Monday, June 30, 2014

AT THE TWENTY NINE...



पाहता पाहता आयुष्यातले एकोणतीस वर्ष निघून गेलेत. यातली बरीच वर्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी खर्च झाली. आता ते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. एखादी गोष्ट मिळवायची. त्यासाठी वाटेल ते करावं आणि मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा. सगळं आयुष्य यातच निघून जाईल कदाचित. जीवन जगण्याची संकल्पना काहीतरी वेगळी होती सुरुवातीपासून. पण या भौतिकवादी जगात जिथं सगळं काही पैश्यासाठी सुरु आहे, मन रमत नाही. स्वतःसाठी थोडी भ्रांत हवी. विचार करावयाला वेळ हवा. नेमकं मी काय करतोय याची चाचपणी तर झाली पाहिजे. यातलं काहीच होत नाही. प्रत्येक क्षण काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत असतो. ती हाव च नको आहे. सामान्य माणूस यापलीकडे करू तरी काय शकतो. परिस्थिती च अशी निर्माण होत जाते कि आपण गोष्टींमागे धावायला लागतो मग इच्छा असो व नसो. तेच शेवटी जीवन होऊन बसते.

समजायला लागल्यापासून बरीच वर्ष उलटली. आत्मिक समाधानासाठी आतुर असलेलं माझं मन आता भरकटलं आहे. मनातल्या त्या संकल्पना हि नष्ट झाल्यात. मनालाही आता व्यवहारवाद योग्य वाटू लागलाय ज्याच्या कधी मागमूस हि नव्हता, ज्याचा मी कधी पाठलाग हि केला नाही, जी संकल्पना हि माझ्या मनाला कधी पटली नाही. आज त्याच आधारावर जीवन जगणं सुरु झालंय. हव्या असलेल्या गोष्टींचा पाठलाग करता करता काय मिळालं तर तो व्यवहारवाद. जग व्यवहारवादावर चालत असेलही पण ते माझं उद्दिष्ट नव्हतं. आयुष्य कमी झालं एका वर्षाने आणि येणाऱ्या अडचणीही कमी झाल्यात. असलं आयुष्य खूप पाहिजे या विचाराचा मी नाही.


एक वेळ होती कि वाढदिवस असला कि खूप संदेश, फोन यायचे. रात्री बारा वाजता जवळच्या लोकांचे फोन तर ठरलेले. आज ना कुणाचा एस. एम. एस. आला ना कुणाचा फोन. ते फार चांगलं झालं. कारण औपचरिकता मला कधी पटली नाही. तिसाव्या वर्षाची सुरुवात झाली. येणाऱ्या वर्षात आव्हानं हि भरपूर आहेत. त्यात मी कितपत यशस्वी होतो ते येणारा काळच ठरवेल. अर्ध आयुष्य संपलं असंही म्हणता येईल. किती वर्ष जगणार हे काही आपल्या हातात नाही. खूप गोष्टी करायच्या आहेत. ते मिळवताना कदाचित आयुष्य जगता येणार नाही मनासारखं. स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांचा आनंद महत्त्वाचा आहे. आयुष्य थांबल्यासारखं झालं आहे. नवीन गोष्टी होत नाहीत आजकाल. वाचन जवळपास संपल्यात जमा आहे. खूप प्रयत्न करून पाहिला पण एका पानापलीकडे वाचू शकलो नाही. रोज तेच तेच सुरु आहे. नाविन्याचा अभाव जाणवायला लागलाय.