Sunday, August 30, 2020

गिग इकॉनॉमी (Gig Economy) म्हणजे काय?

अलीकडे व्यापाराचे स्वरुप बदलते आहे. जॉब चे स्वरूप बदलत आहेत. प्रत्येक कंपनी पैसे कसे वाचतील याचा विचार करते म्हणजे नफ्याचा विचार करते. प्रत्येक कामासाठी नवीन उमेदवार नियुक्त करणे  कंपनीला सुद्धा परवडणारे नाही. शोर्ट टर्म प्रोजेक्ट असतील, छोटे-मोठे काम असेल तर नवीन नियुक्ती करणे तोट्याचा सौदा. त्यामुळे नवीन नवीन शक्कल कंपन्या लढवत असतात. गिग इकॉनॉमी हा त्यातील एक प्रकार. त्याला टास्क इकॉनॉमी असेही म्हटले जाते. गिग इकॉनॉमी म्हणजे फ्री मार्केट सिस्टम. गिग हा शब्द स्लँग असून त्याचा अर्थ म्हणजे ठराविक कालावधीसाठी असणारे एखादे काम.  गिग हा शब्द संगीतकार वापरतात.

त्यात  कंपनी एखादे काम ठराविक कालावधीत व्यावसायिकाकडून करून घेते. त्यांचा करार असतो. ठराविक कालावधीत ते काम पूर्ण झाले की त्या व्यावसायिकाचा त्या कंपनीशी काही संबंध राहत नाही. अनेक लोकांना एखाद्या कंपनीत आयुष्यभर राहणे कदाचित आवडत नसेल तेव्हा ते फ्री-लान्सर म्हणून असे काम  किंवा प्रकल्प पूर्ण करून देतात कंपन्यांना. यात त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य असते. कंपनीत जायची गरज भासत नाही. असेल त्या ठिकाणाहून ते काम पूर्ण करतात. काम पूर्ण केल्यानंतर करारानुसार त्यांना त्यांचे देयक मिळते. भारतात सुद्धा गिग इकॉनॉमी जोर धरू पाहत आहे. डेटा अॅनालिटिक्स, कंटेंट रायटिंग, भाषांतर, निवड, विक्री, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, आर्किटेक्चर, अकाउंटिंग, कन्सल्टिंग असे अनेक गिग जॉब्ज दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत. कंपन्या आपले प्रकल्प आऊटसोर्स करत आहेत. 

गिग इकॉनॉमी  च्या विस्तारामागे अनेक कारणे आहेत. अनेकांना आपण करत असलेल्या कामाचा कंटाळा येऊ शकतो किंवा कंपनीत वेळेवर वेतन न मिळणे, प्रमोशन न मिळणे, वेतन न वाढणे  असे अनेक करणे असू शकतात ज्यामुळे लोकं या क्षेत्राकडे वळत आहेत. या शिवाय ज्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे ते असे अनेक जॉब्स एकाच वेळी करत असतात. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी. एकाच वेळी असे व्यक्ती अनेक कंपन्यांशी सबंधित असतात. त्यांच्या कामात लवचिकता असते. त्यांना मिळणारे काम अल्प किंवा दीर्घ काळासाठी असू शकते.

ज्यांना खूप परिश्रम करण्याची सवय असते त्यांच्यासाठी हे लाभदायक क्षेत्र. आजकाल अनेक कंपन्या अश्या कामाची संधी देत आहेत. कंपन्यांना सुद्धा कौशल्य असलेल्या लोकांकडून काम पूर्ण करवून घेता येते.

आजकाल अनेक वेबसाईट गिग जॉब्ज च्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यात ओला, उबेर, अमेझॉन अश्या अनेक कंपन्या आहेत.



प्रगत राष्ट्रांमध्ये गिग इकॉनॉमी वेगाने विस्तारत आहे. कौशल्य असणाऱ्या लोकांना प्रचंड स्कोप आहे. पारंपारिक नोकऱ्यांच्या मागे न जाता या क्षेत्रात सुद्धा करिअर करता येऊ शकते. गरज आहे ती कौशल्यांची.  तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून काम करता येऊ शकते. येत्या काही वर्षात गिग जॉब चे प्रमाण प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने याकडे संधी म्हणून बघितले पाहिजे. बदलत्या काळाशी जुळवून घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण  अडगळीत पडणार नाही.

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव