Wednesday, October 31, 2018

अनुभव ७


जीवन एक चक्र आहे. प्रत्येक पावलावर ते आपल्याला अनुभव देत जाते. कधी चांगले कधी वाईट. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं अनुभव समृद्ध होत जातो. नवीन शिकत जातो. विद्यार्थी दशा प्रत्येकाचा जीवनातला महत्त्वाचा टप्पा. प्रश्नाचं स्वरूप वेगळ. त्याची उत्तरे हि आपल्याला शोधावी लागतात. छोटे छोटे प्रोब्लेम ही मोठे बनून जातात.  आमची विद्यार्थी दशा म्हणजे चोहोबाजूंनी अडचणी असलेली. जाईल तिथं समस्या, काही करेल तिथे अडचण. असाच एक अनुभव-
पुणे विद्यापिठात एम.ए. च्या दुसर्या वर्षाला असताना ची गोष्ट. आमच्या विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर ची दोन दिवसीय कॉन्फरन्स आयोजित केली होती. दुसरा दिवस होता.  कॉन्फरन्स सुरु व्हायला वेळ होता. आम्ही वेळेआधीच तिथे होतो. हिवाळा होता.  कोवळ्या उन्हात आमच्या विभागाचे एक प्राध्यापक महाशय काही महिला प्राध्यापाकांसोबत विभागाबाहेर बसलेले होते. चर्चा सुरु होती त्यांची. ऐकावं म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. तेव्हा या लोकांचं प्रचंड आकर्षण होतं. ओळख असल्याने गुड मोर्निंग सर म्हणून चर्चा ऐकू लागलो. त्यांनी ओळख करून दिली त्या महिला प्राध्यापकांची. विविध विषयांवर चर्चा सुरु होत्या. तू माझं कौतुक, मी तुझं कौतुक असं चक्र सुरु होतं.  साधारण अर्धा तास झाला असेल. आमचे प्राध्यापक महाशयांनी त्या महिला प्राध्यापकांना चहा घेऊयात असं म्हटले. त्या हो म्हटल्या. थंडीचे दिवस. चहा कुणाला नकोय?  आमच्या विभागाजवळ च ओपन कॅन्टीन आहे. रस्ता ओलांडला कि  कॅन्टीन मध्ये. प्राध्यापक महाशयांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हटले, सचिन, चहा घेऊन ये सर्वांसाठी. मी तेथून निघावं तेच त्यातली एक महिला प्राध्यापक अरे पैसे घे म्हटली. माझे पाय तिथे अडखळले  पण आमचे महाशय उत्तरले, “तो घेऊन येईल. असू द्या.”
खिश्यात दमडी नाही. सहा लोकं म्हणजे तीस रुपये हवेत. आता काय करावं? तेथून निघालो आणि कॅन्टीन ला आलो. ४-५ मिनिटे विचार केला.  त्या चहावाल्याकडे गेलो आणि म्हटलं “आमच्या ....सरांनी सहा कप चहा सांगितला आहे. ते नंतर पैसे देतील. तो व्यक्ती उत्तरला, “उन्होने नही बोला है उनके नामपर कुछ भी देनेका.” “अहो ते बसले आहेत सर तिथे. तुम्ही विचारू शकता, त्यांनीच पाठवलं आहे मला, मी आत्मविश्वासाने बोललो.” फार विचार न करता त्याने सहा कप भरले आणि माझ्या स्वाधीन केले. “खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं” या कधीतरी ऐकलेल्या तत्त्वाचा वापर झाला. खोटं बोलल्याशिवाय पर्याय नव्हता. चहा घेऊन तिथून निघालो.
प्राध्यापक महाशयांच्या चर्चा सुरु होत्या. चहा दिला.  thank you ... thank you आपले नेहमीचे शब्द कानावर आले. हसत-खेळत त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. दुसर्या दिवसाचं सेशन सुरु होण्याच्या बेतात होतं. त्यामुळे थोड्या वेळाने ते हॉल कडे जाण्यास निघाले. मला वाटलं, सर नन्तर तरी पैसे देतील. पण तसं काही झालं नाही.
ते निघून गेले. मी त्या रिकाम्या कपांकडे पाहत बसलो बराच वेळ. कॅन्टीन वापस न्यावेत कि नाही? पैसे मागितले तर काय बोलायचं? विविध प्रश्न होते डोक्यात. शेवटी मी ते कप उचलले आणि कॅन्टीन ला एका कोपर्यात ठेऊन आलो त्या चहावाल्याची नजर चुकवत. पुढचे पंधरा दिवस मी कॅन्टीन कडे फिरकलो ही नाही.
तसंही आमचे प्राध्यापक महाशय आणि महिला हे काही नवीन नव्हतं. बरेच किस्से चवीनं चर्चिले जात होते. वर्षभरात सिनिअर कडून कित्येक गोष्टी ऐकून सामान्य ज्ञान ओसंडून वाहत होतं.

विद्यार्थ्यांकडे पैसे असतीलच असं नाही. बरं सामन्यांकडे पोकेट मनी हा प्रकार नसतो. लाख –दोन लाख पगार असणार्यांनी तीस रुपये देऊ नयेत. कठीण आहे सारं. कदाचित त्यांना वाटलं असेल छोटी रक्कम आहे. पण आमच्यासाठी ती किती मोठी होती त्यांना नाहीच कळणार. खिश्यात दमडी नसताना किती दिवस काढले असतील? किती वर्षे काढली असतील? एका डब्यात दोन असो कि एक वेळचा डबा. डबे बंद असले की होणारे हाल कुणाला माहित? भूक लागली कि चहा वर निभावून न्यायचं. असंख्य वेळा झालंय, केलंय असं. भूक...या शब्दाभोवती फिरतं आपलं जीवन. ती नाही टाळता येत. नियंत्रण तर शक्यच नाही. उपाशीपोटी झोप लागत नाही. अभ्यास तर दूर राहिला. विद्यापिठात शिक्षणासाठी  येणारे असे कित्येक विद्यार्थी सापडतील ज्यांना हे अनुभव आलेत.
सचिन भगत

Monday, October 29, 2018

बदलता काळ, बदलते संबंध-४


१९९० च्या दशकात आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. उद्योगधंदे आले, बाजारपेठ खुलल्या, रोजगाराच्या संधी वाढल्या. मध्यम वर्गाच्या हातात पैसा खेळू लागला. तो पैसा कॅश करण्याचा प्रयत्न उद्योग जगताकडून सुरु झाला. नवीन नवीन गोष्टी बाजारात आणून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु झाला. तंत्रज्ञानाचा वापर हळू-हळू वाढायला सुरु झाली होती. या शतकाच्या सुरुवातीला खर्या अर्थाने प्रचंड उलथापालथ होण्यास सुरुवात झाली. भारतासारख्या बाजारपेठेला नजरंदाज करता येणं शक्यच नाही.
सुरुवातीला मोबाईल फोन आवाक्यात नव्हता. इनकमिंग-आउट गोइंग ला भरपूर पैसे पडत. अंबानींनी तो आवाक्यात आणला. सामन्यांच्या आवाक्यापलीकडे असणारा मोबाईल सहज उपलब्ध झाला. नोकिया चं साम्राज्य आठवत असेल. फिचर फोन घरोघरी झाला. coin बॉक्स, एस.टी.डी. कालबाह्य ठरले. मोबाईल फोन द्वारे संभाषण सुरु झालं. पैसे पडत. त्यामुळे मिस कॉल, मेसेज, रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत ६० रुपयात अमर्यादित बोलणं असे प्रकार सुरु झालेत. आम्ही कित्येकांनी ते केलंय. पैसे वाचविण्यासाठी मिस कॉल वर काम भागवणारे असंख्य होते. चुकून रिसीव्ह केला तर शिव्या. सणावाराच्या शुभेच्छा एक दोन दिवस आधीच पोचत. कारण त्या विशिष्ट दिवशी मेसेज pack चालायचं नाही (black-out days). साधारण एक मेसेज एक रुपया असं समीकरण. आता परिस्थिती बदलली आहे. रोमिंग, black out days इतिहासजमा झालेत. फुकटात कॉलिंग असल्याने मिस कॉल हि बंद झाला. आणि सोशल नेट्वर्किंग ने तर मेसेजिंग हि बंद करून टाकलंय.
बाजारपेठेचा विचार करणाऱ्या मोबाइल कंपन्या आणि सव्‍‌र्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यातच सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिसायला लागली. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात झाली. टाटा डोकोमो ने पर सेकंड बिलिंग योजना आणली आणि त्याचं अनुकरण करणं इतर कंपन्यांना सुद्धा करावं लागलं. जेवढे सेकंद बोलाल तेवढेच पैसे. एवढंच पुरेसं नव्हतं. त्याला इंटरनेट जोडलं गेलं  आणि स्मार्ट फोन चा प्रवेश झाला. फिचर फोन ला घरघर लागली. त्यात इंटरनेट ने आपल्याला वेड लावलं. नेट साठी मोबाईल कंपन्या भरपूर पैसा वसूल करत होत्या. त्याला आळा घातला तो जिओ नं.  जियोने जवळपास फुकट म्हणता येईल, अशा दरात मोबाइल सुविधा पुरवायला सुरुवात केली ते ही फोर जी. अत्यंत आक्रमक मार्केटिंग करीत जिओ मोबाइलच्या क्षेत्रात उतरले आणि प्रस्थापित मोबाइल कंपन्यांचे धाबे दणाणले. मग प्रत्येकाची स्पर्धा सुरू झाली ती सर्वाधिक ग्राहक कोणाकडे असतील याची. डेटागीरी सुरु झाली.
जिओच्या आगमनानंतर ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी मोबाइल सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये ग्राहकाला इंटरनेट डेटा अत्यल्प किंमतीत देण्याची चढाओढ सुरु झाली आहे. मोफत डेटा, मोफत कॉल्स अशा अनेक प्रलोभनांमुळे जिओच्या ग्राहकसंख्येत वेगाने वाढ झाली. कॅशबॅक च्या लोभापायी रिचार्ज करणारे काही कमी नाही.
खाता जेवता, उठता-बसता मोबाईलवर. जाताना-येताना अगदी रस्त्यावरून जातानाही याचा वापर केला जातो. सोशल नेट्वर्किंग वर पसरवलं गेलेलं खरं काय नि खोटं काय काहीच कळत नाही. फालतू विनोद, विडंबन तर सर्रास.
मोबाइल पोर्नोग्राफी, डेटिंग साइट, तासन्तास फोनवर बोलणं, चॅटिंग करणं असं सुरू झालं, व्ही.डी.ओ कॉल सुरु झालेत.  मोबाइलचा सामान्यांच्या रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू झालं. अशा प्रलोभनांमध्ये ग्राहक अडकत गेला. यामध्ये सगळ्यात सोपं लक्ष्य होतं तरुणांचं. त्यामुळे त्यांना आकर्षित करतील अशा कॅमेरा, म्युझिक अशा महत्त्वाच्या सुविधा त्यात तयार केल्या. किती सारे apps उपलब्ध झालेत. ४ जी ने विदाऊट बफरींग व्हिडीओ पाहणं सोपं झालं. मोबाईल मध्येच एवढी स्पेस यायला लागली कि मेमरी कार्ड चा वापर संपण्यात जमा आहे.   
पण आज आपण मोबाइलचा गरजेपेक्षा जास्त वापर करतो आहोत आणि या डेटा वॉरमध्ये मोबाइल सुविधा देणाऱ्या कंपन्या आपल्याला आणखीनच प्रलोभनाला बळी पाडून तो वापर वाढवताना दिसत आहेत.
अन्न,वस्त्र आणी निवारा या बरोबरच मोबाईल ही आजच्या काळाची  मूलभूत गरज बनत चालली आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. आज भाजीवाल्यापासून भिकाऱ्यापर्यंत, शाळेतील लहान मुलांपासून खेड्यातील म्हातार्यांकडे दिसतो. खायला अन्न नाही, राहायला घर नाही पण मोबाईल हवाच  अशी मानसिकता तयार झाली आहे. मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही.
channels ची स्पर्धा च पाहून घ्या. पूर्वी किती मिनिटे ब्रेक आहे हे माहित नसायचं. आता त्यांना आता सांगावं लागतंय. ये ढाई किलो का हाथ नाही, ढाई मिनिट का ब्रेक है किंवा स्क्रिन च्या उजव्या बाजूला दोन मिनिटांचा  time countdown  दाखवावा लागतो. टी.आर. पी. साठी काय नाही सुरु. तेच-तेच कथानक, अतिशोयक्ती, अंगावर मोजके कपडे घालून आकर्षित करण्याचा प्रयत्न, तर्क-विरहित कल्पना. सध्या तर त्या साउथ कडील फिल्म्स चा बोलबाला आहे. कुठलंही channel लावा ते दिसून येईल. बरं लॉजिक चा पत्ता नाही.  
हे सारं घडत असताना आपण कुठे आहोत. आपण तेच करत आहोत जे त्यांना हवं आहे. ते आपल्याला प्रलोभने दाखवतात आणि आपण बळी पडतो. सुरुवातीला फुकट, cashback वगैरे. मग हळू हळू पैसे वसूल केले जातात.
हेच काय. हॉटेल्स, lodge वगैरे पहा. फ्री वायफाय चे फलक लावलेले दिसतील. माणसाची लोभी वृत्ती कॅश केलीय त्यांनी.
हरवून बसलोय आपण स्वतःला या अर्थकारनात. पैसे असो किंवा नसो फक्त वापरा, खरेदी करा. मदतीसाठी बँकां हि सरसावल्या आहेत. पैसे नसतील तर ई.एम.आय., क्रेडीट कार्ड वगैरे.
प्रत्येकाला वाटतं आपण स्वतंत्र आहोत. पण आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे या लोकांनी. किती घरांमध्ये टी.व्ही. बंद करून एकत्र जेवणाची पद्धत आहे?  किती लोकं झोपताना मोबाईल बंद करतात? किती विद्यार्थी मोबाईल शिवाय अभ्यास करू शकतात?  संशोधनाचा विषय आहे. तंत्रज्ञानाशी आपलं नातं घट्ट झालं पण मानवी नातं सैल झालं.
संवाद-संपर्क क्रांती घडवून आणणा-या सोशल मीडियाने आज बहुतांश लोकांचे जीवन व्यापून टाकले आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर प्रचंड वाढलाय. आभासी चित्र निर्माण झालंय. एकटेपणा, नैराश्य वाढलंय. संवाद ढासळला कि हे प्रकार होणारच. सध्याच्या जगामध्ये किती काळ स्क्रीनसमोर असावे याचाही विचार असायला हवा. विरंगुळा म्हणून मोबाईल वापरणे नित्याचेच झाले आहे. आपण हि तेच करतो.
तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही.  स्माइलपेक्षा आता स्माइली महत्त्वाची झाली आहे. आताच्या पिढीवर हेच संस्कार होत आहेत. बदल झपाट्याने होत गेला. अर्थातच चांगल्या बाजू आहेतच. त्याबद्दल दुमत नाही. पण कुठली गोष्ट किती वापरावी, कशी वापरावी, आणि कशासाठी वापरावी याबद्दल जाणीव असणे गरजेचं झालंय. हे करत असताना माणसाचा माणसाशी असलेला संवाद टिकला पाहिजे तो फक्त व्हर्चुअल पुरता मर्यादित असता कामा नये.

Friday, October 26, 2018

बदलता काळ, बदलते संबंध -३


जसा काळ बदलला, तसा माणूस बदलला. मनोरंजनाची अफाट साधने निर्माण झाली. पूर्वी ती नव्हती तेव्हा लोकांमध्ये संवाद भरपूर असायचा. ग्रामीण भागातलं चित्र पाहिलं तर ते प्रकर्षाने दिसून येईल. आता तंत्रज्ञान आलं. मनोरंजनाची साधने आली. आणि माणसाचा स्वभाव, वर्तन बदलत गेलं. पूर्वी संपूर्ण गावात एक-दोन टी. व्ही. संच. तेही फक्त दूरदर्शन. रेडीओ बर्यापैकी असायचा. विविधभारती चे कित्येक कार्यक्रम लोकप्रिय. ते जयमाला असो की सखी सहेली, पिटारा, संगीत-सरिता. खरं तर विविधभारती रेडियो वाहिनी ही प्रसिध्द झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे. बरंच काही बोलता येईल त्याबद्दल. क्रिकेटची मॅच जेव्हा असायची तेव्हा तेव्हा रेडिओची कॉमेट्री ऐकणे मजाच. मराठी समालोचन ऐकणे एक आनंदाची बाब असायची. चेंडु नुसताच तटवला ( प्लेड केला ), झेल घेतला ( कॅच घेतला ), धावबाद ( रन-ऑउट ), यष्टीरक्षक ( विकेटकिपर), गोलंदाज/ गोलंदाजी ( बोलर/ बोलींग ) हे शब्द तर ऐकणे आता दुरापास्त झाले आहे.
अलीकडच्या काळात सारं बदललं. प्रत्येकाच्या घरात टी.व्ही. चा प्रवेश झाला. टाटा स्काय, डिश टी. व्ही. एअर टेल सारख्यांनी भरपूर channels उपलब्ध करून दिली. आज २००-३०० channels सहज उपलब्ध आहेत २००-३०० रुपयांमध्ये. 
रेडिओ रोजचा राहिला नाही. एफ. एम. रेडिओ सुरु झाला, पण त्याच्यामध्ये ती मजा राहिली नाही. त्यात मध्ये मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि फालतू जोकमुळे तर अजूनच वैताग. शहरांमध्ये तर कानात हेडफोन टाकून एफ.एम. ऐकणार्यांची संख्या काही कमी नाही. त्यात भर सार्वजनिक वाहतूक सेवेच्या बस मधील एफ. एम. ची. जिकडे-तिकडे फक्त गोंगाट. आपण हरवलो आहे या गोंगाटात. 
पूर्वी संध्याकाळी लोकं एकत्र यायची. चावडीवर, पारावर, कट्ट्यावर बसायची. हिवाळ्यात शेकोट्या पेटवून अवती-भवती बसेलेले लोकं नित्याचंच. गप्पा व्हायच्या. परिस्थिती बदलली आहे. आज तसं नाही. चावडी, पार ओस पडलेत. शेकोट्या अभावानेच आढळतात. कुणाच्याही घरी जा टी. व्ही. सुरु असतो. अख्ख कुटुंब टी. व्ही. त मग्न. कुठंय चर्चा, कुठंय संवाद. कुणी पाहुणे आले तर ते पण टी. व्ही. पाहण्यात मग्न. सिरिअल्स च तर विचारायला नको. त्यांची कल्पनाशक्ती तर कधी नव्हे तेवढी रसातळाला गेलीय. लॉजिक चा पत्ता नाही. सासू-सुना वाद असो कि अजून काही चोथा केलंय त्याच-त्याच गोष्टींचा. हातात मोबाईल तर नेहमीचाच. त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे कित्येक पालकांना ठाऊकच नाही. भारतात तर पाहता पाहता गरीब-श्रीमंत, मालक-कामगार, स्त्री-पुरुष , तरुण-तरुणाई या सर्वांच्याच कानाला मोबाइल लागला. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या आवाजात त्यावरून बोलणे, अश्लील एसएमएस पाठविणे, वाहने चालविताना अपघात होण्याची तमा न बाळगता त्याचा वापर करणे वगैरे वगैरे. सुद्धा ओघाने आलंच. 
लहान मुल रडतंय म्हणून त्याचा हातात मोबाईल देणार्यांची संख्या काही कमी नाही. त्यात कौतुक. त्याला सगळं कळत. यु.ट्यूब लावता येत वगैरे वगैरे. घरात पालकच हल्ली स्मार्टफोन वरील फेसबुक व वॉट्स अ‍ॅप सारख्या सुविधांमुळे घरातील आपला वेळ या अ‍ॅप्सवर घालवतात. जिथे पालकच आपलं दायित्व विसरून गेलेत तिथे काय अपेक्षा करणार. खेळण्या-बागडण्याच वय वाया चाललं आहे. मोबाईल दिल्याशिवाय तो/ती जेवतच नाही असे कित्येक लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतंय.
पूर्वी शाळेतून घरी आलो, दप्तर फेकलं कि बाहेर खेळायला जाणारी मुलं आज घरातच अडकली आहेत. आउट डोअर गेम्स ची जागा कम्प्युटर गेम्स/ मोबाईल ने घेतलीय. मैदानी खेळ सुटल्याने मुलं व्यायामाला मुकत चालली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत आहे.
जीवन हि रिमोट झालंय आजकाल. लोकं ही रिमोट झालेत. news channels तर विकाऊ झालेत. त्यांना जे हवं असतं तेच आपल्याला पाहावं लागतं. या सार्यांचा परिणाम आपल्यातला संवाद नाहीसा किंवा कमी होण्यात झाला. संवेदना कमी होत चालल्या आहेत. ईतरांशी काहीच देणं-घेणं उरलं नाही. कामापुरते काम. पुढच्या १०-१५ वर्षात गंभीर चित्र दिसेल. त्याचे परिणाम हि आपल्याला भोगावे लागतील. तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा हे ठरवावे लागेल. शिक्षण द्यावं लागेल. जागरुकता निर्माण करावी लागेल. अतिरेकी वापर थांबवायला हवा. एकत्र यायला हवं. चर्चा झडल्या पाहिजेत. संवाद झाला पाहिजे. 
                                                                                                                                                       सचिन भगत

Wednesday, October 24, 2018

बदलता काळ, बदलते संबंध -२


आपलं जीवन हा एक अखंड चालणारा प्रवास आहे. जो कसा जाईल, कुठं जाईल किंवा कधी संपेल काहीच माहित नाही. या प्रवासात अनेकांची साथ लाभते. काही सोबत येतात तर काही मागे पडतात किंवा पुढे जातात. पण प्रत्येक महत्त्वाचा. त्याच्यामुळे प्रवास सुखकर होतो किंवा सुलभ होतो. एकमेकांना घट्ट ठेवायचं काम संवाद करतो. त्यामुळे संवाद हवाच. जेव्हा जेव्हा तो लुप्त होतो तेव्हा तेव्हा तो परिणाम करून जातो. आजच्या हरवलेला संवाद आणि जीवनशैली माणसांमध्ये दुरावा निर्माण करत आहे. संवाद म्हणजे संवेदनशील होणं. संवेदना आली की संवाद सुदृढ होतो.
समर्थ रामदासस्वामी मनाच्या श्‍लोकात सांगतात:
तुटे वाद, संवाद त्यातें म्हणावे|
विवके अहंभाव याते जिणावे॥
अहंता गुणे वाद नाना विकारी|
तुटे वाद, संवाद तोे हीतकारी॥
प्रत्येकाच्या आयुष्यात हे सारं कमी-अधिक फरकाने आलंच.तंत्रज्ञानाच्या जगात ढासळत्या संवादाचे कित्येक उदाहरणे सांगता येतील. जळगाव ला पदवीच्या पहिल्या वर्षाला होतो. काही काळ नातेवाईकांकडून अप-डाऊन सुरु होतं. कॉलेज ते बस-स्टोप पायीच चालत जात होतो. कित्येक विद्यार्थी हाच कित्ता गिरवत. तसंही कला शाखेकडे जाणारे बहुतांशी गरीब घरातलेच. त्यांना ऑटो वगैरे परवडणारं नव्हतंच. बस स्टोप जवळच एक मंदिर आहे. बस ला वेळ असली की त्या मंदिरात मी बर्याच वेळ घालवत होतो. म्हणजे तिथे बसून निरीक्षण. सुसाट वेगानं जाणार्या गाड्या, फेरीवाले, ऑटोवाले,फुटपाथवर ची लोकं, त्यांची चाललेली धडपड अनुभवता येत होती.  कधी पैसे असलेच तर भुईमुगाच्या शेंगा घ्यायचं आणि ते खात  आपला वेळ घालवायचा. तसं ते नित्याचंच. असंच एकदा पायी चालत असताना तो भेटला. त्याची नी माझी पाहिली ओळख त्या भुईमुगाच्या शेंगा खातानाच. तिथेच मला तो गवसला थोडाफार. हळू-हळू भेटी गाठी वाढल्या. विचारांची आदान-प्रदान झाली. तसा तसा तो मला गवसत गेला. तो वेगळाच होता. त्याचे विचार वेगळे. त्याचं राहणीमान अतिशय चांगलं. ताप-टिप कपडे, डोळ्याला चष्मा, शर्टिंग केलेली, पायात शूज वगैरे वगैरे. कपड्यांचा शौकीन. पण काय कुणास ठाऊक तो भेटला आणि जीवनाचा एक भाग बनून गेला. किती चर्चा रंगल्या असतील, भविष्याची स्वप्ने पाहिली असतील. त्याला मी विवेकानंद म्हणत होतो. कुठल्या मुलीबद्दल बोललेलं चालायचं नाही. नेहमी गंभीर. आणि माझा आणि गंभीरते चा संबंध नव्हता. त्याला किती वेळ चिडवलं असेल मुलींवरून. चुकीचा समज आहे तुझा असं म्हणून तो टोलवून लावायचा.  कधी कधी फालतू विनोद केले तर  तो खूप हसायचा.
नॉन-व्हेज चा विषय सोडला तर तो ईतर कुठल्या गोष्टींवर भरभरून बोलतो याची उत्सुकता राहायचीच. प्रत्येक गोष्टींवर चर्चा व्हायची. पण या छोट्या-मोठ्या गोष्टींमधून मला तो उमगत गेला. त्यानं ठरवलं कि ते होतच असे. हुशार होताच. धीरगंभीर...मग्न . त्याच्या अभ्यासात आमच्या सारखे अडथळे नव्हते. मर्यादित जग. कमी बोलणं. त्याच्या घरी पण कित्येकदा जाणं झालं. त्याच्या कित्येक पर्सनल गोष्टी माहित होत होत्या. काही अपेक्षित काही अनपेक्षित. त्याच्या कौशल्यांवर विश्वास होता. माझ्या आधी तो यशस्वी होईल असं माझं अंतर्मन सांगत होत आणि त्याला मी कित्येकदा सांगितलं आणि झालंही तसंच.  माझ्या आधी त्याची नौका किनार्याला लागली होती. मनीषा पूर्ण झाली होती.माझा प्रवास अडथळ्यांची शर्यत पार करत होता. किनार्यावर जाईल कि नाही याची शास्वती नव्हती.  
सगळं काही आलबेल होतं असंही नाही. समज-गैरसमज ने कधी पाठलाग सोडला नाही आणि त्यातून एक अंतर निर्माण झालं, पोकळी निर्माण झाली. आणि संवाद ला उतरती कळा लागली . बराच काळ लोटलाय. त्याचं मजेत सुरु आहे असं ऐकिवात आहे. आज लिहायला घेतलं आणि त्या भूतकाळात तो भेटला.. तो भेटला मला त्या महाविद्यालयात, त्या बस स्टोप जवळ. त्या पहिल्या भेटीपासून ते त्या विद्यापीठापर्यंत. कित्येक वर्षे तो आसपास होता.आधार होता. चांगल्या-वाईट गोष्टींचा साक्षीदार होता. आमची नौका पुढे जाण्यात तो हि एक भागीदार.
कुठलंही नातं टाकाऊ नव्हे तर टिकाऊ असलं पाहिजे. सारं काही आलबेल नाही म्हणून कुणाचं सहकार्य, योगदान किंवा मोठेपण नाकारता येत नाही.

 “ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की " आता हा असा का वागला ?"” – व. पु. काळे
संवाद कमी झाला कि गैरसमज वाढतात आणि गैरसमज झालेत कि संवाद बंद होतो.
सचिन भगत

Monday, October 22, 2018

बदलता काळ, बदलते संबंध-१

कित्येक वर्षानंतर आज एका मैत्रिणीसोबत बोलणं झालं. साधारण १०-१२ वर्षे झाली असतील. फेसबुक ने बरं केलंय. जुनी-पुराणी नाती जपलीय. व्हर्चुअलि का होईना. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यात. बोलता बोलता ती म्हणाली-“तु contact ठेवले नाहीस.” आमच्या संभाषणातील फक्त हेच वाक्य माझ्या डोक्यात राहील.
खरंच असं झालंय का? मी विचारात मग्न झालो. नकळत मी कित्येक वर्षे मागे गेलो, भूतकाळात गेलो . समोर असलेली काम सुरु होतं पण माझं मन भूतकाळात रमल होतं.
खरं आहे ते पण. बाहेर च्या जगात आल्यापासून कित्येक लोकं जोडली गेलीत. काही थोड्या काळासाठी तर काही कायमस्वरूपी. काही कामानिमित्त जोडले गेले, काही वैचारिक साम्यतेमुळे तर काही स्वार्थासाठी. त्यात मी पण अपवाद नाही. माणसाचं जीवनच असं आहे. आता जो तो आपापल्या संसारात मग्न आहे. ध्येय वेगळे आहेत. कधी तरीच संपर्क होतो. एकेकाळी खूप जवळ असलेली लोकं इतकी दूर गेली आहेत कि परतीचे मार्ग बंद झालेत. कित्येक कारणे असू शकतात. कोण चूक हा प्रश्न बाजूला. कधी माझं चुकलं असेल कधी त्याचं चुकलं असेल. त्यातून संवाद कमी कमी होत गेला आणि आता पूर्ण बंद.  
८-१० वर्षे मागे गेलो तर ती सारी मंडळी आसपास दिसून यायची. चर्चा, वादविवाद, फिरस्ती सर्व काही चालायचं. एकमेकांबद्दल जिव्हाळा होता, प्रेम होतं , आसक्ती होती. काळाच्या ओघात ते हळू हळू नाहीसं झालं. संवादाची साधने वाढली. सोशल नेट्वर्किंग, मोबाईल क्रांती नं आपण सारे जोडले गेलो व्हर्चुअलि. पण संवाद लुप्त झाला.साधने आहेत पण संवाद नाही. पूर्वी बरंच होतं. संवादाची साधने कमी होती पण संवाद होता. भेटण्या-बोलण्याची उत्सुकता होती. आता ती उत्सुकता संपलीये. मोबाईल मध्ये नंबर आहे पण तो कधी डायल चं होत नाही. बरं आता तर फुकटात कॉलींग आहे. विशिष्ट प्रसंगी फक्त शुभेच्छांच फोरवर्डीग  सुरु आहे. मेसेज केला की झालं. कुणालाही फोन करावसं वाटत नाही. हीच मानसिकता झालीय प्रत्येकाची. मी पाठवलेला मेसेज मला किमान १५-२० जणांकडून वापस येतो. चक्र सुरु आहे. ते coinbox होते तेव्हा coin संपेपर्यंत बोलणारे आम्ही. आता तर डायल बोटावर आलंय. ते कष्ट ही कशाला. त्या गुगल असिस्तंत ला सांगितलं तरी फोन लागतो. पण नाहीच होत ते.   एका क्लिक वर आहे सारं. पण मनातून क्लिक होत नाही. आणि जो पर्यंत मनातून क्लिक  होत नाही तोपर्यंत हे व्हर्चुयल क्लिक निष्क्रिय. आपण दूर गेलोय एकमेकांपासून. सगळं आदान-प्रदान व्हर्चुअलि. आपण गुंतत चाललो आहे. संवेदना नष्ट होत चालल्या आहेत. तंत्रज्ञानाने आचार-विचार बदलून टाकले आहेत. एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय ते आता सोशल नेट्वर्किंग वर कळायला लागलंय. लाईक वर लाईक सूर आहे.  मात्र नको इतका तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने संवाद साधायला वेळ मिळेनासा झालाय. सजीव नात्याची प्रेमाने विणलेली घट्ट गुंफण तंत्रज्ञाने विस्कटली. प्रत्यक्ष संवादातून निर्माण होणारा जिव्हाळा तंत्रज्ञानाच्या संवादाने दूर गेला. सोशल नेट्वर्किंग वर हजारो मित्र आहेत, मोबाईल मध्ये हजार contact असतील. पण त्याचा काय फायदा?

गेल्या १०-१५ वर्षात किती लोकं जोडली गेली आणि किती दूर गेली याची सांगड घालत होतो. जी नवीन जोडली गेलीत ती व्यावसायिक कारणाने. जी दूर गेलीत ती आपल्या आचार –विचार, अहंकार यामुळे. माझं मन मला सांगत होतं. यश-अपयश, समाजातलं स्थान, आर्थिक सुबत्ता असे अनेक अडथळे नाते-संबंधात निर्माण झाले आहेत आजकाल. त्यामुळे नाती टिकवणं अवघडच.
पूर्वी कसं होतं. सुख-दु:खात सहभाग होता. पाठबळ, पाठींबा होता. सहवास होता. संवाद होता.  थोडक्यात सपोर्ट सिस्टम होती. हसणं-खेळणं होतं. प्रेरणा होती. आपण यशस्वी व्हायला पाहिजे असं वाटणारे शुभचिंतक होते. नाती सहज तोडता येतात. पण नात्यामुळे निर्माण झालेल्या आठवणी नाही पुसता येत. त्या आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनून राहतात. जवळीकतेणे नातं अथवा मैत्री होत नाही. कुठलंही नातं प्रगल्भ व्हायला मोठा काळ जातो. त्या काळात जे टिकलेत ते टिकलेत.  काळाच्या कसोटीत तावून सुलाखून बाहेर पडणं तसं कठीणच. खांडेकर उगाचच नाही म्हटले: “जग जिकंण्याइतंक मन जिकणं सोप नाही!”
जळगाव मध्ये पदवी ला असताना काही चांगल्या लोकांचं सानिध्य लाभलं. कठीण वाटणारा प्रवास त्यांनी प्रवास सोपा केला. प्रचंड उलथा-पालथी चा तो काळ. शून्यातून सुरु झालेली वाटचाल आणि त्या मार्गात येणारे अडथळे अथवा समस्या. याच आस-पास च्या लोकांनी त्या समस्या उपटून फेकायला मदत केली. व. पु.च्या शब्दात: “प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.” तेच अनुभवलंय. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं महत्त्व आहेत. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण देऊन जाते. एका काळासाठी लाइफ-लाईन बनून जाते. उपयोगिता संपली कि नातं संपलं. असं झालंय का? बरं तसं झालंय तर प्रत्येकासोबत का होत नाही. जर-तर ..चा काय फायदा? वि. स. खांडेकर म्हटलेत: “जर आणि तर ! शब्दांची सुंदर प्रेते ! हे शब्द कोषातून काढून का टाकत नाहीत?” एकेकाळी अत्यंत जवळ असणारी कित्येक लोकं एवढी दूर गेलीत कि ती आता दिसेनासी झालीत. टाळी एका हाताने वाजत नाही असंही म्हणतात. त्यात जायला नको. मेलेले मुडदे उकरण्यात काही अर्थ  नाही

विचार थांबत नव्हते. मन अशांत होतं. मेंदू उत्तराच्या शोधात होता. प्रश्नाची गर्दी झाली होती. उत्तर शोधता-शोधता निद्रेचा विजय झाला आणि दुसर्या दिवशी याचा मागमूस ही नव्हता. समोरचे प्रश्न वेगळे आहेत. उत्तरे ही मलाच शोधायची आहेत. प्रश्न आणि उत्तर या चक्रात गुरफटून गेलोय. कित्येक अनुत्तरीत आहेत. व. पु. नी म्हटलंय: “प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...”

सचिन भगत

Friday, October 12, 2018

अनुभव ६


अभियांत्रिकी कडे वळण्याआधी मी एका वरिष्ठ महाविद्यालयात सी. एच. बी. वर वर्षभर जॉब केला. या काळात भरपूर अनुभव आले. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून गेला. वृत्तपत्र पदविका सुरु होती. त्याचे तास संध्याकाळी असायचे. त्यामुळे सी. एच. बी. वर जॉब मिळतो का याची शोध-शोध सुरु होती. एका मित्राकडून एका महाविद्यालायचा संदर्भ मिळाला. त्याने आधीच बोलणं केलेलं होतं. ठरलेल्या दिवशी मी त्या महाविद्यालयात पोचलो. डेमो झाला. आणि सी. एच. बी. वर जॉब मिळाला. सकाळी सात च्या आसपास विद्यापीठ सोडावं लागत होतं. सी. एच. बी. असलो तरी कॉलेज सुटेपर्यंत थांबावं लागे. विद्यापीठापासून ८-१० किमी असेल कॉलेज. कधी-कधी पैसे नसले कि सकाळी लवकर उठून पायीच मार्गक्रमण व्हायचं. तीन-चार वेळेस पैदलवारी झालीय. एवढं चालून काय शिकवण्याची स्थिती राहील. पोट भरल्याशिवाय डोकं चालत नाही. कॉलेज संपल्यावर डबे जायच्या आधी यावं लागे विद्यापीठात. सारी कसरतच. आयुष्यातला एक काळ असतो. त्याला सामोरे जायचं फक्त. तो काही कायम राहत नाही.
सी. एच. बी. वाल्यांचे प्रश्न किती गंभीर असतात त्याची जाणीव झाली. कदाचित त्यामुळेच सी. एच. बी.वर जॉब करायचा नाही हे ठरवता आलं. एक तर त्यांचे पैसे वर्षभर मिळत नाही. किती चकरा व्हायच्या त्या अकाऊंट सेक्शन ला. पण काही उपयोग नाही. बर विभागप्रमुख फक्त आश्वासनं द्यायचा. पण कधी लवकर पैसे मिळावेत असा विचार त्यांनी कधी केलाच नाही. कायम स्वताबद्दल बढाया मारण्यात गुंग. माझे खटके तिथेच उडाले. मी पाठपुरावा कधी सोडला नाही. त्या अकाऊंटवाल्या  बरोबर वाद ही झाला. तिथे दोन प्राध्यापक होती. एक अनुपस्थितीत असला कि त्याच्याबद्दल दुसरे महाशय माहिती पुरवत.  असं नेहमी व्हायचं. चांगलं तर सांगतच नव्हते हे उघड च आहे.  
तिथे बरेच निवृत्त प्राध्यापक यायचेत. तास घायचे. एकदा तिथे एक कॉन्फरन्स आयोजित केली होती. रिसर्च पेपर चे पुस्तक छापणार होते. कॉन्फरन्स ला ईंग्रजी विषयाचे एक मोठे व्यक्ती उपस्थित राहणार होते. त्यांचा रिसर्च पेपर बनवायचा होता. त्या विभागप्रमुखांनी एका निवृत्त प्राध्यापकाला बोलावलं आणि पेपर तयार करून द्या असं सांगितलं. त्यांनी  laptop उघडला आणि गुगल सर्च सुरु झालं. जे जे मिळालं ते कोपी होत गेलं. साधारण एक-दीड तास फक्त कॉपी आणि पेस्ट सुरु होतं त्याचं. ३५-४० पेजेस झाले असतील. मग सुरु झालं एडिटिंग. आणि रिसर्च पेपर तयार झाला.  तीन तासात रिसर्च पेपर तयार. संशोधन काय आहे? लाखो लोकं एम.फिल. पी.एच.डी. होतात वर्षभर. हीच काय ती प्रक्रिया. आपण सगळे सारखेच. खरं संशोधन करणारे क़्वचितच. त्या निवृत्त प्राध्यापकाची कीव यायची कधी कधी. किती हाव असावी. निवृत्त झालास ना आता. सन्मानाने जग. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.  असो.
तिथे distance लर्निंग पण होतं. दर रविवारी तास असायचे. पण कधी झालेत माहित नाही. एकही विद्यार्थी कधी आला नाही. ते यायचे फक्त परीक्षेला. प्राध्यापकांची बिले मात्र निघत राहिली. वाईट अवस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोग असो, NAAC असो. काय करतात माहित नाही. ग्रेडिंग कशावर देतात. नियंत्रण काय. कसलाच पत्ता नाही.
मला कित्येक गोष्टी पटत नव्हत्या. मला जे वाटेल ते मी करत गेलो. त्यामुळे दुसर्या वर्षी मला काय ठेवणार नाहीत मला माहित होतं. मी त्यांना भेटायला गेलो. “सचिन, आपल्या बाजूच्या महाविद्यालयात सी. एच. बी. व्याख्याता वर पाहिजे”, असं मी काही न बोलता त्या विभागप्रमुखांनी सांगितलं. मी फोन केलाय तिथे. आदर म्हणून मी हो ला हो केलं. आणि त्या कॅम्पस मधून बाहेर पडलो.
ते महाविद्यालय जवळच असल्याने त्यांनी सुचविलेल्या महाविद्यालयात गेलो. जायला काय हरकत आहे. प्राध्यापक महिला विभाग प्रमुख होत्या. त्यांना भेटलो. त्यांनी तारीख दिली डेमोची. ठरलेल्या दिवशी मी डेमो द्यायला गेलो. आम्ही दोन उमेदवार होतो. दुसरी उमेदवार महिला होती. आधी तिचा डेमो झाला आणि नंतर माझा. ती जे काही बोलली ते अर्धवट आणि कधी मराठीत तर कधी हिंदीत तर क़्वचित इंग्रजीत. त्यामुळे मला तो जॉब मिळेल अशी खात्री झाली. त्यामाने माझा डेमो चांगला होता.  “नंतर कळवते मी”, असं त्या विभागप्रमुख म्हणाल्या. मी विद्यापीठात निघून गेलो. संध्याकाळी मला त्यांचा मेसेज आला. मेसेज खूप मोठा होता. तो मेसेज असा: Dear Sachin. I am sorry. You are the right choice but I can’t appoint you. Another candidate is the daughter of a professor who is a BOS member. He called me in the morning and I said, yes. He has promised me to approve my candidature as the authorized guide of Pune University. I have been trying for it since a couple of years and I don’t want to lose this chance. Once again, sorry.  All the best for your future.
त्या बाईचा मेसेज वाचला. काही का असेना त्या बाईन खरं सांगून टाकलं होतं. तेवढा प्रामाणिकपणा कायम होता. मी काही उत्तर दिलं नाही. पण तो मेसेज मी कधीच डिलीट केला नाही.  योगायोग असा कि ती बाई ज्या व्यक्तीबद्दल बोलत होती ते माझे एम.फिल चे गाईड होते. माझं एम.फिल. अजून बाकी होतं. काहीच बोलू शकत नव्हतो. त्यामुळे मी तो विषय सोडून दिला. प्रत्येक व्यक्ती आपले हितसंबंध जोपासण्यात मग्न आहे. सत्ता आणि पैसा असला कि काहीही करता येतं.. उच्च शिक्षणात काय सुरु आहे यावरून आपल्याला अंदाज येईलच. संशोधनाची दुरावस्था झालीय. संशोधन नाही तर प्रगती कुठून येणार. असे अनेक प्रकार सुरु आहेत. राजकारण घुसलय शिक्षण-क्षेत्रात.  त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयात सी. एच. बी. साठी प्रयत्न केले नाहीत. त्या विभागप्रमुखांचे  धन्यवाद. त्यांच्यामुळे वेगळ्या वाटेन जाता आलं. विचार करता आला. परत कधी भेट झाली नाही. माझ्या मित्राने बर्याच शिव्या घातल्यात मला. तुला शांत नाही बसता येत. तू कधी सुधारणार नाहीस म्हणे. वगैरे वगैरे.  व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.

हा प्रश्न माझाच नाही. कित्येक तासिका तत्त्वावर काम करणार्यांचे हेच हाल आहेत. निमुटपणे सहन करतात. जे बोलतात ते बाहेर फेकले जातात. आपण सिस्टम बदलण्याच्या गोष्टी करतो. पण लोकं एवढी निर्ढावलेली झाली कि त्यांना काहीच फरक पडत नाही. आजही कित्येक प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करत आहेत. कधीतरी जागा निघेल आणि त्याचं काम होईल या आशेवर. आशा फार वाईट. ती करायला भाग पाडते. आणि आपण करत जातो, सहन करतो. बदल कधी होईल? माहित नाही.

Tuesday, October 9, 2018

त्याची गोष्ट (उत्तरार्ध)


ऑल अनिमल्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल दन अदर्सत्याच्या डोक्यात हे वाक्य कायम फिरत राहत होतं. इक्वल म्हणजे इक्वल. आता हे मोअर इक्वल कुठून आलं. त्याला काही कळेना. वाचनात आलेलं किती सारं आठवत होतं. अटचमेंट इज द सोफ्ट पोइझन (Attachment is the soft poison). खरंच आहे ते. तिच्यात गुंतलो नसतो तर किती बर झालं असतं. There is always some madness in love. But there is also some reason in madness. यावर त्याच्या विश्वास बसला होता.
ऊन डोक्यावर आलं होतं. आजूबाजुच्या शेतामधले लोकं काम करत होती. त्याचं निरीक्षण कधी थांबल नाही. काय जीवन आहे या लोकांच. उन-वारा-पाऊस वगैरे काही पण असो काहीच फरक पडत नाही. धावत असतात सतत. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. त्याचं जीवनमान तो पाहत होता. वर्षानुवर्षे शेती करणारे अजूनही आहे तिथेच आहेत. त्यात काहीच फरक पडलेला नाही. त्यांच्याकडे पाहून त्याला हेवा वाटे. कितीही अडचणी आल्यात तरी त्यांचा प्रवास सुरु आहे. त्याच्या बाबतीत मात्र वेगळच घडलंय. कुठं थांबावं हे कळायला पाहिजे असं त्याला कित्येकदा वाटे.  पण तो अस्तित्ववाद त्याचा पाठलाग काही सोडेना. तो बेकेट नाही का काही तरीच बरळला...
Where I am, I don't know, I'll never know, in the silence you don't know, you must go on, I can't go on, I'll go on.
मनुष्याचं जीवन च निरर्थक आहे म्हणतात. It is meaningless. It is futile. It is absurd. वगैरे काहीतरी.
दिवसामागून दिवस जात राहिलेत. त्याची मानसिकता काही बदलेना. स्वतःच्या आयुष्यात तो गुरफटत गेला. दुनियेत काय चाललंय याचा मागमूस नाही.  विचारांची गर्दी झाली होती. तो सार्त्रा नाही का म्हटला-“I am. I am, I exist, I think, therefore I am; I am because I think, why do I think? I don't want to think any more, I am because I think that I don't want to be, I think that I . . . because . . . ugh!” तो स्वतःशीच पुटपुटत होता कित्येकदा.  तो ओमर खय्याम तर त्याला प्रचंड भावला. त्या रूबायत मधल्या ओळी आठवल्या की त्याला हायसं वाटे:
Oh threats of Hell and Hopes of Paradise!
One thing at least is certain - This Life flies;
One thing is certain and the rest is Lies -
The Flower that once has blown forever dies.”
त्या वर्षी पावसानं दांडी मारली ती मारलीच. उपजीविके पुरत ही निघालं नाही. दोन-तीन वर्षापासून पिक कर्ज ही थकलेलं. त्याची उमेदच गेली होती. त्याला कशातच रस नव्हता.  शेतकऱ्यांच जीवन जवळून पाहत होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारे ए.सी.त राहतात आणि ए.सी. गाडीत फिरतात. सार्या हवेतल्या गप्पा असतात. नेते मोठे झालेत आणि शेतकरी रसातळाला गेला. वृत्तपत्रांमधून विकासाच्या गप्पा, चर्चा व्हायच्या. प्रगती झालीय वगैरे. प्रत्यक्षात सगळं खरं नव्हतं.  नकळत तो तुलना करत होता.
कित्येकदा न राहवून तिचा विचार यायचाच. किती प्रयत्न केला असेल टाळण्याचा. पण शक्यच झालं नाही कधी. ती शेवटची घरी गेली तेव्हा हा शिवाजी नगरला तिला सोडवायला गेला होता. ती बस मध्ये बसून गेली. ती बस नजरेआड होईपर्यंत तो पाहत राहिला. त्याला जायचं होतं तिच्यासोबत तिच्या शहरापर्यंत. पण ती नाही म्हटली. वर्तमानातून-भूतकाळात फिरत होता.
काय करत असेल ती आता? ती खरंच सुखी आहे का? का तिच्या घरच्यांनी जबरदस्ती केली? त्या सार्त्रा चं वाक्य न कळत त्याच्या तोंडून निघे-  “You must be like me; you must suffer in rhythm.”
माय-बापाचा एकमेव आशेचा किरण तो. पण त्याचं काय झालं त्यांना कधी समजलं नाही. त्यांनी कधी विचारलं नाही. आपला पोरगा घरी तर आहे त्यातच त्याचं समाधान.
त्याचं गाव म्हणजे अतिशय छोटं खेड. एका कोपर्यात घडलेली घटना काही सेकंदात पूर्ण गावात. त्याच्याबद्दल असलेल्या चर्चा ही त्याला ऐकिवात होत्या. लोकांच्या नजरा त्याला सर्व काही सांगून जायच्या. रोल मॉडेल व्हायचं होतं पण उलट घडलं. कुणी आपुलकीने विचारे तर कुणी टर उडवण्यासाठी.  लोकांचं ते बोलणं, त्या नजरा..असह्य. तो अल्बर्ट खरंच सांगून गेलाय-“But in the end one needs more courage to live than to kill himself.”
या लेखकांच्या तत्त्वज्ञानाने तो पछाडला होता. वाचलेलं सारं काही आठवत होतं. ओठांवर येत होतं. स्वतःशीच तो बडबडत करत असे.

तो निझे नाही का काय म्हणत होता- One should die proudly when it is no longer possible to live proudly. किती छान बोललाय तो. कित्येक दिवस त्या  वाक्याने त्याचा पिच्छा पुरवला.  मानवी जीवनाचा नेमका अर्थ काय. कशासाठी जगतो आपण?  डू वुई लिव्ह टू सफर? सगळेच धावत असतात. कशासाठी? शेवट माहित असूनही हाव काही सुटत नाही. वेटिंग फॉर समथिंग? बट व्हाट इस समथिंग? नोबडी नोझ.
एके दिवशी तो शेतात गेला आणि परतलाच नाही. त्यानं आपलं जीवन संपवलं होतं. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळल तेव्हा चक्र फिरली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्याच्या खिश्यात एक चिट्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं..”मी लंडन ला चाललो आहे. वाट पाहू नका.” कुणालाच काही समजलं नाही. पोलीस दरबारी आकस्मिक गेल्याची नोंद झाली आणि फाईल बंद.
दुसर्या दिवशी “एका तरुण शेतकर्याची आत्महत्या” अशी बातमी वृत्तपत्रात झळकली. स्थानिक राजकीय नेते मंडळींनी तुटपुंजी मदत दिली. शासनाकडून काही नाही. घोषणा मात्र झाल्यात.
एक तरुण मुलगा गेल्याचं दु:ख ते कुटुंबच जाणो. नेमकं काय झालं. सगळे अनभिज्ञच. लोकांमध्ये कुजबुज मात्र सुरु राहिली. जो तो आपल्या परीने कथानक पसरवत राहिला. ज्याला काही माहित नाही तो पण सहभागी होत राहिला या चर्चेत. नको त्या गोष्टी चघळल्या गेल्या आणि भूतकाळ होऊन गेला.


Friday, October 5, 2018

अनुभव -५


अभियांत्रिकी मध्ये संभाषण कौशल्ये (Communication Skills) म्हणून एक स्वतंत्र विषय आहे. प्रत्येक विद्यापीठात आहे. काही ठिकाणी प्रथम वर्षाला तर काही ठिकाणी तृतीय वर्षाला असाच काय तो फरक. व्यावसायिक क्षेत्रामध्ये टिकायचं असेल तर संभाषण कौशल्ये अवगत केल्याशिवाय पर्याय नाही. फक्त ज्ञान पुरेसं नाही. ते व्यक्त करता यायला हवं. यावर जास्त भर आहे. कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करताना यालाच जास्त महत्त्व देतात. हा विषय शिकवायचा म्हणजे एक आव्हानच. एकतर विद्यार्थी फार गंभीरतेने घेत नाहीत आणि दुसरं म्हणजे आपण शिकवून तरी काय शिकवणार. मार्गदर्शन करण्यापलीकडे आपल्याकडे काय असते हो? ह्या सर्व गोष्टी स्वतःच कराव्या लागतात. जी काय थेरी असते ती दिसायला सोपी असते पण अनुकरण कठीण. विद्यार्थी बोलते झाले पाहिजेत. असे बरेच प्रयत्न सुरु असतात.
सुरुवातीला ते कसं शिकवायचं हे मलाच शिकावं लागलं. हळू-हळू त्यात बदल करत गेलो. अभियांत्रिकी मध्ये जॉब करत असताना अनेक आव्हानात्मक प्रसंग आलेत. त्यातला एक प्रसंग नेहमी आठवतो. मी एक अभियांत्रिकी महाविद्यालय जॉईन केलं होतं.
सुरुवातीला मला मेकनिकल थर्ड इयर मिळालं शिकवायला. विभागप्रमुखांनी बोलावलं मला. मी त्यांना भेटायला गेलो. टाईम टेबल घेतलं. त्यांच्या परीने ते काय करायला पाहिजे वगैरे मार्गदर्शन करत होते. आपलं हो-ला-हो सुरु होत. तेवढ्यात एक प्राध्यापक त्यांच्या कॅबीन ला आला आणि मला थर्ड इयर ला शिकवायचं नाही असं म्हटला. विद्यार्थी ऐकत नाही. शांत बसत नाहीत. चेहरा पडला होता त्या महाशयाचा. त्यांच्या चर्चेतून असं समजल कि ते प्राध्यापक गोल्ड मेडल होते विद्यापीठात. त्याची ती परिस्थिती पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. एकतर आपल्याकडे भारदस्त व्यक्तिमत्त्व नाही.  दोन डिविजन. ८० च्या आसपास विद्यार्थी संख्या प्रत्येक क्लास ची. ए मध्ये फक्त मुले. तर बि मध्ये चार-पाच मुली आणि उरलेले सगळे मुलं. त्यामुळे क्लास कंट्रोल कठीणच. त्यांना शिकवणे म्हणजे आव्हान होतं. बर्याच चर्चा ऐकून होतो त्यांच्या.
तो टाईम टेबल घेऊन कॅबीन कडे परत जाताना हातपाय गळून पडले होते. दुसर्या दिवसापासून क्लास घायचा होता. त्या दिवशी रात्री झोप आलीच नाही. यांनी मुद्दाम आपल्याला तो क्लास दिलाय. आपला गेम होणार असं वाटायला लागलं होतं. त्या प्राध्यापकाची परिस्थिती पाहून मलाही धडकी भरली होती. कम्प्युटर, आय.टी. दिली असती तर बर झालं असतं. कारण तिथे मुलींची संख्या जास्त. मुली त्या मानाने शांत असतात. मुली जास्त असल्याने मुलंही फार सुसंस्कृतपणे वागतात. पण तसं काही झालं नाही.
अभियांत्रिकी मधलं ते पहिल लेक्चर कसं विसरणार. नवीनच असल्याने युनिफोर्म नव्हता. मी प्राध्यापक आहे हे त्यांना कसं कळणार. तसंही माझ्याकडे कुणीही पाहिलं तर विद्यार्थीच समजणार.  युनिफोर्म किती महत्त्वाचा आहे ते समजल तेव्हा. बुडत्याला काठीचा आधार.  पण तो ही नव्हता.

दुसर्या दिवशी कॉलेज ला गेलो. काय शिकवायचं, कसं शिकवायचं यावर बराच विचार केला. एकतर या क्षेत्रात नवीन होतो आणि त्यात ही परिस्थिती. बेल होण्याआधीच मी तिसर्या माळ्यावर क्लास रूम बाहेर उभा राहिलो. बेल झाली आणि मी वर्गात शिरलो. हातात डस्टर आणि खडू. समोर जाऊन उभा राहिलो. गोंगाट सुरु होता. विद्यार्थी जोर-जोरात ओरडत होते. डेस्क-बेंच वाजवत होते. काही माझ्याकडे पाहून हसत होते. काय करावं मला सुचेना. कुठून येऊन पडलो इथ असं झालं.  एखादा प्राध्यापक समोर उभा आहे पण मुलं भिक घालत नव्हती.
थोडा विचार केला. खडू घेतला आणि बोर्डवर टोपिक च नाव लिहिलं.  आणि बोलायला सुरुवात केली . जसा-जसा मी बोलत गेलो तसा तसा क्लास शांत होत गेला. शेवटी हजेरी घेऊन क्लास मधून बाहेर पडलो तेव्हा वर्ग अतिशय शांत होता. काय बोललो ते माहित नाही. जी तयारी केली होती त्यातला एक ही शब्द बोललो नाही. नंतर कधीच अडचण आली नाही. दोन-तीन मुलं संध्याकाळी भेटायला आली. ते म्हटले, सर, छान होतं लेक्चर. आमचा क्लास एवढा शांत कधी राहत नाही.  मला थोडं बरं वाटलं. आत्मविश्वास मिळाला. तयारीविना मी कधीच क्लास ला गेलो नाही. आव्हानं असली कि माणसाचा कस लागतो. आपण काहीतरी करतो. नवीन शोधतो. शिकवण्याच्या पद्धती बदलतो. प्रगती आपलीच. खरं तर त्याचं क्लास ने मला आत्मविश्वास दिला. वेग-वेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्याच शिक्षकांना अनुभव समृद्ध करतात. तसा प्रसंग परत कधी आला नाही. खाजगी क्षेत्रात काम करताना पावलागणिक संघर्ष आहे. कायम स्वतःची कौशल्ये वाढवावी लागतात. वेळेनुसार बदलावं लागतं. ज्यांना जमते ते टिकतात नाहीतर बाहेर फेकले जातात. कौशल्यांना मागणी आहे. डिग्री फक्त नावापुरती असते. व्यावहारिक किंवा व्यावसायिक ठिकाणी त्या डिग्री ची किंमत शून्य.  आपण कुठल्या ठिकाणी किती काळ राहू हे सांगता येत नाही. आपली उपयोगिता संपली कि आपला टोयलेट पेपर व्हायला वेळ लागत नाही.                                                                                                  
                                                                                                                                                               सचिन भगत