मंगळवार...शेगाव ला
आठवडी बाजार भरतो. काही
झालं तरी बाजार चुकवला जात
नाही. हप्तभारासाठी जो काही
भाजी-पाला लागतो तो
घेऊन यायचा. आजूबाजूच्या खेड्यांमधील कित्येक व्यापारी, किरकोळ विक्रेते आपला माल
घेऊन येतात. दिवसभर विक्री करतात.
मी
नेहमी सकाळी जातो बाजारात. एकतर
गर्दी कमी असते, फार वेळ लागत
नाही. कित्येक नोकरी करणारे सकाळी बाजारात जाणे पसंद
करतात. मालाचा भाव थोडा
जास्त असतो. संध्याकाळी परिस्थिती उलट
असते. प्रचंड गर्दी असते. प्रत्येक विक्रेताला माल
संपवून परतीची घाई असते.
भाव पडलेले असतात.
ऋषीपंचमी निमित्त सकाळचं कॉलेज. सकाळी बाजारात जाता
आलं नाही. त्यामुळे दुपारी बाजारात गेलो.
भरपूर वेळ होता.
म्हणून जरा निवांत भटकंती करत
बसलो.
तसं
कुणाकडून काय घ्यायचं ते
ठरलेलं. तरीपण भटकंती म्हणून सारा बाजार पालथा घातला. टीनेजर पासून ६५-७० वर्षांच्या वृद्धापर्यंत विक्रेते आढळले. कुणी तंबू
ठोकलेले. तर कुणी
उघड्यावर. पायाला लागणाऱ्या चपला, बूट
ए.सि.त
विकल्या जातात आणि भाजीपाला सारख्या जीवनावश्यक वस्तू मात्र उघड्यावर. दुर्दैवी चित्र.
फिरता-फिरता त्या
बाजारात मला पुस्तकात शिकलेल्या कित्येक संकल्पना वापरात दिसल्या. संभाषण असो
की जाहिरात. लक्ष वेधून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. त्यातल्या कित्येकांचा पुस्तकांशी संबंध आला
नसेल पण जे
आपण वाचतो ते त्याचा वापर
करतात. समाजातील सर्व स्तरातील जीवन
जवळून अभ्यास करण्याचे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. या बाजारात आलेला प्रत्येक विक्रेता स्वतःच्या तर्हेने मालाची जाहिरात करत
असतो.
फळे
घ्यायची तर एका
आजोबांकडून. नेहमीच. बाजारात ते आपलं
दुकान थाटतात. हंगामानुसार आंबे, संत्री, मोसंबी, द्राक्षे, चिक्कू, बोरं, सफरचंद, कलिंगड, डाळिंब, किवी असे
कित्येक फळे विक्रीला आणतात. प्रत्येक मंगळवार ला
त्यांची भेट होतेच. एखाद्या वेळेस गेलो
नाही तर तुम्ही दिसले नाही
म्हणून विचारणारे ते गृहस्थ.
गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्याकडून खरेदी करत असल्याने चांगले ओळखीचे झालेत. पैसे
असले नसले तरी
अडचण नाही. घेऊन
जा...पैसे कधीपण द्या...हे त्याचं नेहमीचं वाक्य. सुरुवातीपासून त्यांच्या बद्दल कुतूहल. कित्येकदा त्यांच्याशी चर्चा करावी, गप्पा माराव्यात असं वाटायचं. वेळेअभावी कधी
जुळून आलं नाही.
काल
मात्र भरपूर वेळ होता.
साधारण तीन वाजले असतील. आजोबांची जायची वेळ
झाली होती. सकाळपासून ते
तीन वाजेपर्यंत थांबतात. त्यानंतर त्यांचा मुलगा थांबतो. १५-२०
मिनिटे त्यांच्याशी गप्पा मारल्यात. त्यांचे कित्येक पैलू कळाले. त्या दरम्यान त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य नजरेखालून घातलं. मध्ये-मध्ये मी
एखादं दुसरं विचारात होतो.
सत्तर च्या
आसपास वय. दहावी पास.
घरची परिस्थिती बेताची होती. लहानपणापासून काम
करण्याची सवय. कधी
शेतात तर कधी
पाव विकून घर-खर्चाला हातभार लावायचा. दहावीनंतर एदलाबाद ला
टेलिफोन ऑपरेटर म्हणून सरकारी नोकरी मिळाली होती. पण
३०० रुपये महिन्याला. म्हणजे १० रुपये दिवस.
आजोबांना मान्य नव्हतं. त्यामुळे ते रुजू
झालेच नाहीत. व्यावसायिक वृत्ती.
जस-जसं वय वाढत
गेलं तसं-तसं
व्यवसायाचा गणित उमगू
लागलं. व्यवसाय हेच चरितार्थाच साधन
झालं. व्यवसाय सुरु केला
तेव्हा भांडवल नव्हतं. थोडं-थोडं
करता करता ते
आता ते फळांचे विक्रेते आहेत.
आजोबांचा दिवस
सकाळी ५ वाजता सुरु
होतो. कुठल्याही परिस्थितीत ५.३०
ला अंघोळ. सहा वाजता सब्जी मंडित. तेथून माल
उचलायचा आणि बाजारात घेऊन
जायचा. स्थायिक दोन दुकाने पण
आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून ते
राबत आहेत. आता
वय झालं. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवते.चेहऱ्यावर च्या
सुरकुत्या, पांढरे केस, बोलताना लागणारा दम...सावळा वर्ण
असं बरंच काही
बोलकं. सफेद कुर्ता आणि धोती,
डोक्याला पांढरी टोपी असा
पेहराव. वय झालं म्हणून तरी
पण ते घरी
बसत नाहीत. गुडघे त्रास देतात. जास्त बसने होत
नाही आता असं
आजोबा सहज बोलून जातात. खूप
मोठं कुटुंब आहे. दोन
मुलं, तीन मुली.
सगळे विवाहित. नातू-पणतू.
कुणी शिकतंय. कुणी नोकरीला लागलं. आयुष्यभर काम
केलं पण मुलं
कधी कुणाच्या कामाला गेली नाही.
असं बरीच माहिती पुरविली आजोबांनी.
नियत
चांगली पाहिजे फक्त. बरकत
असते धंद्याला. हे दुकान म्हणजे पाच
एकर शेती आहे
असं आजोबा अभिमानाने सांगतात. पण मेहनत आहे.
ती करावीच लागेल त्याशिवाय पर्याय नाही.
धंदा
म्हटलं की नफा
तोटा आलाच. कित्येकदा वाहतुकीदरम्यान खराब
झालेली फळे कुणी
घेत नाही. ग्राहकांचे अनेक
प्रकार. पाच-दहा
रुपयासारखे घासाघीस करणारे काही कमी
नाहीत. गरीब असो
वा श्रीमंत हे मात्र ठरलेलं. हिच
लोकं मॉल मध्ये जाऊन
मागेल तेवढी किमत देऊन
वस्तू खरेदी करतात. रेट फिक्स्ड असा
बोर्ड दिसला की तोंडातून शब्द
निघत नाही त्यांच्या. स्टेटस चा
प्रश्न ही आलाच.
तिथे घासाघीस करणे म्हणजे कमीपना असे
विचार करणारे ही असंख्य. इथे
मात्र पाच-दहा
रुपयांसाठी ही लोकं
मेल्यागत करतात. कष्टाची किमत कमी
होत चालली आहे. त्याचं हे
द्योतक.
हि
कष्टकरी लोकं फार
शिस्तीचे. सवय ते
मोडत नाहीत.
इकडे
आपण सुशिक्षित. कधीही उठावं, कधीही झोपावं. चर्चा काय तर
मी चहा बंद
केलाय, सकाळी फिरायला जाणे सुरु
केलंय. डायेटीग सुरु आहे.
दीक्षित पाळतोय. इतका वेळ
जेवायचं. दोन-जेवणात एवढं
अंतर असावं वगैरे वगैरे. दोन-चार
किलो कमी झालं
की लगेच फेसबुक पोस्ट. पूर्वीचा आणि
आताचा. त्यावर येणाऱ्या लाईक/कमेंट्स ई.
प्रत्येक गोष्टीची जाहिरात. तेच आपलं
आयुष्य.
दुसर्या बाजूला कष्टकरी वर्ग. दोन वेळेस च्या जेवणासाठी
कायम झपाटलेला. संघर्षाचं जीवन जगणारा. सतत धावणं सुरु असते. त्याचं वजन हि वाढत नाही.
मग कसली डायेटीग अन काय? एखाद्या शेतकऱ्याने/कामगाराने दीक्षित फॉलो केल्याचं ऐकिवात नाही.
आपण
नोकरदार वर्ग. एकदा
ऑफिस ला जायचं आणि
बुड टेकवायचं. हालचाल नाही, काही नाही. तोच
आपला कम्प्युटर आणि माउस.
वाटलं तेव्हा चहा-नाश्ता. भरपेट नेहमी.
वयाच्या सत्तरीत असणारे हे
आजोबा सहज बोलता बोलता बरंच
काही शिकवून जातात. त्यांनी पुस्तके नसतील वाचली. पण समाज
वाचला आहे. लोकं
वाचली आहेत. जीवनाचं प्रत्येक पान
उलटवलं आहे. त्याचा आनंद
उपभोगलाय. अजून हि
सुरु आहे.
आपलं
काय...ठरलेली नोकरी. ठरलेलं वेळापत्रक. ठरलेली जागा. ठरलेलं काम.
बस. संपलं सारं.
फळ
विक्रीचा व्यवसाय हा तसा
सामाजिक दृष्ट्या नाक मुरडणाराच व्यवसाय. त्यामुळे सुशिक्षित लोकं
हाती तराजू घेवून फळ विक्रीसाठी बसलेले दिसत
नाही.
रस्त्याच्या कडेला किंवा गाडीवर फळे
विकणारे अनेक छोटे
विक्रेते आपल्याला आसपास आढळतात.
उन-वारा-पाऊस याची
चिंता न करता
त्यांचा व्यवसाय सुरु असतो.
हे आजोबा त्यांचे प्रतिनिधी. वयाची चिंता न करता
संसाराचा रहाटगाडा ओढताना चेहर्यावरच हास्य टिकवून ठेवलंय. शरीर साथ
देत नसलं तरी
इच्छाशक्ती प्रचंड आहे.
या
लोकांच्या आयुष्याकडे पाहिलं की जीवन
काय याचा अर्थ
उमगू लागतो. आपल्यापैकी कित्येक या आयुष्यापासून अनभिज्ञ.
(टीप: फोटो मुद्दाम कोलाज केलाय. परवानगी न घेता एखाद्याचा फोटो अपलोड करणे योग्य नाही म्हणून.)
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव