शर्यत सुरु आहे. असंख्य प्लान उपलब्ध आहेत. आपल्यामधील कित्येक त्याला बळी पडत आहेत. असाच एक प्रसंग.
मध्यंतरी आम्ही ट्रीप ला गेलो होतो. आठ-दहा लोकं. प्रवासा-दरम्यान इकडच्या-तिकडच्या गप्पा होतातच. प्रत्येक आपापले अनुभव सांगत होता. त्यात मी माझा विमा क्षेत्रा-संबंधित अनुभव सांगितला. माझी फसवणूक झाली होती. भांडून मी पैसे परत मिळविले. (जागो ग्राहक जागो- भाग २) आमच्यापैकी एकाची तशाच पद्धतीने फसवणूक झाली होती. विमा काढून ८-९ महीने उलटले होते. पन्नास हजार रुपये वार्षिक हप्ता. प्रतिनिधी त्यांच्या ऑफिस ला येऊन भेटली होती. माहिती सांगितली. यांनी ती स्विकार करून हप्ता ही भरला. ३-४ महिन्यानंतर त्यांना मेल आला कंपनीकडून. पन्नास हजाराचे ४१ हजार झाले होते. म्हणजे तो विमा गुंतवणूक म्हणून तर होताच पण subject to market risk.
त्या प्रतिनिधीने दिलेली माहिती अर्धवट होती. यांनी गुंतवणूक म्हणून विमा घेतला आणि त्या प्रतिनिधीने त्याला subject to market risk करून टाकलं. ते यांना माहित नाही. यांना मार्केट रिस्क नको होतं. झालं. आता पुढे काय? यांना काहीच माहित नाही. “फसवलं नं राव त्या बाईने मला”, असं ते तीन-चार वेळा बोलले.
मला पैसे परत मिळू शकतात काय? त्यांनी विचारलं.
विमा काढून बरेच महीने उलटले असल्याने मी साशंक होतो. विमा रद्द करण्याचा कालावधी हि संपला होता. त्याला फ्री लुक पेरिअड असं म्हणतात म्हणजे विम्याची कागदपत्रे मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला मला ते नकोय म्हणून रद्द करता येते. पण तो पर्याय हि समोर नव्हता.
त्यामुळे मी म्हटलं, प्रयत्न करूयात. रीतसर तक्रार दाखल करू.
ट्रीप वरून परत आल्यानंतर त्यांनी मला त्या विम्याचे कागदपत्रे दाखवली. नेमकं काय सांगितलं होतं आणि काय झालंय याची विचारपूस केली. तक्रार कुठे आणि कशी दाखल करायची हे माहित असल्यने फक्त कुठल्या मुद्द्यावर भर द्यायचा म्हणजे विमा रद्द होऊन पैसे वापस मिळतील यावर विचार केला. त्यानंतर तक्रार करण्यासाठी खालील मेल लिहिला:
Dear Sir/Madam,
I am XXX  from  Shegaon. Your representative visited me to get the policy from me. I agreed for the policy-No.00000000-XXXXX and paid 50000/-. I received the documents later on. I did not read it for many months. When I received official statement from your side (monthly policy charge details-All funds), the amount has been in decreasing order. This is not what your representative had conveyed me. As per her information, this was an investment policy. Now it has been revealed that it is subject to market risk. This was not conveyed by her.
It is clear that what she conveyed was not true at all. I still remember that she did not allow me to fill the policy documents. She said, “I will do it.” I trusted her. She has deceived me.
I have gone through the rules of IRDAI which clearly states that the policy documents have to be filled by me as I am an educated person. This has not happened in my case. Your representative did it. I only signed it. Now I realize why she did it.
I do not agree with this policy. I request you cancel my policy and return the amount with deductions as per the rules of IRDAI.
This is not the way to do the business. I am really disappointed by this type of business. Such type of business harms the image of XXX which is known for the best business and service.
I am writing this to you as I believe that justice will be done.
Kindly cancel my policy and return my amount.
If you don’t do it, I will approach Consumer Forum. The legal options are open.
The details of Policy: XXXXX
हे जसच्या तसं त्यांनी त्यांच्या ई-मेल वरून पाठवलं संबंधित कंपनीला. तक्रार आल्याने एक-दोन दिवसात काही प्रतिनिधी त्यांना येऊन भेटून ही गेलेत. मन वळवण्याचा ही प्रयत्न झाला. इकडून नकार. विमा काढताना रेकोर्डिंग करण्याची पद्धत काही बँका/कंपन्या करत आहेत. यांच्या बाबतीत रेकोर्डिंग झालं होतं. ते तपासण्यात आलं. रेकोर्डिंग खराब झाल्याने त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही.
प्रकरण अंगावर येईल असं दिसल्याने त्यातल्या एकाने हा प्रसंग दुसर्या प्रतिनिधीच्या माथी मारला. तो दुसरा प्रतिनिधी काही दिवसांआधी हे जग सोडून गेला होता. रीतसर प्रक्रिया पार पडली. जवळ-पास एक महिन्याने संपूर्ण रक्कम परत मिळाली.




आता सुशिक्षित लोकांना जर गंडवलं जात असेल तर अशिक्षित/सामान्य लोकांबाबत तर कल्पना करवत नाही.  फसवणूक करणारे सुशिक्षित. किती हा विरोधाभास. आपण ज्ञानाच्या/ नैतिकतेच्या गप्पा ठोकतो दोन-चार पुस्तके वाचली की पण ते अंमलात येत नाही.  कित्येक लोकं मागे लागतात /भेटतात  विमा काढण्यासाठी. बहुतांशी आपल्या आसपासचीच जास्त. नाही म्हटलं तर रुसवे-फुगवे. असा विचार करून विमा काढणार्यांची संख्याही काही कमी नाही. हे फक्त विम्याच्या बाबतीत नाही. तर बाजारात कित्येक प्रोडक्ट्स चेन मार्केटिंग पद्धतीने विकले जात आहेत.  
विमा काढू नये असं मत नाही. विमा चांगलाच. फक्त आपल्याला काय हवंय आणि ते मिळतेय का याची खात्री करायला हवी. कारण पैसा आपला. तो फुकटात मिळत नाही. त्याला मेहनत करावी लागते. संघर्ष करावा लागतो. कित्येकांची बोलणी ऐकावी लागतात. भविष्य चांगलं व्हावं म्हणून कित्येक स्वप्नांना तिलांजली दिली जाते.  ग्राहक सजग होणं काळाची गरज आहे. फसवणूक टाळण्याचा तो एकमेव मार्ग.

सचिन भगत (9922127385)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव